Sunday, 26 April 2026

भाग्योदय

 || श्री स्वामी समर्थ ||


प्रत्येक स्थान हे महत्वाचे असते . आज आपण भाग्यस्थानाचा विचार करुया. भाग्य आणि लाभ ह्यात नेमके कोण मोठे हा प्रश्न पडतो. कर्म सगळेच करतात पण कर्म करताना यशाच्या शिखरावर जाणारे काहीच असतात. कर्मासोबत मिळते ती नशिबाची साथ म्हणूनच भाग्य हे अधिक महत्वाचे आहे. भाग्याची साथ असेल तर लाखातून एकाची निवड होत असते. इथे भाग्याची महती समजते. 

पत्रिकेतील प्रत्येक स्थान हे कुणाना कुणाचे तरी भाग्य स्थान आहे. कर्माचे भाग्यस्थान हे षष्ठ स्थान आहे. स्पर्धात्मक यश ६ व्या स्थानावरून बघतात. कुठल्याही गोष्टी चा दर्जा सुधारण्यासाठी उत्पादन खर्च कमी होण्याची आणि  वास्तूमध्ये  नाविन्य येण्याची गरज असते. बाजारातील सशक्त स्पर्धेमुळे ह्या गोष्टी होवू शकतात. पूर्वी मारुती कार होती आता कितीतरी नवीन गाड्या आहेत.electronic ने बाजी मारल्यामुळे जाहिराती सुधारल्या . स्पर्धा हि निरोगी असेल तर कर्माचे भाग्य हे उजळताना दिसते.म्हणजेच षष्ठ स्थान चांगले असेल तर कर्म हे चांगले होताना दिसेल. 

लाभाचे भाग्यस्थान हे सप्तमस्थान.लाभाचा विचार करताना संसार सुखाचा होईल जर मिळालेला जोडीदार हा समंजस, विचारी ,योग्य निर्णय घेणारा ,प्रोत्चाहन देणारा असेल तरच . धंद्याची भरभराट कधी होईल जेव्हा तुमचा भागीदार चांगला असेल .तुम्ही एखादी गोष्ट उत्तम कधी करु शकता जेव्हा तुमच्या मागे एखादी व्यक्ती ठामपणे उभी असेल तेव्हाच. ह्या सर्व व्यक्ती सप्तमावरून पाहतो. व्यय हे मोक्ष स्थान आहे. व्यय स्थानाचे भाग्य अष्टमस्थान आहे. मृत्यपश्चात मोक्ष मिळतो .मोक्ष मिळण्यासाठी मृत्य यावा लागतो जो कुणालाच नको असतो पण मोक्ष तर हवा असतो . मृत्यूची स्थिती हि तुमच्या पुढील जन्माची सुरवात असते. अपघाती मृत्यू किंवा रोग होवून येणारे मृत्यू हे मोक्ष मिळण्यास अपयशी ठरतात. उलट सर्व सुखे उपभोगुन अध्यात्माकडे जाणारा माणूस मोक्ष प्राप्त करतो. मृत्यू च्या वेळची स्थिती हि पुढील जन्माचा भाग्योदय दर्शवत असते म्हणून.म्हणून पुढील जन्म चांगला मिळण्यासाठी आधीच्या जन्मी मरण चांगले मिळणे आवश्यक आहे. लग्नाचे भाग्यस्थान हे नवम स्थान आहे. नवम स्थान म्हणजे पिता , वंशवेल , धर्म त्रिकोण जो तुमच्या वंशाचा त्रिकोण आहे. भाग्य म्हणजे तुमचे वडील ,पंचम म्हणजे तुमचे आजोबा ,लग्न म्हणजे तुमचे पणजोबा आणि भाग्य म्हणजे पुन्हा खापर पणजोबा ,पुन्हा पंचम म्हणजे खापर खापर पणजोबा अशी हि मालिका लग्न पंचम आणि भाग्यातून चालू असते. धर्म त्रिकोण हा पितरांचा असून पितर दोष हा धर्म त्रिकोणावरून बघितला जातो. नवम स्थानातील केतू हा पितर दोषाचा कारक ग्रह आहे. नवम स्थान शुभ असेल तार दोष नसणाऱ्या कुटुंबात जन्म मिळतो आणि हे तुमचे भाग्य म्हणावे लागेल कारण दोषी वंशात जन्म मिळाला तर प्रथम ते दोष निवारण करायला लागतात आणि त्यानंतर तुमची कर्म गती चालू होताना दिसते. चांगले कुटुंब आणि वंश चांगल्या भाग्य स्थानामुळे मिळते. धन स्थानाचे भाग्य स्थान हे दशम स्थान किंवा कर्म स्थान आहे. उत्तम धनलाभ किंवा अर्थार्जन हे दशमस्थान चांगले असेल तरच मिळतो . 

तृतीय स्थान म्हणजे प्रगती, भावंडे , शेजारी . त्याचे भाग्य स्थान म्हणजे लाभ स्थान . आपल्या हाताखाली असणार्या लोकांनी चांगले काम केले त्यांच्याशी तुमचे चांगले tuning असेल तर यश मिळते. म्हणजेच लाभस्थान चांगले हवे तरच नेत्रदीपक यश मिळते. 

चतुर्थ स्थानाचे भाग्य स्थान हे व्यय स्थान आहे. व्यय स्थान हे खर्चाचे , गुंतवणुकीचे स्थान आहे. चतुर्थ स्थान हे जमीन जुमला ,वाहन ,घर ह्याशी संबंधित आहे. आजची चांगली गुंतवणूक हि चांगला जमीन जुमला तसेच सुख आणि आनंद मिळवून देत असतो . पैसा खर्च झाल्यावर सुख मिळतो , आयुष्यातील सगळ्या सुखांसाठी चांगला पैसा खर्च करावा लागतो आणि त्याची योग्य गुंतवणूक असेल तरच तो योग्य वेळी हाताशी येतो. खर्च किती चांगल्या रीतीने करत आहात त्यावर मिळणारे सुख अवलंबून आहे. खर्च अवास्तव झाला तार निराशा दुक्ख पदरी येते. पंचम स्थानाचे भाग्य स्थान म्हणजे लग्न स्थान .पंचम स्थान म्हणजे संतती ,विद्या पुढील जन्म . ह्या स्थानाचे भाग्य म्हणजे आपण स्वतःच . आपली प्रगती आपल्याच हातात असते.आपले शिक्षण आपणच करायचे आहे. संततीचे भाग्य सुद्धा आपणच आहोत .संतती वर चांगले संस्कार केलेत ,त्यांना चांगले वळण लावले तर म्हातारपणी हीच संतती तुम्हाला सुख देयील तुमचा आधार होईल.संततीच्या मागे खंबीर उभे राहायला लागते. संततीची गुणवत्ता हि आई वडिलांच्या गुणसूत्रावर अवलंबून असते.संतती वाढताना आपला वाटा त्यात खूप मोठा आहे. षष्ठ स्थान हे अनारोग्याचे स्थान आहे. त्याचे भाग्य स्थान म्हणजे धनस्थान .आरोग्य बिघडण्यास कारणीभूत तोंडाचा मोठा वाटा असतो . जी व्यक्ती आपल्या खाण्यावर ताबा मिळवते तिचे आरोग्य चांगले असते. म्हणून आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या हव्यात त्यावर आपले नियंत्रण हवेच.

सप्तम स्थानाचे भाग्य स्थान म्हणजे तृतीय स्थान. सप्तम स्थान हे काम त्रिकोणातील महत्वाचे स्थान . धन स्थान आणि सप्तम स्थान हे जोडीनेच असतात. अर्थार्जन चांगले झाले म्हणजेच अर्थ त्रिकोणात स्थिरता आली कि सप्तम स्थानाचा उदय होतो. तृतीय स्थान पराक्रम दाखवतो . जोडीदाराचा भाग्योदय कधी होणार त्याच्यात चांगले कर्तुत्व करून दाखवण्याची धमक असले का हे ह्या स्थानावरून सूचित होतात . तसेच उत्तम जोडीदार कधी मिळेल हाही विचार आपल्या स्वतःच्या तृतीय स्थानावरून केला जातो. 

अष्टम स्थानाचे भाग्य स्थान हे चतुर्थ स्थान आहे. चतुर्थ स्थान म्हणजे सुखस्थान .मृत्यू कधी होतो जेव्हा शरीरात बिघाड होतो तेव्हा . जेव्हा चतुर्थ स्थानात बिघाड होतो तेव्हा मृत्यू होतो. नवम स्थानाचे भाग्य स्थान हे पंचम स्थान आहे. नवम स्थान हे खरे भाग्य स्थान.पंचम स्थानावरून संततीचा बोध होतो. हिंदू धर्मात पितरांना मोक्ष मिळण्यासाठी संततीचे आगमन सांगितले आहे. आपल्याला गती देणारा मुलगा हवासा वाटतो . काही जणांच्या भाग्यात उत्तम संतती असते .त्यामुळे त्यांचे म्हातारपण सुखात जाते. संततीमुळे आपला खरा भाग्योदय होतो कारण पंचम स्थान हे आपल्या भाग्य स्थानाचे भाग्यस्थान आहे. 

आपल्या पत्रिकेतील मूळ भाग्यस्थान हे नवम स्थान आहे. जातकाच्या नशिबाचा पाया म्हणजे भाग्यस्थान . वारसाहक्काने जातक कुठल्या कुळात जन्माला आला आहे ते ह्या स्थानावरून समजते ,पूर्ण कुंडलीची बैठक ह्या स्थानावर अवलंबून आहे. अध्यात्मिक प्रगती ,मनाचे अंतरंग ,भूतकाळातील अनेक जन्माचा हा लेखाजोखा आहे. भाग्यस्थान जेव्हा कमजोर असते तेव्हा अनेक जन्मातील पुण्याची शिदोरी संपली आहे आणि पापाची पुढे आली आहे हे समजायला हरकत नाही. ह्या स्थानातील ग्रह जातकाच्या पापपुण्याचा हिशोब सांगत असतात.निसर्ग कुनाद्लीतील गुरूची धनु रास इथे येत असल्यामुळे तो ह्या स्थानाचा कारक ग्रह सुद्धा आहे.

त्यामुळे एखाद्याचे भाग्य पाहताना गुरूचाही विचार इथे होणे गरजेचे आहे.भाग्य ज्या स्थानाभोवती फिरते त्याचा कारक ,पालक ,चालक ,मालक गुरूच आहे. गुरु हा जीवकारक असल्याने मनुष्यास जिवंत ठेवण्यास कारणीभूत असतो . ज्या वेळी गुरु गोचरीने ६ ८ १२ मधून जात असतो तेव्हा भाग्य कमी पडते आणि अशुभ घटनांना सामोरे जायला लागते. गुरु का केंद्र कोणातून किंवा त्याच्या आवडत्या स्थानातून जात असतो तेव्हा शुभ फळे देतो ,भाग्य साथ देते. गुरुचे पत्रिकेतील स्थान हि तुमची खरी संपत्ती म्हणावी लागेल म्हणून गुरूचा विचार प्रथम झाला पाहिजे. गुरु चांगला असेल तर आयुष्यात संकटे कमी असतात. इतर ग्रह आणि सर्व शुभ स्थाने हि गुरूच्या दृष्टीत जितकी असतील तितकी अधिक चांगली नशिबाची साथ अधिक लाभेल. गुरु पत्रिकेत ज्या स्थानात असतो ते स्थान आणि ज्या ग्रहांसोबत असतो ते ग्रह अधिक सक्षम आहेत असे दिसून येयील. त्या स्थान प्रभावित होताना दिसेल. भाग्य म्हणजे भाग्य स्थानाची स्थिती आणि गुरु. ज्या ज्या वेळेस पाहिजे त्या गोष्टी मिळत जाणे म्हणजे भाग्य हि सोपी साधी सरळ व्याख्या आहे. 

प्रत्येक गोष्ट पटकन होणे किंवा मिळणे , बँकेची कामे , रोजच्या व्यवहारातील कामे जलद होताना दिसतात ते भाग्यवान असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . 

एखाद्या व्यक्तीकडे अमाप पैसा असतो पण त्यांची कामे होत नाहीत आणि एखादी व्यक्ती हातावर पोट घेवून जगते तिची सगळी कामे सुरळीत होत जातात त्यांना भाग्याची साथ मिळते .

पत्रिकेत गुरु कोणात असताना म्हणजे १ ५ ९ मध्ये असताना व्यक्ती भाग्यवान असतो हे नक्कीच कारण हि स्थाने गुरूला मानवताना दिसतात. ग्रहाला ते स्थान मानवले पाहिजे ग्रह त्या स्थानात आनंदी राहिला पाहिजे. गुरु जर मित्रांसोबत असेल आणि आवडत्या स्थानात असेल तर उत्तम फळे देतो. 

गुरु लग्नी असता धन कमी असेलही पण असामान्य कौशल्य आणि बुद्धी असते त्या वेगळेपणावर आपले अस्तित्व सिद्ध करते. गुरु पंचमात असेल तर स्वतःची संतती आणि शिक्षण हे त्याचे वैभव असते. गुरु भाग्यात असेल तर भाग्य प्रबळ असते.त्याला सर्व कार्यात यश मिळते .त्याला दैवी शक्तीची साथ लाभते आणि घराणे सुद्धा कीर्तिमान असते. धर्मत्रिकोणातील गुरु धर्माचे आचरण करायला प्रवृत्त करतो. त्याने धर्माविरुद्ध कृत्य केले तर ते अशुभ असते. ज्या स्थानात गुरु असतो त्या स्थानातून २ नंबर चा पैसा मिळत नाही. तो १ नंबर च्या व्यवसायात दाखवून धंदा करायला लागतो.

गुरु प्रत्येक स्थानात फुलतो.ग्रह ज्या स्थानात आहे तिथे कसा चांगले काम करेल हा विचार करायला पाहिजे. अर्थ त्रिकोणातील गुरु म्हणजे २ ६ १० मधला गुरु पैसा मिळवण्यासाठी चालवत असतो.हि व्यक्ती पैसा कसा मिळेल ह्याकडे चित्त असते. धनस्थानातील गुरु सिझन प्रमाणे व्यवसाय करू शकते. १० मधील गुरु शारीरिक कष्टाची कामे करून वरती येतो . लेबर पासून अधिकारी होताना दिसतो. षष्ठातील गुरु जीवनातील सुलभता कमी देते .पुण्याचा अभाव असल्यामुळे गुरु षष्ठात असतो. 

तृतीय स्थानात गुरु असेल तर. तृतीय स्थान म्हणजे प्रवास , शेजारी , भावंडे ,अंगातील कलागुण ,छंद. येथील गुरु जगापेक्षा वेगळ्या आवडी असतात. प्रवासातून पैसे मिळतो. सप्तम स्थानातील गुरु परदेशी जावून भाग्योदय करताना दिसतो. लाभतील गुरु मनुष्य संग्रह खूप करतो ,समाजसेवा ,माणसे जोडणे आवडते.

४ ८ १२ पैकी गुरु चतुर्थात चांगला. चतुर्थ स्थात गुरु उच्च शिक्षणाची संधी देतो. १२ व्या स्थानात असेल तर प्रत्येक गोष्ट पैसे देवून त्याग करून मिळवावी लागते.गुरु अष्टमात असेल तर भाग्योदयास अवघड जातो. भाग्योदयासाठी प्रयत्न कष्ट करावे लागतात. १२ व्या स्थानातील गुरु जन्म ठिकाणापासून दूर जावून भाग्योदय करतो. भाग्यवान कुंडलीत गुरु स्वगृहीचा किंवा उच्चीचा असतो.

कर्क राशीतील गुरु हा चंद्रावर अवलंबून असणारा असतो. कर्क राशीत गुरु ज्ञानपिपासू असतात , बुद्धीची झेप मोठी असते. धनु आणि मीन राशीतील गुरु सल्ले देणे हे काम करते. सिंह राशीतील गुरु चांगला असतो पुण्यसंचय असावा लागतो. रविसोबत असणारा गुरु चांगला असतो.अशी व्यक्ती अधिकार संपन्न असते. मंगळाच्या राशीतील गुरु क्रांतिकारक असतात. वर वाहील तसे काम करण्याचे धाडस असते. गुरु शिवाय भाग्य आकारास येत नाही.

भाग्येश जर लग्नात असेल तर गत जन्मीची पुण्याई असते.कुलाचाराचे पालन करावे लागतात .श्राद्ध कर्म करावी लागतात.

भाग्येश पंचमात असेल तर ज्ञानाची कास धरणारी व्यक्ती असेल. भाग्येश भाग्यात उत्तम संधी मिळतात.भाग्येश धनस्थानात असेल तर पैसा मिळतो ,कुटुंबाचे नाव पंचक्रोशीत गाजत असते. भाग्येश दशमात घेतलेल्या कार्यात यश मिळतो. २ ६ १० मधील भाग्येश स्वार्थी असतो. भाग्येश सप्तमात असता भाग्योदय विवाहानंतर होतो. भाग्येश लाभत असेल तर थोड्या प्रयत्नात अधिक यश. उठबस चांगल्या ठिकाणी असते, भाग्येश चतुर्थात असेल तर साधन कुटुंबात जन्म होतो . भाग्येश ६ मध्ये असेल तार शत्रूशी झुंजावे लागते. भाग्येश १२ मध्ये असेल तर नशिबावर अवलंबून राहू नये. भाग्येश अष्टमात असता भाग्योदय सहज होत नाही .वडिलांच्या पश्चात भाग्योदय होतो. कुणाचे तरी मरण हे त्याचे सुख होते. भाग्येश तृतीयात असता कमी त्रासात गोष्टी मिळतात. प्रत्येक गोष्ट शारीरिक त्रासाने ,बुधीमत्ताने करावे लागते. भाग्येश ३ र्या स्थानात असेल तर भाग्यासाठी झुंज द्यावी लागते. भाग्यस्थानात रवी चंद्र मंगळ गुरु भाग्य चांगले असते. शुक्र शनी राहू बुध हे भाग्य कमी असते. चंद्र भाग्यात असेल तार तीर्थाटन होते. मंगळ भाग्यात असेल तर कुळातील कृत्य करतो. भाग्यात शुक्र चांगला नाही आयुष्याची दिशा नाही . बुध भाग्यात भाग्योदय करत नाही . बुद्धी असल्याने अनेक प्रश्न पडतात आणि अधर्मी राहते.

पत्रिकेतील भाग्य भाव हा किती महत्वाचा आहे हे वरील विवेचनावरून लक्ष्यात येतेच. भाग्याला दोष देत राहणारी माणसे नशीब घडवू शकत नाहीत . भाग्य भाव हा धर्म त्रिकोणातील गाभा आहे आणि त्या भावाने दर्शवलेल्या गोष्टी जसे उपासना , मोठ्यांचा आदर केला तर हे स्थान अधिक बळकट होईल आणि भाग्योदय होईल.

सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment