|| श्री स्वामी समर्थ ||
साधनेस , ध्यान धारणेस सुरवात करायची आहे. नामस्मरण करायचे आहे .... कधीपासून करू ? कुठले आसन घेवू ? रोज एकाच जागेवर बसून जप करू का ? खुर्चीवर बसू कि जमिनीवर ? कुठली माळ घेवू प्रत्येक जपाला वेगवेगळी माळ घेवू का? जप सकाळी करू कि संध्याकाळी ? अंघोळ करून जप करायचा का ? हे स्त्रियांनी करायचे कि पुरुषांनी ? प्रश्नांची मालिका संपतच नाही ..बर इतके प्रश्न विचारून शेवटी जपास सुरवात झाली का ? असो.
मुळातच परमेश्वराचे नामस्मरण करावे हा विचार मनात येणे हीच गुरुकृपा आहे असे समजायला हरकत नाही . संकट गळ्याशी आल्याशिवाय परमेश्वराची आठवण येत नाही . आईला मुलाची आठवण मंगळवारी सकाळी शुक्रवारी दुपारी येते का? नाही. मुलाची नाळ आईशी जोडली गेली आहे म्हणून आई कुठेही असो सदैव आपल्या लेकरांचा विचार करते .हो कि नाही ? अगदी तसेच माऊलींचा विचार भक्तांच्या हृदयात सतत असतो , मग जप करायला काळ वेळ दिवस आसन खुर्ची हे सगळे आवश्यक आहे का? नाही हे सगळे दुय्यम आहे . “ श्वासागणिक नामस्मरण “ हीच निष्काम साधना आहे. जगात काय चालले आहे ह्याचा विसर पडला पाहिजे. स्वयपाक करताना , कपडे वाळत घालताना , भाजी निवडताना , बस ट्रेन मध्ये प्रवास करताना , नित्य कर्म करताना क्षणोक्षणी त्याचेच स्मरण त्याचेच नाव मुखी असेल तर सुख आणि दुख सारखेच वाटेल . आपण त्याच्या अस्तित्वात विलीन होऊ आणि व्यर्थ गोष्टी मनाला त्रास देणार नाहीत . अर्थात हि अवस्था यायला वेळ लागेल कारण त्याला अडथळे म्हणजे टीव्ही वरील मालिका , सोशल मिडिया अशी अनेक प्रलोभने आहेत . पण तरीही मनाचा निर्धार केला कि मी निदान 5 मिनिटे तरी रोज काहीतरी साधना करणार तर मग त्याची गोडी लागते .
देवालाही भक्त हवेच कि मग त्यालाही आपल्या लाडक्या भक्तांना प्रचीती द्यावी लागतेच .एकदा प्रचीती आली कि मग श्रद्धा दृढ होत जाते आणि मग महाराज किंवा ती देवता आपल्या तनामनावर राज्य करू लागते . आपले फमिली डॉक्टर जसे एकच असतात अगदी तसेच आपले सद्गुरू आपली कुलस्वामिनी सुद्धा . कपड्याप्रमाणे रोज त्यात बदल अपेक्षित नाही तो चाळा व्यर्थ आहे. एकच गुरु करा पण त्यांचे पाय घट्ट धरून ठेवा , सेवा करत राहा . त्यांनी आपल्याला काय द्यायचे आणि ते कधी द्यायचे ते त्यांना ठरवूदेत , आपण घेण्याच्या पात्र झालो कि ते देणारच पण त्यासाठी अट्टाहास नको आणि ते मिळवण्यासाठी नामस्मरण तर अजिबात नको .
दिवसातून आपली 100 वाक्ये असतात ..मी पारायण केले मी जप केला मी हे केले आणि मी ते केले. नखशिखांत अहंकार आहे आपल्याला . मी गुरुचरित्र वाचतो मी हे करतो आणि ते करतो . अहो तुम्ही आम्ही कोण हे सर्व करणारे???? ते करून घेत आहेत आपल्याकडून म्हणून महाराजांनी आज माझ्याकडून पारायण करून घेतले हे वाक्य अधिक समर्पक होयील आणि ऐकायलाही आवडेल आपल्याला आणि आपल्या महाराजानाही . त्यांना सर्व श्रेय दिले कि आपल्याकडे “ मी “ राहणार नाही त्यामुळे अहंकाराला वाव सुद्धा राहणार नाही . डोळे उघडले कि महाराज आणि बंद केले तरी महाराज हि मनाची अवस्था यायला मग फार वेळ लागणार नाही . हळू हळू प्रापंचिक संकटे शुल्लक वाटायला लागतील. सगळे मनाचे आणि शरीराचे आजार दूर पळून जातील . सगळा प्रपंच द्या त्यांच्यावर सोडून आणि मग बघा आत्यंतिक आनंदाची अनुभूती येणारच .
ज्या गोष्टी आपल्याला कारण नसताना मोठ्या वाटायच्या त्याच आता किडा मुंगी समान वाटू लागतील. त्यांना कारण नसताना दिलेले अनन्यसाधारण महत्व कमी होईल आणि जीव त्यांच्यातच गुंतून राहील. जे होते आहे ते त्यांच्या इच्छेने ह्यावर एकदा आपली निस्सीम श्रद्धा जडली कि दुक्ख संकटांची होळी झालीच म्हणून समजा . हीच भावना मनात असते म्हणून लाखो वारकरी चंद्रभागेच्या काठाशी उभे राहून फक्त कळसाचे दर्शन घेवून माघारी फिरतात , प्रत्यक्ष माऊलींच्या दर्शनाची मग गरजच उरत नाही.
आपली एकेक पाऊले मृत्यूकडे जात आहेत ,वेळ कमीकमी होत आहे तेव्हा आता तोच वेळ फुकट न घालवता ह्या आणि पुढील जन्माचे सुद्धा सार्थक करण्याची एकमेव संधी म्हणजे अखंड नामस्मरण मग ते घरात बाहेर कुठेही असो . जिथे असू तिथे नाम घेवू हे एकदा अंगवळणी पडले कि मनालाही त्याची सवय होयील आणि मुखी फक्त नाम असेल .
म्हणून पुन्हा सांगावेसे वाटते प्रश्न थांबवा आणि नामस्मरण सुरु करा .आपला भाव ते ओळखतात आणि म्हणूनच त्यांच्या सेवेची संधी त्यांनीच आपल्याला दिलेली आहे त्याचे सार्थक करुया आणि जीवन खर्या अर्थाने जगूया .
ह्या वर्षाची मकर संक्रांत काहीतरी वेगळे करून साजरी करुया . पारमार्थिक आनंद लुटुया . अखंड नामस्मरणाचे , निष्काम साधनेचे , भक्तीचे , समर्पणाचे वाण लुटुया ...आनंद देवूया आणि घेवूया .
श्री स्वामी समर्थ
संकलन : सौ . अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment