|| श्री स्वामी समर्थ ||
काही काळासाठी सेनापती मंगळ मिथुन राशीत प्रवेश करत आहे. मंगळ स्वतःला न मानवणार्या बुधाच्या मिथुन राशीत स्वतःच्याच नक्षत्रात काही काळासाठी ठाण मांडून बसणार आहे. मंगळाची दैनंदिन गती कमी होत आहे .मिथुन राशीतच मंगळ 30 ऑक्टोबर ला वक्री होणार आहे .
मुळातच मिथुन हि वायुतत्वाची राशी आहे आणि त्याचा मालक बुध हा बुद्धिमान म्हणून ओळखला जाणारा ग्रह आहे. एखाद्याची बुद्धी किंवा आकलन शक्ती बघायची असेल तर आपले लक्ष नेहमीच पत्रिकेतील बुधाकडे जाते . मी माझ्या खास मैत्रिणीच्या घरी गेले तर आरामात सोफ्यावर बसून गप्पा मारीन कारण ती माझी मैत्रीण आहे तिच्या घरात माझा वावर सहज असेल .पण परक्या माणसाकडे आपण इतक्या सहज पणे बसणार नाही , येतंय ना लक्ष्यात ? थोडक्यात काय तर मंगळ बुधाच्या राशीत Comfortable नाही.
अगदी ह्याचप्रमाणे बुधाच्या मिथुन राशीत मंगळाला आपलेपणा अजिबात नाही कारण मुळातच बुध आणि मंगळ हे विरुद्ध स्वभावाचे ग्रह आहेत . बुध शब्दांची जादू करणार तर मंगळ कायमच तलवार घेवून लढण्याच्या भूमिकेत असणारा ग्रह आहे. बुधाकडे हिरवी शाई आहे तर मंगळाकडे शस्त्र आहे. मंगळा कडे असामान्य धाडस सामर्थ्य धडाडी असली तरी तो उतावळा , अविचारी सुद्धा आहे. त्यामुळे आता बुधाच्या ह्या बडबड्या राशीत मंगळ उतावीळ पणे काहीतरी अविचाराने बोलून जाईल आणि समोरचा दुखावला जाईल तोही कायमचा . पटतंय का?
मंगळ मिथुनेत आहे म्हणजे 13 नोव्हेंबर पर्यंत शाब्दिक चकमकी , उतावीळ पणे घेतले जाणारे चुकीचे निर्णय ह्याला ऊत येयील . मुळात मंगळ हा रक्ताचा ,भांडणे , वैमनस्य , राग , घातपात , सर्जरी , रक्तदाब , BP , कामवासना ,शरीरातील immunity system , आगी लागणे , सैन्य , पोलीस , भावंड , भूपिपुत्र असल्यामुळे बांधकाम क्षेत्र ह्या सर्वाचा कारक असल्यामुळे ह्या सर्वच गोष्टींवर ह्या वक्री भ्रमणाचा परिणाम जाणवल्याशिवाय राहणार नाही .
मिथुन राशी हि कालपुरुषाच्या कुंडलीत तिसर्या भावात येत आणि त्या भावाचे कारकत्व प्रत्यक्ष मंगळा कडेच आहे कारण हा पराक्रम भाव आहे. काही गोष्टीत ताळमेळ असला तरी बुधाची रास व्यावहारिक दृष्टीने मंगळाला अजिबात मानवणारी नाही. मिथुन राशी हि कम्युनिकेशन , संवादाची आहे ज्याच्याशी मंगळाचा दुरचाही संबंध नाही .
मंगळ एक दोन व्यक्तींसाठी नाही तर अखिल विश्वासाठी वक्री होत आहे. ग्रह वक्री होतो तेव्हा तो जोमाने आपली फळे देण्यास अधिक सामर्थ्यवान होतो . ग्रह वक्री होतो तेव्हा तो पृथ्वीच्या कक्षेच्या जवळ येतो , त्यात मंगळ तर पृथ्वीच्या जवळच आहे त्यामुळे तो अधिक बलवान होणार आहे. मंगळ दर दोन वर्षांनी वक्री होतो . ह्या काळात आपल्या अविचारी कृतीने आणि बोलण्याने आपण ज्यांना दुखावतो त्यांच्याशी आपले संबंध कायमचे बिघडतात हे कधीही विसरू नये . निदान वाचकांपैकी काही लोकांनी जरी हे लक्ष्यात ठेवले आणि त्यांना त्याचा फायदा झाला तर लेखनाचे प्रयोजन सुफळ संपूर्ण झाले .
मंगळ हा सेनापती आहे त्यामुळे तो युद्ध करणारच , म्हणूनच विश्वात अनेक देशात युद्धजन्य स्थितीही निर्माण होऊ शकते . आज आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जो तो धडपडत आहे ,हि आपल्या असण्या नसण्याची लढाई आहे पण म्हणून अविचार करून कुणाला शब्दाने दुखावणे आपल्याला आयुष्यभरासाठी भारी पडू शकते ,असे होऊ नये म्हणून हा लेखन प्रपंच . वादविवाद मग ते कुणाशीही असोत . मंगळ भावंडांचाही कारक ग्रह आहे.त्यामुळे ह्या संबंधात आपण सतर्क असले पाहिजे .
आपले शब्द जपून वापरले पाहिजेत मग ते बोलणे असो अथवा लिखाण . गेल्या दोन वर्षापूर्वी जेव्हा मंगळ वक्री झाला होता तेव्हा आपल्या आयुष्यात काय काय स्थित्यंतरे झाली होती त्याचा अभ्यास केलात तर अनेक उत्तरे तुमची तुम्हालाच सापडतील. मेष आणि मीन राशीत त्यावेळी मंगळाचे वक्री भ्रमण होते.
ह्या काळात शनीची उपासना उपयुक्त ठरेल पण त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्ष्यात ठेवायची कि कुठल्याही प्रलोभनांना बळी पडायचे नाही. एखाद्या गोष्टीची मनात आले केली खरेदी हे जरूर टाळायचा प्रयत्न करा , आपला स्वभाव उतावळा होयील आले मनात केले पटकन हे नकोच .
ज्यांचा मंगळ 1 6 8 12 मध्ये मूळ पत्रिकेत वक्री असेल त्यांनी ह्या वक्री भ्रमणात सावधगिरी बाळगा . मिथुन हि वायुतत्वाची राशी आहे त्यामुळे सोशल मिडिया वरचे लिखाण वक्तव्य व्यवस्थित हवे . इंस्टा वरील किंवा कुठल्याही सोशल साईट वरील खरेदीत फसवणूक होऊ शकते . आवडली गोष्ट केली ऑर्डर असे करू नका . पैसे आणि त्रास माझा नाही तुमचा वाचणार आहे. प्रत्येक वेळी समोरच्याच्या बोलण्यावर प्रत्येक वेळी आपण वक्तव्य केलेच पाहिजे असेही नाही. बघा तुमचा पेशन्स वाढवा .
सर्व ज्योतिष अभ्यासकांनी ह्या वक्री मंगळाचे परिणाम वैयक्तिक आयुष्य तसेच संपूर्ण विश्वातील घडामोडींवर काय होतात त्याच्या अवश्य नोंदी करण्यात त्या आपल्या अभ्यासासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. मंगळ वक्री असताना जागतिक मंदी चे पडसाद उमटतात , युद्धजन्य स्थिती , शाब्दिक चकमकीतून भांडणे , टोकाचे विसंवाद होतात . थोडक्यात आपल्याला संयम ठेवायचा आहे .
प्राणायाम , ध्यान धारणा आपल्याला उतावीळ न होण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यातल्या त्यात ऐन दिवाळीत शनीमहाराज आपली वक्री अवस्था सोडून मार्गी होत आहे हा आपल्याला दिलासा आहे.
ग्रह मार्गी वक्री अस्तंगत होतच असतात ,प्रत्येक अवस्था आपल्याला काहीतरी शिकवत असते , आपण आपले कर्म उत्तम करत राहावे ,मंगळ किंवा इतर कुठलाही ग्रह वक्री मार्गी झाला म्हणून आपण श्वास घ्यायचा बंद करणार का? जगायचे सोडून देणार का? तर नाही . फक्त ह्या काळत आपण आपले आयुष्य सुरळीत जावे म्हणून काय काळजी घेवू शकतो ह्यासाठी हा लेखन प्रपंच . श्री स्वामी समर्थ .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment