|| श्री स्वामी समर्थ ||
आपले संपूर्ण आयुष्य हे एकाच गोष्टी भोवती फिरत असते ते म्हणजे “ पैसा “. आपल्या दिवसाची सुरवात आणि शेवट सुद्धा ह्याच गोष्टीवर अवलंबून असतो . “ पैसा “ जगायला दुय्यम आहे अशी कितीही वक्तव्ये आपण ऐकली तरी पैशाशिवाय आपण जगू शकणार नाही हे अंतिम सत्य आहे. भरल्या पोटीच सर्व गोष्टी सुचतात अन्यथा सर्व व्यर्थ आहे. पैसा खिशात असेल तर समाजात ,कुटुंबात मान असतो .
आयुष्य आज आहे तसे नेहमीच राहणार नाही त्यात प्रचंड उलथापालथ कधीही होऊ शकते हा मोठा धडा आपल्याला करोनाने दिला आहे . आज जगातील कित्येक देश दारिद्रय रेषेखाली आहेत . सध्या तर जागतिक मंदी आहे. रुपयाची घसरण रोज होताना आपण पाहत आहोतच . थायलंड सारख्या देशात तर कुटुंबातील सगळ्या लोकांनी काम केल्याशिवाय त्यांचे घर चालणे कठीण असते . पुढील १० वर्षातील नोकर्यांचा प्रश्न किती गंभीर असू शकतो हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे .
ह्या सर्व पार्श्वभूमीवर एक विचार पुढे येतो तो म्हणजे आज कुटुंबात अर्थार्जनाचे अनेक स्त्रोत निर्माण करणे गरजेचे झाले आहे . नुसत्या एकाच्या नोकरीवर आपल्या कौटुंबिक गरजा भागवणे दिवसागणिक कठीण होत आहे . आयुष्यात कधीही काहीही होऊ शकते . कुटुंबप्रमुख एकटाच मिळवत असेल आणि त्याच्यावर काही संकट आले तर त्या कुटुंबाची आर्थिक दृष्टीने ससेहोलपट होणार हे नक्की .
म्हणूनच आज एक विचार मांडावासा वाटतो कि “ Multiple Income Source Is a need of an hour “. माननीय पु. ल. देशपांडे ह्यांनी म्हंटले आहे कि पोट भरण्यासाठी नोकरी करावी पण असा एखादा छंद जोपासावा जो तुम्हाला आयुष्य खर्या अर्थाने जगायला शिकवेल ,आनंद देईल. आजची आर्थिक परिस्थिती बघता असे म्हणावेसे वाटते आहे कि आपल्यातील सुप्त गुण ओळखा त्याचे नुसतेच छंदात रुपांतर न करता त्यातून अर्थार्जनाचा स्त्रोत कसा निर्माण करता येयील ह्याकडे लक्ष द्या.
आज आपल्यातील अनेक स्त्रिया उत्तम सुगरणी आहेत त्यांनी त्यातून खरच अर्थार्जनाचा स्त्रोत तयार केला तर पैसे तर मिळतील पण स्वतःची एक नवी ओळख निर्माण होईल , वेळ छान जायील आणि मन शांत आणि व्यस्त राहिल्यामुळे आरोग्य उत्तम राहील. खरोखर आज मुलांच्या शाळांच्या फी ऐकल्या तरी तोंडचे पाणी पळते , भाज्यांचे भाव , अन्नधान्य सगळी महागाई आहे आणि त्यामुळे मध्यमवर्गीय माणसाचे रोजचे जगणे सुद्धा पैशाच्या गणिताशी निगडीत आहे.
रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर . मग त्यात उगीच नको ते विचार आणि त्यामागून येणारी फुकटची आजारपणे त्यामुळे आपल्याला जी कला येते आहे जसे कागदी फुले बनवणे , मेहेंदी , कलाकुसरीची कामे , भाजण्या मसाले , लोणची असे वर्षाचे टिकाऊ पदार्थ बनवणे , एखादी कला जसे हार्मोनियम , तबला शिकवणे , शाळेतील विद्यार्थ्यांच्या ट्युशन , ज्योतिष शास्त्रा सारख्या दैवी शास्त्राच्या कार्यशाळा , शेअर मार्केट , घरी अत्तरे तयार करणे, फुलवाती ,गवले एक ना दोन असे अनेक अनेक उपक्रम आपल्याला राबवता येतील आणि त्यातून अर्थार्जन नोकरी सांभाळून करता येयील.असे वाटते. जी गोष्ट आपण विरंगुळा ह्या दृष्टीकोनातून बघतो त्यातून स्वतःलाच नाही तर इतरानाही अर्थार्जन मिळवून देता येयील हा दृष्टीकोण तयार झाला पाहिजे . काय वाटते .
आपण आज व्यस्त राहणे अत्यावश्यक आहे. माणसाचे मन आधी आजरी पडते मग शरीर त्यामुळे आपल्या आवडत्या छंदात , कलेत आपले मन गुंतून राहणे हे सगळ्या व्याधींवर रामबाण औषध ठरू शकेल . अनेकदा एकटेपणा , वैफल्य ह्या गोष्टी सुद्धा वाट्याला येतात त्यावर सुद्धा आपण आपल्या कला जोपासून मात करू शकतो . आज अनेक स्त्रीपुरुष अनेक प्रदर्शनातून भाग घेवून तसेच घरून सुद्धा अनेक लहान व्यवसाय करतात . आज मुंबई पुण्यासारख्या शहरात कार्यालयात जाणार्या लोकांसाठी दोन्ही वेळेच्या घरगुती जेवणाचा प्रश्न मोठा असतो ,त्यामुळे असे डबे पोहोचवणे हाही एक उत्तम पर्याय आहे.
आज आधुनिक काळात झूम सारखे online मध्यम उपलब्ध आहे त्यामुळे जगाच्या कानाकोपर्यात तुम्ही ह्या माध्यमाचा उपयोग करून कार्यशाळा घेवू शकता . लहान मुलांचे संस्कार वर्ग , पाककृती ई. थोडक्यात काय तर नुसता विरंगुळा , छंद ह्याच्या पलीकडे जाऊन पाहणे हि आज काळाची गरज आहे .
आपले छंद आणि अंगच्या कलागुणांच्या व्यासंगातून जर अर्थार्जन करता आले आणि अनेकांचे पोशिंदे हि झालो तर आत्मविश्वास वाढेल आणि जगण्याला खर्या अर्थाने अर्थही प्राप्त होईल. मी काहीतरी करत आहे हि भावना आपल्याला जगवत असते.
मंडळी पैसा मिळवणे जितके आवश्यक आहे त्याहीपेक्षा त्याची आपल्या भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक करणे हे त्याहीपेक्षा कित्येक पटीने अधिक महत्वाचे आहे . पैसा हवा तिथे खर्च केलाच पाहिजे पण पुढे कुणासमोर हात पसरायची वेळ येणार नाही ह्याची तरतूद सुद्धा करता आली पाहिजे . शेवटी आज ज्याच्या खिशात पैसा त्याला मान हि एकंदरीत मनोधारणा आहे.
पैसा नसेल तर जगात काय आपल्या कुटुंबात सुद्धा आपली किंमत शून्य आहे ह्याचा अनुभव अनेकदा आपण घेतच असतो.
हि दिवाळी आपल्या सर्वाना उत्तम गुंतवणुकीच्या माध्यमातून समृद्धतेची जावूदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment