Wednesday, 19 October 2022

समाधान

 || श्री स्वामी समर्थ ||



दिवसभर अत्यंत परिश्रम करून आपण सर्वच संसाराचा गाडा ओढत असतो . हे सर्व कश्यासाठी तर पोटाची वितभर खळगी भरण्यासाठी. आजचे स्पर्धेचे युग आहे . सतत कश्याचा तरी हव्यास आहे , सतत काहीतरी मिळवण्याची अभिलाषा आहे , अजून हवे अजून हवे हे संपतच नाही आहे. मग ह्या सर्वातून इर्षा , मत्सर , जीवघेणी स्पर्धा , स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची लढाई आणि त्यासाठी सतत करावा लागणारा संघर्ष .पण हे सगळ करूनसुद्धा यशाच्या शिखरावर जाऊन एक प्रश्न स्वतःला विचारला कि आपण हे सगळे मिळवले पण समाधान मिळवले का? तर त्याचे उत्तर काय असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ह्या सगळ्या जीवघेण्या स्पर्धेत समाधान खरच कुठेतरी दुरापास्त होत आहे . 


आपल्या आधीच्या पिढ्या सुद्धा कष्ट करतच होत्या कि . आजच्या सारख्या सुखसोयी तेव्हा नव्हत्या , त्यानाही संघर्ष करावा लागला कदाचित आपल्याही पेक्षा अधिक पण तरीही आपल्या मागील पिढ्यांना समाधान मिळाले कारण त्यांना कुठे थांबायचे ते समजले ,उमजले आणि म्हणूनच त्यांच्या तब्येतीही दीर्घ काळापर्यंत व्यवस्थित राहिल्या .


आजच्या स्पर्धेत आपण वाहवत चाललो आहोत . आपणच निर्माण केलेल्या गरजा आणि अपेक्षा आता डोईजड होऊ लागल्या आहेत . 

मोठे शिक्षण मग खूप मोठ्या पगाराच्या नोकर्या मग त्याला साजेशी lifestyle , घरे सगळच आले कि राव . आणि मग ते टिकवण्याचा अट्टाहास . करोडो रुपये खर्च करून घेतलेल्या घरात आपल्या पेक्षा आपल्या घरातील नोकरच कदाचित अधिक वेळ असतात .

प्रत्येक मनुष्य आपल्या कुटुंबासाठी खस्ता खातो , कष्ट उपसतो पण हे सगळे करताना आपल्याला समाधान मिळाले का? ह्याचाही विचार केला पाहिजे. 

समाधान हे सापेक्ष आहे . प्रत्येकाची समाधानाची व्याख्या वेगळी आहे. समाधान दिसत नाही पण असते. समाधानी माणसे हव्यासाच्या मागे न लागणारी असतात . कुठे थांबायचे ते समजायला हवे आणि ते एकदा समजले कि अजून हवे अजून हवे आणि सतत मिळवण्याची वृत्ती कमी होते . आज समुपदेशन करताना अनेक केसेस मी पाहते कि घरातील प्रत्येक खोली वातानुकुल असतानाही हजारो रुपये देवून मानसोपचार तज्ञाची औषधे चालू आहेत , झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप लागत नाही पण रस्त्यावरील मजूर अगदी उशीला दगड घेवून सुद्धा पडल्यापडल्या झोपतो.  काहीतरी मिळवण्याच्या नादात आपण आपले सुख समाधान हरवून बसलो आहोत . आज एकाच शहरात राहून आईवडील वेगळे आणि मुले वेगळी राहतात . मोठमोठाल्या घरात माणसे एक किंवा दोनच . घर किती खायला उठत असेल त्यांना . 

उच्च शिक्षण पण हवा तसा पगार नाही म्हणून ऋतू बदलतात त्याप्रमाणे नोकर्या बदलायच्या .पण इतके करूनही समाधान नाही . जीवघेण्या स्पर्धेत आपणच नाही तर आपली मुलेही आपली पुढची पिढी सुद्धा होरपळून निघत आहे . जसजसे वय वाढत जाते तसे शरीर थकते आणि मग हे सर्व नकोसे वाटायला लागते  . आयुष्याच्या एका वळणावर काहीच नको असे वाटू लागते आणि मग शोध सुरु होतो तो समाधानाचा . आपण आजवर काय मिळवले आणि काय गमावले ह्याचा हिशोब मांडला तर ओंजळीतून अगदी लहान सहान आनंद सुद्धा निघून गेल्याचे उशिरा का होईना पण जाणवते .

आज विभक्त कुटुंब संस्था आहे पण त्यामुळे अनेक कौटुंबिक समस्या सुद्धा आहेत . आज आपल्याला आपल्या आवडीचे एखादे पुस्तक निवांतपणे वाचायला मिळत नाही कारण वेळ नाही. हे वेळेचे गणित ज्याला जमले त्याने समाधान मिळवले हे नक्की. प्रत्येकाने आपली समाधानाची व्याख्या सेट केली पाहिजे . सकाळी पेपर वाचत वाफाळलेला चहा कुटुंबासोबत किती लोक पितात सांगा . सतत घड्याळाकडे लक्ष , बोलता बोलता सकाळचे आवरताना तो चहा पिणार नाही तर घशाखाली घालणार  . सगळ्याच गोष्टी घड्याळावर असलेले आयुष्य समाधान देऊ शकणार का ? 

आपण भौतिक सुखाच्या मागे लागून समाधान हरवून बसलो आहोत . 90% मिळाले तरी हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश नाही म्हणून मुले नाराज , मुले हुशार पण फी भरायला पैसे नाहीत म्हणून आईवडील चिंतेत , घरात कुणी आजारी पडले कि डोळ्यासमोर औषधे आणि दवाखान्याची मोठी बिले उभी राहतात . कुठे आणि किती पुरे पडणार आपण ? आत्ताची नोकरी उत्तम आहे पण परदेशातली मिळाली नाही , मुलगी झाली वंशाला दिवा मिळाला नाही म्हणून असमाधान . 


आपल्याला दिलेले आयुष्य कसेही असुदेत आज आपले सर्व अवयव धड आहेत हीच केव्हडी श्रीमंती आहे त्याचे समाधान असले पाहिजे . कुणाचेही आयुष्य परिपूर्ण नाही , त्यामुळे मुळात दुसर्याशी स्पर्धा करणे बंद करावे , ह्या स्पर्धेतूनच इर्षा निर्माण होते . 


समाधान मुळी मिळवायचे नसतेच ते असावे लागते अंतर्मनात . घरातील स्त्री समाधानी असेल ,तिने इतर कुणाशी स्पर्धा केली नाही ,म्हणजे हिच्याकडे हे आहे पण माझ्याकडे नाही , तर अखंड कुटुंब समाधानी राहू शकते . आपण आपल्या आयुष्याचे राजे आहोत आणि जो मनाने तृप्त , समाधानी आहे तोच खर्या अर्थाने राजासारखे आयुष्य जगू शकतो. 


समाधानी माणसाचा चेहरा , देहबोली खूप काही सांगून जाते . आयुष्याची लढाई त्यांनी कधीच जिंकलेली असते कारण समाधान . पूर्वीच्या पिढ्यांनी नाव सुद्धा ऐकली नसतील असे आजार आजकाल आपण ऐकतो , एकटे मानसिक समाधान ह्या सर्व आजारांनी पळवून लावायला पुरेसे आहे इतकी ताकद त्यात आहे. 


मला तर वाटते आपल्यातील लहान मूल प्रत्येकाने जतन करून ठेवले पाहिजे , आपल्याला हवे तसे जगावे आणि दुसर्यालाही जगू द्यावे , आपले छंद जोपासावे , व्यवस्थित आर्थिक नियोजन करावे , भरपूर वाचन करावे आणि सोशल मिडीया चा कमीतकमी वापर करावा . तोच वेळ आपल्या कुटुंबाला द्यावा . ह्या सर्वात समाधानाची पाळेमुळे नक्कीच सापडतील. जे लोक मनावर दडपण घेवून जगतात त्यांचा झोपेचा प्रोब्लेम नाही झाला तरच नवल. अपयश सुद्धा खिलाडूवृत्तीने स्वीकारता आले पाहिजे कारण त्यातूनच यशाची नांदी होणार असते . 

समाधान नसेल तर जगणे अर्थहीन आहे. आनंदानी जगण्यात समाधानाचा स्त्रोत आहे. प्रत्येक गोष्टीत खुसपटे काढणे आपण बंद केले पाहिजे . हि दिवाळी सर्वाना चिरकाल टिकणारे समाधान देणारी असुदे हीच त्या परमेश्वराजवळ प्रार्थना . 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 

 








No comments:

Post a Comment