Sunday, 26 April 2026

शरणागती

 || श्री स्वामी समर्थ ||


आयुष्य ओंजळीतून निघून जाताना देवाची आठवण येते. आयुष्याच्या संध्याकाळी सगळा अहंकार नेस्तनाबूत होतो. आपण किती हतबल आहोत ह्याची मनोमनी जाणीव होते आणि खात्रीही पटते . मोठ्या गुर्मीत वावरणारे आपण आयुष्यभर ह्याला कमी लेख त्याची निंदा कर , संपत्तीचा अभिमान , पैशाचा माज , आपल्या कर्तुत्वाचा गर्व अश्या अनेक गोष्टीतून कधी बाहेरच येत नाही. पण एकदा तरी तो आपल्याला आपली जागा दाखवतो आणि ती अश्या प्रकारे दाखवतो कि बस्स..

आपण एकटे येणार आणि एकटे जाणार पण हे माहित असूनही आपल्या अणुरेणूत भिनलेला आहे प्रचंड महाकाय अहंकार . आपण सगळे एकाच बोटीतील प्रवासी आहोत . खोट्या पाशात अडकलेले आणि मोह माया हेच जग समजणारे. जगण्याची खरी लज्जत काय आहे ते आपल्याला दाखवते ते अध्यात्म जेव्हा दुक्ख संकटे गळ्यापर्यंत येतात आणि आपल्याच असहाय्यतेची जाणीव होते. ना रक्त तयार करू शकत आपण ना पाऊस पाडू शकत , पडलेला पाऊस ना थांबवू शकत . कुणाचा जन्म ना मृत्य काहीच हाती नसतानाही इतका अहंकार जन्मभर आपल्या सोबत प्रवास करत असतो. 

जीवन बदलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण , सेवाभाव . ह्यामुळे आपल्याला नवीन जीवन प्राप्त होते. नामस्मरण जीवनाचा आणि पर्यायाने आपलाही कायापालट करत , आपलीच आपल्याला नव्याने ओळख होते आणि समर्पणाची भावना निर्माण झाली कि तो आपल्या मागे अनंत हाताने उभा राहतो त्याची प्रचीती सुद्धा येऊ लागते.

ज्योतिष आणि अध्यात्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . अध्यात्मात गेल्यावर मागे वळून पाहायचे नाही कारण आता त्यांच्या शाळेत नाव घातले आहे .मग त्यांच्यावर निस्सीम भक्ती आणि सेवा करत रहायची. आपल्याला काय कधी द्यायचे ते तेच ठरवतील. 

आपल्या कर्माचा कारक शनी आहे आणि म्हणून दशम भावात त्याची नेमणूक आहे जो कर्माचा भाव आहे. आपल्या कर्माचा लेखाजोखा त्याच्याकडे प्रत्येक क्षणी आहे कारण तो आपल्या आतच आहे. आपली कर्म आणि ग्रह हे एकमेकांना पूरक आहेत . ग्रह कर्माची फळे देण्यास बांधील असतात त्यामुळे त्यांना दोष देण्यात अर्थ नाही दोष असेल तर तो आपलाच आहे. 

हनुमान जयंती हा समर्पणाचा दिवस आहे. हनुमानाकडे काय मागायचे ?????? जशी तुझी श्री रामावर श्रद्धा आहे तुझ्या आयुष्यात आणि हृदयात त्यांचे स्थान आहे तसेच माझ्याही मनात माझ्या गुरूंचे महाराजांचे स्थान असुदे. माझी श्रद्धा बळकट होवूदे आणि जीवन त्यांच्याच चरणी समर्पित होवूदे.

इतके मागायचे आणि श्री हनुमान कसे रामाचे भक्त आहेत तसे आपणही आपल्या सद्गुरूंचे निस्सीम भक्त होण्यासाठी त्यांच्या चरणी शरण जायचे. कसलीही चिंता काळजी उरणारच नाही कारण आपला प्रपंच ते चालवणार मग आपल्या हाती उरलेच काय ? चिंता आपल्याला जाळत असते तीच निघून गेली कि आपण भक्तीमध्ये आपला जन्म घालवायला मोकळे .

आयुष्यात असा क्षण येतो जिथे कुणीच आपले रहात नाही त्यावेळी आधार असतो तो प्रत्यक्ष परमेश्वराचा जो चराचरात आहे. प्रश्न आहे तो त्याचे अस्तित्व मान्य करण्याचा आणि त्याने सांगितलेल्या मार्गावर अहंकार विरहित जीवन जगण्याचा . जगण्याचा आनंद प्रत्येक गोष्टीतून मिळायला लागतो. नुसते घेणे नाही तर देणेही होवू लागते . त्याच्या भरवश्यावर जीवन जगण्याची कला आत्मसात केली आणि शरण गेलो तर आयुष्यात काहीही कमी नाही.

इथून काहीच घेवून नाही जायचे आपल्याला त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत आणि पुढील प्रवासात त्याचा हात घट्ट धरून ठेवायचा आहे. त्यांचे अस्तित्व जाणवल्याशिवाय राहत नाही आणि जीवन सुकर होते.

एकदा का मनाने आपण त्यांचे झालो कि क्षणोक्षणी प्रचीती देणारे तेच आहेत आणि त्याची दिव्य अनुभूती मिळाल्याशिवाय राहत नाही हे निश्चित आहे .   आपला अहंकार मुळापासून उखडून टाकण्यासाठी परिस्थितीही तेच निर्माण करतात आणि भक्तिमार्गाकडे आपले मन आपल्याही नकळत ओढले जाते हि त्यांचीच लीला आहे. 

फक्त अंतर्मनापासून आपल्या चुकांची कबुली आणि शरणागती आपले आयुष्य नक्कीच बदलून टाकेल ह्यात शंका नाही. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे .

हनुमान चालीसा अंतर्मानापासून पठण केली तर त्याचे शुभ परिणाम मिळतीलच. धैर्य , आयुष्य जगण्यासाठीचे बळ, आत्मविश्वास सगळ्यात वृद्धी होईल. 

हनुमान चालीसा म्हणण्यापूर्वी श्री रामाचा जप करायला विसरू नये कारण प्रत्यक्ष हनुमानाने सांगितले आहे जिथे राम आहे तिथे मी आहे. तसेच मंगळवारी मारुतीच्या देवळात जाऊन शेंदूर मिश्रित तेल त्याच्या पायावर अर्पित करावे .

जय जय जय हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव कि नाई |

जय हनुमान 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

No comments:

Post a Comment