Sunday, 29 January 2023

डोळे हे जुल्मी गडे

 || श्री स्वामी समर्थ ||


विश्वाचा चालक ,मालक ,पालक रवीचा जेव्हा उदय होतो तेव्हा चराचर सृष्टीत जणू एक नवचैतन्य निर्माण होते . उमेद , आत्मविश्वास आणि सकारात्मकता देणारा हा रवी सुर्य मालिकेचा राजा आहे. आज रवीचे कृतिका नक्षत्र आहे म्हणून ह्या राजाबद्दल चार शब्द .

रवी आला कि अंधकार दूर होतो आणि सृष्टी पुन्हा एकदा फुलू लागते . सूर्याच्या तेजस्वी प्रकाशांत आपल्याला जगण्याची उमेद निर्माण होते . मनुष्यच नाही तर झाडे पाने ,सर्व प्राणीमात्र त्याच्या आगमनाने नव्याने जगू लागतात .असा हा रवी सर्व गोष्टी प्रकाशात आणतो ,प्रकाशमान करतो. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला काही ना काही काम दिलेले आहे .जसे डोळ्यांना हि सृष्टी पाहण्याचे काम दिले आहे. डोळे हे अतिमहत्वाचे कारण दृष्टी नसेल तर सृष्टी दिसणार नाही . अत्यंत सुंदर पाणीदार डोळे हि देवाची देणगीच म्हंटली पाहिजे . अनेक कवीमनाच्या लोकांना डोळे स्पुर्ती देतात त्यांना त्यावर काव्य सुद्धा करण्याची प्रेरणा देतात . आपले डोळे इतके सुंदर असले पाहिजेत कि त्याच्याकडे पाहून इतरांना जगण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. आपल्या मानत असते तेच डोळ्यात दिसते. काही लोकांचे डोळे अत्यंत बोलके तर काहींचे निस्तेज असतात . राग लोभ मत्सर द्वेष ह्या गोष्टी डोळ्यातून प्रखरपणे दिसतात अर्थात त्या भावना वाचता येणे हे कौशल्य आहे. अनेकांचे डोळे तेजस्वी असतात तर अनेकांच्या डोळ्यात तेजच नसते . त्यांच्या संभ्रमित ,मलूल कोमेजलेल्या निष्प्राण आयुष्याचे ते जणू प्रतिक असते. 

रवी आपल्याला प्रकाशाकडे नेतो आणि सृष्टीचे दर्शन घडवतो . हि सृष्टी पाहण्याचे काम अर्थात डोळ्यांकडे आहे. रवी चांगला नसेल तर डोळे निष्प्राण दिसतात . रवी डोळ्यात तेज निर्माण करतो. अनेक जण समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बघूही शकत नाहीत कारण कुठेतरी आत्मविश्वास कमी असतो .

रवी हा एखाद्या गोष्टीवर प्रकाश टाकतो म्हणून त्याच्या पुढे पत्रिकेत ग्रह हवेत . टोर्च लावली तर पुढील गोष्टी दिसणार मागच्या नाही . रवी ज्या भावात असेल त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टी प्रकाशात आणेल. रवी आणि चंद्राचा कधीही अस्त होत नाही पण त्यांच्या युतीतील ग्रहांचा मात्र अस्त होतो .अश्यावेळी ते ग्रह फळ देण्यास सक्षम नसतात . 

रवी हा राजा तर चंद्र हि त्याची राणी ,बुध हा राजकुमार आहे. आता लहान मूल हे नेहमीच बाबांजवळ असते म्हणून पत्रिकेत आपल्याला रवी जिथे असतो त्याच भावात किंवा पुढील मागील भावात बुध दिसतो. बुधाला अस्तंगताचा दोष लागत नाही .

रवी आपल्याला आयुष्य खर्या अर्थाने जगायला शिकवतो . रात्र आणि दिवस जसे एकेमागून एक येतात अगदी तसेच आयुष्यातील सुख दुक्ख सुद्धा. रवीचा उदय ,मध्यान्ह आणि रवीचा अस्त ह्या घटना आपल्याला अंतर्मुख करतात .आपणही आयुष्यात कधीतरी उंची गाठून पुन्हा होते तिथेच येणार हाच संदेश तर द्यायचा नसेल ना त्याला समस्त मानव जातीला. म्हणूनच जो उंचीवर जायील तो खाली येणार हेही लक्ष्यात ठेवले पाहिजे. उंची गाठली कि अहंकार येतोच येतो आणि तिथेच आपली परीक्षा असते. 


रवी म्हणजे राजा आणि राजाला राज्याचा कारभार पाहावा लागतो. म्हणजेच व्यवस्थापन क्षेत्र आले. व्यवस्थापन म्हणजे MBA. म्हणूनच ज्यांचा रवी पत्रिकेत चांगला असेल आणि शिक्षणाच्या दशा चांगल्या असतील तर व्यक्ती नक्कीच MBA होऊ शकते. राजा म्हणजे अधिकार , सत्ता , मानसन्मान , मानमरातब . म्हणूनच रविचे बळ असणार्या व्यक्तीना उच्च पदस्थ अधिकारी , लाल दिव्याची गाडी ,अधिकार , सरकारी नोकरी ,मान ह्या सर्व गोष्टीचा उपभोग घ्यायला मिळतो .

परवा मी माझ्या डोळ्यांच्या डॉक्टर कडे गेले होते तेव्हा ते सहज म्हणाले माझीहि पत्रिका बघा कधीतरी .मी म्हंटले पत्रिका बघू पण त्याहीआधी ती न बघता ही अनेक गोष्टी समजू शकतात जसे आता डोळ्यांचा डॉक्टर म्हणजे रवी उत्तम सुस्थितीत असणार . डॉक्टर होण्यासाठी लागणाऱ्या दशा असणार . डॉक्टर म्हणजे सेवाभाव जनतेशी संपर्क म्हणजे चंद्र चांगला पाहिजे. आपल्या पेशंट शी बोलणे उत्तम हवे ते पेशंट पुन्हा आपल्याकडे आले पाहिजेत म्हणून बोलण्यात माधुर्य , विश्वास देण्याचे कौशल्य म्हणून संवादाचा कारक बुध चांगला पाहिजे . आता एक डॉक्टर म्हणून समाजात लोकांनी मान देणे आणि प्रसिद्धी म्हणून गुरु चांगला हवा. एखादा प्रश्न किंवा विषय आला तर त्या अनुषंगाने आपले विचार धावले पाहिजेत हेच सांगण्यासाठी हे उदा. दिले. 

रवी म्हंटला कि मान आला ,अधिकार आला पण त्यातून निर्माण होतो तो अहंकार आणि तो मात्र प्रमाणात असला पाहिजे . अहंकार हाताबाहेर गेला तर आयुष्याची माती होते आणि म्हणूनच रवीचा उदय अस्त हि घटना विसरून चालणार नाही. जो उदय पावतो त्याचा अस्त होतो तो लयास जातो हि रवीची शिकवण आहे. अहंकाराने आयुष्याची माती करायची का आपल्या अधिकाराचा , शिक्षणाचा उपयोग इतरांसाठी करून त्यांना प्रेरणा द्यायची हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. 

रवी ची रास सिंह आणि सिंह हा वनराज आहे जो आपले वर्चस्व अबाधित ठेवतो. रविला कुणी दुसर्याने त्याच्यावर सत्ता गाजवलेली कशी आवडेल ?

रवीचा उदय झाला कि चराचर सृष्टीला पुनश्च जगण्याचे बळ प्राप्त होते . रवी चे बळ वाढवण्यासाठी उगवत्या सूर्याला प्रणाम करून अर्घ्य देणे , सूर्यनमस्कार घालणे ,गायत्री मंत्राचे पठण करणे हितावह ठरेल. रविला आत्माकारक म्हंटले आहे .रवी सुस्थितीत नसेल तर आत्मविश्वासात कमतरता येणार .  रवी बिघडला तर अंधत्व , जनमानसातील प्रतिमा , अधिकार , मान मरातब ह्यापासून व्यक्ती परे राहते . रवी बिघडला तर हृदयाचे विकार ,डोळ्यांचे विकार होतात. रवी हा आरोग्याचा कारक आहे त्यामुळे रवी बिघडला तर तब्येतीच्या कुरबुरी चालू असतात . रवी हा पिता आहे स्त्रियांच्या पत्रिकेत रवी हा पतीकारक पण मानला आहे. लिहिण्यासारखे खूप आहे तूर्तास इथेच पूर्णविराम देत आहे.

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 

















 






Friday, 27 January 2023

मनाचे आणि शरीराचे अपंगत्व देणारा शनी

 || श्री स्वामी समर्थ ||


17 जानेवारी 2023 रोजी शनी महाराजांनी आपली मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश केला आहे . आज शनी महाराजांबद्दल अधिक काही जाणून घेण्याचा प्रयत्न करुया . आयुष्यात अनेक चढ उतार असतात आणि अनेक चांगले वाईट प्रसंग सुद्धा घडत असतात . अनेकदा हे वाईट प्रसंग साडेसाती नसताना किंवा शनीची दशा , पनवती नसताना सुद्धा घडतात पण तरीही काहीही झाले कि शनीवार खापर फोडणे हा मनुष्य स्वभाव आहे. शनीला व्हिलन करून ठेवले आहे आपण .असो .

शनीचे बलाबल पत्रिकेत चांगले असेल तर आजार दुक्ख संकटांचे प्रमाण कमी असते. शनी कमजोर असेल तर संकटांची मालिका जीवनात असतेच . आपल्या अनेक वाईट कर्मांची फळे आपल्याला शनिच्याच दशेत , साडेसातीत भोगायला लागतात .शनी राहू पत्रिकेत एकटेच असलेले बरे कारण त्यांची कुठल्याच ग्रहासोबतची युती शुभ फळे प्रदान करत नाही . शनीला 3 दृष्ट्या आहेत आणि ज्या भावावर त्याची दृष्टी पडेल त्या भावासंबंधी काहीतरी समस्या जीवनात असतेच असते .

शनी वायुतत्वाचा ग्रह आहे. कफ , पित्त आणि वात ह्या त्रिदोशातील वात शनीकडे आहे . म्हणूनच शनी जेव्हा पत्रिकेत active असतो तेव्हा प्राणायाम हा उत्तम उपाय असतो. ज्योतिष शास्त्र हे logic आहे तर्कशास्त्र , पटले पाहिजे . शरीरात वायूचे समान साम्राज्य  आहे  प्राण उदान अपान व्यान समान.  शनी बिघडला तर  शरीरातील वायूचे चलन वलन बिघडेल आणि वाताचे विकार होतील. शनी हाडांचाही कारक त्यामुळे हाडांची दुखणी , नर्वस सिस्टीम बिघडेल . शनी थंड ग्रह आहे म्हणून थंडीत वाताचे आजार डोके वर काढतात . शरीरातून वायू निघून गेला तर शरीर थंड पडते तोच शेवटचा क्षण असतो. 

शनी विलंबाचा कारण आहे म्हणूनच शनी बिघडला असेल तर शरीरात रोग हळूहळू तग धरतात आणि दीर्घ मुदतीसाठी वास्तव्य करतात .शरीरात पायांची , किडनी किंवा लिव्हर चे दोष निर्माण झाले तर शनी कुठेतरी बिघडला आहे हे समजावे.शनी क्रोनिक आजार देतो जे शरीरात हळूहळू तग धरतात आणि पुढे कायमचे वास्तव्य करतात . अनेकदा ते आपल्या चुकीच्या जीवन पद्धतीमुळेही असतात.  

एकांत प्रिय वाटणे, अंधारात बसून राहणे , विरक्ती ची भावना , कुणाशीही संवाद नको ,आयुष्यात आलेल्या अविश्वासू लोकांमुळे संघर्ष ,  वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद , नशेची लत लागणे , वास्तव स्वीकारायचे धाडस नसणे , वजन कमी कमी होत जाणे , हे सर्व पत्रिकेतील शनी बिघडल्याचे सूचित करतात . 

मंगळ शनीचा शत्रू आहे, त्यांच्यातून विस्तव सुद्धा जात नाही त्यामुळे मंगळाच्या राशी किंवा लग्नाला शनी चांगली फळे प्रदान करत नाही . आर्थरायसिस, गुडघ्यांच्या समस्या शनी बिघडला तर होतात . शरीरातील कल्शियम कमी होणे , हाडे ठिसूळ होणे , पार्किंगसन, कंपवात , विसरभोळेपणा , मलमूत्र व्यवस्थेत बिघाड , पोट साफ न होणे ,दातांचे आजार , हृदय विकार , पोटाचे आजार कारण अपान वायू पोटातच फिरतो. अन्न न पचणे हेच अनेक आजारांची सुरवात असते . म्हणूनच कपालभाती सारखा व्यायाम नित्य केल्यास पोटाचेच नाही तर संपूर्ण शरीरात वात व्यवस्थित फिरतो. शनी अपंगत्वाचा कारक आहे मग ते मनाचे असो अथवा शरीराचे . माणसाचे मन आधी आजारी होते मग शरीर . माणसाच्या मनाचे खच्चीकरण करणे हेच शनीचे काम आहे आणि हीच आपल्या पापांची शिक्षा सुद्धा . 

सूर्यास्तानंतर शनीचा प्रभाव सुरु होतो. शनी रात्री बलवान असतो . पहाटेच्या वेळी शनी अधिक बलवान समजला जातो त्याच वेळी अनेकदा हृदय विकार किंवा अन्य दुखणी अधिक होतात . साडेसाती किंवा शनीच्या महादशेत आपण केलेली सर्व पापे अनंत व्याधींच्या रुपात आपल्या समोर एकामागून एक येऊन उभी राहतात आणि आपण मानसिक दृष्टीने कोलमडून जातो . मी मी म्हणणारे आपण जो सांगेल तो उपाय करत सुटतो .जितक्या लवकर शनीचे अस्तित्व आणि त्याचे अबाधित असणारे महत्व आपण स्वीकारू तितके आयुष्य सुकर होयील हे निश्चित .

शनी ग्रहाच्या शांती साठी खालील उपाय करता येतील.

घरातील आणि अन्य वृद्धांची सेवा शुश्रुषा 

शनीचा अखंड जप 

हनुमान चालीसा पठण

मंगळवार ,शनिवार मारुतीचे दर्शन

कणकेचे दिवे 11 शनिवार चढत्या आणि 11 शनिवार उतरते मारुतीच्या मंदिरात लावणे 

नियमित व्यायाम आणि प्राणायाम 

अहंकाराचा त्याग करून लो प्रोफाईल जीवनपद्धतीचा अवलंब करणे 

काळी छत्री दान करणे , अन्नदान करणे.

चतुर्थ श्रेणीच्या लोकांना आदराने वागणूक देणे 

अपंगाना मदत 

नित्य उपासना आपल्यातील असलेला अहं नष्ट करते.


करून बघा , केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे . शनी हेच अंतिम सत्य आहे हे विसरून चालणार नाही .

 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Sunday, 22 January 2023

फेब्रुवारी कार्यशाळा 2023


|| श्री स्वामी समर्थ ||


 ज्यांना ह्या कार्यशाळेत सहभागी ह्ण्याची इच्छा असेल त्यांनी  जाहिराती मध्ये दिलेल्या क्रमांकावर whatsapp करावे .

अस्मिता दीक्षित 

8104639230

Friday, 20 January 2023

शनीचे इतर ग्रहांशी होणारे योग

 || श्री स्वामी समर्थ ||


पत्रिकेत शनी कुठल्याही ग्रहासोबत नसेल आणि कमीतकमी ग्रहांच्या वर दृष्टी टाकत असेल तर उत्तम . शनीच्या नक्षत्रातील ग्रह सुद्धा परिणाम करतात ,वर्ग कुंडली मध्ये शनीची स्थिती कशी आहे ते तपासावे लागतेच . गुरु मध्ये जितके शुभत्व आहे तितकेच अशुभत्व शनीमध्ये आहे . कठल्याही ग्रहाचा परिणाम त्या ग्रहाच्या महादशा , अंतर्दशेत मिळतो. म्हणजेच त्या दशा अंतर्दशेत ते ग्रह फळे देण्यासाठी active होतात .मंगळ शनी युती दशम भावात फळ देयील पण संघर्ष पण करवेल कारण हे दोन्ही शत्रू आहेत . शुक्र शनी युती दशम भावात त्यामानाने सहज फळ देयील . 


रवी शनी युती वडिलांशी पटणार नाही , सरकारशी अनबेन होयील कारण हे दोन्ही ग्रह एकमेकांना पूरक नाहीत . शनी चंद्र युती विषयोग मानला आहे . शनी मंद गतीने जाणारा तर चंद्र मनाचा कारक ,आत्ता इथे तर मग तिथे . चंद्र मनाचे स्वप्नांचे इमले बांधणारा तर शनी जीवनाचे वास्तव स्वीकारायला लावणारा आहे. म्हणून ह्या दोन अत्यंत भिन्न ग्रहांची युती चांगली फलित होताना दिसत नाही . हि युती कुठल्या राशीत होते आहे हेही महत्वाचे आहे . शुक्राच्या वृषभ राशीत हि युती चांगली फळे देयील. पण हीच युती वृश्चिकेत झाली तर मानसिक रित्या त्रासदायक होयील. डिप्रेशन वेडसर पणाची शक्यता . आता पत्रिकेत गुरूची दृष्टी असेल तर फरक पडेल. ह्या योगाला सन्यास योग सुद्धा म्हंटले आहे .


शनी मंगळ युती विस्फोटक आहे. ह्या दोघांमधून विस्तव सुद्धा जाणार नाही . शनी थंड तर मंगळ उद्रेक आहे. ज्वालामुखी आहे तप्त आहे. शनी निराशेकडे झुकणारा तर मंगळ Passion जोपासणारा . त्यामुळे आयुष्यात अनेकदा संघर्ष करावा लागतो . ह्या दोन ग्रहांची युती अपघात , घातपात दर्शवते. पायांचे त्रास विशेषतः गुडघ्याच्या खालच्या भागाला . मंगळ सर्जरीचा कारक आहे. 

मंगळा कडे उतावीळ पणा आहे तर शनीकडे शांतपणे विचारपूर्वक निर्णय घेण्याची वृत्ती आहे. दोघेही एकमेकांच्या विरुद्ध स्वभावाचे. न्यायालयीन कामकाजात ,पुलिस , आर्मी मध्ये हि युती चांगले काम करेल कारण इथे भावनांपेक्षा कर्तव्याला अधिक महत्व आहे .  कर्क राशीत हि युती फोल ठरेल इथे मंगळ निचीचा होयील आत्मविश्वास कमी आणि आजरपण होतील , मकर राशीत हीच युती चांगली फळे देयील. मकर राशीत मंगळ बांधकाम क्षेत्रात यश देयील.

शनी बुध युती .बुध बुद्धीचा कारक आणि शनी लॉजीकल आहे ,अनुभवी आहे त्यामुळे व्यक्ती प्रचंड विचारी तरी होयील किंवा दुसरे टोक गाठेल . कन्या राशीत हि युती उत्तम आणि मेष राशीत वाईट . आपल्या बुद्धीचा दुरुपयोग करतील .

बुध बुद्धीचा , वाणीचा तसेच व्यापाराचा कारक आहे आणि शनी बिघडला असेल तर चोरी ,पैशाची अफरातफरी करणारा . त्यामुळे हि युती चुकीच्या राशीत झाली तर मोठमोठाले फ्रोड , अफरातफरी , बुद्धी भ्रष्ट होते त्यामुळे हि युती असलेल्या लोकांनी सार्वजनिक कामात जिथे लोकांचा पैसा आहे तिथे अजिबात जाऊ नये . भ्रष्ट्राचाराचे आरोप लागतील. ह्या लोकांना बोलायचे असते वेगळे आणि बोलतात वेगळे. तोतरे बोलणे.

गुरु शनी योग हा एक विशेष अध्यात्मिक योग आहे . दोन्ही मोठे ग्रह आणि दोघांचाही जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोण शिकवण एकच फक्त मार्ग वेगळे . शनी एक तपस्वी तर गुरु साधक .हे मिश्रण अफलातून म्हंटले पाहिजे. गुरु अनेक शास्त्रांच्या माध्यमातून शिकवण देयील तर शनी जीवनातील अनुभवातून आपल्याला प्रगल्भ करत जायील. दोघेही जीवनाची मुल्ये शिकवतील आणि जीवन एका वेगळ्याच उंचीवर नेणारी हि असामान्य युती आहे . असे लोक प्रगल्भ विचारांचे आणि विचारवंत असतात . हा योग धर्म आणि कर्माचा आहे. चुकीच्या राशीत हि युती झाली तर व्यक्ती बुद्धिवान न होता निर्बुद्ध होयील . गुरूच्या राशीत चांगले फळ मिळेल . डॉक्टर , समुपदेशक , ज्योतिषी ह्यांच्यासाठी हा योग चांगला .

भोगविलासाचा कारक शुक्रसोबतची शनीची युती  शुक्राच्या गुणात न्यूनता आणेल. विवाहात विलंब आणि वैवाहिक सुखात कमतरता .शनी शुक्र युती तुळेत असेल तर व्यापारात यश मिळते.

शनी राहू युती हि चुकीच्या राशीत झाली तर त्रासदायक . पितृदोष हि युती निर्माण करते . तंत्र मंत्रासाठी हि युती चांगली .

शनी केतू युती गुरूच्या राशीमध्ये फळते . शनी केतू युतीला प्रेतशाप योग म्हंटले आहे. हि युती अष्टम भावात त्रास देणारच . चतुर्थ भावात व्यक्ती विरक्त होताना दिसेल.

प्रत्येक ग्रहाचा आपला स्वतःचा प्रभाव असतो ,दोन ग्रहांची युती होते तेव्हा त्याची फळे प्रकर्षाने मिळतात . दोन्ही ग्रहांची एनर्जी एकत्रपणे मिळते , चांगली आणि वाईट सुद्धा.

प्रत्येक ग्रह हा काहीतरी प्रयोजन ठेवूनच पत्रिकेत असतो , त्याची भाषा समजून घेणे हेच तर आपल्यासारख्या अभ्यासकांचे काम आहे. प्रत्येक पत्रिका एक वेगळे चालेंज असते आणि त्यासाठी अभ्यासाची खोलीही तितकीच सखोल लागते .अजून लिहिण्यासारखे खूप आहे पण तूर्तास इथेच थांबते .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230










Tuesday, 17 January 2023

आपली इच्छा

|| श्री स्वामी समर्थ ||

ज्या क्षणी आपण आपली इच्छा त्यांच्या इच्छेत विलीन करतो. तू जे करशील ते माझ्यासाठी योग्यच असेल ह्यावर दृढ विश्वास आणि निस्सीम श्रद्धा ठेवतो त्या क्षणापासून आपले आयुष्य बदलून जाते . मग मात्र कसलाही विचार नाही . आपल्यासाठी कुठली वेळ योग्य आहे ते त्यांनाच माहित आहे आणि त्या वेळेची वाट पाहणे इतकेच आपल्या हाती आहे. पी हळद हो गोरी हे अध्यात्मात नाही . संयम , पराकोटीचा विश्वास आणि उच्च कोटीची साधना , नामस्मरण  ह्यामुळे  आयुष्यातील सर्वांग सुंदर क्षण पदरात नक्कीच पडतात .

सौ . अस्मिता दीक्षित

शनी कुंभेत

 || श्री स्वामी समर्थ ||

शनी कुंभेत प्रवेश करत आहे. बर मग ??? कुंभ , मीन राशींची साडेसाती आता ....काय होणार ???? असले प्रश्न पडलेले मेसेज आणि फोन बघून थक्क व्हायला होते. याचा अर्थ आपण केलेल्या आणि करत असलेल्या साधनेवर आपला स्वतःचाच विश्वास नाही , हो ना? अहो  शनी महाराजांनी त्यांचा मुक्काम कुंभ राशीत हलवला आहे. ते होणारच होते पुढे ते मीन राशीत प्रवेश करतील. पण ह्या सर्वच गोष्टींचा विचार आपण सकारात्मक भावनेने नाही का करू शकत ? शनी काय राक्षस आहे का? खाणार कि काय तुम्हाला .उलट आता धनु राशीची साडेसाती संपली आहे त्यांनी गेली 8 वर्षे कशी गेली त्याचा विचार करावा आणि कायकाय धडे मिळाले आहेत त्याचा परामर्श घ्यावा चिंतन मनन करावे आणि पुढील आयुष्य जगावे . शनी देवांची शिकवण पुढील आयुष्यात अमलात आणावी म्हणजे पुढे 30 वर्षांनी पुन्हा येणारी धनु राशीची साडेसाती त्यांना परमोच्च मोक्षाचा आनंद नक्कीच मिळवून देयील नाहीतर आहेच मग वेन्तिलेतर आणि आजारपणाची दुखाची मालिका. 


कुंभ म्हणजे ज्ञानाचा घडा आहे. जितके ज्ञानाचे कण वेचता येतील तितके पुढील अडीच वर्षात सगळ्यांनी वेचावेत . हे दिवस पुन्हा 30 वर्ष येणार नाहीत.


प्रत्येक गोष्टीचा वाईटच विचार का करायचा ? शनी मित्र आहे आपला , दाराची बेल वाजवत आहे त्याचे आत्यंतिक आनंदाने स्वागत करा कारण आता त्याचे वास्तव्य आपल्याच घरात पुढे अडीच वर्ष आहे. त्याच्या मनासारखे सचोटीने वागा , थोर्या मोठ्या व्यक्तींचा मान ठेवा , उपासना वाढवा , नामस्मरण वाढवा , लई वेळ असतो आपल्याला , नसेल तर तो आता काढावा लागेल आपल्याच स्वार्थासाठी , दान धर्म करा , सर्वात मुख्य स्वतःला लई शाने समजणे बंद करा , इतर लोक मूर्ख नाहीत ,फक्त तुम्हालाच मेंदू नाही इतरानाही आहे , सर्वाना बरोबर घेवून जायचा प्रयत्न करा . आणि हो कष्टाला अजिबात घाबरू नका , इतके कष्ट करा कि रात्री शांत झोप लागेल पडल्या पडल्या , आपल्या कर्तव्यात चुकू नका . इतके सर्व केल्यावर मग शनी कुंभेत आहे कि अजून कुठे तुम्हाला काय करायचे आहे. आपल्या हातात आहे ते करायचे ते म्हणजे उत्तम कर्म आणि निष्काम उपासना ....स्वतःही घाबरायचे आणि इतरानाही घाबरवायचे हे उद्योग बंद करा. शनी काहीही करणार नाही पण तुमचे नकारात्मक विचार तुम्हाला आजारपण देतील ..मानसिक आणि पुढे शारीरिक सुद्धा . 


शनीचे स्वागत हात पसरून आनंदाने मनापासून करा . साडेसाती हि आयुष्यातील मोठी संधी आहे आणि ती सुद्धा सकारात्मक . कुंभ मीन मकर राशी चे लोक भाग्यवान आहेत कारण शनी त्यांना जीवनाची खरी ओळख करून देण्यासाठी येत आहे. हा माझा तो आपला कोण किती जवळ आहे ते कळेल आता .


साडेसाती तुम्हाला तुमची जागा दाखवेल , किती क्षणभंगुर अस्तित्व आहे आपले आणि माज किती आपल्याला जसे काही अखंड विश्वाचा कारभार आपल्याच खांद्यावर आहे . उद्या आपण गेलो तर 2 क्षण सुद्धा कुणी टिपे गाळणार नाही हे पक्के लक्ष्यात ठेवा .आपले काम झाले कि आपण इथून जाणार हे सत्य आहे ते स्वीकारा ....शनी कुंभेत...साडेसातीची भीती बाळगू नका. शनी मित्र आहे व्हिलन करू नका त्याला...कष्ट करणार्याची ओंजळ सुखाने भरतील शनी महाराज , परदेश गमन , विवाह , वास्तू योग ,संतती सर्व काही प्रदान करतील फक्त जमिनीवरून चाला...इतकच .

सौ . अस्मिता दीक्षित 

संपर्क 8104639230


Monday, 9 January 2023

“ श्वासागणिक नामस्मरण “ हीच निष्काम साधना (अखंड नामस्मरणाचे , निष्काम साधनेचे , समर्पणाचे वाण लुटुया )

 || श्री स्वामी समर्थ ||




साधनेस , ध्यान धारणेस सुरवात करायची आहे. नामस्मरण करायचे आहे .... कधीपासून करू ? कुठले आसन घेवू ? रोज एकाच जागेवर बसून जप करू का ? खुर्चीवर बसू कि जमिनीवर ? कुठली माळ घेवू प्रत्येक जपाला वेगवेगळी माळ घेवू का? जप सकाळी करू कि संध्याकाळी ? अंघोळ करून जप करायचा का ? हे स्त्रियांनी करायचे कि पुरुषांनी ? प्रश्नांची मालिका संपतच नाही ..बर इतके प्रश्न विचारून शेवटी जपास सुरवात झाली का ? असो.


मुळातच परमेश्वराचे नामस्मरण करावे हा विचार मनात येणे हीच गुरुकृपा आहे असे समजायला हरकत नाही . संकट गळ्याशी आल्याशिवाय परमेश्वराची आठवण येत नाही . आईला मुलाची आठवण मंगळवारी सकाळी शुक्रवारी दुपारी येते का? नाही. मुलाची नाळ आईशी जोडली गेली आहे म्हणून आई कुठेही असो सदैव आपल्या लेकरांचा विचार करते .हो कि नाही ? अगदी तसेच माऊलींचा विचार भक्तांच्या हृदयात सतत असतो , मग जप करायला काळ वेळ दिवस आसन खुर्ची हे सगळे आवश्यक आहे का? नाही हे सगळे दुय्यम आहे .  “ श्वासागणिक नामस्मरण “ हीच निष्काम साधना आहे. जगात काय चालले आहे ह्याचा विसर पडला पाहिजे. स्वयपाक करताना , कपडे वाळत घालताना , भाजी निवडताना , बस ट्रेन मध्ये प्रवास करताना , नित्य कर्म करताना क्षणोक्षणी त्याचेच स्मरण त्याचेच नाव मुखी असेल तर सुख आणि दुख सारखेच वाटेल . आपण त्याच्या अस्तित्वात विलीन होऊ आणि व्यर्थ गोष्टी मनाला  त्रास देणार नाहीत . अर्थात हि अवस्था यायला वेळ लागेल कारण त्याला अडथळे म्हणजे टीव्ही वरील मालिका , सोशल मिडिया अशी अनेक प्रलोभने आहेत . पण तरीही मनाचा निर्धार केला कि मी निदान 5 मिनिटे तरी रोज काहीतरी साधना करणार तर मग त्याची गोडी लागते . 


देवालाही भक्त हवेच कि मग त्यालाही आपल्या लाडक्या भक्तांना प्रचीती द्यावी लागतेच  .एकदा प्रचीती आली कि मग श्रद्धा दृढ होत जाते आणि मग महाराज किंवा ती देवता आपल्या तनामनावर राज्य करू लागते . आपले फमिली डॉक्टर जसे एकच असतात अगदी तसेच आपले सद्गुरू आपली कुलस्वामिनी सुद्धा . कपड्याप्रमाणे रोज त्यात बदल अपेक्षित नाही तो चाळा व्यर्थ आहे. एकच गुरु करा पण त्यांचे पाय घट्ट धरून ठेवा , सेवा करत राहा . त्यांनी आपल्याला काय द्यायचे आणि ते कधी द्यायचे ते त्यांना ठरवूदेत , आपण घेण्याच्या पात्र झालो कि ते देणारच पण त्यासाठी अट्टाहास नको आणि ते मिळवण्यासाठी नामस्मरण तर अजिबात नको .


दिवसातून आपली 100 वाक्ये असतात ..मी पारायण केले मी जप केला मी हे केले आणि मी ते केले. नखशिखांत अहंकार आहे आपल्याला . मी गुरुचरित्र वाचतो मी हे करतो आणि ते करतो . अहो तुम्ही आम्ही कोण हे सर्व करणारे???? ते करून घेत आहेत आपल्याकडून म्हणून  महाराजांनी आज माझ्याकडून पारायण करून घेतले हे वाक्य अधिक समर्पक होयील आणि ऐकायलाही आवडेल आपल्याला आणि आपल्या महाराजानाही . त्यांना सर्व श्रेय दिले कि आपल्याकडे “ मी “ राहणार नाही त्यामुळे अहंकाराला वाव सुद्धा राहणार नाही . डोळे उघडले कि महाराज आणि बंद केले तरी महाराज हि मनाची अवस्था यायला मग फार वेळ लागणार नाही . हळू हळू प्रापंचिक संकटे शुल्लक वाटायला लागतील. सगळे मनाचे आणि शरीराचे आजार दूर पळून जातील . सगळा प्रपंच  द्या त्यांच्यावर सोडून आणि मग बघा आत्यंतिक आनंदाची अनुभूती येणारच  . 


ज्या गोष्टी आपल्याला कारण नसताना मोठ्या वाटायच्या त्याच आता किडा मुंगी समान वाटू लागतील. त्यांना कारण नसताना दिलेले अनन्यसाधारण महत्व कमी होईल आणि जीव त्यांच्यातच गुंतून राहील. जे होते आहे ते त्यांच्या इच्छेने ह्यावर एकदा आपली निस्सीम श्रद्धा जडली कि दुक्ख संकटांची होळी झालीच म्हणून समजा . हीच भावना मनात असते म्हणून लाखो वारकरी चंद्रभागेच्या काठाशी उभे राहून फक्त कळसाचे दर्शन घेवून माघारी फिरतात , प्रत्यक्ष माऊलींच्या दर्शनाची मग गरजच उरत नाही.

आपली एकेक पाऊले मृत्यूकडे जात आहेत ,वेळ कमीकमी होत आहे तेव्हा आता तोच वेळ फुकट न घालवता ह्या आणि पुढील जन्माचे सुद्धा सार्थक करण्याची एकमेव संधी म्हणजे अखंड नामस्मरण मग ते घरात बाहेर कुठेही असो . जिथे असू तिथे नाम घेवू हे एकदा अंगवळणी पडले कि मनालाही त्याची सवय होयील आणि मुखी फक्त नाम असेल .

म्हणून पुन्हा सांगावेसे वाटते प्रश्न थांबवा आणि नामस्मरण सुरु करा .आपला भाव ते ओळखतात आणि म्हणूनच त्यांच्या सेवेची संधी त्यांनीच आपल्याला दिलेली आहे त्याचे सार्थक करुया आणि जीवन खर्या अर्थाने जगूया .


ह्या वर्षाची मकर संक्रांत काहीतरी वेगळे करून साजरी करुया . पारमार्थिक आनंद लुटुया . अखंड नामस्मरणाचे , निष्काम साधनेचे , भक्तीचे , समर्पणाचे वाण लुटुया ...आनंद देवूया आणि घेवूया .

श्री स्वामी समर्थ 

संकलन : सौ . अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230 


Saturday, 7 January 2023

शनीचे Appraisal 2023

 || श्री स्वामी समर्थ ||


शनीमहाराज वर्षातील पहिल्या महिन्यातच राशी बदल करत आहेत त्या निम्मित्ताने शनी महाराजां विषयी माहिती प्राप्त करून घेण्यासाठी ह्या महिन्याच्या प्रत्येक शनिवारी लेख लिहिण्याचा मानस आहे. शनी महाराजांच्या कृपेने तो पूर्णत्वास जावा हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .  

शनी आणि गुरु ह्यासारखे मोठे ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा आपल्या सर्वांचेच ह्या अनुषंगाने बदलणाऱ्या घटनांकडे लक्ष वेधले जाते. शनी महाराज हे विलंब करणारे , वार्धक्याचे कारक मानले आहेत हे आपण सर्व जाणताच. कर्म आणि त्यानुसार फळ हे शनीचे मोठे खाते आहे. निसर्ग कुंडलीत म्हणूनच 10 आणि 11 हे भाव शनीला दिले आहेत . दशम स्थान म्हणजे कर्मस्थान . जसे कर्म कराल तसे फळ म्हणून 11 वा लाभ ( आय) भाव सुद्धा इथे समाविष्ट आहे. 

तुम्ही आज जसे कर्म करणार तसे उद्या फळ हाच मंत्र शनी महाराज आपल्याला जपायला सांगत आहेत . 

ह्या ग्रहांचे गोचर भ्रमण मानसिक शारीरिक व्यक्तिशः सामाजिक आर्थिक भौगोलिक राजकारण अश्या सर्व स्थरांवर प्रभाव टाकणारे असते म्हणूनच त्याचा अभ्यास करणे अति आवश्यक असते . 

शनी 18 जानेवारीला त्याच्या कुंभ ह्या मुलत्रिकोण राशीत प्रवेश करत आहे जिथे 2025 मार्च पर्यंत वास्तव्य करणार आहेत . आपल्या कार्यालयात आपल्या वरिष्ठांचे आपल्यावर लक्ष असते आणि आपल्या कामानुसार आपले वार्षिक Appraisal होते अगदी त्याचप्रमाणे आपल्या कर्माचा हिशोब ठेवणारे शनी महाराज आपले Appraisal करणार आहेत . ते सर्वार्थाने आपल्या कर्मावर अवलंबून आहे .पटतय ना? आपण केलेली चांगली वाईट कर्मे फक्त आपल्याला आणि वरच्यालाच माहित असतात . शनी महाराज आता त्याचा फक्त लेख जोख मांडणार इतकच . साडेसाती आली कि आपली धावपळ सुरु होते कारण आता केलेल्या सर्व कर्मांची आठवण होते ,मित्रानो हाच आहे शनीचा धाक. आपण केलेय चुकीच्या गोष्टी अश्याच विरून जातील कुणालाच समजणार नाही ह्या भ्रमात ह्या जगात कुणीही राहू नये कारण ज्याने आपल्याला जन्माला घातले , घडवले तो डोळ्यात तेल घालून आपल्यावर लक्ष्य ठेवुन आहेच कि . 

शनीचेच नाही तर कुठल्याही ग्रहाचे राशी परिवर्तन होताना थोडा खडखडाट हा होणारच . एखादी ट्रेन आपल्या track वरून दुसर्या track वर जाताना जसा काही क्षण खडखडाट होतो ना अगदी तसाच , अनेक बदल होतात , व्यवस्थापीय बदल जे सामान्य जनतेच्या हितासाठी असतात कारण मुळातच शनी सामान्य जनतेचा प्रतिनिधित्व करतो. 


शनी च्या ह्या गोचर भ्रमणा मुळे धनु राशीची साडेसाती संपणार आहे तर मकर राशीला शेवटची , कुंभ राशीला मधली आणि मीन राशीला पहिली अडीचकी असणार आहे . तसे पाहायला गेले तर साडेसाती शिवाय इतर राशींवर सुद्धा त्याचा परिणाम होणारच आहे . माझी कुंभ राशी आहे मकर राशी आहे मग मला त्रास नाही असल्या वल्गना कुणी करू नये , केल्या तर भ्रमनिराश होतील. 

कुंभ राशी निसर्ग कुंडलीत लाभ भावात येते . शनी हा कष्टकरी समाजाचे नेतृत्व करणार आहे त्यामुळे हि समाजाची राशी म्हणायला हरकत नाही . 2023 मध्ये शनीचे कुंभ राशीत होणारे गोचर भ्रम पाहताना गेले 3 वर्ष शनीने मकर राशीत केलेला हाहाकार विसरून चालणार नाही. शनी प्लुटो युतीने करोनाला जन्माला घातले आणि आपले जीवन बदलून गेले. माणसांची पैशाची किंमत समजली आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा झाली. आपले अस्तित्व किती क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव करोना ने आपल्याला करून दिली आणि मग जगण्याची आणि जगवण्याची धडपड सुरु झाली. मकर राशी आपली सीमारेषा , सत्ता , अर्थव्यवस्था ,व्यवस्थापन दर्शवणारी आहे आणि गेले दोन वर्षात तिथले बुरुज कोसळले .

 शनीला 3 दृष्ट्या आहेत 3 7 10. तिसरी दृष्टी मेष ह्या मंगळाच्या तडफदार पण उतावळ्या राशीवर , सातवी राजराशी सिंह राशीवर आणि 10 वी पुन्हा मंगळाच्या वृश्चिक राशीवर . मेषेत हर्शल आणि राहू गोचर करत आहेत. हवे ते मिळवण्यासाठी राहू काहीही करेल जे अर्थात शनीला पसंत नाही . कुठलेही काम आपल्यासाठी नाही तर समाजासाठी लोकांसाठी हि हिताचे आहे कि नाही हे न बघणार्यांना शनी चौदावे रत्न दाखवेल हे निश्चित . 


आपल्या कष्टांनी उच्च पद प्रतिष्ठा मिळवून राजसी जीवन व्यतीत करणारे सिंह राशीचे लोक आहेत . उच्च पदामुळे मिळालेली प्रतिष्ठा मानसन्मान त्यांना थोडासा अहंकार सुद्धा देणारच . शनी धनिष्ठा नक्षत्रातून जात आहे . हुकुम गाजवणाऱ्या लोकांनी जरा त्यांच्या अधिकारांचा अयोग्य वापर करणे सोडून दिले पाहिजे . शनी आणि कुंभ राशी हि लोकशाही दर्शवणारी आहे. Democracy ला सर्वात प्राधान्य असणार आहे . शनी एका राशीत अडीच वर्ष म्हणजे 12 राशीतून भ्रमण करायला त्याला 30 वर्ष लागतील. गेल्या 30 वर्षापूर्वी जगात कंप्यूटर च्या क्षेत्रात बरीच मोठी क्रांती झाली आजी आपले जीवनच बदलून गेले . नवीन technology , यंत्रणा ह्यात नक्कीच काहीतरी क्रांती करण्यात ह्या कुम्भेतील शनीचे योगदान निश्चित असणार आहे.

शनीकडे वायुतत्व आहे. त्यामुळे विमान सेवा , स्पेस ह्यामध्ये काहीतरी क्रांती होयील. जुन्या गोष्टी जाऊन नवीन गोष्टी पुढे येतील. अनेक देशांतून सुद्धा technology ह्यासारख्या गोष्टींसाठी एकतर येऊन काम केले जायील. धनूची साडेसाती संपेल, मिथुन आणि तुळा राशीच्या लोकांची पनवती संपेल आणि कर्क वृश्चिक राशींची शनीची पनवती  किंवा ढय्या सुरु होईल. 

मुळात आपल्याला हे दैवी शास्त्र मदत करत आहे हे पक्के लक्ष्यात ठेवले पाहिजे . शनी असो अथवा गुरु त्यांचे असणे हे आपल्यासाठी महत्वाचे आहे . त्या ग्रहांचा प्रभाव आपल्यावर आहेच पण उत्तरोत्तर त्याचे फळ चांगले मिळण्यासाठी आपले कर्म शुद्ध सात्विक असणे गरजेचे आहे.

शनी आपला शत्रू आहे आणि आता तो आपले फक्त वाईटच करणार ह्या चुकीच्या विचारांना आधी मनातून हद्दपार करा . ग्रह आपले जीवनाच्या प्रवासातील सोबती आहेत .त्यांच्यासोबतच तुमचा आमचा सर्वांचा प्रवास सुखमय होवूदे हीच सदिच्छा.

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230