|| श्री स्वामी समर्थ ||
महाराजांबद्दल काही लिहायचे म्हंटले कि ऊर भरून येतो , लेखणीतून शब्द झरझर बाहेर पण येतात , कसे ते माहित नाही. महाराज म्हणजे आनंदाचा ठेवा . नुसते महाराज म्हंटले कि शेगाव समोर उभे राहते . गेल्या कित्येक वर्षात जग बदलले तसे शेगाव सुद्धा पण महाराजांवरचे आपले प्रेम भक्ती कित्येक पटीन वाढली . शेगाव ला जावून महाराजांची भेट घेणे हा नुसता विचार सुद्धा आनंददायी आहे. तर प्रत्यक्ष भेटीत काय होयील ?
ज्योतिष शास्त्राचे ग म भ न मी गुरुवर्य श्री गोगटे काकांकडे शिकले आणि काका तर निस्सीम गजानन भक्त . ते नेहमी म्हणत अस्मिता हे चांद तारे आहेतच आणि तेही आपल्या पूर्व सुकृताचे फळ देण्यास बांधील आहेत पण त्यांच्याही वरती संतांची सत्ता आहे आणि ती अगाध आहे. संतांचे बोट धरलेला भक्त प्रत्यक्ष परमेश्वरालाही प्रिय आहे त्यामुळे संतसेवा कधीही अनाठायी जात नाही . संतांची सेवा करायला सुद्धा पूर्व सुकृत असावे लागते , उभा जन्म सेवेत घालवला तरी कमी पडेल . संतांच्या सहवास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभलेला प्रत्येक भक्त सुखीच राहतो हि निर्विवाद सत्य आहे. दासगणू महाराजांनी “ श्री गजानन विजय “ ग्रंथ लिहिला. त्यातील एकेक शब्द म्हणजे भक्ती रसाची जणू परिसीमा आहे .
ऋषी पंचमी हा महाराजांचा महानिर्वाण दिन . पण आजही ते आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाची ग्वाही भक्तांना क्षणोक्षणी मिळते आहे. फक्त मनापासून भक्ती आणि श्रद्धा असली पाहिजे . त्यांच्यावर निखळ विश्वास असेल तरच काहीतरी शक्य आहे. ग्रंथात महाराजांनी ज्या भक्तांसाठी केलेल्या लीला वाचल्या तर लक्ष्यात येयील त्यातील प्रत्येक भक्ताने महाराजांवर आपला जीव ओवाळून टाकला होता , समर्पण काय असते ते त्या भक्तांनी दाखवून दिले. उगीच नाही बळीरामाच्या वठलेल्या वृक्षाला पालवी फुटली .
महाराज कुठेही गेलेले नाहीत आणि जाणारही नाहीत तसे वचनबद्ध आहेत ते आपल्या भक्तांशी . ज्यांनी बारा वर्ष कोरड्या असलेल्या विहिरीला एका क्षणात पाणी आणले , तुंब्यात फक्त निर्मळ जल आले , गंगाभारतीचा आजार गेला , चंदू मुकिन कडचे महिनाभरापूर्वी केलेले कानवले अगदी तसेच्या तसे राहिले हे चमत्कार त्यांनी आपल्याला काहीतरी शिकवण देण्यासाठी केले. विहिराला पाणी आल्याचे पाहून भास्कर पाटीलाने सर्वस्व त्यांच्या चरणाशी अर्पण करून त्याचा दास होणे पत्करले . मुक्या प्राण्यांवर जिथे त्यांची कृपा झाली तिथे आपल्यावर होणार नाही का?
गजानन विजय प्रत्येक वेळी आपल्याला नवीन काहीतरी देत राहतो . त्यातील प्रत्येक शब्दात आयुष्याचा अर्थ दडलेला आहे . त्यांच्या अस्तित्वाची प्रचीती यायला आपल्या भक्तीची खोली सुद्धा तितकीच असावी लागते . दंभ , अहंकार दूर ठेवावा लागतो . महाराज आणि भक्तांमध्ये असलेली हि अहंकाराची भिंत गळून पडते तेव्हाच त्यांची शिकवण समजायला लागते .प्रचीतीविना भक्ती नाही आणि भक्ती शिवाय प्रचीती नाहीच नाही .
जेव्हा सगळे संपते तिथे त्यांचा खेळ सुरु होतो . भक्तांना ते सदैव सांभाळत असतात . आपण किती केले त्यापेक्षा कसे केले हे महत्वाचे आहे . तिथे मेवा खावून सेवा करणारे विठोबा घाटोळ नको आहेत तर कृष्णाजी पाटील सारखे निस्सीम भक्त हवे आहेत . दासगणू महाराजांनी लिहिलेला प्रत्येक शब्द अनुभवांची खाण आहे. आज महाराज असते तर हे जग कसे असते हा विचार माझ्या मनात नेहमी येतो आणि त्याच्या आसपास मला अशी काही प्रचीती मिळते कि मी मनोमन काय ते समजते . महाराज हि दिव्य शक्ती आहे , अवलोकनाच्या बाहेरची आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते ..
दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती ..
गजानना गजानना सांभाळ आपल्या भक्तजना ...
समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज कि जय ....
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment