|| श्री स्वामी समर्थ ||
विवाह कधी होईल ,जोडीदार कसा असेल ह्या सर्व प्रश्नांपेक्षा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे माझे वैवाहिक सौख्य कसे असेल हा आहे . विवाहाच्या वेळेची स्थिती सर्वार्थाने तीच कशी राहील ? ती बदलत राहणार . आयुष्यात अनेक वळणे येणार आणि त्यातूनच एकमेकांना सावरत पुढे जात राहणार . बर्याच लोकांना उत्तम वैवाहिक सौख्य लाभते तर काहीना ह्यातून दुक्ख आणि निराशा पदरी येते. तडजोड करत विवाह टिकवणार्या लोकांची संख्या हि अधिक आहे. वैवाहिक सौख्य बघताना खालील गोष्टींचा विचार करुया.
विवाह हा अनेक कारणांनी केला जातो . अनेकदा सगळे करतात म्हणून , घरच्यांनी आग्रह केला म्हणून , मला स्वतःलाही जोडीदार हवा , सहजीवन हवे संसाराची आवड आहे म्हणून , अनेकदा घरात आईवडील वयस्कर आहेत त्यानाही बघायला कुणी नाही . पत्नी निवर्तली मग मुलांना कोण पाहणार म्हणूनही विवाह केला जातो . वरील सर्व कारणे ह्या ना त्या प्रकारे पटणारी आहेत .
ज्योतिषीय ग्रहस्थितीचा विचार केला तर शुभ ग्रहांचा धन भाव आणि सप्तम भाव तसेच पंचम लाभ ह्या भावांवर असलेला प्रभाव सुखी जीवनाकडे वाटचाल करण्यास मदत करेल हे नक्की. सप्तम भाव हा प्रामुख्याने आपल्या जोडीदाराचा आणि दोघात असलेल्या मानसिक अनुबंधाचा आहे तिथे शनी मंगल राहू केतू उपयोगाचे नाहीत . तिथे चंद्र शुक्रासारखे सौम्य आणि ज्ल्तात्वाचे रसिक ग्रहच हवेत तरच संसाराची वेल बहरेल.
अभ्यासकांनी खालील ग्रहस्थितीचा पत्रिका मिलनासाठी अवश्य अभ्यास करावा .
सप्तमस्थान – पापकर्तरी योगात आहे का ,कुठल्या ग्रहांच्या दृष्ट्या आहेत .
सप्तम स्थानातील ग्रह –ते कुठल्या ग्रहांच्या युतीत आहेत आणि कुणाच्या नक्षत्रात आहेत .सप्तमेश कुठे आहे आणि कुणाच्या दृष्टीत युतीत आहे.
विवाहाचा कारक ग्रह शुक्र सगळ्यात महत्वाचा आहे . त्याची स्थिती लग्न कुंडली आणि नवमांश कुंडलीत अत्यंत महत्वाची आहे.
लग्न भाव आणि लग्नेशाची स्थिती अभ्यासा. लग्नेश आणि सप्तमेशाचे काय योग आहेत ते तपासा.
सप्तम स्थानातील ग्रहांचे सप्तमेशाशी ,शुक्राशी आणि इतर ग्रहांशी होणारे योग.
पत्रिकेतील रवी चंद्र मंगल आणि शुक्र त्यांचे परस्परांशी योग आणि सप्तमेशाशी योग महत्वाचे आहेत .
सप्तम स्थानासोबर लग्नस्थान कारण ते सप्तमाचे सप्तम आहे, धनस्थान जे कुटुंब स्थान आहे. षष्ठ स्थान हे सप्तमाचे व्ययस्थान आहे आणि व्यय स्थान जे सप्तम स्थानाचे षष्ठ स्थान आहे.
थोडक्यात १ २ ६ ७ ८ आणि १२ ह्या स्थानांचा विचार आवश्यक आहे. २ ६ ८ १२ ह्या स्थानांमध्ये जर पापग्रह असतील तर वैवाहिक सौख्य चांगले मिळत नाही .
स्त्रियांच्या पत्रिकेत रवी मंगळ तसेच पुरुषाच्या पत्रिकेत चंद्र शुक्र ह्यांचा अभ्यास केला पाहिजे . नवमांश पत्रिकेत ग्रहांचे बळ बघा त्याशिवाय निष्कर्ष काढू नका .
पत्रिकेतील इतर ग्रहस्थिती जसे पितृदोष ,कालसर्पदोष , वैधृती योग, विष्टीकरण.
सप्तमस्थान हे शुभ कर्तरी योगात असेल तर उत्तम . सप्तम स्थान जितके शुभ तितके संसार सुख आणि सहजीवन उत्तम .
सप्तम स्थानात चंद्र ,शुक्र हे स्त्रीग्रह बलवान राशीत किंवा शुभ नक्षत्रात असतील.
सप्तमेश शुभ स्थितीत असेल ,लग्नात ,चतुर्थात ,पंचमात , सप्तमात , नवमात ,दशमात किंवा लाभात , स्व किंवा उच्च नवमांशात ,शुभ नक्षत्रात , मित्र ग्रहांच्या युतीत , दृष्टीत असेल तसेच सप्तमेश मार्गी असेल तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते . अश्या स्थितीत सप्तमेश हा बलवान होतो .
सप्तमेशावर ,सप्तम स्थानावर ,शुक्रावर गुरूची दृष्टी असेल तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते.
लग्नेश आणि सप्तमेशाचा जर नवपंचम योग , लाभ योग ,राशि परीवर्तन योग असेल आणि लग्नेश बलवान असेल तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते.
सप्तमेश , लग्नेश ,शुक्र ह्यांच्यासोबत शनी राहू मंगळ ह्यांचे शुभ योग होत असतील तर वैवाहिक सौख्यात अडचणी येत नाहीत.
२ ४ ६ ८ १२ ह्या स्थानात जर शुभ ग्रह असतील किंवा पाप ग्रह फारसे नसतील तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते .
विवाह वेदीवर चढताना आपला हा विवाह हे आयुष्यातील सर्वोत्तम सुख आहे आणि काहीही झाले तरी मी ते टिकवणार हा दृढ निश्चय मनाशी करून विवाह केला तर समस्या येतील आणि जातील, मार्ग मिळेल आणि संसाराची घडी सुद्धा निट बसेल. आयुष्यात सहजीवन महत्वाचे आहे . दोघेजण नुसते भाजी कोथिंबीर घ्यायला एकत्र गेले तर त्यात आनंद आहे कारण एकच “ ती दोघे एकत्र आहेत “ . सहवास सगळ्यात महत्वाचा आहे. बोलायला भांडायला सुद्धा आपलेच माणूस लागते . फार ताणून धरू नका. चिकित्सक वृत्ती शेवटी आपल्यालाच एकटे ठेवते . सर्व गुण संपन्न इथे कुणीही नाही. प्रत्येक आईवडिलांनी एकदा आपल्या पाल्याला त्याचा चेहरा आरशात बघायला सांगावा त्यांची उत्तरे त्यांनाच आपसूक मिळतील.
सहजीवनाचा आनंद सर्वात मोठा आहे आणि त्यासाठी थोडी तडजोड करण्याची वृत्तीही असावी , नाहीतर हे सर्व इथेच राहील वास्तवात कधीच उतरणार नाही. सर्वाना आपापल्या पसंतीचा जोडीदार मिळूदे आणि सर्वांचे सहजीवन स्वामींच्या कृपेने बहरत , फुलत राहूदे हीच सदिछ्या .
सौ. अस्मिता दिक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment