Wednesday, 4 July 2018

मधुमेह आणि लठ्ठपणा - करुया कायमचा रामराम

|| श्री स्वामी समर्थ ||


डॉ. जगन्नाथ दिक्षित



मंडळी ,     
      आजची आपली जीवनशैली पाहता घड्याळ आपल्यासाठी कि आपण घडाळ्यासाठी असा प्रश्न पडतो. कामाची बाराखडी जणू मागेच असते आपल्या. वाढती महागाई , खर्च ह्याचा ताळमेळ घालण्यासाठी पतीपत्नी दोघानाही नोकरी व्यवसाया निम्मिताने बाहेर जावे लागते. आज मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी करणार्यांच्या घरी येण्याच्या वेळा निश्चित नसतात. आपले आयुष्य आता ८.११ ची सकाळची लोकल आणि ७.१३ ची संध्याकाळची लोकल ह्या भोवतीच फिरत असते. आपण सर्वच आता जणू पैसे मिळवायची यंत्रच झालो आहोत ,पण हे सर्व करत असताना आपले दुर्लक्ष होते आहे ते आपल्या तब्येतीकडे. बराच वेळ घराबाहेर राहिल्यामुळे एकतर कार्यालयात असलेल्या कॅन्टीन मध्ये जेवणे किंवा मग जिथे असू तिथे जे मिळेल ते पोटात ढकलून तात्पुरती भूक भागवणे ह्याला पर्याय नसतो. वेळीअवेळी बाहेरचे खाणे,अपुरी झोप, जागरणे ,रोजच्या जीवनातील चिंता ह्या सर्वांचा दूरगामी परिणाम कळतनकळत आपल्या प्रकृतीवर नाही झाला तरच नवल. 
ह्या सर्वांमुळे आजकाल प्रामुख्याने वाढीस लागलेला आजार म्हणजे “ मधुमेह ” आणि लठ्ठपणा.


      मंडळी, एखादा आजार झाला मग तो कुठलाही असो, तो का झाला त्याहीपेक्षा तो पूर्ण बरा कसा होईल हे पाहणे सर्वात महत्वाचे असते. तुमच्या मनाची ताकद , सकारात्मक विचारसरणी असेल तर तुम्ही कुठल्याही आजारावर मात करू शकता ह्यात शंकाच नाही.

     मधुमेह झाला म्हणजे आपले जीवन संपले अश्या प्रकारची भीतीदायक विधाने ऐकायला येतात. पण आपले अर्धवट ज्ञानच फार धोकादायक असते. फक्त साखर खाल्याने मधुमेह होतो हा गैरसमज आहे ,त्यासाठी इ अनेक कारणेही असू शकतात.

आज मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि ह्याचे मुख्य कारण आपल्या जेवायच्या अनियमित वेळा, अपुरी झोप, चिंता, शरीराला नसलेला पुरेसा व्यायाम , अनियंत्रित आहार आणि वाढणारे वजन. आम्हाला कुठे वेळ असतो चालायला?दिवसभर घरचे ऑफिसचे काम करून जीव मेटाकुटीला येतो अशी सर्वसाधारण वाक्ये कानी पडतात. आपल्याला वेळ नसतोच ,तो आपल्याला काढायला लागतो तेही आपल्या स्वतःच्या उत्तम भविष्यासाठी . थोडा विचार केलात तर आपल्याला रोज २-३ तास टीवी वरील मालिका, whatsapp, सोशल मिडिया ह्या सर्व गोष्टींसाठी वेळचवेळ असतो फक्त व्यायाम न करण्यासाठी आपल्याला अनेक सबबी अगदी सहज सुचतात.
लठ्ठपणाची कारणे

मंडळी , जिथे प्रश्न आहेत जिथे उत्तरेही आहेतच .मधुमेह झाला म्हणून घाबरून जायचे अजिबात काहीच कारण नाही. मधुमेहाबरोबरच लठ्ठपणा ज्याला आपण Obesity म्हणतो त्याचेही प्रमाण सर्वसाधारणपणे वाढीस लागलेले दिसून येते .Obesity itself is a Disease. आपले वजन वाढले कि मग आपोआपच अनेक आजार आपल्या आश्रयाला येतातच, त्यामुळे ह्या सर्वांवर वेळीच उपाय करणे उत्तम.
कै.(डॉ) श्रीकांत जिचकर ह्यांनी ह्या विषयावरती खूप संशोधन केले ,ह्यावर अनेक ठिकाणी  व्याख्यानेही दिली. भारतीय लोकांचे आहारशास्त्र ह्याचा अभ्यास करताना त्यांनी ह्या सर्वाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आणि एक ठोस प्रणाली आखली जेणेकरून आपण ह्या सर्वावरती मात करू शकतो. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत पण त्यांच्या ह्या कार्याची धुरा औरंगाबाद येथील डॉक्टर श्री जगन्नाथ दिक्षित यांनी उचलली आहे. त्यांचे कुटुंब , सहकारी डॉक्टर यांनी त्यांना ह्या कार्यात मोलाचा पाठींबा दिला असल्याने ह्या कार्याने आज प्रचंड वेग घेतला आहे.

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक Diet Plan करतो पण बरेच वेळा आपल्याला त्यात अपयश येते. मग काय मागचे पाढे ५५ असे म्हणून निराश होतो आणि काय व्हायचे ते होणार अशी मनाची चुकीची समजूत घालतो. मला सपूर्ण विश्वास आहे कि वरती उल्लेख केल्याप्रमाणे अनेक उपाय करून थकलेल्या सर्वाना हि संकल्पना रोगमुक्त करेल तेही पूर्णपणे.
           
           डॉक्टर दिक्षित यांचा “ Effortless weightloss  and Diabetes Prevention " अत्यंत वेगळा आणि साधा सोप्पा आहे. त्यासाठी आपल्याला एकही पैसा खर्च करायचा नाही हे सर्वात विशेष. थोडासा मनाचा ब्रेक आणि मनोनिर्धार आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवलात तर आपण सर्व आजारातून मुक्त होवू ह्यात शंकाच नाही.


प्रत्येकाला अगदी सहज जमेल अश्या ह्या diet program ची संकल्पना जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी डॉ दिक्षित अनेक ठिकाणी स्वतः व्याख्याने देत आहेत. आज त्यांच्या बरोबर डॉक्टरांची एक टीम सुसज्ज आहे जी ह्या कार्याचा जोमाने प्रचार करत आहे. हजारो लोकांना ह्याचा फायदा होताना दिसत आहे .विनासायास वेटलॉस हि संकल्पना अत्यंत साधी प्रत्येकाला सहज करता येणारी आहे. डॉक्टरांची ह्या विषयावरील अनेक पुस्तके हि उपलब्ध आहेत. फेसबुक सारख्या सोशल मिडिया वरतीही ह्यासंबंधी माहिती उपलब्ध आहे.

“India free from Obesity and Diabetes ” ह्या मोहिमेत जास्तीतजास्त संखेने लोक आज सामील होत आहेत. आपल्या घरात किंवा शेजारी ,आपले आप्तेष्ट ,मित्र , ओळखीचे ह्या पैकी कुणालाही लठ्ठपणा किंवा मधुमेह हे आजार असतील तर डॉक्टर दिक्षित ह्यांच्या ह्या संकल्पनेची माहिती करून आपण ह्या आजाराला कायमचा रामराम ठोकू शकतो.


चालण्याला पर्याय नाही
        मंडळी ,आयुष्य खूप सुंदर आहे ,ते आनंदात घालवायचे आहे. आयुष्यभर अथक परिश्रमाने मिळवलेला पैसा हे सुंदर जग फिरण्यासाठी ,आपल्या हौसेमौजेसाठी वापरायचा कि त्यातून आयुष्याच्या अखेरीला हॉस्पिटलची बिले भरत राहायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे. आयुष्याची संध्याकाळ आनंदात घालवायची असेल तर फिजिकल फिटनेस अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची सुरवात ह्या क्षणापासूनच व्हयायला हवी.. आपला आहार कसा असावा आणि आपली जीवनशैली कशी असावी हे सर्व आपल्याच तर हाती असते. आजकालच्या so called modern जगात आपण आपल्या शरीर प्रकृतीचा ह्रास करून घेतला आहे.
परंतु चांगल्या गोष्टींसाठी कधीच उशीर होत नसतो. 
         
          डॉक्टर दिक्षित यांनी आपल्या व्याख्यानातून मधुमेहा बद्दल असलेले सर्व गैरसमज तर दूर केलच आहेत पण मुळात आपण नक्की बरे होवू शकतो आणि ह्या आजारास आपल्या आयुष्यातून पळवून लावू शकतो हा विश्वास दिला आहे .आज अनेक लोकांच्या ,डॉक्टरांनी सांगितलेला diet plan केल्यानंतरच्या, यशोगाथा वाचल्यावर मी तर डॉक्टरांच्या पुढे नतमस्तक झाले.
        
          मनात आले हजारो बरे झाले आणि लाखो बरे होणार आहेत ह्यासाठीच डॉक्टर जगन्नाथ दिक्षित नावाचा देवदूतच जणू आपल्यासाठी परमेश्वराने पाठवला आहे.


आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे...

चला तर मग आजच सुरवात करुया आणि “India free from Obesity and Diabetes ” ह्या मोहिमेत आपणही सहभागी होऊया.

ह्या लेखाद्वारे मी सर्वाना मनापासून आवाहन करत आहे कि आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्याही आनंदी, सुधृढ आयुष्यासाठी हा लेख जास्तीतजास्त शेअर करा जेणेकरून अनेकांना ह्याचा फायदा होईल.


लेख आवडला तर अभिप्राय जरूर कळवा.

https://www.facebook.com/antarnad18/

antarnad18.blogspot.in













Saturday, 2 June 2018

अमृततुल्य ग्रंथ “ श्री गजानन विजय "

||श्री स्वामी समर्थ ||





        अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणा कळे | असो खलही केव्हडा तव कृपे सुमार्गी वळे   |
        उणे पुढती ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी   | शिरी सतत माझिया वरदहस्त ठेवा झणी   ||


मंडळी,  
                       भारतभूमी हि संतांच्या सहवासाने ,पुण्यस्पर्षाने पावन झाली आहे. संतसेवा करणारा परमेश्वर कृपेसहि पात्र ठरतो. संत हे ईश्वराचे प्रतिक आहेत. त्यांच्या सेवेने आपण आपल्या षड्रिपूंवर ताबा मिळवू शकतो ,आपली मनोरथे पूर्ण होतात , त्यांच्या स्मरणाने आपले जीवन उजळून निघते ,आपल्या इच्छा फलद्रूप होतात म्हणून त्यांना परिसाची ,कामधेनु, कल्पवृक्षाची उपमा दिली आहे.

                       अध्यात्म हा मानवी जीवनाचा आधार आहे. मनुष्यास संकटे आली कि तो परमेश्वर चरणी धाव घेतो. शेवटी आपल्याला दिलेले दोन हात त्यालाच जोडायचे आहेत. “श्री गजानन विजय”, “ गुरूलीलामृत ”, “ साई चरित्र ” , “दासबोध ” , “ भगवतगीता ” असे अनेक ग्रंथ आहेत ज्यांच्या पुनश्चरणाने मन एकाग्र होवून मनास शांतता मिळते, आपल्या संकटातून हळूहळू मार्ग दिसतो .वरील उल्लेखलेल्या आणि अश्या अनेक ग्रंथांचे नित्य वाचन करणारे लाखो भक्त आहेत.

          
श्री गजानन लीलेचा | पार कधी न लागायाचा | अंबरीच्या चांदण्याचा | हिशेब कोणा न लागे कधी ||

                एका जागी बसून अत्यंत श्रद्धायुक्त मनाने, विनम्रतेने नतमस्तक होवून ,संपूर्णता शरणागत होवून ,एकनिष्ठ राहून ,कुठल्याही भौतिक सुखाची लालसा न धरता ,केवळ सेवा हा भाव मनी ठेवून कुठल्याही ग्रंथाचे केलेलं वाचन म्हणजे “ पारायण ”.

          आज आपण दासगणू महाराजांनी लिहिलेल्या जीवनरूपी सार असलेल्या“ श्री गजानन विजय “ ह्या ग्रंथाबद्दल जाणून घेवू.
दासगणू महाराजांनी संस्थानातील जुनी कागदपत्रे तपासून , त्यातील संदर्भाची पारख करून, महाराजांना त्यावेळी प्रत्यक्ष भेटलेल्या काही व्यक्तींशी बोलून हा पवित्र ग्रंथ रचला. दासगणू महाराज रोज एक अध्याय लिहित असत आणि संध्याकाळी तो मठात सर्वाना वाचून दाखवत असत . अश्याप्रकारे त्यांनी २१ दिवसात २१ अध्याय लिहिले. दासगणू महाराजांचा ह्या सेवेसाठी एक लहानसा सत्कार करायचे संस्थानाने ठरवले. एका ताटात पाकीट , पंचा , श्रीफळ असे ठेवून त्यांना देवू केल्यावर दासगणू महाराजांनी त्यातील फक्त पंचा घेतला आणि बाकी सर्व रक्कम शेगाव संस्थानाच्या कार्यासाठी देवू केली तसेच ह्या पोथीचे सर्व हक्कही संस्थानास देवून टाकले. मंडळी आपण थोडेसे लिखाण केले तरी त्यावर आपला हक्क सांगतो आणि दासगणू महाराजांनी बघा सर्व हक्क संस्थानास देवून टाकले.

       
अपराध माझे गुरुवरा , आज सारे क्षमा करा | वरदहस्त ठेवा शिरी  मी अनंत अपराधी ||


 “ श्री गजानन विजय “ हा ग्रंथ एक अलौकिक सुखाचे भांडार आहे. संतानी त्यांच्या शिकवणीतून आपले जीवन समृद्ध केले. माणसाने माणसाशी कसे वागायचे ते शिकवले. माणसातच देव आहे त्याला अन्य कुठेही शोधू नका हि शिकवण सर्व संतानी दिली.
दासगणू महाराजांनी लिहिलेल्या हा रसाळ ग्रंथ आपल्याला जीवनाची मूल्य शिकवणारा आहे. २१ अध्यायाचा हा मोदक रुपी प्रसाद आपले जीवन आनंदाने उजळून टाकील यात कुठलाही संदेह नाही. २३ फेब्रुवारी,१८७८ रोजी ऐन तारुण्यातील गजानन महाराज देविदास पातुरकर ह्यांच्या वाड्या समोर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीवरील अन्न खाताना प्रथम दिसले. अजानुबाहू असलेल्या महाराजांची कांती सतेज होती ,मुखाने सतत ते “ गण गण गणात बोते ” म्हणत असत ज्याचा अर्थ प्रत्येक जीवात परमेश्वर आहे असा आहे. महाराजांचा काहीही नेम नसे ,कधी ते मौनव्रत धारण करत तर कधी भजन करत ,तर कधी शय्येवर नुसतेच पडून राहत असत. . मानवी जीवनाचे कल्याण करण्यासाठी प्रत्यक्ष ईश्वरानेच त्यांना ह्या भूमीवर धाडले .धन्य ते शेगाव आणि तेथील निवासी , त्यांचे अहोभाग्य म्हणून त्याना ह्या गजानन रत्नाचा सहवास लाभला.

          हा ग्रंथ आपल्याला प्रत्येक अध्यायात जीवनातील अमुल्य गोष्टींची शिकवण देऊन जातो. प्रथम अध्यायात आपण जे अन्न फुकट घालवतो त्यावर एक माणूस जेवू शकतो हि शिकवण महाराजांनी दिली. मंडळी विचार करा रोज आपल्या घरात किती अन्न फुकट जाते ,नुसते ग्रंथ वाचून काहीही होत नाही त्यातील गोष्टी आपल्या आतमध्ये भिनायला लागतात ,संतांची शिकवण आचरणात आणली तरच आपली प्रगती होईल अन्यथा सर्व व्यर्थ आहे. असो. द्वितीय अध्यायात तिन्हीसांजेला महाराज त्यांचे निस्सीम भक्त बंकटलाल ह्यांच्या घरी आले असता त्यांनी वेळ न दवडता सकाळी शिजवलेले अन्न प्रामाणिक पणे महाराजांना वाढले. महाराजांनी तृप्त होवून आशीर्वाद दिला. पण त्यांचेच बंधू इच्छाराम ने मात्र ४ माणसे जेवू शकतील इतके अन्न महाराजांसमोर ठेवल्यावर त्यांनी ते ग्रहण केले आणि उलटी केली ,त्यातून आपण काय शिकतो तर शरीरास आवश्यक तेव्हडेच खावे आणि जे खावे ते पचवावे ,समोर दिसते म्हणून अधाश्यासारखे न खाता कुठे थांबायचे ते समजले पाहिजे. असे प्रत्येक अध्यायाचे चिंतन केले तर काहीना काही शिकवण आहेच.
 
गजाननपदी निष्ठा ठेवा | सुख- अनुभव सर्वदा घ्यावा | कुतार्कासी मुळी न द्यावा | ठाव आपल्या मानसी ||

              जानराव देशमुखाला त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जलानेही जीवन दिले. जानकीराम सोनाराने विस्तव देण्यास नकार दिल्यावर, बंकटलालाने चीलीमिवर धरलेल्या नुसत्या काडीनेही चिलीम पेटली. हे पाहून जानकीरामा तील अहंकार नष्ट होवून तो महारजांच्या चरणी नतमस्तक झाला .

              महाराजांचे असंख्य भक्त पण बंकटलाल , भास्कर पाटील , पुंडलिक भोकरे ह्यावर त्यांचा जास्ती लोभ. आपले मुल जाणते झाले कि आईनेही त्याला दूर करावे हि शिकवण पितांबराला कोंडोलीला पाठवून दिली. नुसत्या महाराजांच्या नामस्मरणाने तेथील वठलेल्या वृक्षास पालवी फुटली इतकी श्रद्धा बळकट असायला लागते.

              ह्या ग्रंथातील कुठलाही अध्याय घ्या तो आपल्या जीवनाशी निगडीत आहे. प्रत्येक अध्याय आपल्याला त्या काळात घेवून जातो आणि ती कथन केलेली घटना जणू आपल्या डोळ्यासमोर घडते आहे असा भास होत राहतो. जीवनात अहंकाराला काहीही स्थान नाही. अहंकारी व्यक्ती संतसेवेस आणि परमेश्वरी कृपेस कधीही पात्र ठरत नाही.

            “ श्री गजानन विजय “ हा पवित्र ग्रंथ जिथे असेल तिथे भूतप्रेत पिशाच्च ,कुठलीही बाधा फिरकतही नाही ,इतकी प्रचंड ताकद ह्यात आहे. हा ग्रंथ म्हणजे प्रेमाचा अथांग महासागर आहे, तो वाचतानाही डोळ्यातून घळाघळा पाणी येते . जीवन आनंदी करण्याचा सोपा उपाय म्हणजे ह्या ग्रंथाचे नित्य पठण, पण अर्थात मनीचा भाव खरा हवा, समर्पणाची भावना हवी नाहीतर सगळच फोल आहे. ह्या ग्रंथाच्या पठणाने घरात लक्ष्मीचा नित्य वास तर होतोच पण जीवनात अमुलाग्र बदल होवून जीवन सुसह्य होते.

 
माझा फोटो ठेवून बाजार मांडू नका
  
         ह्या ग्रंथाचे पारायण एका दिवसात किंवा ३ ७ २१ दिवसातही करता येते. दशमी ,एकादशी आणि द्वादशीला आणि गुरुपुष्य योगावर ह्या ग्रंथाचे जो मनापासून पठण करेल त्यावर महाराजांची कृपा झाल्यास राहणार नाही असे प्रत्यक्ष दासगणू महाराजांनी ग्रंथातच नमूद केले आहे. काहीही मागू नये त्यांच्याकडे आणि कुठल्याही गोष्टीची मनी आस न धरता फक्त आणि फक्त सेवा हा भाव मनी ठेवून पारायण करावे ... आपण सेवा करत राहावी ,महाराज आपले जीवन फुलवणार यात संदेह नसावा. कधी काय द्यायचे ते त्यांना माहित आहे.

             ह्या ग्रंथाच्या पठणास कुठलीही वेळ चालते. मला विचारलं तर श्वास चालू आहे तोवर सेवा करत राहावी तीही निष्काम. सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही पारायण करावे. काही वृद्ध व्यक्तीना खाली बसून जमत नाही त्यांनी खुर्चीवर बसून करावे ,जसे जमेल तसे करावे. अहो ते आपल्याकडून पारायण करून घेत आहेत इथेच त्यांची कृपा झाली असे समजायला हरकत नाही. कित्येक जण पोथी आणतात पण वाचन होत नाही. महाराज माझ्याकडून आपण पारायण करून घ्या हा भाव मनी ठेवलात तर का नाही होणार पारायण ? नक्कीच होईल. सर्वात शेवटी श्रद्धा किती खोल ते महत्वाचे.


झुणका भाकरीचा नेवैद्य


            मंडळी पारायण झाल्यावर महाराजांना चण्याच्या डाळीच्या पिठाचा झुणका , कांदा ,ज्वारीची भाकरी , ओंजळभर मिरच्या ,असल्यास लोण्याचा गोळा असा प्रसाद मनोभावे करावा .नाही जमल्यास शिरा करावा आणि तेही नाही जमले तर दुध किंवा साखर ठेवावी. बघा महाराजांना सर्व स्थरातील लोकांना करता येयील असा झुणका भाकरीचा नेवैद्य आवडतो , बासुंदी पुरीमध्ये त्यांचे चित्त नाही लागत . घरातील आणि त्या दिवशी घरी आलेल्या सर्वाना द्यावा. आपल्याकडून महाराजांनी पारायण करून घेतले म्हणून कृतज्ञता व्यक्त करावी आणि माझे पारायण झाले हा अहंकार मात्र मनी कधीही येवू देवू नये. मी हे केले ,मी ते केले ह्यातच आपण सर्व काही घालवून बसतो. म्हणूनच जी काही सेवा करू ते त्यांच्याच चरणी ठेवावी म्हणजे आपल्याकडे अहंकार यायला काहीच उरणार नाही. ग्रंथाच्या अखेरीला प्रत्यक्ष दासगणू महाराजांनीही आपल्याला हीच शिकवण दिली आहे ,त्यांनी महाराजांना विनंती केली कि “ तुमच्याच प्रेरणेने मी तुमचे चरित्र शब्दबद्ध केले ,तेव्हा आता माझी लाज तुम्हीच राखा. काही अधिक उणे झाल्यास माफ करा लेकरास.”

             मंडळी ,शेगावला गेल्या वर महाराजांच्या गादी समोर एकदातरी अवश्य ह्या अभूतपूर्व ग्रंथाचे पारायण करा आणि अनुभव घेवून बघा. एकदा मी सकाळी पारायण करायचे ठरवले आणि बोलताना सहज बोलून गेले कि मी काय इतके वर्ष पारायण करतेय माझे अडीच त्तासातच पारायण होईल मग मी इतर कामे करीन. झाले दुसरा दिवस उजाडला. सकाळी ७ वाजताच घरातील पूजा इत्यादी सर्व आटोपून मी पारायणास बसले. एक अध्याय वाचला दारावरील बेल वाजली कुणीतरी आले, पुन्हा वाचायला बसले पुन्हा तसेच, त्या दिवशी नको नको ती कामे माझ्या मागे लागली आणि नेमके त्याच दिवशी अनेक लोकही माझ्या घरी आली .अगदी ४ वेळा काहीतरी विकायला आलेल्या विक्रेत्यांनीहि दरवाजा वाजवला. सर्वांची उठबस करण्यात वेळ जात होता पण पारायणावर निष्ठा कायम होती, मग कितीही खंड पडूदे .दुपारी ३ वाजेपर्यंत ७-८ अध्यायच वाचून झाले ...मनात काय ते समजले ,माझी मलाच लाज वाटली .माझे पारायण कसे अडीच तासात होते हे अहंकाराचे बोल आठवले आणि महाराजांच्या समोर बांध फुटला ,पुन्हा आयुष्यात कधीही असे बोलणार नाही एकदा माफ करा असे बोलले आणि पुन्हा वाचायला सुरवात केली . संपर्ण पारायण संध्याकाळी ७ वाजता पूर्ण झाले. त्यानंतर झुणका भाकरी ,शिरा असा प्रसाद केला आणि नेवैद्य दाखवला. खर सांगू का साई चारीत्रातही एक वाक्य आहे “ आधी विचार मग उच्चार ” त्याची प्रचीती त्या दिवशी आली. 

या गजाननरुपी जमिनीत | जे जे काही पेराल सत्य | ते ते मिळणार आहे परत | बहुत होऊन तुम्हांला ||
      


        असेच एकदा शेगावला असताना महाराजांची पोथी घेतली आणि ती समाधीस लावून घ्यायला गेले तेव्हा दर्शनाची मोठी रांग बघून मन खट्टू झाले. संध्याकाळ झाली होती परतीचा प्रवास होता आणि गाडीची वेळ झाली होती .इतक्या गर्दीत मोठ्या रांगेत उभे राहिले असते तर गाडी चुकली असती. तिथल्या सेवेकाराना मला सोडा हे सांगणे म्हणजे त्यांना त्यांचा नियम मोडून डोक्यावर पाप ओढवून घेण्यासारखे आहे म्हणून गप्प उभी होते. पण इच्छा तर प्रबळ होती. तेव्हड्यात तिथे एक अपंग गृहस्त आले त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी होत्या. सेवेकर्यांनी त्यांना वेगळ्या रांगेने दर्शनास सोडले, त्यांच्या पत्नी त्यांना आधार देत होत्या आता त्यांच्या कुबड्या कोण धरणार ? त्यांनी माझ्याकडे पहिले मी लगेच त्या धरल्या आणि सेवेकर्यांनी मलाही आत सोडले. त्या बाई आणि सेवेकरी कुणालाच मलाही दर्शनास जायचे होते ते माहित नव्हते पण महाराजांनी ते ओळखले पण दर्शनास जातानाही काहीतरी सत्कर्म करण्याची संधी देवूनच त्यांनी दर्शन दिले हे महत्वाचे. ती पोथी ज्यांनी मला आणावयास सांगितली होती त्यांचीही इच्छयाशक्ती तितकीच प्रबळ होती म्हणून त्यांच्या हाती हा ग्रंथ आला.

              असे असंख्य अनुभव अगदी उठता बसता मलाच काय सर्वाना क्षणोक्षणी येतात .प्रचीतीविना भक्ती नाही ,त्यामुळे महाराज प्रचिती देणारच पण निव्वळ त्यासाठी भक्ती नको .अजूनही लिहिण्यासारखे खूप आहे , ह्या ग्रंथाबद्दल अपार आदर आहे ,महाराजांनी मला काय दिले हे मी शब्दबद्ध नाही करू शकत ,आपली प्रचीती शेवटी ज्याची त्यांनी अनुभवायची. ह्या अधिक महिन्यात मी गजानन विजय पारायण अद्याप तरी केले नाही पण हा लेख लिहिण्याची बुद्धी देवून त्यांनी मला सेवेची संधी दिली आहे ,त्यासाठी मी महाराजंची सदैव ऋणी राहीन. 

              आमच्या घरी श्री गजानन महाराज प्रगट दिनास गेली कित्येक वर्ष अत्यंत मनापासून , शुचिर्भूत होवून संपूर्ण प्रसाद करणाऱ्या आमच्या शेजारच्या सविता काकू उर्फ “माई “ ह्यांना हा लेख मी समर्पित करते ,त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर महाराजांची कृपादृष्टी आहेच तशी तुम्हा आम्हा सर्वांवर राहूदे अशी महाराजांच्या चरणी नम्र विनंती.

 अभिप्रायासाठी संपर्क साधा खाली दिलेल्या संकेत स्थळावर


https://www.facebook.com/antarnad18/

https://antarnad18.blogspot.in

Thursday, 31 May 2018

अद्भुत अनाकलनीय

|| श्री स्वामी समर्थ ||


संत गजानन महाराज , शेगाव.



मंडळी,

                  अठरा वर्षापूर्वी माझ्या सासुबाईनी श्री गजानन विजय पोथी माझ्या हातात दिली. त्यानंतर काही दिवसांतच मला श्रीक्षेत्र शेगाव येथे जाण्याचा योग आला. शेगावच्या भूमीवर पाऊल ठेवले आणि आयुष्यच बदलून गेले. स्वर्गीय आनंद कुठे असेल तर शेगावात संत गजानन महाराजांच्या पायाशी आणि त्या आनंदाची अनेक वेळा अनुभूती आली. शेगाव संस्थानातील शिस्तबद्ध कारभार , शांतता, भक्तांसाठी रात्रंदिन झटणारे सेवेकरी ह्या सर्वांचे वर्णन करायला शब्दच अपुरे पडतील.

                  गेली ४५ वर्षा पेक्षाही जास्ती वर्ष शेगाव संस्थानाचा कारभार पाहणारे तेथील प्रमुख मा. श्री शिवशंकर पाटील उर्फ भाऊ ह्यांच्याशी प्रथम भेट माझ्या सासूबाईंच्या मुळेच झाली आणि त्यानंतर मी जेव्हा जेव्हा शेगावला गेले तेव्हा तेव्हा होत राहिली .

                 अत्यंत प्रामाणिकपणे उभे आयुष्य महाराजांच्या सेवेत व्यतीत केलेले भाऊ चालते बोलते महाराजच आहेत. वारकरी शिक्षण संस्था, इंजिनिअरींग कॉलेज, आनंद सागर प्रकल्प ह्या सर्वांचे योग्य नियोजन , निष्ठावंत सेवेकार्यांच्या मदतीने करताना पाहून अचंबित व्हायला होते. त्यांची निर्णयक्षमता, शिस्त, धडाडी वाखाणण्याजोगी आहे. हे सर्व करत असताना आपण महाराजांचे फक्त एक सेवेकरी आहोत आणि सेवा करत राहणे हेच आपले काम हि भावना तसूभरही मनातून जात नाही. अतिसामान्य व्यक्तिमत्व असूनही सामन्यातील सामान्य राहणाऱ्या भाऊंकडे पाहिले कि वाटते उगीच नाही महाराजांनी त्यांची ह्या जागी नेमणूक केली .

                  पांढरे शुभ्र धोतर, सदरा आणि डोक्यावर पांढरी वारकऱ्यांसाठी टोपी घातलेले भाऊ सेवेकार्यांच्या गर्दीत हरवून जातात. कुठेही मोठेपणाचा लवलेशही नाही. किती आणि कायकाय शिकायचे ह्यांपासून .संस्थानात चहा घेतला तरी दानपेटीत पैसे ठेवणारे महाराजांचे हे सेवक ,अधिक काय बोलायचे त्यांच्या विषयी. कसलाही मोठेपणा , डामडौल, मी पणाचा लवलेश शोधूनही सापडणार नाही. सतत आपल्या कामात गर्क असणार्रया भाऊना भेटायला गेले असता ते जर वर्तमानपत्र वाचत असतील तर ते वाचता वाचताही आपल्याशी संवाद साधतात .कुठले नमस्कार चमत्कार आवडत नाहीत त्यांना.

                  एक दोन वेळा त्यांनी महाराजांचे अनुभव मला सांगितले आहेत ,त्यांच्या वाणीतून ते ऐकणे म्हणजे पर्वणीच आहे. असो आज मी माझा त्यांच्याबद्दलचा एक जिवंत अनुभव सांगणार आहे. अशीच एकदा शेगावला गेले होते. माझा मुलगाही माझ्याबरोबर होता. नेहमीप्रमाणे भाऊंची भेट झाली. प्रसिद्धी माध्यमांपासून भाऊ नेहमीच दूर राहतात हे मला माहित होते तरीही का कोण जाणे त्या दिवशी त्यांच्याजवळ हट्ट केला कि मला माझ्याबरोबर तुमचा फोटो हवाय. त्यांनी हसून सांगितले अग इथे आपली भेट होतेच त्यात अजून फोटो कश्याला. तरी मी खूप आग्रह केला म्हणून त्यांनी माझ्या आणि माझ्या मुलासोबत ३-४ फोटो काढले. मी निघाले तेव्हा त्यांनी मला सांगितले एकच अट हे फोटो कुणास दाखवू नकोस. मी अर्थात हो हो म्हंटले . संध्याकाळी पुन्हा एकदा महाराजांच्या गादीजवळ, समाधीशी जावून दर्शन घेतले आणि शेगाव स्टेशन कडे निघालो.

                  माझ्या बरोबर त्या वेळी कै. वसंतकाका गोगटे होते. शेगाव स्टेशनातून गाडी सुटली. रात्री १० च्या सुमारास सर्वजण निजानीज करत असताना मला काही करमेना .मला सतत त्या फोटोंची आठवण येत होती आणि का कोण जाणे गोगटे काकांना ते दाखवायला मी फार उत्चुक होते. भाऊना दिलेल्या वचनाचा मला तासादोन तासातच जणू विसर पडला होता. 



असो तर सांगायचे असे कि गोगटे काकांना सर्व हकीकत कथन करून ते फोटो दाखवायला कॅमेरा काढला.आणि पाहते तो काय पुढील मागील सर्व फोटो होते पण भाऊंच्या बरोबर काढलेले ते ४-५ फोटो गायब म्हणजे तिथे फक्त black negative दिसत होत्या. खर सांगू का..एका क्षणात मनी काय ते समजले..मनात चर्रर झाले..कुणी मला काही सांगायची गरजच नव्हती ,मी समजून चुकले... डोळ्यातून घळाघळा पाणी येवू लागले. मनापासून हात जोडले महाराजांना आणि वचन मोडल्याची माफी मागितली. अर्थात ती रात्र जागूनच काढली, झोप कशी लागणार ,मनातून खजील झाले होते. घरी आले ....रोजची कामे व्यवहार सुरु झाले त्या रात्री झोपले असताना स्वप्नांत येऊन भाउनी सांगितले “ मी सांगितले होते तुला फोटो कुणास दाखवू नकोस. ” रात्रभर बसून होते. मला त्यावेळी आणि आज हा अनुभव कथन करतानाही काय वाटत असेल ह्याची कल्पनाही न केलेली बरी. आज भाउंच्या रुपात जणू महाराजांनी मला दर्शन दिले, माझ्याकडून वचन घेतले पण मी माझ्या बालबुद्धीने त्याची पूर्तता करू शकले नाही.
संत गजानन महाराजांचे असे अनेक अनुभव घेऊन हा अध्यात्मिक प्रवास सुरु आहे. शेगावला तर प्रत्येकालाच काहीतरी अनुभव येतोच येतो.

                  आयुष्यात मनाला स्पर्शून गेलेला अनुभव मी अखेरच्या श्वासापर्यंत विसरणार नाही. पुढील वेळी शेगावला गेले तेव्हा भाऊना भेटले. का कोण जाणे त्या वेळी निघताना मला त्यांनी विचारले आज फोटो नाही का काढायचा तुला ? मागे वळून पहिले आणि डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली....भाऊंचे शब्द आठवले .. “ ह्या सर्व शक्ती आपल्या आकलनाच्या पलीकडे आहेत ”.

हा लेख महाराजांच्याच रुपात मला भेटलेल्या भाऊना सादर अर्पण. 

जय गजानन श्री गजानन.


अभिप्राय खालील संकेत स्थळावर पाठवावेत

https://www.facebook.com/antarnad18/

https://antarnad18.blogspot.in




Wednesday, 23 May 2018

स्वामी माझा मी स्वामींचा

|| श्री स्वामी समर्थ ||




                                      गाडी अक्कलकोटला आली.साहेब उतरले; बाईपण उतरल्या..! "आलं एकदाचं तुझं अक्कलकोट "साहेब पुटपुटले व म्हणाले; "आता हे सामान कोण नेणार? रहायची सोय? गर्दी किती आहे पाहिलंस? तरी मी म्हणत होतो.मला यायचं नव्हतं...या स्वामींच्या पायात सगळं वाया घालवलं..!"

"आता बास की! " त्या म्हणाल्या. तितक्यात एक वयस्कर गृहस्थ मुंडासे बांधलेला धांवत आला.." जी;सामान न्यायचंय? " साहेब त्याला वरपासून खालपर्यंत निरखत राहिले..! बाईच म्हणाल्या "न्यायचंय.पण गर्दी दिसतेय.कुठं रहायचं ठरलं नाहीए ..कोण तुम्ही नेणार? " 
"हां " साहेब संशयानं अजूनही पहात होते.बाईंना म्हणाले "कोण कुणास ठाऊक माहिती नाहीए. तू लागलीस बोलायला " 
"जी..मी बराबर घेऊन जातो बगा ..छान रहायची सोय बी व्हईल " 

"मग घे सामान? "बाई म्हणाल्या."घे सामान काय? कोण रे तू? आणि नेणार कुठं? नाही त्या ठिकाणी नेशील आणि आम्हाला सामानाला मुकावं लागेल " साहेब म्हणाले..तो वयस्कर गृहस्थ हसला ;" माजं नाव नरसू ..म्या कशापाई फसवेन? फसलेत समदेच देवा; कुनी शहाना न्हाई मग म्या मारग दाखवतो..! चलातर " असं म्हणत त्यानं सामान डोक्यावर घेतलं.बाईं साहेबांना हळूच म्हणाल्या "आता गप्प बसा..किती गर्दी आहे. सोय झाल्याशी मतलब. " 

एका छानशा घरापाशी सामान नेऊन त्या नरसूनी त्यांची व्यवस्थित सोय लावली..साहेब लंगडत होते हे त्यानं पाहिलं होतं.सोय लागताच त्यानं विचारलं "पायाला काय झालंय जनू? " 
"2 वर्षापूर्वी अॅक्सिडेंट झालेला. हाडाचा चुरा झाला. .ऑपरेशन झालं होतं.पण पाय अधू झाला." बाई म्हणाल्या.नरसू साहेबाच्या पाया नजिक बसला..त्याच्या डोळ्यात करुणा दाटली..! "स्वामी बाबाची कृपा म्हनून आलायसा न्हवं " तो म्हणाला.ते ऐकून साहेब ऊसळले "कसले स्वामी कसलं काय? माझा विश्वास नाहीए. हिच्यासाठी आलोय इथं..मी तर कधीही यापूर्वी आलो नाही. हिनं अखेरची शपथ घातली म्हणून. मी नास्तिक आहे..! जा बाई आता दर्शन करुन ये मी पडतो..कटकट आहे ..!" 
"जा तुम्ही बाई मी थांबतो हतंच..साहेब तुमचा पाय मालिशनं बरा करतो " नरसू म्हणला.
"नको रे आहे ते बिघडवशील " साहेब म्हणले.

" मी येते जाऊन. "बाई म्हणाल्या व गेल्या. नरसूनं साहेबांचा पाय हाती घेतला..जसा पाय चोळत गेला..तसं साहेबांना निद्रा लागली..थोड्यावेळानं जाग आली तेव्हा खूप बरं वाटत होतं..त्यांनी पाहिलं.ऊशापाशी नरसू होता..!! सहज पायाकडं लक्ष गेलं.काहीतरी पानं बांधून पट्टी बांधलेली. साहेब क्षीण आवाजात म्हणले "नरसू;पाणी हवंय " त्यानी लगबगीनं पाणी आणलं.आधार देत स्वत: पाणी पाजलं .." बरं वाटेल बगा आता तुमाला. लै प्रवास जाला नं म्हनून.नरसू म्हणाला " 
"बरं वाटतंय ;चहा मिळाला तर बरं .होईल ..,

"हां आन्तो नं ..!" म्हणत गडबडीनं गेला.चहा आणला.पुन्हा आधार देत चहा पाजला..साहेबांनी त्याच्याकडं प्रेमानं पाहिलं.व म्हणाले ;."नरसू ; तुझ्यात देव आहे खरा..हाच देव..आणि लोक मुर्खासारखे मंदिर ;मठाचं स्तोम माजवतात..कुठले बाबा;स्वामी " 
"बराबर आहे ;नरसू म्हणाला "; त्यो नांदतो मंदिरात;मठात पर स्पंदतो हृदयात..!" यांवर साहेब हसले म्हणले.;"भोळा आहेस; तू इतकं केलंस..तोच देव." 

"आदी संशाव घेतलात" नरसू म्हणाला.साहेब लगेच ऊत्तरले;"
 "तसं वागावं लागतं.फसवणूक होते " नरसू हसला " बराबर हाय मानूस हरघडी फसतो.त्याला ऊमगत न्हाई.समोर असूनबी ..; तो ऊठत म्हणाला ";बरं जाऊ का? झालं काम माजं " साहेबानं त्याचे हात पकडले "का चाललास? बस."
 तो म्हणला " हाय म्या हतंच कायमचा.. पर न्हाई अजून कुनीतरी आल्येलं असल न्हवं .त्याचं बघायला हवं " अन् हे बोलून नरसू वळाला..

बाई घाईघाईनं वर आल्या "नरसू कुठंय? " साहेब म्हणले "गेला तो " बाई तिथंच कोसळल्या..रडायला लागल्या ..साहेबांना कळेना. ते उठले.पायातील कळ गेलेली..आश्चर्य वाटलं.तिला सावरत विचारलं "काय झालं?काही चोरीला गेलं? " बाईंनी पाहिलं "काय विचारता हे..हो गेलंय चोरीला..मिच गेलीय ..मी मठात गेले.तिथं नमस्कार केला अन् स्वामी मुखवट्यात नरसूची मुर्ती ..कितीतरी वेळ...!! " 
साहेब मटकन खाली बसले.सगळं आठवलं त्याचे बोल.- म्या हाय हतंच कायमचा ..समोर असूनबी वळकत न्हाई ..
आपण बोललो.."तुझ्यात देव आहे मठात ;मंदिरात नाही " तो ऊत्तरला "मठात मंदिरात नांदतो;हृदयात स्पंदतो "..साहेबांच्या नास्तिकतेचा वज्रलेप कोसळला..देव असाच भेटत असतो पण अहंपायी दिसत नाही..म्हणूनच नास्तिकता वर्चस्व गाजवते...ह्या विचारांत नरसूचा चेहरा आठवला.एकदम नरसू हे नावही वीजेसमान चमकून गेलं..स्वामी म्हणायचे "मी नृसिंहभान बरें " 

हे जाणवताच साहेबांचा बांध फुटला...डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. अंत:करणापासून त्यांनी हांक मारली "स्वामी sss! "