Saturday, 23 December 2023

केतू

 || श्री स्वामी समर्थ ||


एखादा आजार दीर्घकाळ बरा न होणे किंवा बरा होण्यास विलंब लागणे हे शनीचे काम आहे. कारण विलंब हा त्याचा स्वभाव आहे. दीर्घ आजारपणात एखादा शरीराचा भाग सडतो किंवा कुजतो ह्यासाठी सुद्धा शनीच कारणीभूत आहे पण शेवटी हा सडलेला अवयव शरीरापासून वेगळा करावा लागतो किंवा तो करणेच हितावह असते अश्यावेळी तिथे केतू कार्यरत असतो. एखादे कलम करणे , शरीरापासून नको तो कुजलेला अवयव वेगळा करणे हे केतूचे काम. शस्त्रक्रिया करण्यासाठी मंगळ . म्हणूनच एकंदरीत एखादा अवयव काढून टाकण्यासाठी प्रथम , अष्टम , व्यय भाव तसेच शनी मंगळ केतू हे ग्रह कार्यान्वित झालेले दिसतात . 


सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230


Sunday, 10 December 2023

Attachment मग Detachment

 || श्री स्वामी समर्थ ||

केतू हा विरक्त करणारा ग्रह आहे. केतू म्हणजे पूर्व जन्मातील सुख दुक्खाचे गाठोडे जे आपण ह्या जन्मात घेवून येतो . केतू म्हणजे कळसा वरील पताका , केतू मंगळा सारखी फळे देतो अश्या अनेक गोष्टी आपल्या वाचनात आहेत. ज्योतिष हे तर्क शास्त्र आहे . आपल्याला अनुभूती मिळाली कि नियम बरोबर लागला असे समजायला हरकत नाही .

केतू हा विरक्त करतो पण आपण विरक्त कुणापासून होतो ज्यांच्याशी आपण एके काळी खूप जवळचे असतो किंवा घट्ट मैत्री असते . ज्यांच्याशी खूप attached असतो त्यांच्यापासूनच दूर जातो म्हणजे विरक्त होतो .

परवा एक पत्रिका पाहताना हा अनुभव आला . तृतीय स्थान हे भावंडे आणि शेजारी . जातकाने शेजारी असो कि भावंड त्यांच्यासाठी आपले प्रेम पणाला लावले. माया केली . त्यांच्या सुखासाठी पदरचा पैसाही खर्च केला . पण तृतीयातील केतू वरून जेव्हा गोचर केतूचे भ्रमण झाले तेव्हा घडलेल्या अनेक घटनांतून ह्याच लोकांपासून जातक विरक्त झाला. आता त्याला त्यांची तोंडे सुद्धा पहावीशी वाटत नाहीत इतके बरेवाईट अनुभव जातकाला आले आणि शेवटी तृतीय भावातून दर्शवलेल्या व्यक्तीसापेक्ष संबंधातून तो विरक्त झाला. 

एकेकाळी ज्यांच्याशिवाय पान हलत नव्हते त्यांची आज आठवण सुद्धा नकोशी वाटावी इतकी विरक्ती आज जातकाला केतूने दिलेली आहे. खरे सांगायचे ते हे सर्व लोक जातकाचे कधीच नव्हते पण ते समजायला वेळ यावी लागते . आधी attachment आणि शेवटी detachment. शेवटी काय तर आपले स्वतःचेच अनुभव आणि ग्रह आपल्याला वेळ आली कि फळे देत असतात , अनुभवांनी संपन्न करत असतात . प्रश्न अंतर्मुख होऊन विचार करण्याचा आहे इतकच . इथे तृतीयेश आणि तृतीय भावाचा कारक मंगळ ह्यांचाही विचार आवश्यक आहे.  हाच अनुभव तृतीयेश किंवा तृतीय भावाचा कारक मंगळ बिघडला तरी सुद्धा येतो . 

आपले अनुभव सुद्धा कळवा .

सौ. अस्मिता दीक्षित 
संपर्क : 8104639230


Wednesday, 6 December 2023

मनस्वी चंद्र

 || श्री स्वामी समर्थ ||



प्रेमिकांचा ,कवींचा लाडका चंद्र .आयुर्वेदात शरदपौर्णिमेच्या चांदण्याचा औषधासाठी उपयोग करून घेतला जातो. पृथ्वी वायुरूप अवस्थेतून घनरूपात येताना सूर्याच्या आकर्षणामुळे पृथ्वीचा एक मोठा तुकडा तिच्यापासून वेगळा झाला आणि पृथ्वीभोवती फिरत राहिला अशी चंद्राची जन्मकथा आहे. 

पत्रिकेचा अभ्यास करताना रवी आणि चंद्र हे दोन ग्रह सर्वप्रथम तपासणे आवश्यक आहे. चंद्र हा स्त्री ग्रह आहे. रवी आत्म्याचा तर चंद्र हा मनाचा कारक आहे. विश्वाचा गाडा सुरळीत चालू ठेवण्याचे महान कार्य परमेश्वराने स्त्रीकडे सोपवले आहे .म्हणूनच संसार हा स्त्री शिवाय अपूर्ण असतो . अखंड विश्वात जे सुंदर , कोमल , पवित्र आहे ते स्त्रीमध्ये सामावले आहे तसेच चंद्राची सात्विकता , कोमलता ह्याचाही संगम स्त्रीमध्ये असतोच. स्त्री ला आपण भावी पिढीची निर्मिती म्हंटले तर वावगे ठरू नये. स्त्रीमध्ये जी आकर्षण शक्ती आहे तीच चंद्रात सुद्धा आहे . चन्द्रमाः मनसो जातः .चंद्र हा आपल्या मनाचा कारक ग्रह आहे म्हणूनच माणसाची मानसिकता हि पत्रिकेतील चंद्रावरून समजते. चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला 27 दिवस 7 तास 43 मिनिटे लागतात .म्हणून चंद्र एका राशीत सव्वादोन दिवस असतो. चंद्र हा शीघ्र गतीने जाणारा ग्रह आहे त्याला एका जागी थांबणे माहीतच नाही .

चंद्राचे कारकत्व सागरासारखे अत्यंत विशाल आहे. माणसाचे मन कधीच कुणाला कळत नाही . असंख्य विचारांची भाऊगर्दी माणसाच्या मनात होत असते. अश्या च्या चंचल मनाचा कारक चंद्र आहे. 

आई , मातृसुख , सफेद रंग आणि सफेद वस्तू , मोती , चांदी ,प्रवाही पदार्थ , जलाशय , पाण्यासंबंधी असणारे व्यवसाय , बोटी , स्नानगृहे , स्विमिंग पुल , औषधे ,फळेफुले , बागायत ,मासेमारी ,सुगंधी द्रव्ये , अत्तरे , काव्यगायन चंद्राच्या अधिपत्याखाली येतात .

चंद्र हा मातेशी संबंधित असल्यामुळे चेतना , स्फूर्ती , माया ममता , वात्सल्य ,कुटुंबियांबद्दल असणारी आत्मीयता ,काटकसर , धरसोड,सावध वागणूक तसेच शरीरातील शिरा ,धमण्या , स्पर्शजन्य ज्ञान , जलोदर , घश्याचे आजार ,खोकला , डोळे दुखणे , पक्षाघात ,लहानमोठे आतडे ,दमा ,स्तन , मासिक पाळीचे आजार चंद्रावरून दर्शवले जातात .वृषभ आणि कन्या राशीत म्हणजे पृथ्वितत्वाच्या राशीत चंद्र असणारी मंडळी] निरोगी , शरीराने मजबूत असतात .कुंडलीचे उदित भाग म्हणजे लाग्न्बिंदू ते सप्तम बिंदू येथील चंद्र जीवनशक्ती आणि चांगले आरोग्य देतो . अग्नितत्वाच्या राशी चंद्राला विशेष अनुकूल नसतात . आरोग्याच्या दृष्टीने चंद्राला प्रतिकूल राशी म्हणजे मकर आणि वृश्चिक . वृश्चिक राशीत चंद्र असेल तर स्त्रियांचा मासिक धर्म हा अनियमित असतो . स्त्रियांच्या गर्भाशयावर सुद्धा चंद्राचा अंमल आहे. अग्निराशीतील चंद्रावर शनी ,राहू , मंगळ ,हर्शल ह्यांचा अशुभ दृष्टीयोग असेल तर स्त्रियांच्या अंगावरील दुधाचे प्रश्न निर्माण होतात. स्त्रीच्या शरीरात दुध उत्पन्न करण्याचा कारक चंद्र असून अश्रू निर्माण करण्याचे कामही तोच करतो.

चंद्राचा जप 11000 आहे. तसेच पत्रिकेत चंद्र बिघडला असेल तर शंकराची उपासना सांगितली आहे. मोती हे चंद्राचे रत्न सांगितले आहे. 

चंद्र हा रजोगुणी आणि जलतत्वाचा आहे. जलतत्व हे निरागस , संवेदनशील , हळवे ,कोमल पण बिघडले तर निराशावादी अश्या गुणाचे तत्व आहे. रवी समोर चंद्र असतो तेव्हा पौर्णिमा आणि रवी समोर चंद्र असतो तेव्हा अमावास्या असते. रविला चंद्राने मित्र म्हणून जवळ केले आहे. अग्नी तत्वाच्या रविला चंद्राने मित्र म्हणून जवळ करावे हे एक कोडेच म्हणावे लागेल.बुधाने चंद्राला शत्रू मानले असले तरी चंद्राने बुधाला आपला मित्र मानले आहे. चंद्राने राहू सोडला तर सगळ्यांनाच आपल्या मैत्रीचा आहात पुढे केला आहे. चंद्राची स्वराशी कर्क असून चंद्र वृषभ राशीत उच्चीचा आणि वृश्चिकेत निचीचा आहे. 

रोहिणी , हस्त आणि श्रवण हि ३ नक्षत्रे चंद्राची आहेत .रोहिणी हे मनुष्य गणी तर  इतर दोन नक्षत्रे हि देवगणी आहेत.

चंद्र हे जलतत्व आहे . मोक्ष त्रिकोणाची सुरवात जलतत्वापासूनच होताना दिसते कारण चतुर्थात चंद्राचीच कर्क राशी येते .संवेदना असल्याशिवाय अध्यात्मिक प्रगती होणारच नाही . सद्गुरूंचे चरण किंवा नुसती आठवण आली तरी डोळ्यातून अश्रू येणे हेच पारमार्थिक प्रगतीचे पहिले पाऊल आहे. 

मन आहे फक्त ते दिसत नाही आणि त्या मनावर चंद्राचे अधिराज्य आहे . मन उदबत्तीच्या धुरासारखे असते ..सतत गतिमान ..माणसाचे मन स्थिर असेल तर तो जग जिंकेल आणि तेच मन निराश झाले तर आयुष्य नकोसे होईल. जीवनातील रस निघून जायील. 

चंद्र हा जलतत्व आहे आणि जल म्हणजे पाणी ,लक्ष्मी , जीवन , संवेदना , प्रेम. आयुष्यातून प्रेम वजा केले तर काहीच राहणार नाही . माणूस हा सदैव प्रेमाचा भुकेला असतो . दोन गोड शब्द माणसाला आयुष्यात पुन्हा उभे करू शकतात . हीच चंद्राची आणि आपल्या गुरुंचीही शिकवण आहे . 

चंद्रासारखे होण्याचा प्रयत्न करुया .शीतल , निर्मळ मनाने कुटुंब आणि माणसेही जपूया .

सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230  


Monday, 4 December 2023

ब्रम्हांडातील शक्ती

 || श्री स्वामी समर्थ ||




रोज अगदी प्रत्येक क्षणी आपले षडरिपू आपल्या अवती भोवती फिरतच असतात . कधी आपण मोहाच्या आहारी जातो तर कधी क्रोधाच्या . कुठलातरी रिपू आपल्यावर हाबी होत असतोच . हे सर्व रिपू आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. एखादी  घटना आपल्याला सुखावते तर एखादी दुक्खाचे पहाड उभी करते. कधी आपला आत्मविश्वास द्विगुणीत होतो तर कधी आपण निराशेच्या गर्तेत खोलवर गोते खातो . आनंद आणि दुक्ख हेच जीवन नाही तर त्याही पलीकडे अनेक भावनांचे मिश्रण म्हणजे जीवन. अत्यंत अशाश्वत असे हे आपले जीवन आणि म्हणूनच आत्ताचा क्षण महत्वाचा आहे . पुढच्या क्षणाचे कुणाला ज्ञात आहे? कुणालाही नाही . 

आत्ताचा क्षण भरभरून जगणारा नेहमीच आनंदी असतो. सुखाचा सदरा परिधान करून शांत झोप घेणारा माणूस आत्ताच्या क्षणाचा पुरेपूर आस्वाद घेणारा असतो . आजच्या जगतात हे खूप कमी पाहायला मिळते . पण खर सांगू का इतर गोष्टी सोडा पण हे अंगवळणी पाडून घ्या तर आणि तरच जीवनाचा आनंद लुटता येयील . कारण आत्ताचे जीवन आणि आपले प्रश्न हे आपली शेवटच्या क्षणापर्यंत पाठ सोडणार नाहीत पण ह्या सर्वात जीवन जगायचे मात्र राहून जायील.

प्रत्येक वेळी आपल्या मनासारखे घडेल असे नाही. कधी कुणी आपल्याला दुखावते , आपल्या मनाविरुद्ध वागते , कुणी अपमानास्पद बोलते वागते , आपल्याला कमी लेखते .अश्यावेळी आपण पण शब्द संहार करून समोरच्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करतो आणि अगदी तिथेच आपण चुकतो. त्याने चुकीचे कर्म केले आहे त्याची परतफेड करण्यासाठी आपण कश्याला आपले कर्म वाढवून घ्यायचे ? आणि मग ते फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा. का कश्यासाठी . ज्याचे त्याच्यापाशी मग ते चांगले असो अथवा वाईट . ते त्याला फेडायलाच लागते . कर्म केले कि त्याचे फळ भोगणे हे आलेच कि कारण कर्म तुम्हाला चिकटलेले असते .

आपल्या ब्रम्हांडात अश्या अनेक शक्ती आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत पण अनुभवायला येतात . त्यांचे दिव्य अनुभव आपल्याशी जोडले गेलेले आहेत . ह्या शक्ती म्हणजे पंचतत्व , दिशा , आकाशातील तारे  आणि सर्वात महत्वाचे आपले मन . ह्याहीपलीकडे एक सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजे सद्गुरू . आपल्या प्रत्येक कृतीकडे त्यांचे लक्ष आहे. आपण आपल्या सद्गुरूंच्या दृष्टीक्षेपात आहोत ह्यासारखे पुण्य ते काय ? 

कुठल्याही स्थितीत आपण आपले कर्म वाढवून घ्यायचे नाही . हे सोपे नाही पण अशक्यही नाही. ब्रम्हांडातील ह्या शक्ती सर्वच हिशोब ठेवतात त्यामुळे आपण आपले कर्म प्रतिशोध घेण्याच्या धुंदीत वाढवून ठेवू नये. त्याने काहीच साध्य होणार नाही . कारण ते परत आपल्यालाच फेडायला लागणार आहे. 


सतत काहीतरी वाईट होईल हि भीती मनातून काढून टाकली पाहिजे . आणि जर होणारच असेल तर आपण विचार करून ते बदलणार नाही उलट आपल्याला मानसिक अस्वास्थ्याला तोंड द्यावे लागेल.  सतत घाबरत जगणे , चिंता , कल्प विकल्प ह्यांनीच अनेकांचे जीवन व्यापलेले पाहतो आपण . चिंता करून नवीन प्रश्न उभे राहणार आहेत , सुटणे तर दूर राहिले. 

आजचे जीवन सहज नाही स्ट्रेस फुल आहे पण आता जे आहे ते आहे त्यातूनही आपला आनंद उत्साह कसा टिकून राहील आपल्या चेहऱ्यावरील आणि मनातील सकारात्मक भावना लोप पावणार नाही हे पहिले पाहिजे. आपले बोलणे वागणे आपले शब्द आपले वाचन आपला दृष्टीकोण , लिखाण ,देहबोली , आजूबाजूला असणारी माणसे , फोनवर येणारे मेसेज सर्व काही सकारात्मक ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे . असे झाले तर जीवनातील आनंदापासून आपण तसूभर सुद्धा दूर जाणार नाही . सकारात्मक राहणे आपल्याच हाती आहे आणि ते अशक्य नाही. तुम्ही मनात एखादा विचार आणलात तर ह्याच ब्रम्हांडातील लहरी तुमच्याकडे आकर्षित होतात . तुम्ही सकाळी उठल्यावर म्हणा कि माझे डोके दुखत आहे ....सकाळी 11 वाजता खरोखरच डोके दुखायला लागेल. मनातील विचार शरीरावर मेंदूवर प्रभावित होत राहतात . ब्रम्हांडातील नकारात्मक उर्जेला तुम्ही तुमच्याही नकळत खेचून घेतलेत आणि म्हणून डोके दुखायला लागले. त्यापेक्षा सकारात्मक विचार ठेवा मग सर्व सकारात्मक गोष्टी आकर्षित होण्यास वेळ लागणार नाही. मनाची ताकद सर्वश्रेष्ठ असते आणि ती आपण करत असलेल्या विचारांवर अवलंबून असते . विचार कश्या प्रकारे आहेत त्याप्रमाणे दिवस व्यतीत होत असतो. 

संपूर्णतः मानसिक शारीरिक दृष्टीने सकारात्मक राहिलो तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा घडू लागतात .ह्या ब्रम्हाडात आपल्याला घेण्यासारखे खूप आहे , पण आपण ते घेतच नाही हा आपला प्रोब्लेम आहे. सतत दुक्ख उगाळत राहण्यारया लोकांच्या मागे दुक्खच लागते .... ह्या शक्ती अतिंद्रिय आहेत . त्यांचा प्रभाव आपल्यावर आहेच अर्थात आपल्या प्रराब्धप्रमाणे तो कमी अधिक असणार आहे . त्या सर्वांशिवाय जीवनाचा प्रवास सुद्धा फोल आहे .


आपले आयुष्य आपल्याच हातात आहे आणि ते क्षणाक्षणाला ओंजळीतून वाहत चालले आहे . यु टर्न नाही आहे त्यामुळे आज अगदी आत्ता ह्या क्षणापासून सकारात्मक राहा आणि इतरानाही सकारात्मक राहण्यासाठी प्रेरणा द्या. 

अर्थात सुरवात स्वतःपासून करा ....

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230



 



मा फलेषु कदाचन -एक तपस्वी

 || श्री स्वामी समर्थ ||


नवग्रहांचा राजा रवी. सूर्य किंवा रवी हा केंद्रबिंदू मानून त्याचे भोवती फिरणाऱ्या ज्ञात आणि असंख्य अज्ञात ग्रहांच्या या मालिकेला आकाशगंगेतील एक सूर्यमाला असे म्हणतात . ग्रह हे परप्रकाशित असतात पण सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे . सूर्य तारा आहे पण शास्त्रात त्याला ग्रह म्हंटले आहे. रवीच्या भोवती पृथ्वी ज्या वर्तुळामध्ये फिरते त्याला क्रांतीवृत्त असे म्हंटले जाते .ह्या दीर्घ वर्तुळाचे १२ समान भाग करण्यात आले असून त्यांना १२ राशींच्या संज्ञा दिल्या आहेत . 

रवी मुळे जीवसृष्टी अबाधित आहे. प्रकाश , प्राणवायू सूर्यामुळे मिळतो .त्यामुळे सूर्याला आपण जीवनदायी म्हणतो. D जीवनसत्व देणारा रवी हा आपल्या आयुष्यात आत्यंतिक महत्वाचा आहे. ज्योतिष शास्त्रात रवीला “जगत् पिता ” म्हंटले आहे. तसेच रवी हा आरोग्यकारक , आयुष्यकारक  आणि आयुष्य देणारा ग्रह मानला आहे. जीवनशक्ती ,सद्गुण , नीती , अलौकिक ईश्वरभक्ती ,शुद्ध सात्विक विचार ,अंतर्ज्ञान , अंतस्फुर्ती ,ध्यानधारणा , धैर्य , वैद्य , औषध , सरकार , जगातील राजे आणि राजसत्ता , व्यवस्थापीय अधिकार ,वरिष्ठ अधिकारी , पिता , पितृत्व ,पती इत्यादीचा कारक रवी आहे. स्वयंपाक घरातील वस्तू व पदार्थ तयार करतात त्यात अग्नीचा वापर होतो त्यावर रवीचा अंमल आहे. 

रवी प्रधान व्यक्ती हुकुमत गाजवणार्या , गर्विष्ठ , अहंकारी असतात , शरीर उंच, चेहरा रुंद ,रुबाबदार , स्वभाव पण मनमोकळा ,स्पष्टवक्ता ,उदार आणि महत्वाकांक्षी असतात .

सोन्यातील पिवळा रंग हा रविचा मुख्य रंग आहे. तांबे ह्या धातूवर तसेच पूर्व दिशेवर रवीचा अंमल आहे. माणिक हे रविचे रत्न असून देवघर , देवळे ह्यावर रवीची सत्ता आहे. 

रवीचा मुख्य अंमल हा हृदयावर असून शरीरातील रक्ताभिसरण क्रिया ,हाडे  ,पुरुषांचा उजवा तर स्त्रियांच्या डाव्या डोळ्यावर तसेच गळा , मेंदू ह्यावर रवीचा अंमल आहे. डोकेदुखी , पित्त , कुष्ठ ,नेत्रविकार रविमुळे होतात . वास्तविक पृथ्वी हि रवीभोवती फिरत असते पण पृथ्वीवरून आपल्याला  रवी फिरत असल्याचे जाणवते.

रविचे भ्रमण खालीलप्रमाणे १२ राशीत .

मेष राशी   १३ एप्रिल ते १२ मे

वृषभ राशीत  १३ मे ते १४ जून

मिथुन राशीत  १५ जून ते १५ जुलै

कर्क राशीत  १६ जुलै ते १६ ऑगस्ट

सिंह राशीत  १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर

कन्या राशीत  १६ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर

तूळ राशीत १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर

वृश्चिक राशीत  १४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर

धनु राशीत  १५ डिसेंबर ते १३ जानेवारी

मकर राशीत  १४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी 

कुंभ राशीत  १४ फेब्रुवारी ते १३ मार्च

मीन राशीत  १४ मार्च ते १२ एप्रिल

रवीचा उत्तरायण कालखंड हा 23 डिसेंबर ते २१ जून पर्यंत असून दक्षिणायन २२ जून ते २२ डिसेंबर असा असतो.

रवी हा लग्न ,कर्म आणि भाग्य स्थानाचा कारक आहे. रवी हा मेष , सिंह , धनु ह्या अग्नी तत्वाच्या राशीत बलवान असतो त्यामुळे मनुष्य महत्वाकांक्षी ,उच्च विचारांचा , कर्तव्यनिष्ठ ,दिलदार असतो . धनस्थानातील रवी हा कुटुंब सौख्य देत नाही  इथे रवी थोडासा मानी होतो आणि कुटुंब प्रमुखाला मान हा वर्चस्व गाजवून मिळत नाही तर तो आपल्या प्रेमाने मिळवावा लागतो .व्ययस्थानी आणि अष्टमस्थानी धननाश , शारीरिक कष्ट करवतो .षष्ठात शत्रुपिडा करतो . चतुर्थात चिंता ठेवतो .रवी सिंह राशीत स्वगृही, मेषेत उचीचा तर तूळ राशीत निचीचा मानला आहे .

वृषभ , कन्या , मकर ह्या पृथ्वी तत्वात रवी फारसा आनंद देणार नाही . अग्नीतत्वाच्या राशी ह्या रवीच्या मित्र राशी आहेत कारण तो स्वतः अग्नी तत्वाचा आहे.  चंद्र मंगळ बुध गुरु हे मित्र तर शुक्र शनी हे शत्रू आहेत . शनी शत्रू असल्यामुळे मकर कुंभ ह्या सुद्धा शत्रू राशीच आहेत .रवी आणि शनी हि एकमेकांचे कट्टर शत्रू असल्यामुळे कि काय रवीने मेष राशी आपली उच्च रास मानली आहे जिथे शनी निचीचा होतो. आणि केवळ शत्रुत्व म्हणून कि काय तूळ हि निचीची रास स्वीकारली असावी .

रवीचे सर्वात जुळते कुणाशी तर चंद्राशी .रवी पिता तर चंद्र माता आहे. रवी चंद्र प्रतियोग म्हणजे पौर्णिमा आणि एकत्र म्हणजे युती असेल तर ती अमावास्या .जीवनातील सुख आणि दुख हि चंद्र रवीचा अभ्यास केल्याशिवाय पूर्ण होत नाहीत .रवीच्या सप्तमात जे ग्रह येतात ते वक्री होतात आणि वक्री ग्रह हे अधिक बलवान असतात .रवीची महादशा हि ६ वर्षाची असते. 

रविपासून ३ गोष्टी शिकूया 

१. रवी हा कर्म योगी आहे. सतत कर्म करत राहणे हे रविचे काम आहे .रवी कधीच सुट्टी घेत नाही . भारतात रात्र असते तेव्हा अमेरिकेत दिवस म्हणजे रवी सतत प्रकाशमान असतोच .विश्रांती हा शब्द जणू त्याच्या शब्दकोशात नाही . 

२. भेदभाव नाही . रवी जे नित्यकर्म करत असतो त्यात भेदभाव कधीच करत नाही समान वाटप करणे हीसुद्धा एक मोठी योगसाधना आहे.

३. कुठलीही अपेक्षा नाही. No Expectation.  कर्मयोगाची व्याख्या काय तर “ मा फलेषु कदाचन ”.कर्म करा पण फळाची आशा करू नका .

सूर्योपासना हि सर्व श्रेष्ठ उपासना आहे. सूर्य अधिक बलवान करायचा असेल तर सूर्याला अर्घ्य देणे, सूर्यनमस्कर घालणे हि साधना करावी. गायत्री मंत्र म्हणणे हि सुद्धा सूर्य उपासना आहे. 

ग्रह कमजोर केंव्हा होतात. जेंव्हा ते नीच राशीत असतात. शत्रू राशीत, शत्रू ग्रहासोबत राहू केतू यांनी युक्त असतील किंवा पाप कर्तरी योगात असतील शत्रू ग्रहांची दृष्टी असेल तर ग्रह कुंडलीमध्ये पीडित अथवा कमजोर अवस्थेत असतो. 

कुंडलीतील कमजोर रवी 

रवी म्हणजे नैसर्गिक ऊर्जास्रोत, एक जीवनदायीनी, सृष्टीचे भरण पोषण करणारा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण सृष्टीचा आत्मा आणि ज्योतिष शास्त्रात ही रवी हा आत्म्याचा कारक आहे. रवी म्हणजे तेज, रवी म्हणजे आत्मविश्वास, रवी म्हणजे आत्म सम्मान, रवी म्हणजे पिता, आज अवकाशात रवी नसेल तर आज राहू केतू सुद्धा नसते. असा हा ग्रहांना सुद्धा ऊर्जा प्रदान करणारा रवी नारायण कुंडलीत जेंव्हा कमजोर होतो. तेंव्हा सर्व प्रथम तो व्यक्तीचं आत्मिक बळ कमी करतो. व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती 

कमी करतो. आत्मा पूर्ण सक्रिय होत नाही. व्यक्ती मध्ये कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी जी जिद्द कठीण परिश्रम करण्याची तयारी आणि येणाऱ्या प्रत्येक बऱ्या वाईट गोष्टींना तोंड देण्याची क्षमता. त्यासाठी लागणारे आत्मिक बळ व्यक्ती मध्ये नसते. प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्याची प्रिसिद्ध होण्याची इच्छा असते. एखाद्या यशस्वी व्यक्तीला पहिले की ते यश आपल्याला सुद्धा खुणावत असते. 

इथे कमजोर रवी असलेल्या व्यक्ती फक्त ते यश आणि प्रसिद्धी इतकंच पाहतात. पण ते मिळवण्यासाठी केलेले कष्ट, अनेक कठीण प्रसंगांना तोंड देऊन, परिस्थितीशी केलेला सामना या गोष्टी पाहत नाहीत. कारण कमजोर रवी असलेल्या व्यक्तीला बऱ्याच गोष्टी ह्या सोप्या पद्धतीने कमी कष्टात, कोणतीही अडथळे न येता हव्या असतात. पण रवी हा राजा आहे. आणि राजा होण्यासाठी जनतेच्या परीक्षेत पास होणं महत्वाचे असते. मेहनत केल्याशिवाय कुणीही राजा बनत नाही हा रवीचा उपदेश आहे . त्याचे वर्चस्व त्याच्या गुणांनी त्याला हे सिद्ध करून द्यावं लागत की तो आपल्या प्रजेचे रक्षण, भरणं पोषण उत्तम करू शकतो. तेंव्हाच तो राजा होण्यासाठी योग्य ठरतो. जेंव्हा रवी कुंडलीत कमजोर होतो तो तूळ राशीत ग्रहण योगात किंवा शत्रू ग्रह राशीत, सोबत किंवा दृष्टी योगात असतो. तेंव्हा तो व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी किंवा कोणत्या कार्यासाठी जी आत्मशक्ती आवश्यक असते. जी प्रेरणा आवश्यक असते त्यापासून तो जातकाला वंचित करतो. पर्यायाने अशा व्यक्ती ह्या उदासीन असतात. बऱ्याचदा हे वाक्य त्यांना अतिशय समर्पक ठरते. ""ठेविले अनंते तैसेचि राहावे """याव्यक्ती जीवनात उत्कृष्ट करण्यासाठी फार प्रयत्नशील नसतात किंवा लवकर हार पत्करतात. 

कुंडलीत  रवी उच्च स्थानी आहे इतर ग्रह देखील चांगले आहेत आणि तरीही व्यक्तीला अपयशाचा सामना करावा लागत असेल. तर कुंडलीत राहूची स्थिती अवश्य पाहावी. कारण राहू सूर्याच्या उर्जेला बांध घालतो. कुंडलीत रवी कमजोर जरी असला तर व्यक्तीला जीवनात बरीच मेहनत घ्यावी लागते. तसं पाहायला गेले तर शनी हा रवी पेक्षा ही जास्त शक्तिशाली आहे. जर कुंडलीत शनी चांगला असेल तरी सुद्धा व्यक्ती सफलता प्राप्त करतो . 

रवी हा सामर्थ्य आहे.आत्मा आहे. जर तो कुंडलीत कमजोर असेल तर  जीवनात प्रेरणा, सामर्थ्य, आत्मविश्वास, प्रतिकार शक्ती, चा अभाव असलेलं जीवन असू शकते .


सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230


Friday, 1 December 2023

लग्न आणि नवमांश

 || श्री स्वामी समर्थ ||


नवमांश कुंडली हि लग्न कुंडलीचे सूक्ष्म स्वरूप आहे हे खरे असले आणि नवमांश पाहिल्याशिवाय फलादेशाला मूर्त स्वरूप येत नाही तरीही ह्या दोन्ही कुंडल्यांचा अभ्यास करताना अनेकांचा संभ्रम होतो हे पाहायला मिळते .

प्रत्येक राशीत सव्वा दोन नक्षत्रे येतात आणि प्रत्येक नक्षत्राला चार चरण म्हणजेच प्रत्येक राशीत आपल्याला 9 चरणे पाहायला मिळतात . उदा. मेष राशीत अश्विनी , भरणी आणि कृत्तिका हि 3 नक्षत्रे अनुक्रमे 4 4 1 अशी चरणे येतात . म्हणजेच आपल्याला 9 प्रकारची व्यक्तिमत्व फक्त मेष राशीतच पाहायला मिळतील. मेष राशीचे सर्व लोक खूप चिडणारे संताप करणारे लोक आहेत असे सरसकट विधान आपण नाही करू शकत. मेष राशीचा मंगळ धाडसी , आक्रमक स्वभावाचा ,भांडायला उठणारा , अति महत्वाकांक्षी आहे पण त्याचेही अनेक पेहलू आहेत .उदा. अश्विनी नक्षत्राच्या तृतीय चरणात बुध काम करतो म्हणून मेष (मंगळ ) + अश्विनी ( केतू ) + तृतीय चरण (बुध) हे समीकरण येते जे महत्वाकांक्षी + थोडे अध्यात्मिक + बुद्धिमान आहे. हा जातक शब्दांच्या कोट्या करण्यात हुशार असणारच .तसेच हुशार , देवावर श्रद्धा पण सतत देवदेव न करणारा आणि पैशाची गणिते मांडणारा बुद्धीच्या जोरावर अर्थार्जन करणारा असेल.


ह्याचा अर्थ असा कि हा जातक मेष राशीत अश्विनी नक्षत्रात पण तृतीय चरणात जन्माला आहे . तेव्हा म्हणताना मेष राशीत जन्मला आणि नवमांशात तो बुधाच्या मिथुन राशीत आहे असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरले आणि हेच अनेकदा म्हंटले जाते . जातकाची मेष रासच आहे ती त्याने सोडून मिथुनेत उडी नाही मारली . चंद्र हा मेष राशीतच आहे फक्त तो बुधाच्या तिसर्या नवमांशात आहे ज्याची तो प्रकर्षाने फळे देणार आहे त्यांनी रास बदलून तो बुधाच्या राशीत नाही गेला तर फक्त नवमांश बुधाचा आहे . ह्याचा सखोल अभ्यास झाला तर जातकाच्या  व्यक्तिमत्वाचे कंगोरे समजतील. 


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230