Monday, 4 December 2023

मा फलेषु कदाचन -एक तपस्वी

 || श्री स्वामी समर्थ ||


नवग्रहांचा राजा रवी. सूर्य किंवा रवी हा केंद्रबिंदू मानून त्याचे भोवती फिरणाऱ्या ज्ञात आणि असंख्य अज्ञात ग्रहांच्या या मालिकेला आकाशगंगेतील एक सूर्यमाला असे म्हणतात . ग्रह हे परप्रकाशित असतात पण सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे . सूर्य तारा आहे पण शास्त्रात त्याला ग्रह म्हंटले आहे. रवीच्या भोवती पृथ्वी ज्या वर्तुळामध्ये फिरते त्याला क्रांतीवृत्त असे म्हंटले जाते .ह्या दीर्घ वर्तुळाचे १२ समान भाग करण्यात आले असून त्यांना १२ राशींच्या संज्ञा दिल्या आहेत . 

रवी मुळे जीवसृष्टी अबाधित आहे. प्रकाश , प्राणवायू सूर्यामुळे मिळतो .त्यामुळे सूर्याला आपण जीवनदायी म्हणतो. D जीवनसत्व देणारा रवी हा आपल्या आयुष्यात आत्यंतिक महत्वाचा आहे. ज्योतिष शास्त्रात रवीला “जगत् पिता ” म्हंटले आहे. तसेच रवी हा आरोग्यकारक , आयुष्यकारक  आणि आयुष्य देणारा ग्रह मानला आहे. जीवनशक्ती ,सद्गुण , नीती , अलौकिक ईश्वरभक्ती ,शुद्ध सात्विक विचार ,अंतर्ज्ञान , अंतस्फुर्ती ,ध्यानधारणा , धैर्य , वैद्य , औषध , सरकार , जगातील राजे आणि राजसत्ता , व्यवस्थापीय अधिकार ,वरिष्ठ अधिकारी , पिता , पितृत्व ,पती इत्यादीचा कारक रवी आहे. स्वयंपाक घरातील वस्तू व पदार्थ तयार करतात त्यात अग्नीचा वापर होतो त्यावर रवीचा अंमल आहे. 

रवी प्रधान व्यक्ती हुकुमत गाजवणार्या , गर्विष्ठ , अहंकारी असतात , शरीर उंच, चेहरा रुंद ,रुबाबदार , स्वभाव पण मनमोकळा ,स्पष्टवक्ता ,उदार आणि महत्वाकांक्षी असतात .

सोन्यातील पिवळा रंग हा रविचा मुख्य रंग आहे. तांबे ह्या धातूवर तसेच पूर्व दिशेवर रवीचा अंमल आहे. माणिक हे रविचे रत्न असून देवघर , देवळे ह्यावर रवीची सत्ता आहे. 

रवीचा मुख्य अंमल हा हृदयावर असून शरीरातील रक्ताभिसरण क्रिया ,हाडे  ,पुरुषांचा उजवा तर स्त्रियांच्या डाव्या डोळ्यावर तसेच गळा , मेंदू ह्यावर रवीचा अंमल आहे. डोकेदुखी , पित्त , कुष्ठ ,नेत्रविकार रविमुळे होतात . वास्तविक पृथ्वी हि रवीभोवती फिरत असते पण पृथ्वीवरून आपल्याला  रवी फिरत असल्याचे जाणवते.

रविचे भ्रमण खालीलप्रमाणे १२ राशीत .

मेष राशी   १३ एप्रिल ते १२ मे

वृषभ राशीत  १३ मे ते १४ जून

मिथुन राशीत  १५ जून ते १५ जुलै

कर्क राशीत  १६ जुलै ते १६ ऑगस्ट

सिंह राशीत  १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर

कन्या राशीत  १६ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर

तूळ राशीत १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर

वृश्चिक राशीत  १४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर

धनु राशीत  १५ डिसेंबर ते १३ जानेवारी

मकर राशीत  १४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी 

कुंभ राशीत  १४ फेब्रुवारी ते १३ मार्च

मीन राशीत  १४ मार्च ते १२ एप्रिल

रवीचा उत्तरायण कालखंड हा 23 डिसेंबर ते २१ जून पर्यंत असून दक्षिणायन २२ जून ते २२ डिसेंबर असा असतो.

रवी हा लग्न ,कर्म आणि भाग्य स्थानाचा कारक आहे. रवी हा मेष , सिंह , धनु ह्या अग्नी तत्वाच्या राशीत बलवान असतो त्यामुळे मनुष्य महत्वाकांक्षी ,उच्च विचारांचा , कर्तव्यनिष्ठ ,दिलदार असतो . धनस्थानातील रवी हा कुटुंब सौख्य देत नाही  इथे रवी थोडासा मानी होतो आणि कुटुंब प्रमुखाला मान हा वर्चस्व गाजवून मिळत नाही तर तो आपल्या प्रेमाने मिळवावा लागतो .व्ययस्थानी आणि अष्टमस्थानी धननाश , शारीरिक कष्ट करवतो .षष्ठात शत्रुपिडा करतो . चतुर्थात चिंता ठेवतो .रवी सिंह राशीत स्वगृही, मेषेत उचीचा तर तूळ राशीत निचीचा मानला आहे .

वृषभ , कन्या , मकर ह्या पृथ्वी तत्वात रवी फारसा आनंद देणार नाही . अग्नीतत्वाच्या राशी ह्या रवीच्या मित्र राशी आहेत कारण तो स्वतः अग्नी तत्वाचा आहे.  चंद्र मंगळ बुध गुरु हे मित्र तर शुक्र शनी हे शत्रू आहेत . शनी शत्रू असल्यामुळे मकर कुंभ ह्या सुद्धा शत्रू राशीच आहेत .रवी आणि शनी हि एकमेकांचे कट्टर शत्रू असल्यामुळे कि काय रवीने मेष राशी आपली उच्च रास मानली आहे जिथे शनी निचीचा होतो. आणि केवळ शत्रुत्व म्हणून कि काय तूळ हि निचीची रास स्वीकारली असावी .

रवीचे सर्वात जुळते कुणाशी तर चंद्राशी .रवी पिता तर चंद्र माता आहे. रवी चंद्र प्रतियोग म्हणजे पौर्णिमा आणि एकत्र म्हणजे युती असेल तर ती अमावास्या .जीवनातील सुख आणि दुख हि चंद्र रवीचा अभ्यास केल्याशिवाय पूर्ण होत नाहीत .रवीच्या सप्तमात जे ग्रह येतात ते वक्री होतात आणि वक्री ग्रह हे अधिक बलवान असतात .रवीची महादशा हि ६ वर्षाची असते. 

रविपासून ३ गोष्टी शिकूया 

१. रवी हा कर्म योगी आहे. सतत कर्म करत राहणे हे रविचे काम आहे .रवी कधीच सुट्टी घेत नाही . भारतात रात्र असते तेव्हा अमेरिकेत दिवस म्हणजे रवी सतत प्रकाशमान असतोच .विश्रांती हा शब्द जणू त्याच्या शब्दकोशात नाही . 

२. भेदभाव नाही . रवी जे नित्यकर्म करत असतो त्यात भेदभाव कधीच करत नाही समान वाटप करणे हीसुद्धा एक मोठी योगसाधना आहे.

३. कुठलीही अपेक्षा नाही. No Expectation.  कर्मयोगाची व्याख्या काय तर “ मा फलेषु कदाचन ”.कर्म करा पण फळाची आशा करू नका .

सूर्योपासना हि सर्व श्रेष्ठ उपासना आहे. सूर्य अधिक बलवान करायचा असेल तर सूर्याला अर्घ्य देणे, सूर्यनमस्कर घालणे हि साधना करावी. गायत्री मंत्र म्हणणे हि सुद्धा सूर्य उपासना आहे. 

ग्रह कमजोर केंव्हा होतात. जेंव्हा ते नीच राशीत असतात. शत्रू राशीत, शत्रू ग्रहासोबत राहू केतू यांनी युक्त असतील किंवा पाप कर्तरी योगात असतील शत्रू ग्रहांची दृष्टी असेल तर ग्रह कुंडलीमध्ये पीडित अथवा कमजोर अवस्थेत असतो. 

कुंडलीतील कमजोर रवी 

रवी म्हणजे नैसर्गिक ऊर्जास्रोत, एक जीवनदायीनी, सृष्टीचे भरण पोषण करणारा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण सृष्टीचा आत्मा आणि ज्योतिष शास्त्रात ही रवी हा आत्म्याचा कारक आहे. रवी म्हणजे तेज, रवी म्हणजे आत्मविश्वास, रवी म्हणजे आत्म सम्मान, रवी म्हणजे पिता, आज अवकाशात रवी नसेल तर आज राहू केतू सुद्धा नसते. असा हा ग्रहांना सुद्धा ऊर्जा प्रदान करणारा रवी नारायण कुंडलीत जेंव्हा कमजोर होतो. तेंव्हा सर्व प्रथम तो व्यक्तीचं आत्मिक बळ कमी करतो. व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती 

कमी करतो. आत्मा पूर्ण सक्रिय होत नाही. व्यक्ती मध्ये कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी जी जिद्द कठीण परिश्रम करण्याची तयारी आणि येणाऱ्या प्रत्येक बऱ्या वाईट गोष्टींना तोंड देण्याची क्षमता. त्यासाठी लागणारे आत्मिक बळ व्यक्ती मध्ये नसते. प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्याची प्रिसिद्ध होण्याची इच्छा असते. एखाद्या यशस्वी व्यक्तीला पहिले की ते यश आपल्याला सुद्धा खुणावत असते. 

इथे कमजोर रवी असलेल्या व्यक्ती फक्त ते यश आणि प्रसिद्धी इतकंच पाहतात. पण ते मिळवण्यासाठी केलेले कष्ट, अनेक कठीण प्रसंगांना तोंड देऊन, परिस्थितीशी केलेला सामना या गोष्टी पाहत नाहीत. कारण कमजोर रवी असलेल्या व्यक्तीला बऱ्याच गोष्टी ह्या सोप्या पद्धतीने कमी कष्टात, कोणतीही अडथळे न येता हव्या असतात. पण रवी हा राजा आहे. आणि राजा होण्यासाठी जनतेच्या परीक्षेत पास होणं महत्वाचे असते. मेहनत केल्याशिवाय कुणीही राजा बनत नाही हा रवीचा उपदेश आहे . त्याचे वर्चस्व त्याच्या गुणांनी त्याला हे सिद्ध करून द्यावं लागत की तो आपल्या प्रजेचे रक्षण, भरणं पोषण उत्तम करू शकतो. तेंव्हाच तो राजा होण्यासाठी योग्य ठरतो. जेंव्हा रवी कुंडलीत कमजोर होतो तो तूळ राशीत ग्रहण योगात किंवा शत्रू ग्रह राशीत, सोबत किंवा दृष्टी योगात असतो. तेंव्हा तो व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी किंवा कोणत्या कार्यासाठी जी आत्मशक्ती आवश्यक असते. जी प्रेरणा आवश्यक असते त्यापासून तो जातकाला वंचित करतो. पर्यायाने अशा व्यक्ती ह्या उदासीन असतात. बऱ्याचदा हे वाक्य त्यांना अतिशय समर्पक ठरते. ""ठेविले अनंते तैसेचि राहावे """याव्यक्ती जीवनात उत्कृष्ट करण्यासाठी फार प्रयत्नशील नसतात किंवा लवकर हार पत्करतात. 

कुंडलीत  रवी उच्च स्थानी आहे इतर ग्रह देखील चांगले आहेत आणि तरीही व्यक्तीला अपयशाचा सामना करावा लागत असेल. तर कुंडलीत राहूची स्थिती अवश्य पाहावी. कारण राहू सूर्याच्या उर्जेला बांध घालतो. कुंडलीत रवी कमजोर जरी असला तर व्यक्तीला जीवनात बरीच मेहनत घ्यावी लागते. तसं पाहायला गेले तर शनी हा रवी पेक्षा ही जास्त शक्तिशाली आहे. जर कुंडलीत शनी चांगला असेल तरी सुद्धा व्यक्ती सफलता प्राप्त करतो . 

रवी हा सामर्थ्य आहे.आत्मा आहे. जर तो कुंडलीत कमजोर असेल तर  जीवनात प्रेरणा, सामर्थ्य, आत्मविश्वास, प्रतिकार शक्ती, चा अभाव असलेलं जीवन असू शकते .


सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230


1 comment:

  1. रवी आणि शनी स्व राशी मध्ये असून सुद्धा जातकास त्रास होतोना का दिसतो राहु केतु दृष्टि नसताना

    ReplyDelete