Thursday, 31 May 2018

अद्भुत अनाकलनीय

|| श्री स्वामी समर्थ ||


संत गजानन महाराज , शेगाव.



मंडळी,

                  अठरा वर्षापूर्वी माझ्या सासुबाईनी श्री गजानन विजय पोथी माझ्या हातात दिली. त्यानंतर काही दिवसांतच मला श्रीक्षेत्र शेगाव येथे जाण्याचा योग आला. शेगावच्या भूमीवर पाऊल ठेवले आणि आयुष्यच बदलून गेले. स्वर्गीय आनंद कुठे असेल तर शेगावात संत गजानन महाराजांच्या पायाशी आणि त्या आनंदाची अनेक वेळा अनुभूती आली. शेगाव संस्थानातील शिस्तबद्ध कारभार , शांतता, भक्तांसाठी रात्रंदिन झटणारे सेवेकरी ह्या सर्वांचे वर्णन करायला शब्दच अपुरे पडतील.

                  गेली ४५ वर्षा पेक्षाही जास्ती वर्ष शेगाव संस्थानाचा कारभार पाहणारे तेथील प्रमुख मा. श्री शिवशंकर पाटील उर्फ भाऊ ह्यांच्याशी प्रथम भेट माझ्या सासूबाईंच्या मुळेच झाली आणि त्यानंतर मी जेव्हा जेव्हा शेगावला गेले तेव्हा तेव्हा होत राहिली .

                 अत्यंत प्रामाणिकपणे उभे आयुष्य महाराजांच्या सेवेत व्यतीत केलेले भाऊ चालते बोलते महाराजच आहेत. वारकरी शिक्षण संस्था, इंजिनिअरींग कॉलेज, आनंद सागर प्रकल्प ह्या सर्वांचे योग्य नियोजन , निष्ठावंत सेवेकार्यांच्या मदतीने करताना पाहून अचंबित व्हायला होते. त्यांची निर्णयक्षमता, शिस्त, धडाडी वाखाणण्याजोगी आहे. हे सर्व करत असताना आपण महाराजांचे फक्त एक सेवेकरी आहोत आणि सेवा करत राहणे हेच आपले काम हि भावना तसूभरही मनातून जात नाही. अतिसामान्य व्यक्तिमत्व असूनही सामन्यातील सामान्य राहणाऱ्या भाऊंकडे पाहिले कि वाटते उगीच नाही महाराजांनी त्यांची ह्या जागी नेमणूक केली .

                  पांढरे शुभ्र धोतर, सदरा आणि डोक्यावर पांढरी वारकऱ्यांसाठी टोपी घातलेले भाऊ सेवेकार्यांच्या गर्दीत हरवून जातात. कुठेही मोठेपणाचा लवलेशही नाही. किती आणि कायकाय शिकायचे ह्यांपासून .संस्थानात चहा घेतला तरी दानपेटीत पैसे ठेवणारे महाराजांचे हे सेवक ,अधिक काय बोलायचे त्यांच्या विषयी. कसलाही मोठेपणा , डामडौल, मी पणाचा लवलेश शोधूनही सापडणार नाही. सतत आपल्या कामात गर्क असणार्रया भाऊना भेटायला गेले असता ते जर वर्तमानपत्र वाचत असतील तर ते वाचता वाचताही आपल्याशी संवाद साधतात .कुठले नमस्कार चमत्कार आवडत नाहीत त्यांना.

                  एक दोन वेळा त्यांनी महाराजांचे अनुभव मला सांगितले आहेत ,त्यांच्या वाणीतून ते ऐकणे म्हणजे पर्वणीच आहे. असो आज मी माझा त्यांच्याबद्दलचा एक जिवंत अनुभव सांगणार आहे. अशीच एकदा शेगावला गेले होते. माझा मुलगाही माझ्याबरोबर होता. नेहमीप्रमाणे भाऊंची भेट झाली. प्रसिद्धी माध्यमांपासून भाऊ नेहमीच दूर राहतात हे मला माहित होते तरीही का कोण जाणे त्या दिवशी त्यांच्याजवळ हट्ट केला कि मला माझ्याबरोबर तुमचा फोटो हवाय. त्यांनी हसून सांगितले अग इथे आपली भेट होतेच त्यात अजून फोटो कश्याला. तरी मी खूप आग्रह केला म्हणून त्यांनी माझ्या आणि माझ्या मुलासोबत ३-४ फोटो काढले. मी निघाले तेव्हा त्यांनी मला सांगितले एकच अट हे फोटो कुणास दाखवू नकोस. मी अर्थात हो हो म्हंटले . संध्याकाळी पुन्हा एकदा महाराजांच्या गादीजवळ, समाधीशी जावून दर्शन घेतले आणि शेगाव स्टेशन कडे निघालो.

                  माझ्या बरोबर त्या वेळी कै. वसंतकाका गोगटे होते. शेगाव स्टेशनातून गाडी सुटली. रात्री १० च्या सुमारास सर्वजण निजानीज करत असताना मला काही करमेना .मला सतत त्या फोटोंची आठवण येत होती आणि का कोण जाणे गोगटे काकांना ते दाखवायला मी फार उत्चुक होते. भाऊना दिलेल्या वचनाचा मला तासादोन तासातच जणू विसर पडला होता. 



असो तर सांगायचे असे कि गोगटे काकांना सर्व हकीकत कथन करून ते फोटो दाखवायला कॅमेरा काढला.आणि पाहते तो काय पुढील मागील सर्व फोटो होते पण भाऊंच्या बरोबर काढलेले ते ४-५ फोटो गायब म्हणजे तिथे फक्त black negative दिसत होत्या. खर सांगू का..एका क्षणात मनी काय ते समजले..मनात चर्रर झाले..कुणी मला काही सांगायची गरजच नव्हती ,मी समजून चुकले... डोळ्यातून घळाघळा पाणी येवू लागले. मनापासून हात जोडले महाराजांना आणि वचन मोडल्याची माफी मागितली. अर्थात ती रात्र जागूनच काढली, झोप कशी लागणार ,मनातून खजील झाले होते. घरी आले ....रोजची कामे व्यवहार सुरु झाले त्या रात्री झोपले असताना स्वप्नांत येऊन भाउनी सांगितले “ मी सांगितले होते तुला फोटो कुणास दाखवू नकोस. ” रात्रभर बसून होते. मला त्यावेळी आणि आज हा अनुभव कथन करतानाही काय वाटत असेल ह्याची कल्पनाही न केलेली बरी. आज भाउंच्या रुपात जणू महाराजांनी मला दर्शन दिले, माझ्याकडून वचन घेतले पण मी माझ्या बालबुद्धीने त्याची पूर्तता करू शकले नाही.
संत गजानन महाराजांचे असे अनेक अनुभव घेऊन हा अध्यात्मिक प्रवास सुरु आहे. शेगावला तर प्रत्येकालाच काहीतरी अनुभव येतोच येतो.

                  आयुष्यात मनाला स्पर्शून गेलेला अनुभव मी अखेरच्या श्वासापर्यंत विसरणार नाही. पुढील वेळी शेगावला गेले तेव्हा भाऊना भेटले. का कोण जाणे त्या वेळी निघताना मला त्यांनी विचारले आज फोटो नाही का काढायचा तुला ? मागे वळून पहिले आणि डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली....भाऊंचे शब्द आठवले .. “ ह्या सर्व शक्ती आपल्या आकलनाच्या पलीकडे आहेत ”.

हा लेख महाराजांच्याच रुपात मला भेटलेल्या भाऊना सादर अर्पण. 

जय गजानन श्री गजानन.


अभिप्राय खालील संकेत स्थळावर पाठवावेत

https://www.facebook.com/antarnad18/

https://antarnad18.blogspot.in




Wednesday, 23 May 2018

स्वामी माझा मी स्वामींचा

|| श्री स्वामी समर्थ ||




                                      गाडी अक्कलकोटला आली.साहेब उतरले; बाईपण उतरल्या..! "आलं एकदाचं तुझं अक्कलकोट "साहेब पुटपुटले व म्हणाले; "आता हे सामान कोण नेणार? रहायची सोय? गर्दी किती आहे पाहिलंस? तरी मी म्हणत होतो.मला यायचं नव्हतं...या स्वामींच्या पायात सगळं वाया घालवलं..!"

"आता बास की! " त्या म्हणाल्या. तितक्यात एक वयस्कर गृहस्थ मुंडासे बांधलेला धांवत आला.." जी;सामान न्यायचंय? " साहेब त्याला वरपासून खालपर्यंत निरखत राहिले..! बाईच म्हणाल्या "न्यायचंय.पण गर्दी दिसतेय.कुठं रहायचं ठरलं नाहीए ..कोण तुम्ही नेणार? " 
"हां " साहेब संशयानं अजूनही पहात होते.बाईंना म्हणाले "कोण कुणास ठाऊक माहिती नाहीए. तू लागलीस बोलायला " 
"जी..मी बराबर घेऊन जातो बगा ..छान रहायची सोय बी व्हईल " 

"मग घे सामान? "बाई म्हणाल्या."घे सामान काय? कोण रे तू? आणि नेणार कुठं? नाही त्या ठिकाणी नेशील आणि आम्हाला सामानाला मुकावं लागेल " साहेब म्हणाले..तो वयस्कर गृहस्थ हसला ;" माजं नाव नरसू ..म्या कशापाई फसवेन? फसलेत समदेच देवा; कुनी शहाना न्हाई मग म्या मारग दाखवतो..! चलातर " असं म्हणत त्यानं सामान डोक्यावर घेतलं.बाईं साहेबांना हळूच म्हणाल्या "आता गप्प बसा..किती गर्दी आहे. सोय झाल्याशी मतलब. " 

एका छानशा घरापाशी सामान नेऊन त्या नरसूनी त्यांची व्यवस्थित सोय लावली..साहेब लंगडत होते हे त्यानं पाहिलं होतं.सोय लागताच त्यानं विचारलं "पायाला काय झालंय जनू? " 
"2 वर्षापूर्वी अॅक्सिडेंट झालेला. हाडाचा चुरा झाला. .ऑपरेशन झालं होतं.पण पाय अधू झाला." बाई म्हणाल्या.नरसू साहेबाच्या पाया नजिक बसला..त्याच्या डोळ्यात करुणा दाटली..! "स्वामी बाबाची कृपा म्हनून आलायसा न्हवं " तो म्हणाला.ते ऐकून साहेब ऊसळले "कसले स्वामी कसलं काय? माझा विश्वास नाहीए. हिच्यासाठी आलोय इथं..मी तर कधीही यापूर्वी आलो नाही. हिनं अखेरची शपथ घातली म्हणून. मी नास्तिक आहे..! जा बाई आता दर्शन करुन ये मी पडतो..कटकट आहे ..!" 
"जा तुम्ही बाई मी थांबतो हतंच..साहेब तुमचा पाय मालिशनं बरा करतो " नरसू म्हणला.
"नको रे आहे ते बिघडवशील " साहेब म्हणले.

" मी येते जाऊन. "बाई म्हणाल्या व गेल्या. नरसूनं साहेबांचा पाय हाती घेतला..जसा पाय चोळत गेला..तसं साहेबांना निद्रा लागली..थोड्यावेळानं जाग आली तेव्हा खूप बरं वाटत होतं..त्यांनी पाहिलं.ऊशापाशी नरसू होता..!! सहज पायाकडं लक्ष गेलं.काहीतरी पानं बांधून पट्टी बांधलेली. साहेब क्षीण आवाजात म्हणले "नरसू;पाणी हवंय " त्यानी लगबगीनं पाणी आणलं.आधार देत स्वत: पाणी पाजलं .." बरं वाटेल बगा आता तुमाला. लै प्रवास जाला नं म्हनून.नरसू म्हणाला " 
"बरं वाटतंय ;चहा मिळाला तर बरं .होईल ..,

"हां आन्तो नं ..!" म्हणत गडबडीनं गेला.चहा आणला.पुन्हा आधार देत चहा पाजला..साहेबांनी त्याच्याकडं प्रेमानं पाहिलं.व म्हणाले ;."नरसू ; तुझ्यात देव आहे खरा..हाच देव..आणि लोक मुर्खासारखे मंदिर ;मठाचं स्तोम माजवतात..कुठले बाबा;स्वामी " 
"बराबर आहे ;नरसू म्हणाला "; त्यो नांदतो मंदिरात;मठात पर स्पंदतो हृदयात..!" यांवर साहेब हसले म्हणले.;"भोळा आहेस; तू इतकं केलंस..तोच देव." 

"आदी संशाव घेतलात" नरसू म्हणाला.साहेब लगेच ऊत्तरले;"
 "तसं वागावं लागतं.फसवणूक होते " नरसू हसला " बराबर हाय मानूस हरघडी फसतो.त्याला ऊमगत न्हाई.समोर असूनबी ..; तो ऊठत म्हणाला ";बरं जाऊ का? झालं काम माजं " साहेबानं त्याचे हात पकडले "का चाललास? बस."
 तो म्हणला " हाय म्या हतंच कायमचा.. पर न्हाई अजून कुनीतरी आल्येलं असल न्हवं .त्याचं बघायला हवं " अन् हे बोलून नरसू वळाला..

बाई घाईघाईनं वर आल्या "नरसू कुठंय? " साहेब म्हणले "गेला तो " बाई तिथंच कोसळल्या..रडायला लागल्या ..साहेबांना कळेना. ते उठले.पायातील कळ गेलेली..आश्चर्य वाटलं.तिला सावरत विचारलं "काय झालं?काही चोरीला गेलं? " बाईंनी पाहिलं "काय विचारता हे..हो गेलंय चोरीला..मिच गेलीय ..मी मठात गेले.तिथं नमस्कार केला अन् स्वामी मुखवट्यात नरसूची मुर्ती ..कितीतरी वेळ...!! " 
साहेब मटकन खाली बसले.सगळं आठवलं त्याचे बोल.- म्या हाय हतंच कायमचा ..समोर असूनबी वळकत न्हाई ..
आपण बोललो.."तुझ्यात देव आहे मठात ;मंदिरात नाही " तो ऊत्तरला "मठात मंदिरात नांदतो;हृदयात स्पंदतो "..साहेबांच्या नास्तिकतेचा वज्रलेप कोसळला..देव असाच भेटत असतो पण अहंपायी दिसत नाही..म्हणूनच नास्तिकता वर्चस्व गाजवते...ह्या विचारांत नरसूचा चेहरा आठवला.एकदम नरसू हे नावही वीजेसमान चमकून गेलं..स्वामी म्हणायचे "मी नृसिंहभान बरें " 

हे जाणवताच साहेबांचा बांध फुटला...डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. अंत:करणापासून त्यांनी हांक मारली "स्वामी sss! " 



Thursday, 17 May 2018

किमया भगवंताची.

||श्री स्वामी समर्थ||




एका जुन्या इमारतीत त्या वैद्याचे घर होते. घराच्या मागच्या भागात त्याने संसार थाटला होता आणि पुढच्या भागात दवाखाना. त्याच्या पत्नीची सवय होती कि, दवाखाना उघडण्यापूर्वी संसाराला लागणारी, त्या दिवसाच्या सामानाची एक चिठ्ठी, ती दवाखान्यात ठेवत असे. पूजाअर्चा करून वैद्य महाराज दवाखान्यात येत आणि भगवंताचे नाव घेऊन ती चिठ्ठी उघडत. पत्नीने ज्या गोष्टी त्यात लिहिल्या आहेत, त्यांच्यासमोर ते त्या वस्तूंचे भाव लिहीत असत आणि त्याचा हिशेब करत असत. 

नंतर मग परमात्म्याची प्रार्थना करून म्हणत, "हे दयाघना भगवंता, मी केवळ तुझ्याच आदेशानुसार, तुझी भक्ती सोडून, इथे या दुनियादारीच्या चक्रात येऊन बसलो आहे." वैद्यजी कधीच आपल्या तोंडाने रोग्याला फ़ीस मागत नसत. कुणी द्यायचे तर कुणी नाही, परंतु एक बाब निश्चित होती, कि त्या दिवसाच्या सामानाचा लावलेल्या हिशेबाची रक्कम पूर्ण झाली कि नंतर आलेल्यांकडून ते काहीच फीस घेत नसत, मग तो येणारा रोगी कितीही पात्र आणि श्रीमंत असो. 

एक दिवस वैद्याने दवाखाना उघडला. गादीवर बसून परमात्म्याचे स्मरण करून पैशाचा हिशेब लावण्यासाठी चिठ्ठी उघडली आणि ते अवाक झाले, एकटक बघतच राहिले. काही क्षण त्याचे मन भरकटले, डोळ्यासमोर तारे चमकायला लागले. परंतु दुसऱ्याच क्षणी त्याने आपल्या मनावर नियंत्रण मिळवले. गव्हाचे पीठ, तेल-तूप-मीठ, तांदूळ-डाळ या सामानानंतर पत्नीने शेवटी लिहिले होते, "मुलीचे लग्न येत्या २० तारखेला आहे, तिच्या लग्नाला, हुंड्याला लागणारे सामान"

काही वेळ विचार करून बाकी सगळ्या सामानांची किंमत लिहून लग्नाला लागणाऱ्या सामानासमोर त्याने लिहिले, "हे काम भगवंताचे आहे, तो जाणे आणि त्याचे काम जाणे." 

नेहेमीप्रमाणे काही रोगी आले, त्यांना वैद्याने औषधी दिली. या दरम्यान एक मोठीशी कार त्यांच्या दवाखान्यासमोर येऊन थांबली. वैद्याने काही खास लक्ष दिले नाही, कित्येक कार त्यांच्याकडे येत असत. आधी आलेले रोगी औषधी घेऊन चालले गेले. तो सूट-बुटातला साहेब कारमधून बाहेर आला आणि नमस्कार म्हणत बेंचवर बसला. वैद्य म्हणाला, “आपल्याला जर औषधी पाहिजे असेल तर आपण इकडे स्टूल वर या म्हणजे मी आपली नाड़ी परीक्षा करू शकेल आणि कुणा इतरांसाठी औषधी हवी असेल तर रोगाचे, स्थितीचे वर्णन करा.”

ते साहेब म्हणू लागले, "वैद्यजी, तुम्ही मला ओळखले नाही का? माझे नाव कृष्णलाल आहे. आणि आपण तरी कसे ओळखणार, कारण मी १५-१६ वर्षानंतर आपल्याकडे आलो आहे. आपल्याला मी आपल्या मागच्या मुलाखतीबद्दल सांगतो, म्हणजे सारे काही समजून येईल. जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो ना तेव्हा मी स्वतःहून आलो नव्हतो, खरे तर ती ईश्वरी योजनाच होती. ईश्वराला माझ्यावर कृपा करण्याची इच्छा झाली होती, कारण त्याला माझे घर आबाद करायचे होते, माझ्या जीवनात भरभरून सुख आणायचे होते. आणि आपली ती पहिली भेट आठवली, कि आज देखील ईश्वराच्या त्या साहजिक कृपेच्या प्रसंग आठवणीने, मी विनम्र होतो, नतमस्तक होतो, अशब्द होतो. 

झाले असे होते कि मी आपल्या पैतृकांच्या घरी जात होतो. अगदी आपल्या दवाखान्याच्या समोर माझी कार पंक्चर झाली. ड्राईवर कारचे चाक काढून पंक्चर लावायला चालला गेला. आपण बघितले कि मी उन्हामध्ये कारजवळ उभा आहे. आपण माझ्याजवळ आलात आणि दवाखान्याकडे बोट दाखवून आत यायला विनंती केली, इथे खुर्चीमध्ये सावलीत बस म्हणून म्हणालात. आंधळ्याला काय दोन डोळेच पाहिजे असतात, मी खुर्चीमध्ये येऊन बसलो. आपण मला यथोचित गूळ-पाणी देऊन तृप्त केले. का कोण जाणे पण ड्राइवरने देखील काही जास्तच वेळ घेतला होता. 

दुपार झाली होती. एक छोटीशी मुलगी आपल्या गादीपाशी उभी होती आणि म्हणत होती, "चला ना बाबा, मला भूक लागली आहे. आपण तिला म्हणत होता, बाळा थोडा धीर धर,, जाऊ यातच आपण. 

मी हा विचार केला कि इतक्या वेळचा आपल्याजवळ बसलो आहे आणि माझ्यामुळे आपण जेवायला देखील जाऊ शकत नाहीत. म्हणून काहीतरी औषधी विकत घेऊन टाकू, म्हणजे माझ्या बसण्याचा भार हलका होईल, काही उद्देश प्राप्त होईल.  मी आपल्याला बोलता बोलता म्हणालो, "वैद्य महाराज, मागच्या ५ - ६ वर्षांपासून मी इंग्लंडमध्ये राहतो, व्यवसाय करतो तिथे. इंग्लंडला जाण्यापूर्वीच माझे लग्न झाले आहे, पण संतती-सुखापासून मात्र अजून वंचित आहे. इथे भारतात देखील बरेच इलाज केले, तिथे इंग्लंडमध्ये देखील दाखवले, पण पदरी निराशाच पडली आहे. 

आपण म्हणालात, "भगवंतापासून निराश होऊ नका, तो अत्यंत दयाळू आहे, तो खूप मोठा दाता आहे. आपण म्हणालात, लक्षात ठेवा त्याच्या कोषागारात कशाचीही कमी नाही. कशाचीही आस तो पूर्ण करतो. संतती, धन-दौलत, इज्जत, सुख-दुःख, जीवन-मृत्यु, सारे काही त्याच्याच हातात आहे. ते कुणा वैद्य किंवा  डॉक्टरच्या हातात नसते. ते कोणत्या औषधाने मिळत नाही. जे काही व्हायचे असते ते सारे भगवंताच्या आदेशाने होत असते. संतती जरी द्यायची असेल तरी दाता तोच आहे. आजदेखील तो प्रसंग जशाच्या तसाच माझ्या नजरेसमोर आहे. माझ्याशी हे सारे बोलत असताना, आपण एकीकडे औषधाच्या पुड्या बांधत होतात. सगळ्या औषधी आपण दोन भागात विभाजित करून, दोन वेगवेगळ्या पाकिटात टाकल्या, आणि मला विचारून एका पाकिटावर माझे नाव टाकले, आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे. माझ्या हातात ते सुपूर्द करून औषधी घेण्याची विधी आपण समजावलीत.

मी ताबडतोब ती औषधी घेतली. कारण त्याच्यामागे फक्त आपल्याला काही पैसे देणे हा उद्देश होता. परंतु आपण पैसे घेण्याला नकार दिला. ‘बस, ठीक आहे’ म्हणालात. जेव्हा मी आग्रह केला तेव्हा आपण म्हणालात कि आजचे खाते बंद झाले आहे. मला काहीच समजले नाही. परंतु या दरम्यान आपल्याकडे एक व्यक्ती आला. त्याने आपली चर्चा ऐकून मला सांगितले कि आजचे खाते बंद झाले म्हणजे वैद्य महाराजांना आजच्या दिवसाची घरेलू खर्चासाठी लागणारी राशी, जी त्यांनी भगवंताला मागितली होती, तेवढी भगवंताने त्यांना रोग्यांमार्फत दिली आहे. त्याशिवाय ते अधिक पैसे कुणाकडूनही घेत नाही. 
मी काहीसा परेशान झालो कारण मी माझ्या मनानेच लज्जित झालो. माझे विचार किती निम्न होते आणि हा सरलचित्त वैद्य किती महान आहे. मी जेव्हा घरी जाऊन पत्नीला औषधि दाखवली आणि सारा प्रसंग तिच्यासमोर उभा केला तेव्हा तिला भगवतदर्शनाचा आनंद झाला, तिच्या डोळ्यातून पाणी आले, मन भरून आले, आणि ती म्हणाली ते वैद्य म्हणजे कुणी व्यक्ती-माणूस नसून माझ्यासाठी तो देवतारूप माध्यम बनून आला आहे. आजवर एवढी सारी औषधी घेतली, एवढे वैद्य, हकीम, डॉक्टर झाले, आज मला माझ्या मनीची इच्छा पूर्ण करणारा भगवंत या वैद्याच्या रूपाने, या औषधी स्वरूपाने भेटला आहे. हे औषध माझ्या संततीसुखाचे कारण आहे, आपण दोघेही श्रद्धेने हे औषध घेऊ यात. 

कृष्णलाल वैद्याला पुढे सांगू लागला, आज माझ्या घरी दोन फूल उमलले आहेत. आम्ही दोघे पति-पत्नी हरघडीला आपल्यासाठी प्रार्थना करत असतो. इतक्या वर्षात व्यवसायामुळे मला वेळच मिळत नव्हता कि स्वतः येऊन आपल्याला धन्यवादाचे  दोन शब्द बोलावे म्हणून. इतक्या वर्षांनी आज भारतात आलो आहे आणि कार केवळ आणि मुद्दाम इथेच थांबवली आहे. वैद्यजी आमचा सारा परिवार इंग्लंडमध्ये सेटल झाला आहे. केवळ माझी एक विधवा बहीण आणि तिची मुलगी इथे भारतात असते. 

आमच्या त्या भाच्चीचे लग्न या महिन्याच्या २१ तारखेला होणार आहे. का कोण जाणे जेव्हा-जेव्हा मी आपल्या भाच्चीसाठी काही सामान खरेदी केले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आपली ती छोटीशी मुलगी यायची आणि मग प्रत्येक सामान मी डबल खरेदी करायचो. मी आपल्या विचारांना, तत्वाला, मूल्यांना जाणत होतो, कि संभवतः आपण हे सामान न घेवोत, परंतु असे वाटत होते कि माझ्या सख्ख्या भाच्चीच्या बरोबर मला नेहेमी जो चेहरा दिसत आहे, ती पण माझी भाच्चीच तर आहे. माझे तिच्याशी एक नाते त्या भगवंताने असे जोडले आहे, आणि म्हणून आपण त्या नात्याला नकार देणार नाही, कारण माझ्या भाच्चीबरोबर या भाच्चीचा ‘भात भरण्याची’ माझी ज़िम्मेदारी त्याने मला दिली आहे.

वैद्याचे डोळे आश्चर्याने उघडेच्या उघडेच राहिले आणि सौम्य आवाजात म्हणाले, ''कृष्णलालजी, आपण जे काही म्हणत आहात ते मला काहीच समजेनासे झाले आहे, ईश्वराची काय माया आहे हे त्याचे तोच जाणे. आपण माझ्या ‘श्रीमती’च्या हाताने लिहिलेली हि चिठ्ठीबघा" असे म्हणून वैद्यांनी ती चिठ्ठी कृष्णलालजींना दिली. 

तिथे उपस्थित सारे ती चिठ्ठी बघून हैरान झाले, कारण "लग्नाचे सामान" याच्यासमोर लिहिले होते ''हे काम परमेशाचे आहे, त्याचे तोच जाणे"

कंपित आवाजात वैद्य म्हणतात, "कृष्णलालजी, विश्वास करा कि आजपावेतो कधीही असे झाले नाही कि पत्नीने चिठ्ठीवर आवश्यकता लिहिली आहे आणि भगवंताने त्याची व्यवस्था केली नाही. आपण सांगितलेली  संपूर्ण हकीकत ऐकून असे वाटते कि भगवंताला माहित होते कि कोणत्या दिवशी माझी श्रीमती काय लिहिणार आहे. अन्यथा आपल्याकडून इतक्या दिवस आधीपासून या सामान खरेदीचा आरम्भ परमात्म्याने कसा करवून घेतला असता?

"वाह रे भगवंता, तू महान आहेस, तू दयावान आहेस. मी खरंच हैरान आहे कि तो कसे आपले रंग दाखवतो आहे."

*चातकाची तहान किती | तृप्ति करूनि निववी क्षिती ||१||*
*धेनु वत्सातें वोरसे | घरीं दुभतें पुरवी जैसें ||२||*
*पक्कान्न सेवुं नेणती बाळें | माता मुखीं घालीं बळें ||३||*
*एका जनार्दनीं बोले | एकपण माझें नेलें ||४||*

वैद्यजी पुढे म्हणतात, "जेव्हापासून मला समजू लागले, केवळ एकच पाठ मी वाचला आहे. सकाळी उठून तुझी भक्ती करण्यासाठी मी अजून जिवंत आहे म्हणून त्या परमात्म्याचे आभार मानायचे, संध्याकाळी आजचा दिवस चांगला गेला म्हणून त्याचे आभार मानायचे, खाताना, झोपताना, श्वास घेताना, असा हरघडीला त्याचे स्मरण करायचे, त्याचे आभार मानायचे. 

*दळिता कांडिता | तुज गाईन अनंता ||१||*
*न विसंबे क्षणभरी | तुझे नाम गा मुरारी ||२||*
*नित्य हाचि कारभार | मुखी हरि निरंतर ||३||* 
*मायबाप बंधुबहिणी | तू बा सखा चक्रपाणि ||४||* 
*लक्ष लागले चरणासी | म्हणे नामयाची दासी ||५||*

Monday, 14 May 2018

आपले प्रेम असेच राहूदे

|| श्री स्वामी समर्थ ||





नमस्कार मंडळी,

               आजपर्यंत “अंतर्नाद “ ह्या ब्लॉगला १००० पेक्षा जास्ती वाचकांनी भेट दिली आहे. त्याबद्दल मी सर्व वाचकांचे मनापासून आभार मानते. दाद देणारा उत्तम वाचकवर्ग असेल तर आपल्या लिखाणाचे चीज होते. गेल्या दीड महिन्यात ब्लॉग सुरु झाल्यापासून मला खूप लोकांनी फोन, email ,whatsapp आणि इतरही माध्यमातून ,प्रत्यक्ष भेटून जे प्रोत्चाहन दिले त्यांची मी शतशः ऋणी आहे. आपली सर्वांची साथ आणि वेळोवेळी केलेले अमूल्य मार्गदर्शन फार फार मोलाचे आहे, त्यावर ह्या ब्लॉगची पुढील वाटचाल सुरु राहील .


 माझ्या पाठीशी सदैव उभे राहून प्रेरणा देणाऱ्या सद्गुरू श्री स्वामीसमर्थांच्या चरणी त्रिवार वंदन.