Tuesday, 11 October 2022

सुगरण

 || श्री स्वामी समर्थ ||


नुकताच दसरा झाला आहे आणि आता सर्वांनाच दिवाळीचे वेध लेगले आहेत . दिवाळी म्हंटली कि फराळ आलाच त्याशिवाय दिवाळी साजरी होऊच शकत नाही . सहज मनात आले कि ह्या दिवाळीला नेहमीपेक्षा आपण काही वेगळे पदार्थ करू शकतो का म्हणून जरा youtube वरती सर्च केले तर एक ना दोन असंख्य पदार्थांच्या रेसिपी दिसल्या . आता ह्यातील नेमकी कुठली करायची हा प्रश्नच पडला. 

आज आवर्जून ह्या विषयावर लिहिण्याचे कारण असे कि आज सोशल मिडीया मुळे जग खूप जवळ आले आहे. आपल्याच नाही तर जगभरातील , विविध प्रांतातील अनेक पदार्थ कसे तयार करायचे ते आपण अगदी घरात बसून शिकू शकतो . आपल्याला आज आपले नेहमीचे पारंपारिक पदार्थ तसेच अगदी सकाळच्या न्याहारी पासून ते संध्याकाळच्या जेवणामध्ये कुठले पदार्थ करावेत ह्याची सर्व माहिती सहज उपलब्ध होते .  

ह्यातील अनेक पदार्थ पाहताना एक गोष्ट आवर्जून लक्ष्यात येते कि ह्यातील प्रत्येक पदार्थ चवदार रुचकर असतोच पण त्याचे presentation पाहून हा पदार्थ करावा असे चटकन मनात येते . 

हे सर्व पदार्थ पाहताना एक जाणवले कि ह्यातील प्रत्येक पदार्थाला मग तो तिखट असो अथवा गोड बरच साहित्य जसे वेगवेगळे मसाले , धणेपूड , जिरेपूड , लसूण आले ,खडा मसाला ,अनेक पीठे असे अनेक जिन्नस लागतात . केक ची रेसिपी असो अथवा पुडिंग ची अनेक पदार्थ विकत आणावे लागतात . पदार्थात त्यातील एखादा चमचा जिन्नस लागतो मग उरलेल्याचे काय करायचे ? हा प्रश्न असला तरी  आत्ता ते हवेच असे होते .


जेवणात विविधता लागतेच , मुलेच काय आपल्यालाही जिभेचे चोचले आहेत . प्रत्येक गृहिणीने पदार्थ बनवताना आपल्या घरातील माणसांच्या आवडीनिवडी , त्यांची वये आणि प्रत्येकाची तब्येत ,पचनशक्ती ह्याचा सर्वांगीण विचार करून पदार्थ बनवले पाहिजेत . आपल्याला झेपेल ते करावे आणि रुचेल पटेल तेच खावे हे म्हंटले आहेच कि . प्रत्येक कुटुंबातील खाण्यापिण्याच्या आवडी , तसेच परंपरा वेगवेगळ्या असतात , जसे देशस्थ लोक प्रत्येक पदार्थात शेंगदाणे घालतात तर कोकणस्थ गुळ प्रत्येक गोष्टीत घालतात . असो प्रत्येकाची आवड वेगळी आहे आणि पदार्थ करण्याची पद्धत सुद्धा .

आज खाऊचा डबा , 100 प्रकारच्या भाज्यांचे प्रकार , 50 प्रकारचे गोड पदार्थ , अनेकविध प्रकारचे डोसे , इडलीचे प्रकार , घावने एक ना दोन अशी माहितीपूर्व पुस्तके अगदी दिवाळी अंक सुद्धा मिळतात . त्यातून वैविध्य पूर्ण अशी माहिती जरी आपल्याला मिळत असली तरी शेवटी  आपल्याला हवे ते आपण घ्यायचे हे महत्वाचे आहे . वेगळे पदार्थ नक्कीच करून बघायचे पण ते आपल्या कुटुंबाच्या आवडी जपत हेच सांगायचे आहे. 


तात्पर्य असे कि नवनवीन पदार्थ बनवायचे नाहीत का? तर असे अजिबात नाही आपल्या स्वयपाकात विविधता हवीच कि सारखे उपमा पोहे शिरा इडली डोसा हे तरी किती करणार . फक्त आपल्या तब्येती आणि आपली पथ्ये सांभाळून हे पदार्थ करावेत कारण ह्यातील मसाले किंवा अनेक जिन्नस महाग सुद्धा असतात . प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी आहे. 


स्वयपाक घरात स्त्रीचे राज्य असते. तो जणू तिचा बालेकिल्लाच असतो , त्यातील प्रत्येक वस्तूला तिच्या मायेचा परीस स्पर्श असतो . तेथील प्रत्येक वस्तुमध्ये  सासर आणि माहेरच्या आठवणी दडलेल्या असतात . स्वयपाक करण्याची कला पिढ्या बदलल्या तशी काळानुरूप बदलली आहे . दडपे पोहे आणि शिऱ्याची जागा आता पास्ता आणि केलोन्ग ने घेतली आहे. काळानुरूप आपण हे सर्व स्वीकारले सुद्धा आहे तरीही एक मनापासून वाटते कि आपला आहार नियमित असला पाहिजे , आपल्या पोटाला काय आणि किती झेपेल हे ज्याचे त्याला माहित असते ,हॉटेल मध्ये दिसणाऱ्या मसालेदार भाज्या कधीतरी बर्या वाटतात , रोज तश्या करून खाणे म्हणजे पचन संस्था बिघडवायला आमंत्रण .

घरातील स्त्रीला घरातील सर्वांच्या आवडी माहित असतात . घरात असणारे धान्य , भाज्या ह्यातून आपल्या कौशल्याने ती अनेकविध पदार्थ घरी सुद्धा करू शकते आणि सर्वांचे आरोग्य सांभाळू शकते .सरतेशेवटी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे नाही का?  कधीतरी बाहेर जाऊन खाणे ह्याला कुणीच नाही म्हणत नाही आपल्यालाही स्वयंपाकाला  सुट्टी मिळावी असे कधीतरी वाटतेच कि . पण ह्या सर्व प्रकारच्या रेसिपी रोज घरात करणे अवघड आहे इतकेच मला म्हणायचे आहे . प्रत्येक जण माझ्या मताशी सहमत असेल किंवा असलेच पाहिजे असे अजिबात नाही .कारण व्यक्ती तितक्या विचारधारा . 

ज्योतिष शास्त्राचा विचार करता ज्या स्त्रीचे चंद्र शुक्र उत्तम सुस्थितीत असतील तिला स्वयपाकाची आवड तर असेलच पण त्याची उतम कलात्मक मांडणी सुद्धा करता येयील. स्वयपाक घरात डोळ्याचे प्रमाण असते. सुगरण असलेली गृहिणी हातानेच न मोजता बरोबर मीठ तिखट घालेल , त्यासाठी मोजमापाची तिला आवश्यकता भासणार नाही . आपल्या आहारात अनेक भाज्या , कडधान्ये , पालेभाज्या , विविध डाळी धान्ये ह्याचे तसेच ह्या सर्वासाठी लागणारे आर्थिक नियोजन ,संतुलन करून घराचे आरोग्य जपणारी ती सुगरण म्हंटली पाहिजे . 

कोंड्याचा मांडा करून उत्तम संसार करणार्या आणि श्रीमती कमलाबाई ओगले ह्यांचे  शिष्यत्व मिळवणार्या माझ्या सासूबाई श्रीमती. सुशीला दीक्षित ह्यांना ला लेख समर्पित करत आहे. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment