|| श्री स्वामी समर्थ ||
रोज अगदी प्रत्येक क्षणी आपले षडरिपू आपल्या अवती भोवती फिरतच असतात . कधी आपण मोहाच्या आहारी जातो तर कधी क्रोधाच्या . कुठलातरी रिपू आपल्यावर हाबी होत असतोच . हे सर्व रिपू आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहेत. एखादी घटना आपल्याला सुखावते तर एखादी दुक्खाचे पहाड उभी करते. कधी आपला आत्मविश्वास द्विगुणीत होतो तर कधी आपण निराशेच्या गर्तेत खोलवर गोते खातो . आनंद आणि दुक्ख हेच जीवन नाही तर त्याही पलीकडे अनेक भावनांचे मिश्रण म्हणजे जीवन. अत्यंत अशाश्वत असे हे आपले जीवन आणि म्हणूनच आत्ताचा क्षण महत्वाचा आहे . पुढच्या क्षणाचे कुणाला ज्ञात आहे? कुणालाही नाही .
आत्ताचा क्षण भरभरून जगणारा नेहमीच आनंदी असतो. सुखाचा सदरा परिधान करून शांत झोप घेणारा माणूस आत्ताच्या क्षणाचा पुरेपूर आस्वाद घेणारा असतो . आजच्या जगतात हे खूप कमी पाहायला मिळते . पण खर सांगू का इतर गोष्टी सोडा पण हे अंगवळणी पाडून घ्या तर आणि तरच जीवनाचा आनंद लुटता येयील . कारण आत्ताचे जीवन आणि आपले प्रश्न हे आपली शेवटच्या क्षणापर्यंत पाठ सोडणार नाहीत पण ह्या सर्वात जीवन जगायचे मात्र राहून जायील.
प्रत्येक वेळी आपल्या मनासारखे घडेल असे नाही. कधी कुणी आपल्याला दुखावते , आपल्या मनाविरुद्ध वागते , कुणी अपमानास्पद बोलते वागते , आपल्याला कमी लेखते .अश्यावेळी आपण पण शब्द संहार करून समोरच्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करतो आणि अगदी तिथेच आपण चुकतो. त्याने चुकीचे कर्म केले आहे त्याची परतफेड करण्यासाठी आपण कश्याला आपले कर्म वाढवून घ्यायचे ? आणि मग ते फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा. का कश्यासाठी . ज्याचे त्याच्यापाशी मग ते चांगले असो अथवा वाईट . ते त्याला फेडायलाच लागते . कर्म केले कि त्याचे फळ भोगणे हे आलेच कि कारण कर्म तुम्हाला चिकटलेले असते .
आपल्या ब्रम्हांडात अश्या अनेक शक्ती आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत पण अनुभवायला येतात . त्यांचे दिव्य अनुभव आपल्याशी जोडले गेलेले आहेत . ह्या शक्ती म्हणजे पंचतत्व , दिशा , आकाशातील तारे आणि सर्वात महत्वाचे आपले मन . ह्याहीपलीकडे एक सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजे सद्गुरू . आपल्या प्रत्येक कृतीकडे त्यांचे लक्ष आहे. आपण आपल्या सद्गुरूंच्या दृष्टीक्षेपात आहोत ह्यासारखे पुण्य ते काय ?
कुठल्याही स्थितीत आपण आपले कर्म वाढवून घ्यायचे नाही . हे सोपे नाही पण अशक्यही नाही. ब्रम्हांडातील ह्या शक्ती सर्वच हिशोब ठेवतात त्यामुळे आपण आपले कर्म प्रतिशोध घेण्याच्या धुंदीत वाढवून ठेवू नये. त्याने काहीच साध्य होणार नाही . कारण ते परत आपल्यालाच फेडायला लागणार आहे.
सतत काहीतरी वाईट होईल हि भीती मनातून काढून टाकली पाहिजे . आणि जर होणारच असेल तर आपण विचार करून ते बदलणार नाही उलट आपल्याला मानसिक अस्वास्थ्याला तोंड द्यावे लागेल. सतत घाबरत जगणे , चिंता , कल्प विकल्प ह्यांनीच अनेकांचे जीवन व्यापलेले पाहतो आपण . चिंता करून नवीन प्रश्न उभे राहणार आहेत , सुटणे तर दूर राहिले.
आजचे जीवन सहज नाही स्ट्रेस फुल आहे पण आता जे आहे ते आहे त्यातूनही आपला आनंद उत्साह कसा टिकून राहील आपल्या चेहऱ्यावरील आणि मनातील सकारात्मक भावना लोप पावणार नाही हे पहिले पाहिजे. आपले बोलणे वागणे आपले शब्द आपले वाचन आपला दृष्टीकोण , लिखाण ,देहबोली , आजूबाजूला असणारी माणसे , फोनवर येणारे मेसेज सर्व काही सकारात्मक ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे . असे झाले तर जीवनातील आनंदापासून आपण तसूभर सुद्धा दूर जाणार नाही . सकारात्मक राहणे आपल्याच हाती आहे आणि ते अशक्य नाही. तुम्ही मनात एखादा विचार आणलात तर ह्याच ब्रम्हांडातील लहरी तुमच्याकडे आकर्षित होतात . तुम्ही सकाळी उठल्यावर म्हणा कि माझे डोके दुखत आहे ....सकाळी 11 वाजता खरोखरच डोके दुखायला लागेल. मनातील विचार शरीरावर मेंदूवर प्रभावित होत राहतात . ब्रम्हांडातील नकारात्मक उर्जेला तुम्ही तुमच्याही नकळत खेचून घेतलेत आणि म्हणून डोके दुखायला लागले. त्यापेक्षा सकारात्मक विचार ठेवा मग सर्व सकारात्मक गोष्टी आकर्षित होण्यास वेळ लागणार नाही. मनाची ताकद सर्वश्रेष्ठ असते आणि ती आपण करत असलेल्या विचारांवर अवलंबून असते . विचार कश्या प्रकारे आहेत त्याप्रमाणे दिवस व्यतीत होत असतो.
संपूर्णतः मानसिक शारीरिक दृष्टीने सकारात्मक राहिलो तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा घडू लागतात .ह्या ब्रम्हाडात आपल्याला घेण्यासारखे खूप आहे , पण आपण ते घेतच नाही हा आपला प्रोब्लेम आहे. सतत दुक्ख उगाळत राहण्यारया लोकांच्या मागे दुक्खच लागते .... ह्या शक्ती अतिंद्रिय आहेत . त्यांचा प्रभाव आपल्यावर आहेच अर्थात आपल्या प्रराब्धप्रमाणे तो कमी अधिक असणार आहे . त्या सर्वांशिवाय जीवनाचा प्रवास सुद्धा फोल आहे .
आपले आयुष्य आपल्याच हातात आहे आणि ते क्षणाक्षणाला ओंजळीतून वाहत चालले आहे . यु टर्न नाही आहे त्यामुळे आज अगदी आत्ता ह्या क्षणापासून सकारात्मक राहा आणि इतरानाही सकारात्मक राहण्यासाठी प्रेरणा द्या.
अर्थात सुरवात स्वतःपासून करा ....
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment