Wednesday, 6 December 2023

मनस्वी चंद्र

 || श्री स्वामी समर्थ ||



प्रेमिकांचा ,कवींचा लाडका चंद्र .आयुर्वेदात शरदपौर्णिमेच्या चांदण्याचा औषधासाठी उपयोग करून घेतला जातो. पृथ्वी वायुरूप अवस्थेतून घनरूपात येताना सूर्याच्या आकर्षणामुळे पृथ्वीचा एक मोठा तुकडा तिच्यापासून वेगळा झाला आणि पृथ्वीभोवती फिरत राहिला अशी चंद्राची जन्मकथा आहे. 

पत्रिकेचा अभ्यास करताना रवी आणि चंद्र हे दोन ग्रह सर्वप्रथम तपासणे आवश्यक आहे. चंद्र हा स्त्री ग्रह आहे. रवी आत्म्याचा तर चंद्र हा मनाचा कारक आहे. विश्वाचा गाडा सुरळीत चालू ठेवण्याचे महान कार्य परमेश्वराने स्त्रीकडे सोपवले आहे .म्हणूनच संसार हा स्त्री शिवाय अपूर्ण असतो . अखंड विश्वात जे सुंदर , कोमल , पवित्र आहे ते स्त्रीमध्ये सामावले आहे तसेच चंद्राची सात्विकता , कोमलता ह्याचाही संगम स्त्रीमध्ये असतोच. स्त्री ला आपण भावी पिढीची निर्मिती म्हंटले तर वावगे ठरू नये. स्त्रीमध्ये जी आकर्षण शक्ती आहे तीच चंद्रात सुद्धा आहे . चन्द्रमाः मनसो जातः .चंद्र हा आपल्या मनाचा कारक ग्रह आहे म्हणूनच माणसाची मानसिकता हि पत्रिकेतील चंद्रावरून समजते. चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला 27 दिवस 7 तास 43 मिनिटे लागतात .म्हणून चंद्र एका राशीत सव्वादोन दिवस असतो. चंद्र हा शीघ्र गतीने जाणारा ग्रह आहे त्याला एका जागी थांबणे माहीतच नाही .

चंद्राचे कारकत्व सागरासारखे अत्यंत विशाल आहे. माणसाचे मन कधीच कुणाला कळत नाही . असंख्य विचारांची भाऊगर्दी माणसाच्या मनात होत असते. अश्या च्या चंचल मनाचा कारक चंद्र आहे. 

आई , मातृसुख , सफेद रंग आणि सफेद वस्तू , मोती , चांदी ,प्रवाही पदार्थ , जलाशय , पाण्यासंबंधी असणारे व्यवसाय , बोटी , स्नानगृहे , स्विमिंग पुल , औषधे ,फळेफुले , बागायत ,मासेमारी ,सुगंधी द्रव्ये , अत्तरे , काव्यगायन चंद्राच्या अधिपत्याखाली येतात .

चंद्र हा मातेशी संबंधित असल्यामुळे चेतना , स्फूर्ती , माया ममता , वात्सल्य ,कुटुंबियांबद्दल असणारी आत्मीयता ,काटकसर , धरसोड,सावध वागणूक तसेच शरीरातील शिरा ,धमण्या , स्पर्शजन्य ज्ञान , जलोदर , घश्याचे आजार ,खोकला , डोळे दुखणे , पक्षाघात ,लहानमोठे आतडे ,दमा ,स्तन , मासिक पाळीचे आजार चंद्रावरून दर्शवले जातात .वृषभ आणि कन्या राशीत म्हणजे पृथ्वितत्वाच्या राशीत चंद्र असणारी मंडळी] निरोगी , शरीराने मजबूत असतात .कुंडलीचे उदित भाग म्हणजे लाग्न्बिंदू ते सप्तम बिंदू येथील चंद्र जीवनशक्ती आणि चांगले आरोग्य देतो . अग्नितत्वाच्या राशी चंद्राला विशेष अनुकूल नसतात . आरोग्याच्या दृष्टीने चंद्राला प्रतिकूल राशी म्हणजे मकर आणि वृश्चिक . वृश्चिक राशीत चंद्र असेल तर स्त्रियांचा मासिक धर्म हा अनियमित असतो . स्त्रियांच्या गर्भाशयावर सुद्धा चंद्राचा अंमल आहे. अग्निराशीतील चंद्रावर शनी ,राहू , मंगळ ,हर्शल ह्यांचा अशुभ दृष्टीयोग असेल तर स्त्रियांच्या अंगावरील दुधाचे प्रश्न निर्माण होतात. स्त्रीच्या शरीरात दुध उत्पन्न करण्याचा कारक चंद्र असून अश्रू निर्माण करण्याचे कामही तोच करतो.

चंद्राचा जप 11000 आहे. तसेच पत्रिकेत चंद्र बिघडला असेल तर शंकराची उपासना सांगितली आहे. मोती हे चंद्राचे रत्न सांगितले आहे. 

चंद्र हा रजोगुणी आणि जलतत्वाचा आहे. जलतत्व हे निरागस , संवेदनशील , हळवे ,कोमल पण बिघडले तर निराशावादी अश्या गुणाचे तत्व आहे. रवी समोर चंद्र असतो तेव्हा पौर्णिमा आणि रवी समोर चंद्र असतो तेव्हा अमावास्या असते. रविला चंद्राने मित्र म्हणून जवळ केले आहे. अग्नी तत्वाच्या रविला चंद्राने मित्र म्हणून जवळ करावे हे एक कोडेच म्हणावे लागेल.बुधाने चंद्राला शत्रू मानले असले तरी चंद्राने बुधाला आपला मित्र मानले आहे. चंद्राने राहू सोडला तर सगळ्यांनाच आपल्या मैत्रीचा आहात पुढे केला आहे. चंद्राची स्वराशी कर्क असून चंद्र वृषभ राशीत उच्चीचा आणि वृश्चिकेत निचीचा आहे. 

रोहिणी , हस्त आणि श्रवण हि ३ नक्षत्रे चंद्राची आहेत .रोहिणी हे मनुष्य गणी तर  इतर दोन नक्षत्रे हि देवगणी आहेत.

चंद्र हे जलतत्व आहे . मोक्ष त्रिकोणाची सुरवात जलतत्वापासूनच होताना दिसते कारण चतुर्थात चंद्राचीच कर्क राशी येते .संवेदना असल्याशिवाय अध्यात्मिक प्रगती होणारच नाही . सद्गुरूंचे चरण किंवा नुसती आठवण आली तरी डोळ्यातून अश्रू येणे हेच पारमार्थिक प्रगतीचे पहिले पाऊल आहे. 

मन आहे फक्त ते दिसत नाही आणि त्या मनावर चंद्राचे अधिराज्य आहे . मन उदबत्तीच्या धुरासारखे असते ..सतत गतिमान ..माणसाचे मन स्थिर असेल तर तो जग जिंकेल आणि तेच मन निराश झाले तर आयुष्य नकोसे होईल. जीवनातील रस निघून जायील. 

चंद्र हा जलतत्व आहे आणि जल म्हणजे पाणी ,लक्ष्मी , जीवन , संवेदना , प्रेम. आयुष्यातून प्रेम वजा केले तर काहीच राहणार नाही . माणूस हा सदैव प्रेमाचा भुकेला असतो . दोन गोड शब्द माणसाला आयुष्यात पुन्हा उभे करू शकतात . हीच चंद्राची आणि आपल्या गुरुंचीही शिकवण आहे . 

चंद्रासारखे होण्याचा प्रयत्न करुया .शीतल , निर्मळ मनाने कुटुंब आणि माणसेही जपूया .

सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230  


No comments:

Post a Comment