Friday, 13 June 2025

व्यवसाय आणि ग्रहयोग – भाग १

 || श्री स्वामी समर्थ || 



आपण घेतलेले शिक्षण आणि नोकरी , व्यवसाय ह्याचा अनेकदा एकमेकांशी काहीही संबंध नसतो असे दिसून येते . आपण जे शिक्षण घेतले त्याला अनुसरून नोकरी नाही म्हणून मग नोकरी मिळेल असे शिक्षण घ्यावे लागते आणि त्यातच वयाची पंचविशी उलटते . 

टेक्निकल आणि व्यवस्थापन अश्या वेगवेगळ्या अभ्यास पद्धतीचे शिक्षण घेणे आजकाल आवश्यक आहे . आज आपण काही व्यवसाय आणि नोकरी साठी लागणारे ग्रहयोग बघुया .


इंजिनिअरींग हे क्षेत्र मोठे असून त्यात विविध शाखा येतात . ह्यासाठी प्रामुख्याने मंगळ पाहावा त्याच्या राशी आणि त्याचा दशम भावाशी असलेला संबंध . ४ ५ ८ ह्या ठिकाणी मंगळाच्या राशी असतील तर चांगलेच . मंगळ हा मेकानिकल रसायने , रवी मेकानिकल , शनी सिव्हील  भूगर्भ . संगणक म्हणजेच कॉम्पुटर क्षेत्रासाठी बुध , गुरु हर्शल चांगले . गुरु हा उच्च तंत्रज्ञान तसेच शनी अत्यंत संयम , चिकाटी देतो तसेच मंगळ इंजिनिअरींगशी संबंध देतो. 

बुध हा उत्तम संवाद कौशल्य देतो . शब्दांच्या कोट्या करणारा हा बुध पत्रिकेत उत्तम फलित देत असेल तर कुठल्या क्षेत्रात आपण यश संपादन करू शकतो ते बघुया .

लग्न भावात किंवा धन भावात बुध तसेच २ ६ १० ६ ह्या भावांशी जर मंगल गुरु बुध संबंधित असतील तर व्यक्ती वकिली क्षेत्रात नाव मिळवेल. 

पंचम , लाभ भावातील शनी सुद्धा वकिलीसाठी पूरक ठरतो. वकील म्हणून व्यवसाय करायचा असेल तर लाभस्थान आणि लाभेश शुभ हवेत  तसेच लग्नात ५ ७ ९ १० ह्या लग्न राशी हव्यात .

केंद्रात शुभ गुरु शनी व्यक्तीला उत्तम न्यायाधीश बनवतात . न्यायाधीश होण्यासाठी लग्नेश बलवान आणि ६ १० ह्या भावात शुक्र गुरु शनी हे ग्रह परस्परांशी संबंधित असावेत .हे अधिकार देणारे ग्रह आहेत . लग्न दशम भावातील राहुसुद्धा उच्च फलित देतो. शनी ५ ११ मध्ये असावा . 

४ ९ ह्या भावांची दशा उच्च शिक्षण देयील पण नोकरी देणार नाही . त्यामुळे शिक्षण घेताना पुढे नोकरीसाठी असलेल्या दशांची सांगड घालणे आवश्यक आहे. दशा मार्ग दाखवतेच . जसे नवम भावाच्या दशेत पर्यटन , प्रोफेसर गुरूशी संबंधित व्यवसाय केले तर उत्तम होईल. षष्ठ भाव असेल तर घरी खाद्य पदार्थ करून त्याचा व्यवसाय करावा. पंचम भाव हा कलेचा creative आहे. मुलांच्या शिकवण्या , कला अवगत असेल तर तबला पेटी हेही शिकवता येयील.

ज्योतिष शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अश्या विविध पत्रिका संग्रहित करून त्यातील नियम अभ्यासावे . कदाचित अजूनही काही नियम निघू शकतील त्याचेही अध्ययन करावे. नुसते पोस्ट ला लाईक करून काय सध्या होणार . प्रत्येक विषयाचे मनन , चिंतन आवश्यक आहे. 

पुढील भागात इतर व्यवसाय बघुया .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Wednesday, 11 June 2025

शुक्र केतू युती

 || श्री स्वामी समर्थ ||


गोष्ट आहे एका मैत्रिणीची . सतत उदास , निराश , शून्यात कुठेतरी बघत राहणार , पटकन कश्याचेही उत्तर नाही. चेहऱ्यावर सतत गूढता, मनाचा थांगपत्ता लागणार नाही. आपल्या वयाप्रमाणे छान कपडे , केश वेशभूषा नाही . सतत आपले जगबुडी झाल्यासारखे भाव घेवून फिरणारी हि व्यक्ती मला नेहमी कोड्यात टाकत असे. 

ज्योतिष शास्त्र शिकल्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती , त्यांचे चालणे बोलणे ह्याकडे ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून बघण्याची अपोआप सवय होते. खूप वेगाने चालणारी व्यक्ती मग त्याचे चर लग्न असेल. पैसा पैसा करणारे मग त्यांचा धनेश पृथ्वी तत्वाच्या राशीत असेल. राहू धनात , मोठमोठ्याने बोलणे, कदाचित व्यसन सुद्धा अनेकदा स्मोकिंग , गालावर खळी लग्नात शुक्र , असो असे ठोकताळे मांडायची सवय होत जाते. 


हिचे व्यक्तिमत्व इतके गूढ होते कि अपोआप माझी उत्सुकता ताणली गेली आणि तिच्या पत्रिकेच्या अभ्यासाला सुरवात केली. प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यामागे तसेच आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा क्रम पाहिला तर त्याही मागे एक ठोस असे कारण असते. 

हिचा विवाह झाला , मुले हि झाली आणि पतीचे निधन झाले. दुसरा विवाह नाही , तसा योगही नाही. पत्रिका पाहताना सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले ते तृतीयात असलेल्या शुक्र केतू अंशात्मक युतीने . शुक्र वैवाहिक सुखाचा कारक आणि केतू विरक्त ज्या ग्रहासोबत असेल त्या ग्रहाचे सर्व गुण शोषून त्याला रिता करणारा. केतूला दिसत नाही पण त्याला मनाचे चक्षु आहेत , स्पर्शज्ञान आहे . अंतर्मनाची संपूर्ण ताकद आहे .पण शुक जे सुंदर जग दाखवेल आणि ते उपभोगायचे मार्गही देयील ते केतुकडे काहीच नाही. 

साधी वेणीही नाही सारखा तो कसातरी केसांचा अंबाडा घालायचा , एकटे एकटेच राहायचे , फारसे बोलणे नाही , सतत चिंतायुक्त चेहरा आणि मोकळेपणाने हास्य सुद्धा नाही, चांगले ड्रेस , नटणे नाही ह्याचे उत्तर मला शुक्र केतू युतीने क्षणात दिले. शुक्र नुसता कोरडा तर कसे वाटेल नटावे चांगले राहावे. असो. शुक्र आयुष्यातील सगळ्या भौतिक सुखाचा कारक केतुमुळे दुषित झाला. तृतीय भाव हे विवाहाचे भाग्य आहे त्यात शुक्र केतू युती . 

सप्तम भाव पाप कर्तरी योगात . सप्तमेश अष्टम भावात स्तंभी . कुटुंब भावात हर्शल . शनी हर्षलामुळे बिघडला आणि पतीचे निधन अचानक झाले. लग्नातील गुरूने हि घटना वाचवली नाही . चतुर्थ भावात आमावस्या योग . बुध वृश्चिकेत नेप सोबत .

मुलांची जबाबदारी आणि घरची बेताची परिस्थिती . असो. अनेकदा वैवाहिक सुखाचा कारक शुक्र हा जर केतु सोबत युती करत असेल तर त्या व्यक्तीला संसार सुख किती आहे हे तपासून पाहिले पाहिजे . शुक्र हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे आणि शुक्र रस आहे. शुक्र केतू युती असेल तर संसारातील रसच निघून जायील आणि मग निरस आयुष्य वाट्याला येयील. 

अनेकदा सप्तम भाव बिघडतो म्हणून विवाह मोडतो पण त्याही पेक्षा त्याचे खरे कारण म्हणजे शुक्राची पत्रिकेतील स्थिती . शुक्र चांगला असेल तर सकारात्मकता , जीवनात पर्यायाने संसार सुखात आनंद चैतन्य निर्माण होते. शुक्र म्हणजे नुसते  शारीरिक सुख नाही तर आत्मिक , अध्यात्मिक सुखाची बरसात करणाराही हा शुक्र आहे. शुक्र म्हणजे सळसळता उत्साह . संसारात गोडवा शुक्र निर्माण करतो , पती आणि पत्नी ह्यात ओढ निर्माण करणे , एकमेकांच्या सहवासाची ओढ, चांगला स्वयंपाक , गृहसजावट , पै पाहुण्याची उठबस , काहीतरी नवीन करण्याची आवड , कलात्मकता ,  पर्यटन ह्या सर्वाचा एकत्रित मेळ कुटुंबाचा सर्वांगीण विकास , मानसिकता आणि कुटुंबात एकोपा निर्माण करण्यास पूरक ठरतो. 

चेहऱ्यावर प्रसन्नता , गोडवा आणि माणसाबद्दल प्रेम निर्माण करणारा हा शुक्र केतुसारख्या विरक्त शुष्क ग्रहासोबत असेल तर वेगळेच चित्र दिसेल. हि युती मीन राशीत असेल तर अध्यातातील प्रगती  होवू शकते कारण शुक्र हा सगुण भक्तीचाही कारक आहे आणि केतू सारख्या अध्यात्मिक ग्रहासोबत तो मोक्षाचा मार्ग स्वीकारेल. पण संसार सुखाला पारखाच होईल.   

केतू हा घरात असून नसल्यासारखा . त्यामुळे घरातील स्त्री कुटुंबात रममाण होणार नसेल तर संसार कसा होईल हा प्रश्नच आहे. शुक्र केतू युती हे माझ्या मते संसार सुखाला पारखे करणारी युती आहे. पत्रिका मिलन करताना अश्या सर्व बाबी तपासून बघितल्या तर नंतर पश्चात्ताप करायची वेळ येणार नाही. 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230  


Saturday, 7 June 2025

माणसांचे खरे अंतरंग उलगडणारा राहू ????

 || श्री स्वामी समर्थ ||




संथ असणारया पाण्यात खडा टाकला तर जे होते तेच राहू दशा सुरु झाली कि आपल्या आयुष्याचे होते . राहू ह्या भावात चांगला आणि राहू ह्या नक्षत्रात चांगला हे सबकुछ झूट आहे. राहू केतू हे राक्षस आहेत आणि त्यांना कितीही आंजरले गोंजारले तरी त्यांचे मुळ स्वभाव गुणधर्म जाणार नाहीत . प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तश्याच राहुला सुद्धा आहेत . 

राहू हा चंद्राला ग्रहण लावतो म्हणजे नेमके काय होते. आयुष्यात अश्या घटना घडायला सुरवात होते ज्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो , आपली शांत झोप उडते, मन सैरभैर होते आणि नक्की काय चाललय तेच समजेनासे होते. आपल्या मनाच्या ठिकर्या उडाल्या कि राहूचा विजय झालाच म्हणून समजा कारण तेच तर त्याचे घ्येय आहे . मन शांत नसेल तर काहीच सुचणार नाही , प्रत्येक गोष्ट निरस वाटू लागेल आणि जगण्यातील एकंदरीत सगळाच आनंद विरून जायील .

लहान पणापासून ज्या भावंडासोबत, मित्रांच्यासोबत लहानाचे मोठे झालो त्यांच्याशी अगदी शुल्लक गोष्टीवरून वितुष्ट येयील .  वास्तविक ज्या कुटुंबात आपण लहानाचे मोठे झालो त्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्याला पूर्णतः ओळखते मग असे गैरसमज होतातच कसे? कुठल्याही लहान गोष्टीवरून गैरसमज कुणामध्ये होतील ? जे एकमेकांना अनभिद्य आहेत पण इथे तर एकाच कुटुंबातील व्यक्ती एकमेकांची तोंड पाहिनाशी झालेली आहेत . समज गैरसमज मनाला त्रास देत राहतात एक दोन नाही तर पूर्ण १८ वर्ष . आयुष्यभर एकमेकांच्या शिवाय राहू न शकणारे भाऊ बहिण एकमेकापासून दुरावतात एकाच शहरात राहून एकमेकांची तोंडे पाहंत नाहीत . अगदी एकमेकांच्या नावाने अंघोळ करतात म्हंटले तर वावगे ठरू नये. 


मित्र मैत्रिणी जवळची सगळी माणसे लहान सहान अत्यंत शुल्लक कारणांनी हळूहळू दूर व्हायला लागतात . मग फोन बंद होतात आपण केला तरी तितकेच बोलणे मोजकेच त्यात भावनिकता लोप पावलेली असते, सगळ्या संवेदना नष्ट होतात , प्रेमाचा ओलावाही नसतो फक्त आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार . ज्या दिवशी तुम्ही समोरच्या व्यक्तीला फोन करायचे बंद होणार त्या दिवसापासून तुमचा संबंध संपला कारण समोरून कधीही फोन येणार नाही . तुम्हाला हौस असेल तर करत राहा फोन. राहू आपली मज्जा बघत राहणार . आपल्याला समजायला लागते कि आपण एकटे पडत चाललो आहोत आणि हा एकटेपणा अत्यंत भयंकर असतो . आपण मनापासून जगतो , सामोर्च्यासाठी खूप काही सातत्याने करत असतो आणि मानसिक गुंतवणूक ती तर विचारूच नका . आयुष्यभराची साथ सोबत असलेली माणसे हळूहळू आपल्यापासून इतकी दुरावतात कारण काहीच नसते . दोन व्यक्तींच्या मधील गैरसमजाची एक अदृश्य भिंत . हे गैरसमज संपत नाहीत , ते दूर होत नाहीत अशी स्थिती राहूच निर्माण करतो.  राहू भोग भोगायला लावतो .


ह्या सगळ्या घटना मन अत्यंत उदास विषण्य करतात आणि शेवटी भावनिक दृष्ट्या आपण कोलमडून पडतो. आपली तब्येत ढासळू लागते , आर्थिक सुबत्ता कमी होते कामात लक्ष लागत नाही आणि काहीच नकोसे वाटते . जीवन हे एकटेपणाने नाही तर आपल्या आप्त , मित्र नातेवाईक ह्यांच्यासोबत जगण्यासाठी आहे . 


आपण आजवर प्रत्येकासाठी किती काय काय केले वेळ प्रसंगी कसे मदतीला धावून गेलो , कश्याचाही विचार न करता पैसाही खर्च केला हे सर्व आठवत राहते पण त्याचा काहीच उपयोग नसतो आणि ह्या गोष्टी बोलूनही दाखवायच्या नसतात त्या ज्याच्या त्याने समजून घ्यायच्या असतात .

आपली कुणालाही आठवण येत नाही अगदी आपण आहोत कि मेलो ह्याची विचारपूस पण कुणी करत नाही . हि सर्व परीस्थिती निर्माण करणारा राहू अत्यंत बुद्धिवान माहीर आहे. आपल्या मनात यायच्याही कितीतरी आधी त्याने गोष्टी घडवून आणलेल्या असतात . 

गैरसमज हे मोठे विष आहे आणि ते आपल्याही नकळत आपल्या विरुद्ध आपल्याच लोकांच्या मनात भरवून राहुने आपला डाव साधलेला असतो . कसला डाव ? तर आपले मानसिक खच्चीकरण करण्याचा . हेच ते चंद्र ग्रहण जे मनाला लागते . आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे ह्या जगातून निघून जाणे ह्याही घटना राहू दशेत घडतात . पैशाचा अपव्यय आणि माणसांचाही होतो तो वेगळाच.

अनाठायी पैसा खर्च होतो आणि मन चिंतीत राहते. पैसा भरपूर येतो पण टिकत नाही त्याला असंख्य दिशा फुटतात . राहूच्या दशेत काहीच राहत नाही . ओंजळीतून सर्व काही निघून जाते. पैसा गेला पुन्हा कष्ट करून मिळवता येतो पण आयुष्यभर जोडलेल्या माणसांचे काय ? माझी माझी म्हणून जपलेली माणसे आपल्या हृदयाच्या कोपर्यातून क्षणात निघून जातात . असंख्य प्रश्न मनाला भेडसावू लागतात . ह्याच माणसांना मी आपले मानले होते माझी माझी माणसे म्हणून डोक्यावर घेवून त्यांच्या सोबत आज इतका आयुष्याचा प्रवास केला होतो ते सर्व खोट होत का? नात्यांवरचा विश्वास उडतो , आणि मग वास्तवाची जाणीव होते तशी परमेश्वराची आठवण येते . 

सगळे दुरावतात पण देव नाही . त्यामुळे सगळ्यांपासून दूर गेलो कि महाराजांच्या, देवाच्या समीप जातो. क्षमायाचना सुरु होतात , राहूचा जप करा , त्याचे रत्न घाला हे करा आणि ते करा पण त्याने खरच जे झाले ते परत येणार आहे का? मनावर असलेले दुक्खाचे वेदनेचे असंख्य ओरखाडे पुसले जाणार आहेत का? कधीच नाही आणि आता हे सर्व बरोबर घेवूनच जगायचे आहे? पुन्हा नव्याने तीच नाती जोडली जातील ? कदाचित नाही .

फसवणूक , विश्वासघात हे राहूचे दुसरे नाव आहे जणू . जवळच्या नात्याने , मित्राने सहकार्याने कुणीही असो त्याने केलेला विश्वासघात मग तो पैशाचा व्यवहार असो , मनाचा किंवा जमीन जुमला . इतके बेमालून फसतो कि आपला आपल्यावरचा विश्वास उडावा. कधी स्वप्नात सुद्धा येणार नाही अश्या व्यक्ती आपल्याला फसवून आयुष्यातील मोठे धडे शिकवतात . ज्यांच्या वर आपला आपल्याही पेक्षा अधिक विश्वास असतो त्यांच्याकडून झालेली फसवणूक आपल्याला अंतर्बाह्य हादरवून टाकते .जगायचे कुणासाठी आणि विश्वास ठेवायचा तरी कुणावर ‘??? शेवटी एकच उत्तर परमेश्वरावर तो आपलाच आहे आणि आपलाच राहणार . 

राहूच्या दशेत कुठल्याही कागदावर सही डोळस पणे करा , कुणालाही जामीन राहताना विचार करा , प्रेमाचे उमाळे अगदी आपल्या मुलांसाठीही नको . राहू च्या दशेत नको त्या व्यक्तींना आपणच जवळ करतो आणि फसतो . समाजात आपले नाव बदनाम करणाऱ्या व्यक्ती राहूच्या दशेत भेटतात . सामाजिक जीवन बदलते, मित्र मैत्रिणी दूर होतात , गैरसमज तसेच राहतात आणि सगळेच दुरावतात . आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सुद्धा लोकांचा थोडा विचित्र होत जातो आणि आपल्या लोक टाळतात . आपल्याला हे का होत आहे हेच समजत नाही कारण आपण जसे असतो तसेच असतो . आपण बदललेले नसतो तर राहुने परिस्थिती बदललेली असते .

आज आपण राहुबद्दल वेगळा विचार करूया किबहुना राहु देखील कदाचित हेच सुचवत असावा. आयुष्यभर आपल्याला ओळखणारी आपली आपली म्हणवणारी माणसे आपल्याच बद्दल फालतू कारणानी गैरसमज होवून दूर जावूच कशी शकतात ? आपली बिनबुडाची नाती संपुष्टात येतात ,जी आपण डोक्यावर घेवून आयुष्यभर फिरत होतो , ह्यातच राहूच्या असामान्य ताकदीची ओळख आपल्याला होते. कितीही काहीही म्हणा राहू चे खेळ आपल्याला अंतर्मुख करायला भाग पाडतात . नात्यांची खरी ओळख करून देतात , तुम्ही कुणासाठीही कितीही काहीही करा ह्या जगात आपले कुणीही नाही त्यामुळे स्वतःसाठी जगा आणि ह्या नात्यांच्या गुंत्यात अडकू नका हेच तर राहुला सांगायचे नाही ना? असाही विचार अनेकदा करावासा वाटतो .


ह्या विश्वात आपण एकटे येणार आणि एकटेच जाणार हेच जणू सांगण्यासाठी राहुने हा खेळ मांडलेला असावा असे अनेकदा वाटते. आपण ज्या लोकांसाठी जीव ओवाळून टाकतो ती क्षणात परकी कशी होवू शकतात ? मग आजवर काय ओळखले आपण एकमेकांना , एखादी चूक होवू शकते पण आपल्या नात्यात इतकीही परिपक्वता नाही कि आपण एकमेकांना माफ करू शकत नाही  . आपण ज्या नात्यांच्या जीवावर उड्या मारतो ती किती कच्ची तकलादू आहेत हेच राहू आपल्या समोर आणायचा प्रयत्न करत असतो. राहूचे खेळ त्यालाच माहिती . 

आजवर असंख्य वेळा राहूचे लेख आपण वाचले ऐकले पण आज ह्याच राहूचा असाही वेगळा विचार मला करावासा वाटला म्हणून हा लेखन प्रपंच. ज्यांनी ज्यांनी राहू दशा भोगली आहे त्यांना माझे म्हणणे नक्कीच पटेल . 

अखंड विश्वाला आधुनिक तंत्रज्ञानाची मोहिनी दाखवणारा राहू हा पूर्णतः वाईट नाही . त्याने तर जग जवळ आणले आहे . आज चे gpay , insta सोशल मिडिया , प्रगत युग राहूचा करिष्मा आहे . प्रत्येक वाईट गोष्टीतूनही काहीतरी शिकण्यासारखा धडा मिळतो तो हा असा . राहुला पूर्णतः समजून घेणे कठीण आहे . अदृश्य शक्ती आपल्या अवती भोवती आहे पण आपण तिला ओळखू  शकत नाही. इथे प्रत्येक माणसात राहू आहे. आपल्यासमोर गोड बोलणारी मागून आपलीच निंदा करणार हे गृहीत धरून चालले तर त्रास कमी होणार . सतर्क राहणे , कमी बोलणे हा राहुसाठी सर्वोत्तम उपाय आहे. 

राहू काय शिकवतोय ? अंतर्मुख व्हा आणि विचार करा . कुणीही आपले नाही पण आपल्या अत्यंत समीप आहे तो आपला देव . आज किती वेळ देतो आपण त्याला. सगळे विश्व फसवे आहे पण देव कधीही आपल्याला अंतर देणार नाही , दिलेहि नाही . उर्वरित आयुष्य त्याच्या चरणाशी समर्पित केले तर झालेला त्रास वेदना दाह नक्कीच  सुसह्य होयील ह्यात शंका नसावी. 



सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230  

Friday, 6 June 2025

रेशीमगाठी भाग 5 -गुण मिलन आणि ग्रह मिलन करताना लावायचे निकष

 || श्री स्वामी समर्थ ||


पूर्वीच्या काळी विवाह जमवण्यासाठी गुण पहिले जात असत . १८ गुण जुळले तर विवाह करायला हरकत नाही . पण आता कालानुरूप ज्योतिष परिभाषा सुद्धा बदलत आहे आणि म्हणून फक्त गुण मिलन पुरेसे नाहीतर ग्रह मिलन पण करावे असे मी नक्कीच सुचवीन .

पत्रिकेतील गृहसौख्य , संसार सुख , व्यवहार , नोकरी आणि आयुष्यमर्यादा , पर्यटन , नवीन वस्तूचा लाभ ह्या सर्व गोष्टी गुण मिलनावरून समजणार नाहीत म्हणून ग्रह मिलन तितकेच महत्वाचे वाटते . आपल्या आयुष्यातील आजार , आजूबाजूच्या लोकांशी पटणे न पटणे , पैशाचा ओघ हे सर्व गुण मिलानावरून नाही समजणार . 

गुण मिलन हे ३६ गुणांचे आहे . आपले व्यक्तिमत्व , नाती गोती , नोकरी व्यवसाय , अर्थार्जन , जोडीदार , गृहसौख्य , संतती , परदेशगमन , छंद , आजार , कष्ट , संकटे ह्या सर्व गोष्टींची खोली समजायला मूळ पत्रीकेलाच हात घालावा लागतो म्हणून नुसते गुण पुरेसे नाहीत . उदा द्यायचे तर पूर्वी राक्षस गण असलेली मुलगी नको कारण ती उर्मट असू शकेल अरे ला कारे करणारी . पण अशी मुलगी ५० लोकांच्या एकत्रित कुटुंबात रमेल का सामावून घेईल का स्वतःला ? कदाचित नाही कारण तिला स्वतंत्र विचारसरणी असेल म्हणून ती पूर्वीच्या काळात नको होती . पण आता सकाळी लवकर उठून सगळ्यांचे डबे भरून नोकरीला घराबाहेर पडणारी स्त्री हि राक्षस गणाची असली तर अंगात खूप उमेद ताकद असल्यामुळे दिवसभराचा कामाचा डोंगर उपसु शकेल. घरात पाहुणे आले तर सगळ्यांसाठी खपून स्वयपाक करेल लगेच दमले दमले म्हणून हॉटेल मधून जेवण मागवणार नाही .  ह्या सर्वच एकत्रित विचार केल्यावर असे लक्ष्यात येते कि बदलेल्या काळानुसार , मानवी जीवन सुद्धा बदलले आहे आणि बदलेल्या जीवन शैलीच्या वेगळ्या आहेत त्यामुळे गुण आणि ग्रह मिलन हे दोन्ही करणे क्रमप्राप्त आहे. 

ग्रह मिलन कसे करावे ?

वैवाहिक सौख्य उत्तरोत्तर मिळाले तर विवाह परिपूर्ण होतो. उत्तम दर्जाचे वैवाहिक सौख्य पाहण्यासाठी सप्तम भाव , सप्तमेश , चंद्र शुक्र गुरु पाहावेत .वैवाहिक जीवनात चढ उतार , शारीरक , मानसिक त्रास आहेत का ? एखादी मानसिक विकृती , लैंगिक विकृती समस्या , मानसिक दुर्बलता , शारीरिक अत्याचारांना बळी पडणे ह्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत . आरोग्य आणि आयुष्यमान हे घटक अजिबात डावलून चालणार नाहीत . दोघांच्याही पत्रिका वैचारिक दृष्टीने ठीक असाव्यात म्हणून दोघांचीही लागणे आणि लग्नेश पाहावे. एकाचे पारडे खाली गेले तर दुसर्याचे वर असावे म्हणजे एकमेकांना पूरक असावेत . 

स्त्रियांच्या पत्रिकेत द्वितीय भाव सुस्थितीत असला पाहिजे कारण तिथे आपले कुटुंब आहे . कुटुंबात रुळणारी , माणसाना आपलेसे करणारी आणि घर आपले मानणारी मुलगी संसार तीकावान्याकडे लक्ष्य देयील . तसेच चतुर्थ भाव कारण ते आपले घर जिथे आपले वास्तव्य असते . २ आणि ४ हे दोन्ही भाव बलवान हवेत . घरोघरी मातीच्या चुली पण त्या चुलीवर सतत आग पेटायला नको इतकेच .

लग्न षडाष्टकात नको नाहीतर वैचारिक मतभेत होतात . नवर्याला २५ हजार मिळाले तो म्हणेल फिक्स ला टाकू ती म्हणले दोन दिवस महाबळेश्वरला जावू . लग्न हे आपले शरीर देह आहे . आपण दिसतो कसे आणि आपले आयुष्य , सकारात्मकता , जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन हे सर्व लग्न भाव दर्शवते.

चंद्र हा आपली मानसिकता , प्रेमाची भावना , सरलता , सहजीवनातील प्रेम , मनाची उमेद आणि ताकद दाखवतो .

भावनिक आरोग्य आणि पत्नीचे मन समजून घेण्याची क्षमता म्हणून चंद्र महत्वाचा आहे . मानसिक दौर्बल्य असेल तर व्यसनाधीनता , मानसिक  असंतुलन होण्याची शक्यता असते . रवी एकमेकांच्या षडाष्टकात नसावा नाहीतर जीवनाची उदिष्टे वेगवेगळी असतात . एकमेकांबद्दल ओढ आकर्षण निर्माण करणारे ग्रह मंगळ शुक्र चंद्र राहू पाहावेत .

ग्रह मिलन करताना एकमेकांच्या राशी सम सप्तक योगात , नवपंचम योगात असतील तर उत्तम .नवपंचम योगात एकाच तत्व येते त्यामुळे आचार विचार , दृष्टीकोन , आर्थिक गणिते , इतर व्यवहार चांगले असतात .चंद्र एकमेकांच्या षडाष्टकात नसावा . 

एकाचे लग्न कन्या आणि दुसर्याचे मीन असेल तर अशी लग्ने made for each other अशी असतात . एकमेकांचे होवून जीवन व्यतीत करतात . एकाचा शुक्र मेष राशीत असेल आणि दुसर्याचा मंगळ राहू तुल राशीत असेल तर एकमेकांच्याबद्दल मानसिक शारीरिक आकर्षण असते . तसेच एकाचा शुक्र मिथुन राशीत आणि दुसर्याचा मंगळ राहू पण मिथुनेत असेल तर एकमेकांसाठी आकर्षण असते . 

ग्रह मिलन करताना पत्रिकेतील काही त्रासदायक योग आपण नक्कीच पहिले पाहिजेत . मुलाच्या पत्रिकेत चंद्र असेल तिथे मुलीच्या मिथुन राशीत शनी मंगळ राहू नसावा . मुलीच्या पत्रिकेत रवी असेल तिथे मुलाचा शनी राहू असतील तर तिच्या प्रगतीत अडथळे येवू शकतात .सतत दडपण राहील मुलीला.

एकाचा चंद्र असेल तिथे दुसर्याचा शुक्र गुरु असेल तर पत्रिका चांगल्या जुळतील.

एकंदरीत गुण आणि ग्रह मिलन व्यवस्थित केले तर पुढे मनोमिलन नक्कीच होणार ह्यात दुमत नसावे.


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230