|| श्री स्वामी समर्थ ||
महाराजांचे आपल्या भक्तांशी हृदयस्पर्शी असे नाते असते. सगळ्याच्या पलीकडे असणारे हे अभेद्य असते. शेवटच्या क्षणी ते अशी काही खेळी खेळतात आणि आपल्याला संकटातून पार करतात . न मिळणारे कर्ज , विवाह , मनासारखे घर कुठलीच इच्छा अपूर्ण राहत नाही . स्वामी माझा आणि मी स्वामींचा हे उगीच नाही. ह्या नात्याला नाव नाही ते फक्त अनुभवायचे. काहीही झाले तरी महाराज आहेत हा विश्वास आपल्याला जगवत असतो . महाराजांच्या नुसत्या विचारांनी सुद्धा मनाच्या तारा झंकारु लागतात , जगण्याच्या आशा पल्लवित होतात , त्यांच्या प्रार्थना , पदे नुसती कानावर पडली तरी मन त्यावर ठेका धरू लागते . त्यांच्यात मी आणि माझ्यात ते हा दिव्य अनुभव मी कित्येक वेळा घेतला आहे. निराशेचे ढग त्यांच्या अस्तित्वाने उडून जातात . अब जो भी होगा अच्छा हि होगा हा विश्वास मनाला उभारी देतो आणि पुन्हा आपण आपल्या संसारात प्रपंचात रममाण होतो.
एक वेळ अशी येते जेव्हा त्यांचे असणे आणि नसणे दोन्हीही एकच होते कारण त्यांचे अस्तित्व आपण प्रत्येक क्षणी अनुभवायला लागतो. निर्गुण रूपाचे सगुण रूप कसे आणि कधी रुपांतर होते ते समजत नाही . हा अनमोल दुग्ध शर्करा योग म्हणजे आपल्या भक्तीची परीसीमा होय . आजवरच्या सेवेची हि पोचपावती समजायला हरकत नाही . महाराजांच्या दर्शनाने मन तृप्त होणे , त्यांच्या शिवाय कुठलाच विचार मनाला स्पर्शून न जाणे , प्रचंड आत्मविश्वासाने कामाला लागणे आणि घेतलेल्या कामाचे सोने करणे हे त्यांचे आपल्या समीप असल्याचे प्रमाण आहे.
महाराजांची सेवा करायला भाग्य लागते , पूर्व संचित लागते , कुठून तरी सुरवात होणे आवश्यक आणि ती एकदा झाली कि मग आनंदाचे डोही आनंद तरंग अशीच आपली आणि आपल्या मनाची अवस्था होते .
भौतिक सुखांची लालसा न सुटणारी आहे पण महाराजांच्या नामातील जादू आपल्याला मोक्षाकडे नेणारी आहे. मनाची शांतात , प्रसन्नता आणि अतीव समाधान फक्त नामातच आहे आणि म्हणूनच अखंड नामाचे महत्व तितकेच आहे . महाराज जादू करणार नाहीत पण आपले दुक्ख हलके करण्याचा मार्ग दाखवतील. परमार्थात रमलेला माणूस शांत जीवनाचा अनुभव नक्कीच घेतो .
आपण सामान्य माणसे आहोत आणि कधीतरी मन उदास होणार , कधीतरी शंकांचे काहूर मनात उठणार सर्व काही होणार पण तरीही त्यांच्या नामात ह्या सर्वावर हळुवार फुंकर घालण्याचे सामर्थ्य आहे. महाराज हा आपल्या जीवनाचा मोठा आधार आहे. अनेकदा मी व्यथित झाले तर मी नामस्मरण करते आणि माझे मन त्यातून अलगद बाहेर येते . नित्याचे नामस्मरण मुळातच आपल्याला व्यथांमध्ये अडकुनच देत नाही .
ज्योतिष आणि अध्यात्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . आकाशातील ग्रहतारे आपल्या पूर्व सुकृता प्रमाणे फळे प्रदान करतात पण , आपल्या आयुष्याचे अध्यात्मिक कवच आपले जगणे सुखकर करते . आयुष्याची सकारात्मक बाजू बघायला शिकवते . अनेकदा धर्मसंकट समोर येते पण योग्य वेळी योग्य तेच घडवून आपले आयुष्य ते नेहमीच मार्गस्थ करतात .
सदैव भरकटत राहणारे आपले मन जेव्हा साधनेच्या रुपात गुरूंच्या चरणाशी स्थिर होते तेव्हा सगळ्यातून लक्ष्य बाहेर येवून फक्त आणि फक्त त्यांचेच चरण दिसू लागतात आणि त्यांचे आपले नाते घट्ट झाल्याची पोचपावती मिळते .
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment