Monday, 24 October 2022

ज्योतिष आणि हिमालय - ह्या जन्मातील तुमच्या अस्तित्वाच्या खुणा जपणारे हे शास्त्र

|| श्री स्वामी समर्थ ||


ज्योतिष शास्त्राला अथांग महासागराची उपमा दिलेली आहे . मला मात्र हे दैवी शास्त्र हिमालायासारखेच भासते . हिमालयाकडे पाहिले कि आपोआप आपले मस्तक त्याच्यासमोर झुकले जाते अगदी तसेच हे शास्त्र खूप काही देण्यासाठी आपले दोन्ही बाहु पसरत आहे असा जणू भास होतो. हिमायाचे वैभव पहिले कि आपला अहंकार गळून पडतो . आकाशगंगेतील हे ग्रहतारे म्हणजे हिमालयाची उत्तुंग शिखरे आहेत त्यांना जिंकण्याचा उन्मत्त पणा करू नये , त्यांना प्रेमाने अपुल्कीनेच जिंकता येयील आणि तसे झाले  तरच ग्रहांची बोलीभाषा हळूहळू समजू लागेल. जितकी हिमालयाची उंची तितकीच आपल्या अभ्यासाची खोली सखोल असली पाहिजे . आपल्याकडे येणारा जातक त्याच्या दुखाने गर्भगळीत झालेला , पिचलेला आणि असंख्य संकटांच्या फेर्यात अडकलेला असतो . हिमालयासारखा गारवा आपल्या प्रेमळ सकारात्मक वाणीने त्याला आपल्याला देता आला पाहिजे . 


बघा ज्योतिषाचा मूळ गाभा हे आपले कर्मच तर आहे. मनुष्य कर्म करायला बांधील आहे आणि त्यानुसार त्याला फळाची प्राप्ती होणार आहे . ज्योतिष हि विद्या शिकवताना शिक्षकानेही आपले मन हिमालयासारखे ठेवले पाहिजे आणि हातचे काहीही न राखून ठेवता मुक्त हस्ताने हे ज्ञान देऊन खर्या अर्थाने ह्या शास्त्राचे सेवक झाले पाहिजे. ह्या ज्ञानाचा कुठे आणि कसा उपयोग करायचा ह्याला जश्या मर्यादा आहेत ,बंधने आहेत तसेच त्यातून घेतला जाणारा मोबदला किंवा मानधन ह्याला सुद्धा आहेत  किबहुना त्या असल्याच पाहिजेत . हिमालयासारखी ज्ञानाची उंची गाठणाऱ्या ह्या शास्त्राच्या सेवकाना कुठल्याही पदवीची , हारतुरे आणि सन्मानाची , पारितोषिकांची गरज नाही कारण तो ह्या सर्वाच्या खूप पुढे आहे. 


श्री गजानन महाराजांनी भक्तांना सांगितले अही कि माझा फोटो ठेवुन बाजार मांडू नकोस .त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्राचा बाजार मांडू नये तर ह्या शास्त्रापुढे नतमस्तक व्हावे . ज्याला ह्या ज्ञानाबद्दल आणि शास्त्राबद्दल अत्यंत मनापासून कळकळ आहे त्यालाच हे शिकवावे अन्यथा सर्व फोल ठरेल. आपल्या गतजन्माशी असणारे आपले धागेदोरे सहजपणे उलगडून दाखवणारे तसेच ह्या जन्मातील तुमच्या अस्तित्वाच्या खुणा जपणारे हे शास्त्र अगाध आहे , जनमानसावर ह्या शास्त्राचा खोल पगडा आहे , ज्योतिष ह्या विषयाबद्दल कुतूहल नाही अशी व्यक्ती ह्या अखिल विश्वात नाही . आपल्या भविष्यातील अंधारात चाचपडत राहण्यापेक्षा ह्या शास्त्राचे मार्गदर्शन घेवून आयुष्य सुकर , समाधानी करण्याचा प्रयत्न मनुष्य करत असतो .

हिमालया पर्यंत जो पोहोचला तो जातकाच्या उत्तरापर्यंत पोहोचला आणि आपले उत्तम कर्मच , साधना आपल्याला तिथवर नेऊ शकते. आपली साधना , मानसपूजा आणि नामस्मरण हिमालया इतकेच उत्तुंग असले पाहिजे . त्यातील भाव १०० नंबरी खरा असला पाहिजे .पत्रिका आपल्याला आरपार दिसली पाहिजे . भविष्यातील घटनांचा मागोवा घेण्यासाठी  साधना निश्चित उपयोगी पडते . 


वरवरचे पोपटासारखे पुस्तकी ज्योतिष उपयोगी नाही , ज्योतिषाला स्वतःचे विचार तारतम्य ,  अभ्यासाची दिशा असलीच पाहिजे . आपल्या आणि समोरच्याच्या वेळेचे भान सुद्धा असले पाहिजे . मी किती हुशार आणि विद्वान आहे हे न सांगता त्याच्या पत्रिकेतील बलवान ग्रह त्याला काय देऊ शकतो हे सांगता आले पाहिजे. अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसला तसे आपल्याला फक्त जातकाचा प्रश्न दिसला पाहिजे .


आपल्या बोलण्यात जातकाला विश्वास वाटला पाहिजे. एखादी घटना त्याच्या आयुष्यात का घडली किंवा घडणार नाही ह्याचे योग्य विश्लेषण करता आले पाहिजे तरच जातकाला ह्या शास्त्राबद्दल आणि ज्योतिषाबद्दल सुद्धा नितांत आदर वाटेल. 

हिमालयासारखी आपल्या ज्ञानाची उंची मिळवण्यासाठी अथक परिश्रम लागतात आणि ते करण्याची तयारी फार कमी लोकांची असते कारण हल्ली instant चा जमाना आहे.  एकच शास्त्र शिका पण त्याचे टोक गाठा हे होत नाही . असो 

प्रत्येकाच्या आयुष्यात हिमालयाच्या ताकदीचे अध्यापक यावेत आणि आपले ज्ञान तितक्याच उंचीला जावे ह्याच सदिछ्या.


संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230





 

 

No comments:

Post a Comment