Thursday, 13 July 2023

कर्म हेच सर्व श्रेष्ठ आहे

 || श्री स्वामी समर्थ ||



लहानपणी आपण मस्ती करायचो खोड्या काढायचो मग आई आपल्याला सांगायची कि बघ हा चुकीचे वागले ,खोटे बोलले कि बाप्पा शिक्षा करतो. मग आपण लगेच त्याची माफी मागायचो आणि आईच्या कुशीत शिरायचो . हेच संस्कार घेवून आपण लहानाचे मोठे होतो . व्यथा हि आहे कि मोठे झाल्यावर आपण आपल्या आईला म्हणजेच प्रत्यक्ष स्वामीना सुद्धा विसरतो . आईचे संस्कार बर्यापैकी लोप पावतात कारण आपल्याला शिंग फुटतात . 


आपल्या जीवन प्रवासात अनेक लोक आपल्याला वेळोवेळी मदत करत असतात , पावलोपावली आपण त्यांच्या ऋणातच असतो पण अनेकदा हे विसरून आपण त्यांचा अपमान करतो , त्यांना दुखावतो , मला कोण अडवणार अश्याच वृत्तीचे आपले वर्तन असते . आपण चुकलो तर साधी माफी सुद्धा मागत नाही आपण खोटेपणाचा ,दांभिक पणाचा टेंभा घेवून मिरवत असतो . आयुष्यात पुढे जाताना कदाचित स्वतःच्याच कष्टांनी फळ मिळू लागते .ज्यांनी आपल्यावर संस्कार केले ज्यांनी मार्ग दाखवला पडत्या काळात मदतीचा हात दिला त्यांच्या खरतर ऋणात असतो आपण पण त्याचसोबत जोपासला गेलेला अहंकार आपल्यातील सतसत विवेक बुद्धी ला मारक ठरतो . वाटेल तसे वागायचा जणू परवाना मिळाल्यासारखे वागतो आणि तिथेच चुकतो.

आपल्या कष्टाचे फळ बाप्पा देतो पण मिजास केली तर ते काढून सुद्धा देतो हेही आईने सांगितले होते जे नेमके आपण विसरतो. अहो स्वामी कोण कुठले. ज्यांनी मदत केली त्यांना हवे तेव्हा जवळ करा हवे तेव्हा फेकून द्या हि वृत्ती बळावते  कारण आपली विचार क्षमता हरवून आपल्याच कोशात मग्न असतो. 


अश्याच एका उंच टोकावर जाऊन सर्व हातातून निसटून जायला लागते तेव्हाच आपल्याला शुद्ध येते पण वेळ निघून गेलेली असते . आपल्या चुका आठवतात पण माफी मागायची वेळ निघून गेलेली असते आणि ती मागायची आपल्यात हिम्मत सुद्धा नसते. माफी मागायला आणि ती करायला सुद्धा मन मोठे लागते आणि त्याला सद्गुरुकृपा सुद्धा लागते. रोज आपण आपल्यातील चुका शोधल्या पाहिजेत . इथे कुणी परिपूर्ण नाही प्रत्येक जण कधीना कधी चुकणार पण ती मान्य करायला वाघाचे काळीज लागते आणि त्या साठी गुरुकृपा लागते.

नुसते उपास तापास , व्रत वैकल्ये आणि पारायण करून काहीही होत नाही कारण इतके सगळे करून आपण जैसे तिथेच आहोत . पण ज्या क्षणी ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होते तेव्हा तरी आपण बदलले पाहिजे . अंतर्मानापासून आपल्यात बदल घडवायचा असेल तर मन निर्मळ हवे , अंतर्बाह्य एकच वृत्ती असायला हव्यात , नियत शुद्ध हवी आणि राजकारणी धोरणी वृत्ती दूर हवी तरच एखादा ज्ञानाचा किरण सापडेल.


आपल्याला कोण सुधारू शकतो तर आपण स्वतःच . ह्या जगात सर्वात श्रेष्ठ काय आहे तर कर्म.  एखादे कर्म केले कि त्याचे फळ त्याला चिकटले म्हणून समजा . आपण दुसर्याचा अपमान केला कि भविष्यात आपलाही होणार आणि तोही दसपट जास्ती आणि तेव्हा समजते सर्व काही पण वेळ निघून गेलेली असते.    

अजूनही आपल्याला परमार्थ समजला नाही , भक्ती समजली नाही , समर्पित होणे जमत नाही , अहंकार जात नाही , दुसर्याचे मन समजत नाही त्यामुळे स्वामी समजणे हि खूपच दूरची गोष्ट आहे. ते समजण्यासाठी मनाचे शुद्धीकरण होणे अति आवश्यक आहे. मनाला येयील तसे वागलो तर स्वामीच काय ह्या भूतलावरील कुठलीच देवता आपल्याला आशीर्वाद देणार नाही मग तुम्ही काहीही कराल.

काय हवे आहे आपल्याला ह्याचा खरच एकदा शांतपणे बसून शोध घ्या. हारतुरे , सत्कार , वाहवा , प्रसिद्धी नक्की काय हवे आहे . आपल्या महाराजांना सुद्धा जिथे ह्या सगळ्याचा मोह नाही तिथे आपल्याला कश्याला हवा आहे ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे . यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन सुद्धा तिथे आपण एकटेच असू कारण ह्या सर्वच गोष्टींचा तिटकारा असणारे सद्गुरू आपल्यासोबत नसतील. आपण त्यांचे धरलेले बोट कधीच सुटले आहे ह्याची सुद्धा जाणीव नाही आपल्याला इतके आपण आपल्याच विश्वात रमलो आहोत .

आयुष्यत प्रत्येक गोष्टीत समर्पण लागते . स्वयपाक करताना गृहिणीला त्यात जीव ओतावा लागतो तेव्हाच त्याला चव येते. तसेच प्रपंच ते परमार्थ हा अवघड प्रवास पार तोच करू शकतो जो स्वतःला गुरु चरणी “ समर्पित “ करतो.

मला महाराज खूप आवडतात ...अहो पण तुम्ही त्यांना आवडता का? त्यांच्या आवडी निवडीचे काय ? आपल्या लहानपणी बाप्पा होता आणि तो अजूनही आहेच . त्याच्याबद्दल वाटणारे प्रेम आणि वेळप्रसंगी भीती आजही तितकीच वाटली पाहिजे किबहुना काकणभर अधिकच तेव्हाच आयुष्याची संध्याकाळ सुकर होईल नाहीतर सर्व व्यर्थ आहे.

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

Tuesday, 4 July 2023

रवी हा राजा

 || श्री स्वामी समर्थ ||


सूर्यमंडळ ज्याच्या अधिपत्याखाली आहे असा सूर्य म्हणजेच रवी हा राजा आहे. म्हणूनच सर्व ग्रह क्रांतीवृत्तात त्याच्या भोवती आपापल्या कक्षेत फेर धरून भ्रमण करत असतात . रवी हा सूर्यमालेचा आधार आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीराचा आधार कोण आहे ? आपल्या पाठीचा मणका . आपल्या पाठीच्या मणक्याला शरीरातील इतर अवयवांपेक्षा काकणभर अधिकच महत्व आहे. म्हणूनच पाठीचा मणका काहीतरी समस्या देत असेल तर पत्रिकेत रवी बघा . हमखास तो शनी ग्रहा मुळेच बिघडल्याचे निदर्शनास येते . ज्योतिष हे अजिबात कठीण नाही साधे सोपे सरळ शास्त्र आहे . इथे लावायचा आहे तो फक्त तर्क .ते एकदा जमले कि फलादेश अगदी सहज सांगता येतो.

म्हणूनच पत्रिकेतील प्रत्येक भाव , राशी आणि ग्रह शरीरातील कुठला भाव दर्शवत आहेत आणि त्यांचे कारकत्व काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. कुठलेही शास्त्र पायरी पायरीने शिकले पाहिजे सगळीकडे शोर्टकट नाहीत .

सर्वांचा दिवस अत्यंत शुभ जावूदे.

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230   


साद ( गुरुपौर्णिमा विशेष )

 || श्री स्वामी समर्थ ||




शेगाव हून आणलेल्या महाराजांच्या पादुकांची आज देवघरात प्रतिष्ठापना केली . त्यांच्या चरणाशी मला जागा मिळाली आहे आणि आता ती प्राण गेला तरी सोडणार नाही . आज मागे वळून पाहताना जाणवते कि पात्रता नसतानाही त्यांनी खूप खूप भरभरून दिले आहे . जीवनाला अध्यात्माची जोड मिळाली तर ह्यापेक्षा दुसरे काय अभिप्रेत आहे म्हणा. जीवन आनंदी आहे . अपेक्षाविरहित आहे , जे देत आहेत तेही खूप आहे आणि ह्याचा विसर क्षणभर सुद्धा नाही . गेले 8 दिवस काय करू आणि काय नको असे मलाच नाही तर,  ज्यांच्या हृदयात महाराजांच्या प्रेमाची ज्योत तेवत आहे , त्या सर्वाना असेच झाले असणार . कधी एकदा पौर्णिमा येते आहे आणि महाराज आशीर्वाद द्यायला आपला हात माझ्या मस्तकावर ठेवत आहेत असे झाले आहे. म्हणूनच मुखाने सतत एकच प्रार्थना आहे..” वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी ...” त्यांच्या एका प्रेमळ कटाक्षाची

प्रतीक्षा संपली आहे . 


संपूर्ण घरात एक वेगळेच चैतन्य मी आज अनुभवत आहे. आज महाराज आले कि ते कुठे बसतील , मी त्यांच्याशी काय बोलणार ? त्यांना आवडणारे सगळे पदार्थ तर केलेच आहेत पण त्यांना काय आवडेल ? त्यांच्या आवडीची सर्व फुले , विडा नेवैद्य  तयार आहे . एखादी गोष्ट राहून तर नाही ना गेली ? अश्या सर्व विचारांची भाऊ गर्दी आज मनात आहे. ह्या वर्षीची गुरुपौर्णिमा माझ्या नवीन वास्तूत होणार असल्याने विशेष उत्साह आहे . त्यांच्या पदस्पर्शाने आज माझी वास्तू पावन होणार आहे . गेले काही दिवस मला फक्त पादुकाच दिसत होत्या . महाराजांच्या चरणाची पूजा करताना प्रत्यक्ष त्यांचेच चरण समोर आले . मागे वडाचे झाड आणि समोर स्वामी . हे खरेच होते कि भास मला नाही माहिती पण त्यांचा स्पर्श मी अनुभवला हे नक्की. त्याचे काय संकेत आहेत ते समजण्याची कुवत माझ्या पामरात नाहीच नाही पण आज त्यांच्या सेवेत अखंड राहता यावे म्हणून आज पादुकांची प्रतिष्ठापना केली . आता अखंड विश्वात काहीही झाले तरी तिथून हलायचे नाही हाच निर्धार आहे. अखंड सेवा आणि नामस्मरण ह्यातील आनंद केवळ अविस्मरणीय आहे आणि मी तो प्रत्येक क्षणी लुटत आहे .

नामस्मरणाचे व्यसन लागले तर दुसऱ्यातील दोष आणि उणीदुणी दिसत नाहीत तर स्वतःच्याच चुका दिसायला लागतात हे त्याचे गमक आहे . आपल्यातील “ मी “ ची आहुती देण्यासाठी नामस्मरण हे औषध गुणकारीच म्हंटले पाहिजे . 

पूर्वसुकृत चांगले असेल तरच गुरुसेवा घडते आणि गुरुही भेटतात ह्याचा दाखला महाराजांचे परमभक्त दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ह्या रसाळ , समग्र ग्रंथात दिला आहे. महाराजांच्या भक्तांचे अनुकरण करायला सांगितले तर मी दोन भक्तांचे करीन एक म्हणजे गणू जवर्या आणि दुसरा म्हणजे निस्सीम भक्त बंकटलाल. गणू ची अपार भक्ती आणि श्रद्धा ह्यामुळे महाराज धावून आले आणि त्याला जीवनदान दिले . खरच त्यांच्याच जीवावर माझ्याही उड्या आहेत. आपल्या सर्वांच्याच आहेत म्हणा. बंकटलालासारखी निस्सीम भक्ती खरच विशेष आहे कारण महाराजांना ओळखण्याची दिव्य दृष्टी त्याला होती म्हणूनच त्याने संपूर्ण विश्वाची महाराजांशी ओळख करून दिली . तशीच आयुष्यातील चांगले वाईट गोष्टी आणि माणसे (कलियुग आहे बाबा ) ओळखायची दृष्टी महाराजांनी आपल्याला द्यावी हीच प्रार्थना .

महाराज आपल्यावर कधी प्रसन्न होतील आणि आपल्या इच्छा कधी पूर्ण करतील हा विचार सुद्धा करू नये कारण त्यांना आपल्याला काय आणि कधी द्यायचे ते माहित आहे . ते आपले जन्मोजन्मी चे साथी आहेत म्हणूनच ह्याही जन्मात त्यांच्या सेवेचा लाभ आपल्याला मिळत आहे. ती सेवा अंतर्मनापासून करत राहणे हेच आपल्या हाती आहे.

 

काहीही झाले तरी आपला विठोबा घाटोळ होऊ द्यायचा नाही हा मनोमनी निश्चय करायचा आहे आज. निदान इतके तरी आपण करूच शकतो. सतत कसली तरी आसक्ती घेवून जगणारे आपले मन नामस्मरणात एकदा का रमले कि मागणे संपते आणि फक्त देणे उरते .

करोना नंतरचे जग बदलत आहे , कुणास ठाऊक उद्या त्याचा काका मामा भाऊ येयील पण आपण कष्टास मागे हटायचे नाही आणि महाराजांच्या भक्तांनी तर कश्यालाच घाबरायचे नाही. मनात कुठलाही कल्प विकल्प न आणता फक्त मनापासून सेवा करत राहणे हेच जीवनाचे उद्दिष्ठ असले पाहिजे . आपल्या श्वासावर विराजमान असलेल्या आणि आपल्या हृदयाची प्रत्येक धडकन असणारे आपले गुरु पाठीशी खंबीर असताना भीती कसली . आळशी माणसाचे तोंड सुद्धा बघू नये असे महाराजांनी भक्तांना सांगितले आहे. कष्ट करून शेत पिकवून खा हा आदेश देणार्या आपल्या महाराजांचे चरण स्पर्श आज आपल्या घराला होत आहे , हे अहो भाग्याचे लक्षण आहे. 

त्यांच्या स्वागताच्या तयारीत आपण स्वतःलाही विसरलो आहोत . हीच तर खरी भक्ती आहे .महाराज हा एकच ध्यास आहे आणि ह्यालाच गुरुकृपा म्हणत असावेत. फक्त प्रचीती मिळावी म्हणून भक्ती नको तर ती करत राहायचे आहे कारण प्रचीती हि मिळणारच आहे पण फक्त त्यासाठी स्वामी स्वामी नको . मी महाराजांचा भक्त आहे हा अहंकार सुद्धा अजिबात नको . रोज नव्याने संकटे येणार आहेत पण काहीही झाले जीवनात कितीही वादळे येवुदेत आपण आपली त्यांच्या चरणाशी असलेली जागा सोडायची नाही . 

जन्म मृत्युच्या फेर्यातून सोडवणारे आपले महाराज भक्तांच्या मनावर विराजमान आहेत . त्यांच्या सहवासात आपले जीवन व्यतीत होणे ह्यासारखे भाग्य दुसरे असूच शकत नाही . संतसेवेचे अपार पुण्य आहे , त्यामुळे जीवनाचा खरा अर्थ समजून सांगणाऱ्या महाराजांच्या सेवेतून क्षणभर सुद्धा उसंत नको हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .

रोजच्या दैनंदिन जीवनातून काही काळ तरी त्यांच्या सेवेत घालवून आपले जीवन कृतार्थ करणे हेच आपले परम कर्तव्य आहे. आज मी महाराजांना माझ्या हाताने भरवणार आहे , त्यांच्यासाठी विडा सुद्धा आणला आहे. त्यांच्या पायाला तेल लावणार आहे त्यांना डोळे भरून पाहणार आहे आणि त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणार आहे . त्यांचे माझ्या घरातील अस्तित्व मी प्रत्येक क्षणी अनुभवणार आहे .


त्यांच्यामुळे माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीच्या आयुष्याला चार चांद लागले आहेत , आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर त्यांनी नेले आहे. उरलेल्या आयुष्यात माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी मला नामस्मरण , पारायण करण्याची संधी द्यावी .समाजासाठी काहीतरी चांगले करून , त्यांच्याच कृपेने मला असलेले ज्ञान इतरांना देवून मला इथून जायचे आहे. माझे मन आणि चित्त सदैव त्यांच्या चरणाशीच असावे आणि कुठल्याही क्षणी त्यांचा वियोग नको हेच आज मागायचे आहे . महाराजांच्या माझ्या आयुष्यातील आगमनामुळे माझ्या दुक्ख संकटांची होळी झाली , त्याची तीव्रता कमी झाली आणि माझे आयुष्य तेजोमय झाले म्हणूनच मी महाराजांना माझे बेस्ट फ्रेंड बनवले आहे . रोजच्या जीवनातील प्रत्येक मिनिटांचा आखो देखा हाल त्यांनाच सांगत असते , भाजी आणायला गेले , बँकेच्या कामासाठी गेले सर्व सर्व त्यांना सांगितल्याशिवाय चैन पडत नाही मला. 

महाराज म्हणजे जीवन जगण्याची शक्ती , चैतन्य आणि भला मोठा विश्वास . नवीन कार्यशाळेचे आयोजन त्यांनाच विचारून , कुठे प्रवासाला जाणे त्यांना सांगून आणि आता हे माझे रुटीन झाले आहे कित्येक वर्षापासून . कुठलाही लेख त्यांच्या चरणी ठेवते मग जे कुणी वाचतील ते . इतक्या वर्षाच्या अध्यात्मिक प्रवासातून मला इतके समजले आहे कि सेवेत आपला जीव ओतावा लागतो तरच ह्या भक्तीतून ह्या देवाला पाझर फुटतो . लाखो लोक आज शेगाव शिर्डी अक्कलकोट गोंदवले इथे जाऊन महाराजांचे दर्शन घेत आहेत त्यांच्या पवित्र ग्रंथांची पारायणे करीत आहेत पण आपल्या भक्तीची , श्रद्धेची खोली तेच जाणतात .त्यांचे दर्शन हाही एक सुखद अनुभव असतो. जे होईल ते त्यांच्या इच्छेने आणि जे करतील ते आपल्या भल्यासाठी हा विश्वास सर्वांनी ह्या गुरुपौर्णिमेला वृद्धिंगत केला पाहिजे तसेच आपला संसार सुद्धा त्यांना समर्पित करावा .  

आमरण वारी घडो आणि सदैव तुमचे चिंतन राहू दे , श्वासात श्वास आहे तोवर लेखन होत राहूदे हीच विनंती आहे. इतके वर्ष श्री गजानन विजय ग्रंथ वाचूनही प्रत्येक वेळी ग्रंथात नवीन काहीतरी ओवी दिसते म्हणजेच अजून किती मोठा पल्ला गाठायचा आहे बघा . गजानना गजानना सांभाळ आपल्या भक्त जना . 

अंतर्मानापासून त्यांना “ साद “ घालूया आणि “ प्रसाद रुपी “ आशीर्वाद मागुया तोही अगदी हक्काने प्रेमाने...

प्रसाद हा मज द्यावा देवा | सहवास तुझाची घडावा देवा ||

निशिदिनी तव मी नाम स्मरावे | विसर तुझा न पडावा देवा ||

हृदय मंदिरी तुला बैसवूनी | ज्ञान योग मज व्हावा देवा ||

हरिनामामृत निशिदिनी पाजुनी | जन्ममृत्यु चुकवावा देवा ||

आत्मसुखाची हीच विनंती | वियोग ना तव व्हावा देवा ||

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क    : 8104639230


Sunday, 2 July 2023

गुरुपौर्णिमा ..पूर्व संध्या

 ||श्री स्वामी समर्थ ||


गुरुकृपा हा खरा राजयोग आहे पण गुरुकृपा झाली आहे हे ओळखायचे कसे ? गुरुकृपा झाल्यावर आपल्यात अंतर्बाह्य काय परिवर्तन होते ? ह्यावर विचारमंथन आवश्यक आहे. परमेश्वराने आपल्याला ह्या भूमीवर कर्म करायला पाठवलेले आहे आणि पूर्व संचीताप्रमाणे आपल्याला आयुष्य सुद्धा प्रदान केले आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला सद्गुरू भेटणे हा सुद्धा पूर्व संचीताचाच एक भाग आहे. ह्या जन्माचे संचित हे पुढील जन्माचे पूर्वसंचीत असणार आहे त्यामुळे ह्याजन्मी पूर्व संचित कमी पडले तरी ह्या जन्मीच्या चांगल्या कर्माचा संचय करून ह्या आणि पुढील जन्मासाठी संचित करता येयीलच कि . 

महाराजांचा प्रगट दिन , गुरुपौर्णिमा हे दिवस त्यांची आठवण काढायचे नाहीत ती तर क्षणोक्षणी आहेच पण ह्या दिवशी त्यांच्या आशीर्वादाचे धनी होण्यासाठी सेवेत राहायचे आहे इतकेच निदान मला तरी समजते . प्रापंचिक दुक्खापासून कुणीच सुटलेला नाही ती येतच राहणार कधी आर्थिक संकटे तर कधी शारीरिक व्याधी , कधी अपेक्षाभंग ,काहीना काही होतच राहणार पण काहीही झाले तरी नामस्मरण सोडायचे नाही . हे नामच सर्व दुक्खावर रामबाण उपाय आहे . अगदी जालीम औषध म्हणा ना . पण आपण दुनियाभरच्या डॉक्टरांकडे जातो पण नाम मात्र घेत नाही कारण ते तितकेच कठीण आहे. पण एकदा त्याची गोडी लागली कि मग “ आत्मरंगी मन रंगले..” अशीच अवस्था मनाची होऊन जाते. 

भौतिक सुखे म्हणजे गुरुकृपा खचितच नाही अर्थात त्याकडे मनुष्याचा अधिक ओढा असतो आणि ते स्वाभाविक आहे. गुरुकृपा म्हणजे आत्मिक समाधान . प्रत्येकाची समाधानाची व्याख्या वेगवेगळी आहे . व्यक्ती तितक्या प्रवृत्ती . कोण कश्यात समाधान मानेल सांगता येत नाही . 

आयुष्यात अनेकदा अश्या घटना घडतात कि असे वाटते अरे हे इतके सुख पदरात पडले आहे , माझी खरच पात्रता आहे का हे घ्यायची ? अश्यावेळी महाराजांच्याकडे पाहिले तर बघा ते खुदकन हसत असतात कारण हे सुख त्यांच्याच कृपेने पदरात पडलेले असते . महाराजांचे वचन आहे “ अशक्य हि शक्य करतील स्वामी “ . अनेकदा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज घडून जातात आपल्याही नकळत . कर्ज मिळणे , मनासारखी नोकरी , मनासारखा विवाह होणे अश्या अनेक मनुष्याच्या मनातील इच्छा सहज प्राय होण्यासाठी महाराजांचा वरदहस्त लागतोच लागतो. एखादा दुर्धर आजार गुरुकृपेने सहज बरा होतो तर कधीकधी मोठ्या अपघातातून सुद्धा आपण सहीसलामत बाहेर येतो. 


प्रारब्ध भोग हे ज्याचे त्यालाच भोगावे लागतात पण गुरुकृपा असेल तर त्याचा दाह कमी होतो , दुक्ख सहन करायची ते 

पेलायची आपली मानसिक ताकद आणि कुवत कित्येक पटीने वाढते. 

जेव्हा सर्वत्र अंधार होतो तेव्हा त्यांचे राज्य सुरु होते आणि तिथे अशक्य काहीच नसते. शेवटच्या क्षणाला होत्याचे नव्हते होते , आपली नय्या पार होते आणि तीच गुरुकृपा असते . प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सुद्धा आपले पाय जमिनीवर ठेवणे हीच खरी गुरुकृपा आहे .

सर्व सुखाची साधने पायाशी नसतानाही जो समाधानाच्या उच्च शिखरावर राहतो , आत्मिक आनंद अनुभवतो , ना मोह ना क्लेश , सगळ्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या चरणावर आपले सर्वस्व वाहतो आणि समाधानी राहतो त्यावर “ गुरुकृपेचा “ अखंड वर्षाव होत असतो .

समाधान हे मिळवावे लागते आणि ते मिळाले कि कश्याचीच उणीव भासत नाही . जगाकडे आणि स्वतःच्याही आयुष्याकडे त्रयस्थाच्या नजरेतून पाहण्याचा असामान्य दृष्टीकोण लाभतो हीच गृरुकृपा आहे. ना मोह ना द्वेष कश्याचाही लवलेश मनाला शिवत नाही . गुरुकृपेची अवीट गोडी चाखणारा समाधानाच्या शिखरावर विराजमान होतो. तुम्हा आम्हा सर्वांवर गुरुकृपा अखंड बरसत राहूदे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230