Sunday, 26 April 2026

Curse (शाप)

 || श्री स्वामी समर्थ ||




जीवन म्हणजे संघर्ष आहेच आहे .व्यवसायात आपल्याला अनेकदा संघर्ष करावा लागतो , कष्टाला पर्याय नसतो. एका व्यवसायातील दोन व्यक्तींमध्ये पराकोटीची स्पर्धा होती . त्यातील एक देवभक्त आणि कष्ट करून आपले नित्याचे जीवन जगत होती. दुसरीही देवभक्त होती पण ती आपल्या कामापेक्षा दुसर्या व्यक्तीच्या 

यशावर खार खात होती. इर्षा करून काहीही मिळत नाही. इतरांना त्याच्याबद्दल काहीबाही वाईट सांगणे, त्याच्या मागे त्याची निंदा करणे ,अपमानित करणे हे कित्येक वर्ष चालू होते पण पहिल्या व्यक्तीने मात्र आपले वागणे बदलले नाही कारण देवावर श्रद्धा आणि आपल्या प्रयत्नावर विश्वास .


एक दिवस ह्या गोष्टींचा अतिरेक झाला कारण दुसर्या व्यक्तीने पहिल्या व्यक्तीबद्दल फारच वाईट उद्गार काढले जे त्या व्यक्तीला खूप लागले. मन दुखावले आणि डोळ्यात अक्षरशः पाणी आले. पण त्याने काहीही न करण्याचा प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय घेतला फक्त देवाला जे काही आहे ते सांगितले. 


काही दिवस असेच गेले पण त्या नंतर मात्र स्थिती बदलली . टीका , निंदा करणाऱ्या त्या व्यक्तीचा व्यवसाय थांबला, अर्थात अर्थार्जन थांबले , कुटुंबाची अनेक प्रकारे वाताहत झाली आणि सगळे जीवन उध्वस्त झाले. 


ह्या जगात परमेश्वरी शक्ती नक्कीच कार्यरत आहे फक्त ती आपल्याला दिवस नाही . ती एकदाच हिशोब करते पण तो असा करते कि आयुष्यातील सगळा आनंद हिरावून घेते . आपण जगतो पण प्रेतवत . प्रत्येक वेळी दुष्मनी केलीच पाहिजे का ? कश्यासाठी ? आपल्या नशिबात आहे ते मिळणार आपल्याला . जो तो आपापले नशीब घेवून जन्माला आलेला आहे आणि त्याचे इथले कार्य संपले कि जाणार , त्यात तुम्ही आम्ही काहीही बदल करू शकत नाही.


आपण जे काही कर्म करतो , वावगे बोलतो, निंदा करतो , कुणाला फसवतो , पैशाचा चुकीच्या मार्गाने विनियोग करतो , कुणाला त्रास देतो त्याचे जगणे असह्य करतो , समाजात कुणाबद्दल त्याच्या मागे काय काय बोलतो तेही आपली लायकी नसताना ते स्वामी कड्या नजरेने पाहत असतात पण वेळ आल्याशिवाय ते त्यावर आपे मत देत नाहीत . ज्या वेळी ते आपली केस हाती घेतात आणि सोटा उगारतात तेव्हा मात्र आपल्याला पळता भुई थोडी होते . प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे आहे . सारखेच कष्ट करणाऱ्या दोन व्यक्तींचे जीवन वेगवेगळे असते कारण त्यांचे पूर्वकर्म तसे असते. 


कुणाला त्रास देवून आपले चांगले होत नाही तर पुढील संकटांची ती नांदी असते. ह्या सर्वाची कल्पना असूनही आपल्या हातून त्या केल्या जातात कारण तेच आपले प्राक्तन असते. इथे उपासना प्रचंड कार्य करत असते . उपासक असणारी मंडळी ह्या मार्गाला कदापि जाणार नाहीत . 


प्रत्येक कृती किंवा काम करताना त्याच्या परिणामांची भीती आपल्याला असली पाहिजे जर त्यामुळे कुणाचे नुकसान होणार असेल. एक वेळा जेवा पण कुणाचे शाप तळतळाट घेवू नका . ते आपल्याला उद्वस्त करतात . प्रत्येक व्यक्तीला त्याची देवता ज्याची तो उपासना करतो ती तारत असते त्यामुळे आपण बरे आपले काम बरे हा व्यवहार असावा. निंदा करताना एखाद्याला अपमानित करताना किंवा समाजात त्याला बेअब्रू करताना खूप मजा येते , आसुरी आनंदही होतो पण कोण माझे काय वाकडे करणार ह्या प्रश्नाला योग्य वेळ आली कि परमेश्वर उत्तर दिल्याशिवाय राहात नाही . एखाद्याची टिंगल करणे , ग्रुप करून त्याला एकटे पाडणे , घरी आलेल्याला अपमानित करणे ह्या सारख्या गोष्टी अत्यंत वाईट रीतीने बुमरंग होवूनच परत येत असतात .


कुणाची त्याच्यामागे निंदा करून , अपशब्द वापरून तसेही काहीच मिळत नाही. ह्या अपयशाकडे नेणाऱ्या पायर्या आहेत आणि ह्या कृत्यामुळे आपण आपल्या स्वतःलाच संपवत असतो . एखाद्याला दुखावणे म्हणजे त्याच्यातील परमेश्वराला दुखावणे. इतके प्रगल्भ विचारांचे म्हणवणारे आपण पण प्रत्यक्षात मात्र. असो . सुज्ञास सांगणे न लगे. 


आपल्याला देवाने दोन हात दिले आहेत ते कष्ट करून आपलेच आयुष्य साकारण्यासाठी . २४ तास आणि दोन हात ह्याचे गणित जमले कि आयुष्य आनंदी होणारच सर्व काही मिळणारच आणि तेही आपल्या नशिबात आहे तितकेच. कुणाची निंदा करून आपण आपलीच कर्म वाढवून घेत असतो जी फेडायला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो .ह्या चक्रातून आपली सुटका नसते.


एखाद्याचा शाप आपले आयुष्य उध्वस्त करू शकतो हे लक्ष्यात आणून देण्यासाठीचा हा लेखन प्रपंच.


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment