Monday, 15 September 2025

सहजक्रिया

 || श्री स्वामी समर्थ ||

नारदमुनी स्वतः मोठे साधक होते .सदैव “ नारायण नारायण “ जप करत असत. एकदा श्री विष्णूंच्या भेटीला ते गेले आणि महा विष्णुना नमस्कार करून म्हणाले कि मी आपला महान भक्त आहे कारण मी सदैव आपलेच स्मरण करत असतो . तेव्हा विष्णू मनोमन समजले कि ह्याला आपल्या भक्तीचा अहंकार झालेला आहे . त्यांनी नारदाला सांगितले अजूनही एक भक्त आहे पृथ्वी लोकात जो माझा परम भक्त आहे. तेव्हा नारदांनी ते सरळ नाकारले आणि कोण आहे तो अशी विचारणा केली.

त्यावर वेश बदलून दोघे पृथ्वी लोकात एका शेतात आले जिथे एक शेतकरी नांगर चालवीत होता . पण नुसताच नांगर चालवत नव्हता तर मुखाने सदैव विष्णूंचे नाम घेत होता .

विष्णूनी नारदाला सांगितले कि ह्या भक्तापेक्षा तू मोठा भक्त आहेस हे सिद्ध करण्यासाठी तू हा नांगर चालव . फक्त एक फेरी मार पण तो चालवताना एका हातात तेलाने भरलेले मातीचे भांडे घे ज्यातील तेल नांगर चालवताना खाली सांडले नाही पाहिजे आणि एकीकडे मुखाने नामस्मरण सुद्धा केले पाहिजे . इतकेच ना हे तर सोपे आहे असे म्हणून नारदमुनी एका हातात तेलाचे भांडे घेवून नांगर ओढू लागले पण इथे तिथे तेल सांडणार तर नाही ना ह्या भीतीने खरच थोडे तेल सांडले. विष्णूनी त्यांना काय शिकवले ते त्यांना समजले आणि आपल्या अहंकाराला तिलांजली देत नारदमुनी त्यांच्या समोर नतमस्तक झाले.

प्रपंच करून परमार्थ करणे हि सहजक्रिया जरी वाटत असली तरी त्यात सर्वस्व ओतावे लागते . प्रपंचातील सर्व कर्म करताना परमेश्वराच्या चरणी लीन व्हावे लागते . प्रत्येक कर्म करताना त्याला हृदयात स्थान द्यावे लागते . क्षणभर सुद्धा त्याला न विसरता प्रपंच करत राहणे हे खचितच सोपे नाही . हि कठोर परीक्षा आहे कारण नाम घेणे म्हणजे भौतिक सुखापासून परास्त होणे आणि ते जमणे महाकठीण असते .

सातत्य आणि श्रद्धा असेल तर हेही जमते . नाम घेण्यासाठी वेगळे काहीही करावे लागत नाही इतकी हि क्रिया सहज होवून जाते . आपणही रोजच्या आपल्या प्रपंचात “ वेळ नाही “ हि सबब सांगतो त्यात तथ्य नाही. पोळ्या करताना , कपडे वाळत घालताना , स्वयंपाक करताना , चालता बसता उठता झोपता , आपली नित्य कर्म करताना नाम घेत राहणे हि क्रिया तितकीच आपल्याही नकळत सहज होवून जाते . फक्त करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती हवी .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Thursday, 11 September 2025

तनुस्थान

 || श्री स्वामी समर्थ ||


लग्न भाव म्हणजेच तनुस्थान हे महत्वाचे आहे , त्यात राशी बदलल्या तरी भाव महत्वाचा .जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर असलेली राशी हि जातकाच्या लग्नात येते. पूर्व क्षितिजावर सूर्य उगावतो तो लग्न बिंदू असतो . जन्म लग्नातील उदित राशी तिचा स्वामी आणि लग्नातील ग्रह हे जातकाच्या आयुष्यावर स्वभाव टाकतात जसे  प्रथम दर्शनी असलेले रूप रंग , शरीरयष्टी बांधा तसेच मन आणि स्वभावावर परिणाम करतात . लग्न बिंदू आत्यंतिक महत्वाचा आहे कारण ह्यातून आपण जन्म घेत असतो आणि त्यासोबत आलेल्या आपल्या चांगल्या वाईट वासना देखील ह्या जन्मात प्रवेश करत असतात . ह्या स्थानाला महत्व आहे कारण ह्या भावातील ग्रह बलवान असतात . केंद्रातील हे प्रथम आणि प्रमुख स्थान आहे.

लग्न बिंदू निश्चित करणे महत्वाचे असते. परवा एक पत्रिका पाहिली त्यात लग्न भावात शून्य अंशावर मेष लग्न उदित होते . आता मेष घ्यायचे कि मीन हा प्रश्न होता तेव्हा रुलिंग ची मदत घेतली . त्या दिवशी रुलिंग ला केतू असल्यामुळे मेष लग्न निश्चित केले आणि त्यानुसार केलेल्या पत्रिकेचे विवेचन सुद्धा बरोबर ठरले.

लग्न जेव्हा शून्य अंशावर उदित होते तेव्हा रुलिंग प्लानेट ची मदत देवासमान समजावी .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Wednesday, 10 September 2025

स्थित्यंतरे दाखवणारा अष्टम भाव

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या आयुष्यात काहीही वाईट झाले किंवा उलथापालथ झाली कि आपण सर्वात खापर फोडतो ते शनी राहू केतू मंगळ ह्यांच्यावर . पण अनेकदा ह्यातील कुणीच त्याला जबाबदार नसून इतर अनेक योग त्या घटना घडवत असतात . उदा द्यायचे झाले तर अष्टम भाव , त्यातील ग्रह किंवा अष्टमेशाची दशा . एखादा ग्रह जेव्हा अष्टमेशाच्या नक्षत्रात असतो तेव्हा जीवनात अनेक स्थित्यंतरे बघायला मिळतात . अष्टम भाव हा प्रामुख्याने लग्नापासून आठवा असल्यामुळे मुख्यतः शारीरिक पीडा तसेच आर्थिक मानसिक शांतता हरवून टाकतो . नको ते व्याप आणि मनस्ताप मागे लागतात .नोकरीत निलंबन ,पैसे अडकणे , उधारी , व्यसने , व्यवसाय अचानक बंद पडणे , शारीरिक त्रास उद्भवणे आणि त्यामुळे मानसिक संतुलन बिघडणे ह्या गोष्टीना जातकाला सामोरे जायला लागते.

अष्टम भाव हा सप्तमाचा धन भाव आहे अनेकदा आपला जोडीदार आपल्यामागे समर्थपणे उभा असतो त्यामुळे नेहमीच अष्टम भाव नकारात्मक फळे देयील असे नाही . भावेश आणि भावातील ग्रह जर अष्टमेशाच्या नक्षत्रात असतील तर काय फळे मिळतात ते बघुया .

प्रथमेश किंवा प्रथम भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर अपघात , तीव्र डोकेदुखी, नैराश्य, आळशी , आत्मघातकी वृत्ती असते . धनेश किंवा धन भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर उधळपट्टी , बोलण्यात अडखळणे , कौटुंबिक सौख्य नसणे , आर्थिक गुंतवणुकीत फसवणूक होते. तृतीयेश किंवा तृतीय भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर खोट्या बातम्या पसरवणे , खोट्या सह्या , करारात फसवणूक , भागीदार फसवतील.

चतुर्थेश किंवा चतुर्थ भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर घरात दडपण , शिक्षणात अडथळे , आईशी न पटणे , मनाची ताकद कमी आणि घरात एकटे राहायला भीती वाटणे , वाहन अपघात , घराची चुकीची कागदपत्रे . भाग्येश किंवा भाग्यातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर उच्च शिक्षणात अडथळे , वडिलांशी वितुष्ट , देवधर्म न होणे , न्यायालयीन कामात अडथळे , लाभेश किंवा लाभतील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर मित्र आप्तेष्ट ह्यांच्याकडून नुकसान , कुसंगती . व्ययेश किंवा व्यय भावातील ग्रह जर अष्टमेश किंवा अष्टम भावाच्या नक्षत्रात असतील तर अपघात , सर्जरी , चुकीच्या गुंतवणुकीतून तोटा , मनस्ताप , परदेशी कंपन्यांच्या व्यवहारात फसवणूक होते.

अष्टम भाव अनेक कंगोरे देत असतो त्यामुळे अभ्यास करावा तितका थोडाच आहे. एखादा नियम अनेक पत्रिकातून अनुभवला तर त्याची अनुभूती मिळाली असे समजायला हरकत नाही . एखादी घटना फक्त एक ग्रह घडवत नाही तर त्यास अनेक योग , ग्रह दशा कारणीभूत असतात . एखादा ग्रह भरभरून देणारा तर एखादा अडथळे निर्माण करणारा. सगळे रंग समजले पाहिजेत . असाच अभ्यास करत राहूया . तूर्तास इथेच पूर्णविराम .

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Tuesday, 9 September 2025

भाकीत म्हणजे ब्रम्हवाक्य नाही

 || श्री स्वामी समर्थ ||

ज्योतिष शास्त्राचा आवाका प्रचंड मोठा आहे त्यामुळे त्याचा अभ्यास सुद्धा तितकाच सखोल आहे. एखाद्याच्या पत्रिकेबद्दल भविष्य कथन करणे सोपे नाही. प्रचंड दांडगा व्यासंग आणि उपासना असेल तरीही केलेलं भाकीत अनेकदा चुकू शकते कारण हे शास्त्र पूर्णपणे परिपूर्ण नाही. शास्त्र हे कर्माच्या सिद्धांतावर अवलंबून आहे म्हंटले तर वावगे ठरू नये. भविष्य कथन करण्याच्या अनेक पद्धती प्रचीलीत आहेत पण पद्धत कुठलीही वापरली तरी उत्तर बरोबर आले पाहिजे हे महत्वाचे आहे .

सर्वच कुंडल्या काही सोप्या नसतात . अनेक कार्यशाळा करून ज्योतिष येयील का? तर नाही. त्यातून मिळालेले ज्ञान आपल्याला अभ्यासाची दिशा दाखवेल. पण तुमचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला परिपूर्ण ज्ञान देयील ह्या मताशी बहुतांश सहमत होतील. पुस्तक आणि प्रत्यक्ष आयुष्य हे वगळे आहे आणि म्हणूनच पुस्तकात दिले आहे २ ७ ११ लागले कि विवाह होईल पण त्याचा दशा लागूनही जेव्हा विवाह होत नाही त्याचे कारण आपला स्वतःचा अभ्यासच देवू शकतो .थोडक्यात ग्रंथात दिलेले नियम आयुष्यातील अनेक प्रश्न सोडवताना कसे लावायचे ते समजले पाहिजे . जसे मेष लग्नाला कन्येचा शुक्र हा प्रनायासाठी उत्तम नसेल पण कन्येसारख्या पृथ्वी तत्वाच्या राशीत तो आर्थिक दृष्टीने चांगले फलित देयील. अवास्तव पैसा खर्च करणारी व्यक्ती नसेल तर पैशाचा संग्रह करील.

प्रत्येक पत्रिका हे ज्योतिष अभ्यासका समोर असलेल एक आव्हान असते जिथे आपल्या ज्ञानाची आकलन शक्तीची अक्षरशः कसोटी लागते. जातक आपण दिलेल्या निर्णयावर विश्वास ठेवून पुढील मार्ग आखणार असतो त्यामुळे सांगणाऱ्या ज्योतिषाचीही जबाबदारी वाढते . सप्तम भावाचा सब बुध असेल तर दुसरा विवाह होईल हे नेहमीच शक्य होत नाही हे लक्ष्यात आले पाहिजे

अनेक वेळा पत्रिकेतील ग्रह आपल्यासमोर पेच निर्माण करतात , गुगली टाकतात अश्यावेळी आपली वयक्तिक उपासना उपयोगी पडते . आपल्या ज्ञानाचा कस लागतो तिथे आपला आतला आवाज सुद्धा ऐकावा लागतो . ज्योतिषाची तळमळ जातकाचा प्रश्न सुटावा अशी असेल तर प्रश्न निश्चित सुटतो .

एखाद्या पत्रिकेचे उत्तर उदा. विवाहाचा प्रश्न असेल आणि विवाह हि घटना जातकाच्या आयुष्यात घडणार नसेल असे संकेत जरी ग्रह देत असतील तरीही ती खुबीने त्याला न दुखावता सांगणे हे कौशल्य असते . अनेकदा आपण वर्तवलेले भाकीत जरी नकारात्मक असले तरी ते खरे झाल्यामुळे जातकाचा आपल्यावर विश्वास बसतो आणि अश्याही अवस्थेत तो पुन्हा आपल्याकडे प्रश्न घेवून निश्चित येतो असा अनुभव आहे.

सांगितलेले खरे झाले ना? मग ते कदाचित आपल्या मनासारखे नसेलही असो , भाकीत खरे झाले हे महत्वाचे असते. शास्त्राला मर्यादा आहेत त्यामुळे वाटेल त्या गोष्टीचे मुहूर्त काढून द्या हे जरी सांगितले तरी ते देणे उचित ठरणार नाही जसे घटस्फोट लवकर व्हावा असे प्रश्न हे न हाताळलेले बरे. निसर्गासमोर माणसाने नतमस्तक व्हावे हेच योग्य .

काही आपले प्रारब्ध भोग सुद्धा असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर उपाय नसतो . जपताप्य , नामस्मरण , अनेकदा घटनेचा क्रम बदलवू शकत नाही पण आपली मनोधारणा बदलवू शकतात . आपले मतपरिवर्तन होवू शकते . एखादी गोष्ट

आयुष्यात घडणार नाही हे आपले मन स्वीकारते हाच नामाचा महिमा आहे. जसा काळ पुढे सरकतो तसे आयुष्य नव्याने सुरु करण्याची उमेद उपसना देत असते . आपले आप्त कुटुंबीय हे जग सोडून गेले तरी मागे राहिलेल्या व्यक्तींना जगावेच लागते तेही असलेल्या दुक्खाला दूर करून . कुणी कुणासाठी थांबत नाही हा संदेश आपल्याला ह्या घटनातून मिळतो.

ज्योतिष हे चमत्कार करणारे आणि होत्याचे नव्हते करण्याची ताकद असलेले शास्त्र नाही , ते परिपूर्ण शास्त्र आपल्याला पुढील घटनांचा फक्त संदेश देत असते . ग्रह आपल्या पुर्वकर्मांचा आरसा आहेत आणि त्याची फलिते देण्यास समर्थ आहेत म्हणूनच आपल्या पत्रिकेत त्या त्या भावात ठाण मांडून बसले आहेत . सारीपटावरील सोंगट्या प्रमाणे आपण त्यांना हलवू शकत नाही .आपल्या कर्मांनी आपल्या आयुष्याची जी वाट लावलेली असते ते आपले आयुष्य वाटेवर राजमार्गावर आणण्याचा प्रयत्न शास्त्र करते म्हणून त्याला मार्गदर्शक घटक म्हंटलेले आहे.

आजकाल लोकांना ज्योतिष हा एक छंद झालेला आहे. बर सांगितलेले उपाय करतील कि नाही हे ज्योतिषाला जातकाची पत्रिका बघूनच समजलेले असते पण तरीही मोठ्या आशेने तो उपाय सांगतो . उपाय करणे हे ज्याचे त्याचे प्रारब्ध आहे.

शास्त्राची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न विचारू नयेत आणि ज्योतिष सांगूही नये. तितकी आपली पात्रता नाही हे नक्की. शास्त्र अनुभूती देणारे आहे आणि ते देतेच देते . ज्योतिष शास्त्रावर तुमचा विश्वास असो अथवा नसो सूर्य उगवायचा राहत नाही . निसर्ग ग्रह आपापली कामे चोख बजावत असतात . आपण सामान्य माणसे आहोत

आकाशातील ह्या लुकलुकणाऱ्या तारकांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो आणि त्यांचे जन्मापासून असलेले विलक्षण आकर्षण आपल्याला त्यांचा अभ्यास करण्यात प्रद्युक्त करते . एखादे भविष्य चुकले तर पुन्हा अभ्यास करावा शेवटी भविष्य वर्तवणारा सुद्धा माणूसच आहे . खरतर स्वतःला ज्योतिष न म्हणवून घेता अभ्यासकच म्हंटले पाहिजे . हे तर्कशास्त्र आहे आणि त्याचा अभ्यास प्रत्येकाने करावा . आपले वेद , पुराण , ग्रंथ , उपनिषदे ह्या सर्वच अभ्यास करून आपल्या ऋषीमुनींचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करावा .

ग्रहतारे आपल्या जीवनाचा एक भाग आहेत आणि त्यांचा अभ्यास आपल्याला भाकीत वर्तवताना उपयुक्त होतो. पण म्हणून आपण केलेले प्रत्येक भाकीत हे ब्रम्हवाक्य असेल असे नाही आणि तसा अट्टाहास सुद्धा नसावा.

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 

Saturday, 6 September 2025

राहूच्या दशेत नेमके कुठले शिक्षण घ्यावे ????

 || श्री स्वामी समर्थ ||


राहूची दशा अंतर्दशा असेल तेव्हा अनेकदा आता मुलाचे शिक्षणातील लक्ष उडणार , मग मुलगा सारखा घरा बाहेर राहणार , चुकीच्या संगतीत अडकणार , त्याचे अभ्यासावरून लक्ष उडणार असे एक ना अनेक प्रश्न बरेचदा विचारले जातात . राहू आणि केतू ह्यांचा अभ्यास तसा बराच मोठा आहे . त्यात प्रगत सोशल मिडीया जनमानसावर हाबी आहेच पण त्यामुळे अनेकदा कुठेतरी काहीतरी वाचून ते आपल्या पत्रिकेला जोडून पाहणे हे शहाणपणाचे नक्कीच नाही .

आज आपण राहूची कार्यक्षेत्र पाहूया . राहू हा एक छाया ग्रह आहे आणि त्याला राशी नाही त्यामुळे तो ज्या राशीत असतो त्या राशीस्वामीची फळे प्रदान करतो. राहूच काय तर प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या भावात राशीत वेगवेगळी फळे देत असतो आणि ती चांगली वाईट दोन्ही असू शकतात . राहू बिघडला तर ड्रग्स किंवा नशिल्या पदार्थांच्या आहारी व्यक्ती जावू शकते .

ग्रह हा पूर्णपणे फलित देतो ते त्याच्या दशेत , अंतर्दशेत . वैदिक शास्त्रात राहू केतू ना जसे महत्व दिलेले आहे तसेच कृष्णमुर्ती ह्यानी राहू केतुना विशेष महत्व दिले आहे. आयुष्यातील अनपेक्षित वळणावर आपल्याला राहूच भेटत असतो , राहुने आज जग जवळ आणले असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . संशोधन, गूढ विद्या ह्या सर्वांच्या मागे राहूच आहे नुसते तंत्रज्ञान नाही तर दशहतवाद , परदेशी प्रवास ,फसवणूक , राजकारण सुद्धा राहूचे कार्यक्षेत्र आहे.

राहू पत्रिकेत दुषित नसेल आणि शिक्षण घेता येयील अश्या भावांचा कारक असेल तसेच तश्या दशा सुद्धा राहुशी निगडीत असतील तर खालील कुठल्याही क्षेत्रातील शिक्षण आपल्या आवडीनुसार आणि इतर ग्रहस्थिती पाहून घेता येयील.

वेगवेगळया औषधांची निर्मिती , सायबर गुन्हे , AI ,Data Science आणि चित्रपट निर्मिती , Animation , Graphic Design , Computer Technology , फोटोग्राफी, Digital , सोशल मिडीया मार्केटिंग ह्या क्षेत्रात शिक्षण घेवून अर्थार्जन करता येयील.

परदेशी भाषा आणि परदेश खुणावत असतो जेव्हा राहू दशा असते. त्याचप्रमाणे गुढतेच कारक असलेला राहू गूढ विद्या ज्योतिष , तंत्र मंत्र साधना , मानसशास्त्र तसेच हिप्नोटीझम कडे आपला कल घेवून जातो. ह्या शस्त्रांचा अभ्यास राहू दशेत चांगला होतो. गुन्हेगार क्षेत्राशी संबंध असल्यामुळे गुन्हेगारांची मानस शास्त्र , फोरेन्सिक lab मधेही काम करता येयील.

राहू हा मायावी राक्षस आहे , ह्या दशेत प्रत्येक पावूल जपून टाकावे लागते कारण फसवणूक होण्याची शक्यता सर्वाधिक असते. राहू भ्रमित करतो त्यामुळे करायला जावे एक आणि व्हायचे भलतेच अशी गत होवू शकते तसेच राहू कुठून आपली फसवणूक करेल सांगता येत नाही . आपल्या गोष्टी गुप्त ठेवणे हितावह ठरते . जितकी गुप्तता तितके यश अधिक . जवळच्या लोकांकडून विश्वासघात आणि दिशाभूल . तसेच चुकीची संगत व्यसनाधीन करू शकते .

राहू कुठल्या भावात आहे आणि कुठल्या ग्रहासोबत आहे त्यावर शिक्षण कुठले घ्यायचे ते समजू शकते.

राहू हा आकर्षण निर्माण करणारा ग्रह असल्यामुळे कमी कष्ट करून मोठा फायदा मिळवण्याच्या नादात कित्येक जण आपले आयुष्य पणाला लावतात आणि सर्वस्व घालवून बसतात . शेवटी राहू हा मोह आहे , राहू हे राक्षसाचे धड असल्यामुळे त्याला जे जे दिसेल ते सर्व हवे आहे. राहू माणसाला passionate बनवतो आणि त्यासाठी बुद्धी भ्रमिष्ट सुद्धा करवतो म्हणूनच राहूच्या दशेतील सर्वच काळ हा दडपण देणारा असतो. शुभ संबंधित राहू असेल तर कुशाग्र बुद्धिमत्ता देतो आणि अरब पतीही बनवतो .

कुठलीही शिक्षण शाखा निवडताना आपली आवड , कुवत आणि अर्थात आर्थिक गुंतवणूक ह्या सर्वच सारासार विचार करूनच क्षेत्र निवडले पाहिजे. एखादी गोष्ट फक्त जाहिरातींना फसून किंवा अविचाराने केली उतावळे पणाने निर्णय घेतला तर आई वडिलांच्या कष्टाचे पैसे जातील पण आयुष्यातील सोन्यासारखा वेळ फुकट जायील तो पुन्हा येणार नाही.

शिक्षण क्षेत्राची निवड करताना राहू कुठल्या भावात आहे , नक्षत्रात कुठल्या आहे, युतीतील ग्रह , त्यावर कुणाच्या दृष्टी आहेत आणि अर्थात दशा कुठल्या ग्रहाची आहे ह्या सर्वाचा एकत्रित विचार करावा लागतो.

चुकीचे शैक्षणिक क्षेत्र निवडले तर पीछेहाट होते , अभ्यास करण्यास फारसा उत्साह नसतो कारण मुळात विद्यार्थ्याची आवड लक्ष्यात न घेता ते निवडलेले असते . त्यामुळे पुढे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कमी होतो , मी काहीच करू शकत नाही किंवा मला काही जमतच नाही अश्या खोट्या भ्रमाच्या कोशात तो स्वतःच अडकत जातो . म्हणूनच कुठले शिक्षण घ्यावे हे महत्वाचे आहे .

आपण घेत असलेल्या शिक्षणाचा नोकरी मिळवण्यासाठी उपयोग होईल कि नाही हेही पाहिले पाहिजे . राहूचे अवडंबर न माजवता अभ्यास पूर्वक सावधपणे पावले टाकली , ज्योतिष मार्गदर्शन घेतले तर योग्य शिक्षण क्षेत्र निवडून आयुष्य उंचीवर नेता येयील ह्यात दुमत नसावे.

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Thursday, 4 September 2025

एकरूपता

 || श्री स्वामी समर्थ ||

भगवंत गोपाल कृष्ण एकदा रुक्मिणी सोबत रथातून जात असताना समोरून राधा कृष्णाचा धावा करत आली . तिला पाहून कृष्ण रथातून उतरले आणि तिच्याशी चार शब्द गुजगोष्टी करून पुन्हा रुक्मिणी सोबत निघून गेले. घरी आल्यावर रुक्मिणी ने विचारले , हि कोण होती तेव्हा तिची ओळख भगवंताने करून दिली. आता स्त्री हि स्त्रीचा मत्सर करणारच त्यात ती रुक्मिणी . प्रत्यक्ष आपल्या भगवंतावर प्रीती करणारी त्याला पुजणारी आहे तरी कोण ह्या मनातील द्वेषातून तिने राधेला एकदा घरी बोलावले आणि कडकडीत दुध तिला दिले. राधे ने कृष्णाचे नाव घेतच दुध प्राशन केले व घरी गेली. संध्याकाळी भगवंत घरी परतले .

ते दमले असतील म्हणून रुक्मिणी त्यांचे पाय दाबायला लागली असता तिला दिसले कि त्यांच्या पायावर फोड आलेले आहेत . तिने विचारले असता भगवंत उत्तरले आज राधा तुझ्याकडे आली असता तिला तू उकळते दुध दिलेस. कृष्णाचे नाव घेत तिने ते प्राशन केले . तिच्या अत्यंत प्रेमाने भरलेल्या हृदयात सदा सर्वकाळ विराजमान असलेले कृष्णाचे चरण त्यावर ते दुध पडले आणि भगवंतांचे पाय भाजले फोड आले.

राधेचे आपल्या आयुष्यातील आणि हृदयातील महत्व रुक्मीणीला भगवंतानी पटवून दिले. काय वर्णावी हि भक्ती आणि आपल्या देवाशी असलेली एकरूपता . खरच भक्ती असावी तर अशी . आपण सुद्धा ज्या देवतेचे पूजन करतो त्यावर अशीच निस्सीम श्रद्धा हवी . त्यांच्या बद्दल शंका घेवू नये . ते आपले काही वाईट करणार नाही हा भाव मनी ठेवूनच जीवन जगले पाहिजे. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तरीही ती त्यांचीच कृपा असा भाव मनात दृढ असला पाहिजे. ते जे करतील त्यातच माझे हित आहे असा भाव असावा. नुसत्या पूजा , प्रदक्षिणा , पोथ्या वाचून आणि धार्मिक यात्रा करून भगवंताच्या समीप जाता येणार नाही . पण आपला १६ आणे खरा खुरा शुद्ध भाव मात्र क्षणात आपल्याला त्याच्या समीप नेऊ शकतो ह्यात शंकाच नसावी.

हवी आहे ती अपार श्रद्धा , भक्ती आणि एकरूपता .

श्री स्वामी समर्थ

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 

Wednesday, 3 September 2025

अद्भुत पंचम ( शेअर मार्केट )

 || श्री स्वामी समर्थ ||


पंचम हा धर्म त्रिकोणातील मुख्य भाव. अर्थातच धर्माने वागा आणि धर्माचे अनुकरण करा हे सांगणारा भाव पत्रिकेत अनन्यसाधरण असाच आहे. ह्या भावावरून आपण प्रेम , प्रणय , विद्या संतती , खेळ , कला , नाविन्य ,creativity , निर्मिती , ज्योतिष विद्या , तंत्र मंत्र आणि कमी कष्टात फायदा करून देणारे शेअर मार्केट पाहतो . आजचे युग प्रगत असले तरी संयम संपलेल्या पिढीचे आहे. आपल्याला न झेपणारी आव्हाने स्वीकारून मग स्वतःलाच बिझी आहे असे गोंडस नामकरण केलेल्या तरुणाईचे आहे.असो .

आज बाहेरील अनेक देश नोकरीसाठी सहज संधी उपलब्ध करून देत आहेत. पण ज्यांना ते शक्य नाही किंवा आहे त्यांचा मोर्चा शेअर मार्केट कडे सध्या मोठ्या प्रमाणात वळलेला आपल्याला दिसून येतो. आज मध्यमवर्ग सुद्धा ह्यात आपला सहभाग मोठ्या प्रमाणावर करत आहे .

आजच्या पिढीला ५-६ आकडी पगार मिळत असल्यामुळे विविध गुंतवणूक करताना शेअर मार्केट प्रथम दर्शनी डोळ्यासमोर आले तर नवल नाही . पण जसे आज कुंभ राशीतील राहुने AI दिले आहे तसेच कमी कष्टात अफाट फायदा करून देणारे शेअर मार्केट तरुणांवर प्रचंड हाबी आहे.

येथे असणारी रिस्क सुद्धा हसत घ्यायला ते तयार आहेत . चार मुले नाक्यावर किंवा कुठेही भेटली कि चहा सोबत चर्चेचा विषय म्हणजे गुंतवणूक हा असतोच . आपल्या चिमुकल्या जगाचे मोठे विस्तृत आधुनिक जग आपण स्वतःच केलेले आहे. आधुनिकतेच्या नावाखाली किंवा एक सोशल स्टेटस जपण्यासाठी अनेकविध गोष्टी आज घरात येत आहेत . घरात प्रत्येकाकडे फोन आहे अगदी लहान मुलांच्या कडे सुद्धा . मग पर्यायाने हे सर्व टिकवण्यासाठी मिळवला जाणार्या पैशाचा ओघ हा घरात अनेक पर्याया तून आलेला असावा ह्या हेतूने मग शेअर मार्केट हा एक मुख्य पर्याय निवडला जातो. अफाट मिळकत आणि त्यावर कर चुकवण्याची धडपड बस्स सध्या हेच जीवनाचे प्रमुख उद्दिष्ट झाल्यासारखे झाले आहे. सोशल मिडीयावर क्षणोक्षणी झळकणाऱ्या सोशल influencer च्या असंख्य जाहिराती मती गुंग करणाऱ्या आहेत .

एखादी नवीन गोष्ट करणे आणि त्याच्या आहारी जाणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत .त्यात मागची पैपै करून मिळवलेली पिढी म्हणजे अगदी टाकावू , त्यांच्या मतांचे अस्तित्वच नाही . तर असे हे भूल मोहिनी काहीही म्हणा पण सगळ्यांना येड करणारे शेअर मार्केट अभ्यासपूर्वक हाताळले तर फायदेशीर नक्कीच आहे पण इथे क्षणात रावाचा रंक सुद्धा होवू शकतो . आभाळाला गवसणी घालायला जावे आणि रस्त्यावर यावे असे नको व्हायला.

झटपट श्रीमंत होण्याचा हा पर्याय असे वाटणाऱ्या लोकांना ह्याची दुसरी बाजू माहित नाही . कुठल्याही गोष्टीचा अंमल चढला कि त्याची धुंदी उतरायला वेळ लागतो . हे आभासी जग आहे जे राहूचे आहे. Gpay , net , RTGS वगरे म्हणजे राहू . झटपट पैसा मिळवण्याच्या नादात आपल्या कुटुंबाची वाताहत तर होणार नाही ना ह्याची काळजी सर्वप्रथम केली पाहिजे. आपली गुंतवणूक हि कमी नफा मिळवून देणारी असली तरी चालेल पण हृदयाचा ठोका थांबवणारी नसावी .

दिसायला जितके हे चित्र गोंडस आहे तितके ते खरच आहे का? आज दोन पुस्तके वाचून जसे लोक स्वतःला ज्योतिषी म्हणवतात तसेच एक दोन ट्रेड केले कि मला ह्यातील सर्व ज्ञान अवगत झालेले आहे असा भाव मनात अनेकांच्या येत आहे आणि हीच पुढील संकटाची नांदी आहे.

ह्या जुगारात अनेकदा अंदाज चुकले आणि लाखोंचा तोटा झाला तर तो पेलवायाची ताकद आपल्यात आहे का? मग मानसिक संतुलन बिघडते आणि त्यावर उपाय म्हणून मग सर्व व्यसने समोर हात जोडून उभीच आहेत कि. एकदा यश मिळाले कि हात जणू आभाळाला लागतात मग जीवघेणी खेळी सुरु होते . अधिक हाव अधिक लालसा अधिक नफा मिळवण्याची नशा चढते मग आहे ते सर्व पणाला लागते आणि पुढे ...सुज्ञास न बोलणे उत्तम . आयुष्याच्या सारीपटावर पुन्हा एकदा भला मोठा अंधार , आपली पत गमावणारा . मिळवलेली अब्रू वेशीवर टांगणारा आणि घराण्याचे नाव पात पणाला लावणारा हा अंधार खरच जीवघेणा कि कित्येक आयुष्य सुद्धा ह्या अंधारात कायमची लुप्त होतात .

इतकी मोठी जोखीम घेणारा मध्यमवर्ग अनेक संकटाना तोंड देताना दिसतो . घरातील स्त्रीवर्गाचे दागिने सुद्धा गहाण ठेवून झटपट श्रीमंत दाम दुपटीने पैसा मिळवावा हे स्वप्न दाखवणारा हा जुगार मती गुंग करणारा आहे.

रोज मिनिटा मिनिटाचे ट्रेडिंग करणे , डोळ्याच्या खाचा आणि मेंदूला मुंग्या येयीपर्यंत आपले रोजचे काम सोडून ह्यात गुंतणे हे अत्यंत धोक्याचे आहे. फायदा हवा तर जोखीम घ्यायचीही तोटा सहन करण्याचीही मानसिकता हवी . सगळे कानाला कायम गोड गोड कसे ऐकायला मिळणार ???

हा जुगार जीवघेणा आहे. कुटुंब आणि कुटुंबाचे सुख स्वतःच्या हाताने नष्ट करताना दहा वेळा विचार करा . लक्ष्मी इतकी सहज नाही . अपार मेहनत करून ती कमवावी लागते . एखाद्या गोष्टीचा अपुरा अभ्यास पण डोंगर इतका ध्यास जीवनाला वेगळी कलाटणी देवू शकतो . ज्याला हा जुगार संयमाने खेळता आला तो ह्यात तरेल पण इतरांचे काय ?झटपट मिळवायचे कि झटपट घालवून बसायचे ????

एखाद्या ट्रेड मध्ये फायदा झाला कि मग हाव सुटते आणि मग अजून हवे अजून हवे हि जीवघेणी न संपणारी इर्षा अधिकच फुलत जाते . सुगीचे दिवस क्षणात संपतात आणि आपण भानावर येतो तेव्हा ओंजळीतून सर्व निघून गेलेले असते असे मात्र व्हायला नको .

ह्या सर्वच परिणाम मन शरीर झोप विचार ह्या सर्वावर होत असतो आणि कालांतराने तो हाताबाहेर जावून मोठ्या आजारांचे मूळ ठरतो . सतत २४ तास हाच विचार . एकमेकांची चौकशी बाजूलाच राहिली . फक्त पैशाची भाषा हेच आजचे बहुतांश जग झालेले आहे.

शेअर मार्केट अजिबात वाईट नाही . पण त्याची मोहिनी पडून त्यात आयुष्याची वाताहत झाली तर अर्थ नाही त्याला. अभ्यास पूर्वक आपले अंदाज बांधून त्यात पैसे लावणे हे नेहमीच समर्पक राहील .

सुरवात केली पण कुठे थांबायचे कुठे मनाला आवर घालायचे ते समजले पाहिजे .

ज्योतिषीय विश्लेषण पाहताना ज्यांचे पंचम अबाधित आहे किंवा जिथे बुध राहू दुषित नाहीत , धन पंचम लाभ हे भाव देत आहेत ह्या दशेत ह्यातून पैसा मिळू शकतो . पण ज्यांचे अष्टम , व्यय भाव कार्यान्वित आहे त्यांना काही न काही नुकसान होणार हे ठरलेलेच आहे .

घेतलेले शिक्षण आणि मिळकत त्याची मोट रोजच्या जीवनातील प्रश्नांशी बांधताना मग शेअर मार्केट सारखा झटपट श्रीमत होण्याचा मार्ग सोपा वाटतो आणि आपल्याही नकळत आपण त्यावर चालू लागतो . आज स्वतःचे घर नाही म्हणून अनेकांचे विवाह होत नाहीत हे चित्र आहे मग पैसा मिळवायचा तरी कसा. त्यासाठी अनेक इतर पर्याय आहेत पण ते झटपट पैसा देणारे नाहीत म्हणून ते खुणावत नाहीत किबहुना ते पर्याय म्हणून स्वीकारले जात नाहीत .

पैसा दुसर्याकडून उधार घेवून सुद्धा अनेकजण ह्या शर्यतीत भाग घेतात आणि मग तो डूबला कि तो परत कसा द्यायचा हा यक्षप्रश्न समोर उभा राहतो . त्यात मग स्वतःच्या ठेवी विकणे त्यावर कर्ज घेणे हे प्रकार सुरु होतात , घरची शांतता भंग होते आणि मग अश्यावेळी दोन घास सुखाचे खात होतो तेच बरे असे म्हणायची वेळ येते .

हव्यास मग तो कश्याचाही असो वाईटच असतो पण तो जीवघेणा नसावा. आपण जसे आहोत तसे आहोत . नशिबात असेल तो पैसा मिळणार आणि जायचा तो जाणार . कुणाला विचारायचे नाही , सल्ला घ्यायचा नाही स्वतःला शहाणे समजायचे अश्या व्यक्तींच्या अनेक पत्रिका पाहून हा लेख लिहायची इच्छा झाली . पुन्हा एकदा सांगावेसे वाटते कि शेअर मार्केट हा पर्याय प्रत्येकाने स्वीकारावा पण अभ्यासपूर्वक , त्याच्या अधीन जावू नये , त्याला सर्वस्व मानु नये इतकेच कारण जेव्हा मार्केट पडते आणि तोटा सहन करायला लागतो तो करायचीही हिम्मत नसेल तर सर्वस्व होते नव्हते ते सर्व पणाला लावायची खरच गरज आहे का? कुणाला दाखवायचे आहे श्रीमंत होवून ??????? विचार प्रश्न स्वतःलाच आणि बघा काय उत्तर मिळतेय ते . आपल्या मागील पिढ्यांनी आपल्याही पेक्षा आनंदात आयुष्य काढले हे विसरून चालणार नाही.

यश आणि अपयश दोन्ही खुल्या दिलाने स्वीकारता येण्याची धमक पाहिजे . नैराश्येच्या गर्तेत नेणारा हा बाजार आहे ह्याचे भान योग्य वेळेस झाले तर बरे. आपल्या आधीच्या पिढ्यांनी नाही का गुंतवणूक केली , पण सुरक्षित सावध , अनेक पर्याय आजही आहेत जे दोन टक्के कमी देणारे पण सुरक्षित आहेत . पोस्टात लोक आजही गुंतवणूक करतात जी सुरक्षित आहे त्याची लाज वाटायला नको .

माणूस पोटासाठी कष्ट करतो आणि धन कमावतो . पण त्यासाठी झटपट श्रीमत होण्याचा अट्टाहास नको . सगळे आयुष्य पणाला लावून मिळणार काय ? मोठे आजार , व्यसने , कौटुंबिक मतभेद कि नात्यातील संबंधातील तिढा ? नक्की काय हवे आहे आपल्याला ????????

आपले आयुष्य सुरक्षित असते जेव्हा आपण मिळवलेल्या संपत्तीचा विनियोग आणि गुंतवणूक योग्य ठिकाणी केलेली असते. आपली झोप उडवणारी कुठलीही गोष्ट लाभ देयील ? कि जीवनातील आनंद हिरावून घेयील ??????????? उत्तर आपले आपणच शोधायचे आहे . ज्याची त्याची सुखाची व्याख्या वेगळी असू शकते पण समाधानाची व्याख्या महत्वाची आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुठे थांबायचे ते समजले पाहिजे . गेल्या कित्येक दिवसात शेअर मार्केट मध्ये अपयशाला सामोरे जावून कर्ज बाजारी होवून आयुष्याची वाताहत झालेल्या पत्रिका पहिल्या आणि मन सुन्न झाले. माणसाला नक्की मिळवायचे तरी काय असते ??? कसला हव्यास असतो नेमका ? कुणासाठी चालले आहे हे सर्व ? कुणाला दाखवायचे असते हे वैभव ?????एक न दोन प्रश्न पडले आणि हे वास्तव आपल्यासमोर मांडावेसे वाटले .

ऑप्शन ट्रेडिंग , इंट्रा डे ट्रेडिंग हे आकर्षण निर्माण करते पण ते क्षणिक असते . फ्युचर ऑप्शन , कॅडल स्टिक , निफ्टी , सेन्सेक्स , असेट अलोकेशन असे शब्द कानावर आदळू लागतात आणि माणूस ह्या चक्रात ओढला जातो. राहू सावधपणे आपली खेळी खेळत असतो पण ती समजायला आपल्याला उशीर होतो. समजते तेव्हा सर्व संपलेले असते .

गुंतवणुकीचे इतर अनेक मार्ग आहेत पण अपुरा अभ्यास ह्यामुळे आपल्याच आयुष्याचे चित्र बदलते .

आयुष्यभर ताठ मानेने , अभिमानाने जगलो , आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कुणाही वर अवलंबून नको राहायला म्हणून थोडे थांबून विचारपूर्वक ,अभ्यास करून योग्य सल्ला घेवून गुंतवणूक करा . आपले आयुष्य दिशाहीन होण्यापासून आपणच वाचवायचे आहे, तसेच आयुष्यात शोर्ट कट नसतात हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच .

विघ्नहर्ता सर्वाना चांगली बुद्धी देवूदेत .

श्री स्वामी समर्थ

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230