Thursday, 2 January 2025

ये चांद खिला

 || श्री स्वामी समर्थ ||

आकाशात दुडूदुडू धावणारा चंद्र कधी आपल्या मनाची कळी खुलवतो तर कधी ती कोमेजून टाकतो . चंद्र म्हणजे मन आणि मन स्थिर तर सर्व चांगलेअसते  . चंद्र एका जागी फार वेळ थांबत नाही अगदी तसेच आपले मन , कधी इथे तर तिथे भरकटत जाते. मन शांत असेल तर माणूस नीट विचार करू शकतो नसेल तर अविचारांचे थैमान मनात असते . चंद्राला सर्व राशीतून आणि त्यातील प्रत्येक नक्षत्रातून भ्रमण करायला जवळजवळ महिना लागतोच . चंद्र हा वनस्पतींचे नेतृत्व करतो . वनस्पती म्हणजे जीवन . आयुर्वेद ह्या शास्त्राचा ज्योतिषाशी पर्यायाने चंद्राशी संबंध आहे कसे ते पाहू .

औषधे तयार करण्यासाठी वनस्पतीचा वापर केला जातो . पूर्वी आजच्यासारखी औषधे नव्हती , तेव्हा वैद्यबुवा असत आणि त्यांना वनस्पतींचे संपूर्ण सखोल ज्ञान असे. मग हि वनस्पती घ्या त्याचे इतके वळसे उगाळा आणि दुधातून मधातून घ्या असे ते सांगत असत. प्रत्येक नक्षत्राला एक आराध्य वृक्ष दिलेला आहे ज्याचा  त्या नक्षत्राशी काहीतरी संबंध आहे म्हणून दिला आहे. त्या वृक्षाच्या मुळी , पारंब्या पाने , खोड, फुले , फळे  ह्याचा उपयोग औषधात होतो. 

मृग नक्षत्र हे द्विपाद नक्षत्र आहे , त्याचा घश्यावर अंमल आहे .त्याचा वृक्ष आहे खैर . त्यापासून बनवली जाणारी कंठ्सुधार वटी ज्यात प्रामुख्याने असतो तो खैर म्हणजे कात . वृषभ राशी हि कुटुंबस्थानात येणारी राशी जिथे आपली पंचेंद्रिये आहेत , आपल्या खाण्यापिण्याच्या आवडी आपला आवाज वाचा ह्याबद्दल सांगणारी हि राशी आहे. खाखा खाल्ले तर मधुमेह सारखा आजार होवू शकतो आणि तो बरा होण्यासाठी इथे आराध्य वृक्ष जांभूळ आहे. जांभळाचा रस हा मधुमेहावर गुणकारी असतो.

आयुर्वेद आणि ज्योतिष एकमेकांशी कसे संबंधित आहेत ह्याची हि उदा देता येतील.  चंद्र हा नैसर्गिक शुभ आणि स्त्री ग्रह आहे . मातेला चंद्रा चीच उपमा दिली जाते . स्त्रीचा रजोधर्म सुद्धा चंद्राशी म्हणजेच मनाशी निगडीत आहे. मानसिक दृष्टीने अत्यंत सुधृढ स्त्रीचा राजोधर्म वेळेत येतो . मुलाला जन्म दिल्यावर स्त्रीला पान्हा फुटतो त्याचाही चंद्राशी जवळचा संबंध आहेच कि . स्त्रीने दडपण घेतले तर फुटलेला पान्हा आटू शकतो म्हणूनच स्त्रीने मन शांत ठेवावे तसेच घरच्यांनीही घरातील  वातावरणात चांगले ठेवावे जेणेकरून बाळंतपण सुखरूप होवून बाळ सुद्धा निरोगी होईल असे सांगितले जाते. 

चंद्र म्हणजे मन ह्यासाठी खालील उदा देता येतील ....

तोच चंद्रमा नभात , कवी मनाने केलेले चंद्राचे वर्णन , जिथे सागरा धरणी मिळते , प्रेयसीची आपल्या प्रियकराकडे असलेली भावनिक ओढ , ये चांद खिला ये तारे हसे ... प्रणयाचा रंगात बहरून मोहरून जाणारी प्रेमी युगुलाची रात्र, चंद्र आहे  साक्षीला म्हणत आपल्या प्रियकरावर प्रेमाची बरसात करणारी प्रेयसी ,  चंदा है तू मेरा सुरज है तू म्हणत आपल्या डोळ्या समोरून एक क्षणभर सुद्धा आपल्या लेकाला दूर न करणारी आई . आपल्या मनाचे विविध मूड दर्शवणारी हि गाणी डोळ्यासमोर आणली तर मानवी मनाचे किती न मोजता येणारे कंगोरे आहेत ह्याची जाणीव होईल .

चंद्र कधी इथे तर कधी तिथे . एक साधी घटना मनाला स्पर्श करते आणि डोळ्यातून अश्रू येतात आणि एखादी आनंदी करणारी शुभ घटना पण डोळ्यातून अश्रू काढते , दोन्ही घटनांमध्ये कारण वेगवेगळे असते . एखादा क्षण निराशेच्या गर्तेत ढकलतो जिथून परत येण्याचा अनेकदा मार्गच नसतो.  मानवी मन मोठे विलक्षण आहे आणि त्याचा थांगपत्ता कदाचित सृष्टीच्या निर्मात्यालाही समजणार नाही. करोडो मैल दूर असणारा हा चंद्र पृथ्वीवरील अथांग जलाशयला भरती ओहोटी आणतो त्याच्यासमोर नतमस्तक नाही होणार तर काय.   

आपल्या मनातील कोमल हळुवार भावना ,प्रेम माया , चंचलता , अधीरता सर्व काही वेळोवेळी प्रगट करणारा हा “ चंद्र ”.

मानाने एखादी गोष्ट ठरवली कि माणूस ते करतोच करतो . मनाचे आणि चंद्राचे घनिष्ठ नाते आणि त्याचे पदर उलगडून दाखवण्यासाठी  हा लेखन प्रपंच . 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

सुखी सहजीवनाची ग्रहस्थिती

 || श्री स्वामी समर्थ ||


विवाह कधी होईल ,जोडीदार कसा असेल ह्या सर्व प्रश्नांपेक्षा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे माझे वैवाहिक सौख्य कसे असेल हा आहे . विवाहाच्या वेळेची स्थिती सर्वार्थाने तीच कशी राहील ? ती बदलत राहणार . आयुष्यात अनेक वळणे येणार आणि त्यातूनच एकमेकांना सावरत पुढे जात राहणार . बर्याच लोकांना उत्तम वैवाहिक सौख्य लाभते तर काहीना ह्यातून दुक्ख आणि निराशा पदरी येते. तडजोड करत विवाह टिकवणार्या लोकांची संख्या हि अधिक आहे. वैवाहिक सौख्य बघताना खालील गोष्टींचा विचार करुया.

विवाह हा अनेक कारणांनी केला जातो . अनेकदा सगळे करतात म्हणून , घरच्यांनी आग्रह केला म्हणून , मला स्वतःलाही जोडीदार हवा , सहजीवन हवे संसाराची आवड आहे म्हणून , अनेकदा घरात आईवडील वयस्कर आहेत त्यानाही बघायला कुणी नाही . पत्नी निवर्तली मग मुलांना कोण पाहणार म्हणूनही विवाह केला जातो . वरील सर्व कारणे ह्या ना त्या प्रकारे पटणारी आहेत . 

ज्योतिषीय ग्रहस्थितीचा विचार केला तर शुभ ग्रहांचा धन भाव आणि सप्तम भाव तसेच पंचम लाभ ह्या भावांवर असलेला प्रभाव सुखी जीवनाकडे वाटचाल करण्यास मदत करेल हे नक्की. सप्तम भाव हा प्रामुख्याने आपल्या जोडीदाराचा आणि दोघात असलेल्या मानसिक अनुबंधाचा आहे तिथे शनी मंगल राहू केतू उपयोगाचे नाहीत . तिथे चंद्र शुक्रासारखे सौम्य आणि ज्ल्तात्वाचे रसिक ग्रहच हवेत तरच संसाराची वेल बहरेल. 

अभ्यासकांनी खालील ग्रहस्थितीचा पत्रिका मिलनासाठी अवश्य अभ्यास करावा .


सप्तमस्थान – पापकर्तरी योगात आहे का ,कुठल्या ग्रहांच्या दृष्ट्या आहेत .

सप्तम स्थानातील ग्रह –ते कुठल्या ग्रहांच्या युतीत आहेत आणि कुणाच्या नक्षत्रात आहेत .सप्तमेश कुठे आहे आणि कुणाच्या दृष्टीत युतीत आहे. 

विवाहाचा कारक ग्रह शुक्र सगळ्यात महत्वाचा आहे . त्याची स्थिती लग्न कुंडली आणि नवमांश कुंडलीत अत्यंत महत्वाची आहे.

लग्न भाव आणि लग्नेशाची स्थिती अभ्यासा. लग्नेश आणि सप्तमेशाचे काय योग आहेत ते तपासा. 

सप्तम स्थानातील ग्रहांचे सप्तमेशाशी ,शुक्राशी आणि इतर ग्रहांशी होणारे योग.

पत्रिकेतील रवी चंद्र मंगल आणि शुक्र त्यांचे परस्परांशी योग आणि सप्तमेशाशी योग महत्वाचे आहेत .

सप्तम स्थानासोबर लग्नस्थान कारण ते सप्तमाचे सप्तम आहे, धनस्थान जे कुटुंब स्थान आहे. षष्ठ स्थान हे सप्तमाचे व्ययस्थान आहे आणि व्यय स्थान जे सप्तम स्थानाचे षष्ठ स्थान आहे.

थोडक्यात १ २ ६ ७ ८ आणि १२ ह्या स्थानांचा विचार आवश्यक आहे. २ ६ ८ १२ ह्या स्थानांमध्ये जर पापग्रह असतील तर वैवाहिक सौख्य चांगले मिळत नाही . 

स्त्रियांच्या पत्रिकेत रवी मंगळ तसेच पुरुषाच्या पत्रिकेत चंद्र शुक्र ह्यांचा अभ्यास केला पाहिजे . नवमांश पत्रिकेत ग्रहांचे बळ बघा त्याशिवाय निष्कर्ष काढू नका .

पत्रिकेतील इतर ग्रहस्थिती जसे पितृदोष ,कालसर्पदोष , वैधृती योग, विष्टीकरण.

सप्तमस्थान हे शुभ कर्तरी योगात असेल तर उत्तम . सप्तम स्थान जितके शुभ तितके संसार सुख आणि सहजीवन उत्तम .

सप्तम स्थानात चंद्र ,शुक्र हे  स्त्रीग्रह बलवान राशीत किंवा शुभ नक्षत्रात असतील.

सप्तमेश शुभ स्थितीत असेल ,लग्नात ,चतुर्थात ,पंचमात , सप्तमात , नवमात ,दशमात किंवा लाभात , स्व किंवा उच्च नवमांशात ,शुभ नक्षत्रात , मित्र ग्रहांच्या युतीत , दृष्टीत असेल तसेच सप्तमेश मार्गी असेल  तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते . अश्या स्थितीत सप्तमेश हा बलवान होतो . 


सप्तमेशावर ,सप्तम स्थानावर ,शुक्रावर गुरूची दृष्टी असेल तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते. 

लग्नेश आणि सप्तमेशाचा जर नवपंचम योग , लाभ योग ,राशि परीवर्तन योग असेल आणि लग्नेश बलवान असेल तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते.

सप्तमेश , लग्नेश ,शुक्र ह्यांच्यासोबत शनी राहू मंगळ ह्यांचे शुभ योग होत असतील तर वैवाहिक सौख्यात अडचणी येत नाहीत.

२ ४ ६ ८ १२ ह्या स्थानात जर शुभ ग्रह असतील किंवा पाप ग्रह फारसे नसतील तर वैवाहिक सौख्य चांगले मिळते .

विवाह वेदीवर चढताना आपला हा विवाह हे आयुष्यातील सर्वोत्तम सुख आहे आणि काहीही झाले तरी मी ते टिकवणार हा दृढ निश्चय मनाशी करून विवाह केला तर समस्या येतील आणि जातील,  मार्ग मिळेल आणि संसाराची घडी सुद्धा निट बसेल. आयुष्यात सहजीवन महत्वाचे आहे . दोघेजण नुसते भाजी कोथिंबीर घ्यायला एकत्र गेले तर त्यात आनंद आहे कारण एकच “ ती दोघे एकत्र आहेत “ . सहवास सगळ्यात महत्वाचा आहे. बोलायला भांडायला सुद्धा आपलेच माणूस लागते . फार ताणून धरू नका. चिकित्सक वृत्ती शेवटी आपल्यालाच एकटे ठेवते . सर्व गुण संपन्न इथे कुणीही  नाही. प्रत्येक आईवडिलांनी एकदा आपल्या पाल्याला त्याचा चेहरा आरशात बघायला सांगावा त्यांची उत्तरे त्यांनाच आपसूक मिळतील.

सहजीवनाचा आनंद सर्वात मोठा आहे आणि त्यासाठी थोडी तडजोड करण्याची वृत्तीही असावी , नाहीतर हे सर्व इथेच राहील वास्तवात कधीच उतरणार नाही. सर्वाना आपापल्या पसंतीचा जोडीदार मिळूदे आणि सर्वांचे सहजीवन स्वामींच्या कृपेने बहरत , फुलत राहूदे हीच सदिछ्या .

सौ. अस्मिता दिक्षित

संपर्क : 8104639230

झाले मोकळे आकाश

 || श्री स्वामी समर्थ ||


म्हणता म्हणता वर्ष सरले आणि आज नवीन इंग्रजी वर्षाची म्हणजेच 2025 ची पूर्वसंध्या मनावर दस्तक देत आहे. काही तासात नवीन वर्ष सुरु होईल. नवीन वर्षात मी नियमित चालायला जाणार , अभ्यास करणार , वेळेवर उठणार एक न दोन काही तासातच विरून जाणारे संकल्प करण्यास सगळे मश्गुल आहेत अगदी मी सुद्धा . पण हे सर्व करण्यासाठी नवीन वर्ष हा मुहूर्त का हे आजवर समजले नाही . असो. 

खरच दिवस किती भराभर पुढे जात आहेत , म्हणतात ना सुखाचे क्षण आणि दुक्खाचे दिवस असा हा उन पावसाचा खेळ अनेकांच्या आयुष्यात अनेक चढाव उतार घेवून आलेला आहे . गत वर्षातील कडू गोड आठवणी सर्वाना तिलांजली देवून नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी आपण खुल्या दिलाने पुढे होवुया कारण संघर्ष हेच जीवन आहे. 


नवीन वर्षाच्या सुरवातीची  ग्रहांची बैठक पाहता कर्क राशीतील वक्री मंगळ धुसफुसत राहणार , गुरूच्या नक्षत्रात नुकताच प्रवेश केलेले  कुंभ राशीतील शनी महाराज , मीन आणि कन्या राशीतील राहू केतू आणि अर्थात वृषभ राशीतील गुरु महाराज . एप्रिल आणि मे दोन महिने होणारी राहू शनी युती अनेक परिवर्तने घेवून येयील . फेब पासून शुक्र मीन ह्या त्याच्या उच्च राशीत उच्चीची वस्त्रे परिधान करत असला तरी तिथे तो वक्री अवस्थेत सुद्धा काही काळ असणार आहे त्याच सोबत शुक्र शनी युती सुद्धा तिथे होणार आहे. जानेवारीच्या अखेर मिथुनेत वक्री अवस्थेत प्रवेश करणारा मंगळ. २९मार्च २५ रोजी शनी महाराज आपली कुंभ रास सोडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत आणि त्याचबरोबर मकर राशीची साडेसाती पूर्ण होणार आहे. साडेसाती नुसती राशी बदलून संपत नाही तर प्रत्येकाच्या वयक्तिक पत्रिकेत चंद्राच्या अंशाप्रमाणे ती संपत असते हे मी मागील एका लेखात स्पष्ट केले आहे. त्यामुळे मीन राशीत शनी महाराजांनी पदार्पण केले तरी सगळ्या मकर राशीच्या लोकांची साडेसाती संपेल असे मात्र नाही . आता पुढे सज्ज व्हायचे आहे ते मेष राशीच्या लोकांनी . कार्माधीपती शनी त्यामुळे उत्तम काय असायला हवे तर आपली कर्म . साडेसातीचा त्रास नको असेल तर हनुमान चालीसा , दर मंगळवारी मारुतीला शेंदूर अर्पण करणे आणि कष्ट करत सन्मानाने जगणे हा उपाय आहे. आळशी , कामचुकार , दुसर्याच्या जीवावर आणि पैशावर आरामात लागणाऱ्या लोकांची शनी दुर्दशा करतो , अहंकाराचा माज ज्याने आपल्याला जन्माला घातलय त्याला दाखवला तर उलटी गिनती सुरु झाली म्हणून समजा . 


मुळात साडेसाती असो अथवा नसो जीवन हे एक आव्हानच आहे त्यामुळे साडेसातीचे भूत डोक्यातून काढून टाका . नवीन वर्षात संकल्प करण्यापेक्षा मी माझे आयुष्य पुढे सकारात्मक कसे होवू शकेल ह्याचा विचार करा . नव्याची नवलाई संपतेच संपते आणि मग खरी आव्हाने समोर उभी ठाकतात ती लीलया पेलायला उपासनेची जोड लागते  ग्रह मार्गी वक्री स्तंभी अवस्थेतून भ्रमण करत असतात . आपल्या आयुष्यावर त्यांचे चांगले वाईट प्रभाव होत असतात . उपासना असेल तर आयुष्य मार्गस्थ होते .

मोकळ्या आकाशाखाली मुक्त विहार करणाऱ्या पक्षांप्रमाणे आपले जीवन आणि मन सुद्धा मुक्त करण्याचा प्रयत्न करा . आपली घ्येय , उद्दिष्ट , छंद , आवडीनिवडी ह्यांना पंख लावा आणि उंचच उंच भरारी घ्या . मला काहीतरी मिळवायचे आहे करून दाखवायचे आहे ह्या विचाराना वेग द्या . चुकीच्या  गोष्टीपासून स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न सातत्याने केला तर आपले जीवन अधिक सुंदर होईल. दिवसातील ९०% वेळ हा अत्यंत टुकार , फालतू विचार करण्यात आपण घालवतो , ज्या गोष्टीचा आपल्याशी काडीचाही संबंध नाही असे विचार आपल्याला हवेच कश्याला ? आपल्या मेंदूतील हा कचरा सर्वप्रथम काढून टाकलात तर स्वस्थ जीवनाकडे नक्कीच वाटचाल होईल. सोशल मिडीयाचा अवास्तव वापर आपला मेंदू पोखरत चालला आहे. प्रत्येक बातमी आपल्यासाठी असतेच असे नाही . digital माध्यमांच्या आहारी गेलेले तुम्ही आम्ही आपले अस्तित्व जणू विसरत चाललो आहोत. आपण ह्या माध्यमांसाठी आहोत कि हि माध्यमे आपल्यासाठी हे अवघड गणित झाले आहे. आपले डोळे आणि इतर इंद्रिय , बुद्धी भरकटत चालली आहे. संवाद नष्ट होत आहे आणि आधुनिक जगतातील ह्या सर्व मोबाईल , डीजीटल माध्यमातील राहूचा विळखा आपल्याभोवती आपल्याही नकळत अधिकाधिक घट्ट होत आहे. आज मनाचे श्लोक , सकाळच्या प्रार्थना , शुभंकरोती लोप पावत आहे . नामस्मरण आपल्या भोवती सद्गुरूंचे जणू कवच तयार करते हा ओरा भेदून जाणे दुष्ट शक्तीना शक्यच होत नाही म्हणून नामस्मरणाची अंघोळ जणू सद्गुरूंच्या चरणावर घातली पाहिजे . आपले मन , बुद्धी विचार स्थिर असतील तर जीवनातील आनंद लोप पावत नाही . 

आयुष्यात ग्रहस्थिती नेहमीच बदलत असते जसा आपला निसर्ग पण आपली नित्यकर्मे करताना आपली उपासना , नामस्मरण बळकट असेल त्यात सातत्य असेल तर कितीही वादळे आली तरी आपण त्याला धीराने तोंड देवू शकतो . आपल्याला साधनेसाठी एक अखंड वर्ष स्वामी देत आहेत किती भाग्यवान आहोत आपण . आता ह्या वेळेचे चीज करणे हे मात्र आपल्याच हाती आहे. 


गत वर्षापेक्षा नवीन वर्षात मी अधिक साधना कशी करू शकेन हा विचार मनात रुजवला पाहिजे. इतर गोष्टी अपोआप होत राहणार आहेत .आयुष्यात माणसे येत जात राहतात , घडणाऱ्या घटनाही घडत राहतात आपण मात्र आहोत तिथेच राहतो ह्याचे कारण मानसिक दृष्टीने आपण त्यात अडकून पडतो ,गुंतून राहतो , कुणी अपमान केला कोण काय बोलले सर्व काही मनाच्या कोपर्यात दडवून ठेवतो विसरत नाही आणि माफही करत नाही . ह्या सर्वाचे साचलेले थर तुमच्या मनाला ह्या सर्वाची सतत जाणीव करून देत राहतात , अपमानाच्या सुडाच्या भावनेने आपण कायम जळत राहतो आणि अनेक आजारांना जन्माला घालत राहतो . ज्याने अपमान केला तो मस्त जगत असतो. मुक्त व्हा आणि आकाशातील पक्षाप्रमाणे मनाच्या हिंदोळ्यावर आनंदाने विहार करा . नको ते विचार आणि माणसे दूर करा . ज्यांच्याशी पटते त्यांच्यासोबत आयुष्य घालवा . सगळ्यांनाच सगळे आवडले पाहिजे असा काही नियम नाही . 


स्वतःसाठी जगा , नकारात्मक विचार, सूडबुद्धी , द्वेष , मत्सर , हेवेदावे ह्या सर्वाना कायमची  तिलांजली द्या . स्वामी माझा मी स्वामींचा बस इतकेच लक्ष्यात ठेवा. आजकाल भावना विरहित जग आहे. कुणी कुणाचे नाही , फायदा तिथे माणूस असे समीकरण आहे अश्या जगात भावना विवश होणारी माणसे कोलमडून जातात म्हणूनच खंबीर व्हा आणि स्वतःसाठी जगा , वाचन वाढवा , वाचन माणसाला अनेक वेगवेगळे दृष्टीकोन देतो , विचारांच्या कक्षा रुंदावतात आणि प्रगल्भते कडे पावुले पडतात . संकुचित मनोवृत्ती क्षणाचा आनंद देयील पण चिरकाल दुक्ख सुद्धा देयील. मी पणाची कर्तेपणाची भावना जोवर जात नाही तोवर सद्गुरू प्राप्ती नाही हे निश्चित . तुच करता करविता आहेस हि भावना मनात ठेवून निस्सीम भक्ती केली तर त्यांच्या चरणाशी जागा मिळणारच आणि ती जागा मिळवणे हेच आयुष्याचे आणि जगायचे कारण झाले पाहिजे .

आपला आहार विहार , शब्दभांडार आपल्याच हाती आहे , आता माणसे जोडायची कि आहेत तीही घालवायची ह्याचा विचार प्रत्येकाचा असणार आहे . समस्या आहेत आणि येतच राहणार , उपाय आहेत ते केले तर परिस्थिती बदलणार पण आम्हाला काहीही करायला नको , मस्त comfort मध्ये बसायचे , बस मग आहेत शनी महाराज .

सगळेच कसे अंबानी होणार . ज्याच्या त्याच्या प्राक्तना प्रमाणे आयुष्य आहे. तुलना नको आणि करायची तर स्वतःशी करा . आपल्या मानला , शरीराला पर्यायाने आयुष्याला वळण लावून शिस्त बद्ध करायची गरज आहे. सिंहावलोकन करा , विचार मनाला माझे काय चुकले ? मी कुठे कमी पडलो ? उत्तरे तुमची तुम्हाला मिळतील . जुने गेले तर नाविन्य येयील. 

शेवटी ते देणारे आहेत आणि ते द्यायलाच बसले आहेत . खूप काही करायचे आणि मिळवायचे आहे , घ्यायचे आहे आणि द्यायचेही आहे...


एकदा फक्त एकदाच त्या मोकळ्या नभाकडे मनापासून पहा आणि अगदी तसेच आपले मन मोकळे ढाकळे करा , अविस्मरणीय अनुभव आहे , नक्कीच घेवून बघा आणि अनुभव कळवा . मला वाचायला आवडतील.

येते वर्ष 2025 आपल्या सर्वांसाठी सुख समृद्धीचे , उत्तम आयु आरोग्याचे आणि इच्छित फलप्राप्तीचे जावूदे हीच स्वामी समर्थांच्या चरणी त्रिवार विनंती . 

मीच तुझा मान आणि मीच तुझी काया 

तुझ्या विज्ञानाला माझ्या अध्यात्माचा पाया 

श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ |

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

एक पाऊल मोक्षाकडे

 || श्री स्वामी समर्थ ||


फक्त ह्याच जन्मात नाही तर अनेक जन्मातून मनुष्य प्रवास करत असतो. जन्मोजन्माच्या ह्या फेर्यातून मुक्ती मिळते जेव्हा मोक्षाची प्रवेशद्वारे उघडतात . मागील जन्माच्या कर्माचा हिशोब ह्या जन्मात आणि ह्या जन्मातील कर्माचा हिशोब पुढील जन्मात असे हे चक्र फिरत असते. पुनरपि जननं पुनरपि मरणं म्हंटले च आहे. 

खरतर मोक्षाला जाण्यासाठीच जन्म असतो पण मनुष्य अर्थ काम धर्म ह्या पुरुषार्थात अडकतो आणि मोक्ष दुरावतो . परमेश्वर प्राप्ती हे जीवनाचे उद्दिष्ठ असूनही मोक्षाकडे जाण्यास विलंब होतो . मागील जन्मातील कर्म ह्या जन्मात ..मागील पानावरून पुढे चालू . ग्रह ह्या कर्माचे फळ देण्यास बांधील आहेत थोडक्यात ग्रह कर्मफळ देण्यासाठीचे माध्यम आहेत . जसे कर्म तसे फळ म्हणून ग्रहांना कधीही दोष देण्यात अर्थ नाही कारण ते आपल्याच कर्माचे फळ देत असतात .


पत्रिकेतील षष्ठ भाव पहा . रोग ऋण शत्रू भाव . षष्ठ भाव नोकरीचा आहे. नोकरी मिळाली कि खिशात पैसा खुळखुळायला लागतो आणि पैश्यामुळे माणसाचा “ अहं “ फुलतो . पैसा आला कि मग काय हवे ते करा आणि उधळा लक्ष्मी , जीवनशैली बदलते कधीही काहीही खावे प्यावे , मग त्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक पैसा अजून पैसा मग त्यासाठी घड्याळ्याच्या काट्यावर असणारे जीवन आणि मग त्यातून निर्माण होणार्या असंख्य चिंता विवंचना . ह्या सगळ्याचा शेवट होतो एखाद्या दीर्घ आजारात . ह्या सगळ्याचे मूळ बदललेली जीवनशैली आणि विचार सरणी. आहे त्यात समाधान मानणे सध्या कठीण आहे , इर्षा आणि त्यातून निर्माण झालेला आपल्याच लोकांबद्दलचा द्वेष तिरस्कार .एखाद्याचे कौतुक आणि खुल्या दिलाने स्तुती सुद्धा करता येत नाही आपल्याला इतक्या कोत्या मनोवृत्तीचे आहोत आपण.

पत्रिकेतील चतुर्थ भाव आपले मन , लग्न म्हणजे आपले शरीर , देह आणि आत्मा म्हणजे सूर्य . साहस , आत्मविश्वास देणारा मंगळ , बुद्धी, अभिव्यक्ती  देणारा बुध , ज्ञान देणारा गुरु , आयुष्यातील सर्व सुखाची बरसात शुक्र , कष्ट , आजार , अपमान देणारा शनी .आयुष्यात अचानक घटना घडवणारा राहू , कोमात नेणारा केतू . हि सर्व मागील अनेक जन्मातील कर्म आहेत जी ग्रहांच्या माध्यमातून चांगले किंवा वाईट परिणामांचे फल प्रदान करतात . 

शास्त्रात चातुर्वीद पुरुषार्थ सांगितले आहेत . पंचम भाव आपले पूर्वकर्म , नवम भविष्य आणि प्रथम आपले वर्तमान हे ज्याला समजले त्याला आपल्या जन्माचे रहस्य किंवा उद्दिष्ट समजेल. जन्म हा लादलेला नाही , आपल्या इच्छेतून आपण जन्म घेतला आहे . जन्म घेण्याची प्रबळ इच्छा झाली म्हणून मातेच्या उदरातून जन्म घेतला आहे आपण . षष्ठ भावावर विजय मिळवणे ह्याचाच अर्थ कुटुंबात सुख दुक्खाच्या प्रसंगात एकत्र राहणे , समजून घेणे कुटुंबातील एक होवून राहणे , शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा शत्रू निर्माण न करणे आणि आजारांवर मात किंबहुना सुधृढ राहणे , षष्ठ भावावर विजय मिळाला तर सप्तमाचे फळ भोगता येयील. 

ह्या पृथ्वीलोकावर कितीही संकटे दुक्ख असले तरी मनुष्याला मृत्यू नको असतो .  मोक्षप्राप्ती म्हणजेच परमेश्वर प्राप्ती आणि त्याचा ध्यास असला पाहिजे . चारही पुरुषार्थ जीवनाचे विविध टप्पे दर्शवतात आणि प्रत्येक टप्पा परिपूर्ण पणे जगून झाला तरच मोक्षाकडे वाटचाल होवू शकते. मनुष्य हा इच्छेमुळे जन्म घेतो हे आपण पाहिले. आपले मन चतुर्थ भावात आहे आणि मन म्हणजेच आपल्या मनातील विचार . विचाराना कक्षा नाहीत .मनाला बंधनात ठेवता येत नाही कारण ते उदबत्तीच्या धुरासारखे इथे तिथे भटकत असते. मन हे असंख्य वासनांचे घर आहे. काहीना काही सारखे हवे असते , हे सर्व न संपणारे आहे म्हणूनच मोक्ष मिळणे कठीण आहे. भाव मनात प्रगट होतात आणि विचार मेंदूत . हृदयातील आणि डोक्यातील विचार जेव्हा शून्य होतील म्हणजेच कुठलीच इच्छा राहणार नाही अशी जेव्हा मनाची अवस्था होयील तेव्हा समजून जा कि तुम्ही मोक्षाच्या पायर्या चढायला लागले आहात . म्हणूनच मोक्षाच्या आधीची पायरी एकादश भाव म्हणजेच लाभ भाव. पुढील मोक्षाच्या पायरीवर पाऊल ठेवण्यापूर्वी मिळालेले सर्व लाभ तिथेच ठेवून जावे लागते . इच्छांचे परिमार्जन होणे सोपे नाही आणि म्हणूनच मोक्ष मिळणे सुद्धा तितकेसे सोपे नाही कारण आपले मन संसारातून बाहेरच येत नाही. संसार म्हणजे सार जे नेहमीच पातळ असते , न आटणारे प्रेम तिथे आहे. अजून हवे हे संपत नाही , त्यात अडकत जातो आणि मोक्ष दुरावतो.

इच्छा आहेत तोपर्यंत मुक्ती नाही . षडरिपू , इच्छा आपले पाय मागे ओढतात म्हणूनच साधना , नामस्मरण आपल्याला ह्यातून बाहेर काढण्यास मदतच करते .


पुढील वर्षात एक उत्तम साधक बनण्याचा प्रयत्न करुया. कुणी बघितलाय मोक्ष पण खरच असेल तर त्यासाठी साधना करण्याचा  दृढनिश्चय करुया . 

महाराजांनी सांगितलेच आहे “ अशक्य काहीच नाही “ आपल्या जीवनात सुद्धा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतील फक्त एकच गोष्ट हवी ती म्हणजे “ दुर्दम्य इच्छाशक्ती “.

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230