Wednesday, 19 October 2022

आली माझ्या घरी हि दिवाळी

 ||श्री स्वामी समर्थ ||




दीपावली हा सर्वात मोठा सण सर्वत्र प्रचंड उत्चाहात साजरा होतो . ह्यावर्षी करोनाच्या नंतर जवळजवळ दोन वर्षांनी हा सण साजरा करताना लोकांमध्ये खूप उत्साह दिसून येत आहे . सर्वत्र मोठी खरेदी करताना लोक दिसत आहेत . बदलत्या काळानुसार प्रत्येक सणांची रूपे सुद्धा बदलताना दिसतात . आमच्या लहानपणची दिवाळी फार वेगळी होती . दिवाळी सुरु होण्याआधीच आम्ही मनाने दिवाळी साजरी करायला सुरवात करायचो . बाबांनी ठरवलेल्या किमतीत आणलेला ड्रेस , फटाके सगळ शिस्तीत . तेव्हा उठसुठ खरेदी हा प्रकार नव्हता आम्हाला दिवाळी आणि वाढदिवस असे दोन वेळाच नवीन कपडे मिळत असत . तीच गोष्ट दिवाळीच्या फराळाची , आज सगळच सगळीकडे सहज उपलब्ध असल्यामुळे त्याचे नाविन्य राहिले नाही.  त्यात आजकाल वेळ नाही ह्या सबबीखाली विकतचा फराळ ( जो आजही आम्हाला परवडणार नाही ) त्याकडे अनेकांचा कल आहे. असो . दिवाळीच्या सुट्टीत शाळेत दिलेला गृहपाठ असायचा . फुलपाखरासारखे ते दिवस होते. आम्ही दिवाळीच्या आधीच फराळ फस्त करू नये म्हणून आज्जी डब्यात डबे ठेवायची .आजच्या पिढीला फराळ आवडत नाही असे नाही पण एका गालात मोमोज आणि एका गालात करंजी असे काहीसे झाले आहे . 


दीपावली हा खरतर दिव्यांचा सण . अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा सण . श्रीराम आपला वनवास संपवून अयोध्येत परत आले तेव्हा अयोध्या वासियांनी त्यांचे स्वागत लक्ष लक्ष दिवे लावून केले ,अशी पौराणिक कथा आहे. दिवाळी म्हणजे कंदील , दिव्यांची आरास , सुशोभित रांगोळी ,फटाके आणि फराळ इतकच आहे का ? कि त्याही पलीकडे आपण विचार केला पाहिजे ? हो नक्कीच केला पाहिजे . प्रत्येक दिवाळीला आपल्यातील एखादा वाईट गुण सोडून दिला पाहिजे ,त्यासाठी मुळात आपल्यात तो आहे ह्याची दिलखुलास कबुली आपण स्वतःलाच दिली पाहिजे. गेल्यावर्षी पेक्षा आयुष्य एका वेगळ्या उंचीवर नेता आले पाहिजे . आजकालचे जग पाहता मानसिक दृष्टीने अत्यंत सशक्त झाले पाहिजे तरच पुढील पिढीला आपण काहीतरी देऊ शकू . एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करून त्याच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद बघण्यासारखे सुख ते काय . एखाद्याच्या दिशाहीन आयुष्याला दिशा देतानाचा निर्भेळ आनंद म्हणजेच खरी दिवाळी . एखाद्याला नोकरी मिळवण्यासाठी मदत केली , हुशार विद्यार्थ्याची फी भरली , आपल्या विभागातील जेष्ठ नागरिक संघाला किंवा विकलांग मुलांसोबत दिवाळी साजरी केली तर आपलीही दिवाळी अनंत अर्थाने सुफळ संपन्न होईल. 

प्रत्येक वेळी स्वतःच्याच आनंदासाठी जगण्यापेक्षा कधीतरी आपण दुसर्याच्या आनंदाला कारणीभूत ठरलो तर किती समाधान मिळेल ? पट्तय का? आज दिवसागणिक वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. त्यांना काहीही नको आहे फक्त कुणीतरी त्यांच्या सोबत चार शब्द बोलावे बस , आपला सहवास हीच त्यांची आज खरी गरज आहे. 

ह्या दिवाळीला काहीतरी वेगळे करूया आणि आपल्या पुढील पिढीलाही ह्या आगळ्या वेगळ्या सणाची खर्या अर्थाने ओळख करून देवूया . दिवाळी म्हणजे आनंद ,समृद्धी , प्रगती , यश , सर्वार्थाने एक पाऊल पुढे टाकणारा सण . 

वाईट गोष्टींवर चांगल्या विचारांनी मात करणारी , तुम्हा आम्हा सर्वाना ज्ञानाच्या प्रकाशाने तेजाळून टाकणारी हि दिवाळी तुमच्या आमच्या आयुष्यात सर्वार्थाने संस्मरणीय ठरू दे. स्वतः जगताना इतरांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा द्विगुणीत करणारी हि दिवाळी चैतन्याची , समृद्धीची आणि काहीतरी वेगळे करण्याच्या विचारांनी प्रेरित झालेली असुदे . देण्यात जो आनंद आहे तो घेण्यात नाही ह्याचा अनुभव देणारी हि दिवाळी असुदे . चला तर मग नवीन आशा आकांक्षाचे पंख लावून सज्ज होवुया नवीन वर्षाच्या स्वागतासाठी . 


शुभ दीपावली

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 



No comments:

Post a Comment