Tuesday, 14 July 2020

गुरु व गुरुमंत्र किंवा गुरुदिक्षा

||श्री स्वामी समर्थ ||




सामान्यपणे अध्यात्मीक क्षेत्रातला प्रत्येकजण गुरुमंत्र मिळाला म्हणजे काहीतरी फार मोठे साधन झाले असे समजतात. अनेक जण असे आहेत ज्यांनी तो घेतला आहे. तर अनेक जणांना तो घ्यायचा आहे. पण या गुरुमंत्राच्या बाबतीत काही तरी गोड गैरसमज किंवा गोंधळ झाला आहे असे वाटते. कारण बरेच जण आपल्या कार्यसिद्धीसाठी जसे, नोकरी मिळावी, विवाह व्हावा, संतती व्हावी, घर व्हावे, रोग बरे व्हावेत यासाठी गुरुमंत्र मागत असतात. पण एक लक्षात घ्या की अशा कामना पूर्तीसाठी घेतलेला मंत्र हा गुरुमंत्र होत नाही तर ते कामना सिद्धीमंत्र होतात. गुरुमंत्र किंवा दीक्षामंत्र हा तुम्ही, गुरु आणि ते परमेश्वरी तत्व यांना सांधणारा सांधा असतो. त्यामध्ये कुठलीही कामना, इच्छा किंवा मागणे याचा अडथळा नसतो.

गुरुमंत्र म्हणजे एक कमिटमेंट असते, गुरुला दिलेले वचन असते, गुरुप्रति काया, वाचा, मनाने, तनमनधनाने, सर्वार्थाने केलेले निःसंशय समर्पण असते. 'उतणार नाही मातणार नाही घेतला वसा (मंत्र ) टाकणार नाही' मग काय वाटेल होवो असा ठाम निश्चय असतो. स्वेच्छेने पण पुर्ण विचारपूर्वक स्वीकारलेले बंधन असते. गुरुमंत्र घेईपर्यंतच तुम्हाला गुरुमंत्र घ्यायचा की नाही या स्वयंनिर्णयाचा अधिकार असतो. ज्याक्षणी तुम्ही गुरुमंत्र घेता त्याच क्षणी तुमची सर्व सुत्रे गुरुकडे जातात. तुमचा स्वयंनिर्णयाचा अधिकार संपतो. फक्त 'गुरुर्वाक्यं प्रमाणं' असे व्हावे लागते. म्हणूनच तर 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु..' असे म्हटले आहे. गुरुसाठी सर्व समर्पित करण्याची तयारी ठेवावी लागते. गुरुमंत्र म्हणजे गुरुप्रती संपूर्ण समर्पण, गुरुप्रती अढळ निष्ठा आणि गुरुवर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास.

पण एक लक्षात घ्या की गुरुमंत्र घेतल्याने तुमच्या कुठल्याही भौतिक समस्या सुटणार नाहीत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव वगैरे कुणाच्याही समस्या सुटल्या नाहीत, उलटपक्षी त्या वाढल्या. गुरुमंत्र म्हणजे समस्या मुक्तिचे साधन नव्हे. तर आध्यात्मिक वाटचालीचा खडतर मार्ग आहे. गुरु आणि गुरुमंत्र तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे, जसजसे तुम्ही पक्व होत जाल त्याप्रमाणे तुमची आध्यात्मिक प्रगती करत असतो. तुमची जन्म जन्मांतरीची भवबीजे, संस्कारबीजे, कर्मबीजे हळूहळू जाळून टाकत असतो. शुद्ध करत असतो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी करत असतो.

आणखी एक गोष्ट म्हणजे, कुणीही कधीही उठतो आणि गुरुमंत्र मागत सुटतो, गुरुमंत्र काय बाजारातला भाजीपाला आहे कां ??? कुणीही उठावे आणि कधीही मागावा ??? गुरुमंत्र मिळण्यासाठी सुद्धा तपश्चर्या करावी लागते तेव्हा त्याचे महत्त्व कळते. पूर्वीच्या काळी तर अगदी बारा-पंधरा वर्षे गुरुगृही राहून गुरुची सर्व प्रकारे कायावाचामनाने, तनमनधनाने सेवा करुन त्याला प्रसन्न करावे लागे. कुंतीने अशीच दुर्वासांची सेवा केली, उमाने शिवाची केली, लक्ष्मीने विष्णूची, सरस्वतीने ब्रम्हदेवांची तर अनुसयेने अत्री ऋषींची ! त्यानंतरच गुरु अशा लायक शिष्यांची अगदी कठोर परीक्षा निष्ठुरपणे घेत असतात. अगदी सहनशीलतेचा अंत पहाणारी, मोडून टाकणारी, सगळा अहंकार धुळीस मिळवणारी, अगदी लाचार बनवणारी, हीन दीन लीन करून टाकणारी, मनाचा आणि शरीराचा कस पहाणारी परीक्षा घेतात, तुकामाऊलींनी गोंदवलेकर महाराजांची घेतली, रामानंदांनी कबीराची घेतली, बाबाजींनी तुकाराम महाराजांची घेतली. थोडा जरी अभिमान वाटला तरी श्रीगुरु असे काही करतात की तुमच्या अहंकाराचा पालापाचोळा होऊन जातो. गलितगात्र होऊन जातो. आपण पोचलो असे वाटता वाटता धाडकन खाली फेकून देतात, जणू सापशिडीचा खेळच सुरू असतो. एवढे भोग भोगल्यावर मग तेव्हा कुठे शिष्याला ला गुरुमंत्रदीक्षा प्राप्त होते. गुरुमंत्रासाठी सुद्धा शिष्याची लायकी असावी लागते. गुरुमंत्रं अशिष्याय न देयं ।

गमतीने सांगायचं तर कधीही जिवंत गुरुपेक्षा फोटोतले गुरु केव्हाही चांगले. फोटोतल्या गुरुंना तुम्ही गुलाम बनवून ठेऊ शकता. पुजा केली नाही केली तरी ते काही बोलत नाहीत. भूक लागली, तहान लागली असे सांगू शकत नाहीत, तुम्ही तुमच्या सवडीने त्याची सेवा करा, न करा. वाटेल तो नैवेद्य दाखवा न दाखवा. त्यांच्या मुर्तीवर फोटोवर १०००/- ₹चा हार घाला की १/- ₹ चा घाला. त्यांचेसमोर काहीही बोला, करा. भ्रष्टाचार करा. ते काही बोलत नाहीत बोलू शकत नाहीत. मुर्ती आणि फोटो तुमच्या गुलाम असतात. तुमच्या इच्छेनुसार जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याची दोन फुले वाहून, साखर समोर ठेवून, नमस्कार करुन एक दिनचर्येचा उपचार केला की मग तुम्ही वाटेल ते करायला मोकळे. या फोटोतल्या गुरुंना तुम्ही तुमचे वाटेल ते काम करायला सांगत असता. दानपेटीत लाच म्हणून काही नोटा टाकून त्यांना लालूच दाखवू शकता. पण जिवंत गुरूंचे तसं नाही. त्यांना चोवीस तास झेलावे लागते. त्यांच्या आज्ञा पाळाव्याच लागतात.

‌जिवंत गुरु म्हणजे धगधगता निखारा आहे. ते तुमच्या आवाक्यात नाही येणार. ते तुमचे गुलाम नाहीत होणार. त्यांना जे हवे तेच ते करणार. चुकलं तर फटके लगावणार. ते तुमच्यावर कधी प्रेम करील तर कधी कान उपटील. ते त्यांच्या मर्जीनुसार वागण्यास स्वतंत्र असतात. त्यांच्यावर जे कार्य जन्म जन्मांतरीच्या ऋणानुबंधांने सोपवलेले असते तेच ते करत असतात. ते निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळे भावाविष्कार दाखवून, कुणाशी असे तर कुणाशी तसे वागून आपले नियोजित कार्य पुर्ण करत असतात. तुम्ही त्यांच्या विषयी काय बोलता, काय अर्थ काढता याची त्यांना पर्वा नसते. पण गुरूच्या बाह्य वर्णनावरून, वर्तनावरून त्यांची योग्यता कळत नाही. त्यांना खरे ज्ञानी लोकच ओळखू शकतात.ते कुणाचे मिंधे नसतात. त्यांना जे हवे तेच ते करतात. त्यांना जे हवे तेच घडवून आणतात. सामान्य संसारी लोकांना सद्गुरु म्हणून त्यांचं काम करणारा हरकाम्या गुलाम हवा असतो. साधकाच्या बाबतीत असे आहे की गुरू मंत्र घेण्या आधी त्या साधकाने आपली शिष्य होण्याची पात्रता सिद्ध करावी, आपली आध्यात्मिक बैठक तयार करावी आणि मग गुरुची परीक्षा घ्यावी की आपली होडी पैलतीरावर नेण्यास खरच या गुरूंचे गलबत सक्षम आहे कां ??? कारण गुरुमंत्र घेणे किंवा दीक्षा प्राप्त करणे म्हणजे समस्यांचा किंवा अपेक्षांचा कटोरा घेऊन उभे राहणे नव्हे तर गुरूंच्या एका शब्दा बरोबर सर्व काही सोडून त्यांच्या शब्दानुसार त्या परमेश्वराशी अनुसंधान साधण्यासाठी तयार होणे आणि मुख्य म्हणजे " आने की बाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्माकां कपाट कौन, कौनमे कौन समायां, काहे को नर देह आया" या नाथ पंथीय कोडयाचे उत्तर शोधण्यास सक्षम होणे म्हणजे गुरू दीक्षा होय. सारांश गुरू म्हणजे प्रत्यक्ष आग त्याच्याशी मुळीच खेळू नये.

 संग्रहित

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर  Click करून अभिप्राय नक्की द्या.
antarnad18@gmail.com
लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच  Follow वर Click करायला विसरू नका.

संचय

||श्री स्वामी समर्थ ||



जन्माला आल्यापासून आपला सगळा वेळ संचय करण्यातच जातो ...सगळे जमवून ठेवायचे ...ओतप्रोत आपल्या गरजेपुरते असावे हा विचारच नसतो ...नुसती हाव ...हे हवे ते हवे .एका पायाला किती ते चपला बुटांचे जोड, कपडे ,सोनेनाणे..प्रपंचाला लागणाऱ्या गोष्टींचा नुसता भडीमार करतो ..न संपणारे आहे हे सर्व .

कुठे थांबायचे ते कळतच नाही आपल्याला ..म्हणूनच ह्याला संसार म्हणत असावेत ..सार जे कधीच आटत नाही माया ,प्रेम,लोभ ह्या सगळ्या पोटी आयुष्यभर सतत "संचय " करत राहतो ...शेवटी हे सर्व इथेच सोडून जायचे आहे हे माहित असूनही ..स्वामिनी भक्तांना सांगितले आहे.अरे किती जमा करशील ? किती आणि कश्यासाठी ? हि हाव बरी नाही ..हे म्हणजे अग्नीत तुपाची धार ...जितके तूप अधिक घालत जाशील तितका अग्नी अधिकाधिक प्रज्वलित होत जायील .

संचय करुया पण तो " अखंड नामाचा " कारण तेच शेवट आपल्याला ह्या भवसागरातून तारून नेणार आहे आणि शेवटचा क्षण सुखाचा करणार आहे ...श्री स्वामी समर्थ


अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वर  Click करून अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्या तसेच  Follow वर Click करायला विसरू नका.

चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा..

|| श्री स्वामी समर्थ ||





आपण सर्वच उठसुठ शानिमहाराजाना वेठीला धरतो ...साडेसाती आली आणि त्यात जरा वाईट झाले कि लग्गेच साडेसातीवर खापर आणि चांगले झाले कि श्रेय स्वतःला...असे नसते ..साडेसातीवर शनी वरती प्रश्नांची सरबत्ती असते ,अनेक लेख ह्यावर येतात अनेक प्रश्न विचारले जातात पण सर्व निष्फळ जोवर आपण आपले स्वतःचे कर्म तपासून पाहत नाही ...शनी हा न्यायी ग्रह आहे तो उगीच कुणालाही त्रास देत नाही आणि शिक्षाही ठोठावत नाही .तुमचे कर्म उत्तम असेल तर तो कश्याला तुम्हाला त्रास देईल. 

स्वामी समर्थांचे पट्टशिष्य आनंदनाथ महाराजांच्या स्तोत्रात त्यांनी लिहिले आहे कि " कायिक वाचिक आणि मानसिक " सर्व पापे झाली जी अनेक ती माफ कर गुरुराया .म्हणजेच कायेने वाचेने आणि अगदी मनानेही मी कुणाचे वाईट चिंतले असेल तर ते मला माफ कर ...इतके सत्कृत्य आपल्या हातून चांगले झाले तर साडेसाती हे आपल्याला वरदान ठरेल ह्यात शंकाच नाही . माझी रास हि आणि माझा हा ग्रह इथे आहे आणि तिथे आहे हे बंद करा. प्रश्न थांबवा आणि उपासना सुरु करा .

 साडेसातीत तसेच राहू दशेत माणसाने समाजत जास्ती मिसळू नये . कमीतकमी बोलावे म्हणजेच कमी बोलले कि प्रश्न आणि संकटे निर्माण होणार नाहीत .जास्तीत जास्त जप करावा.. रोज स्वतःचे सिंहावलोकन करावे रोज रात्री झोपताना जे जे काही दिवसभरात झाले ते सद्गुरुचरणी ठेवावे म्हणे सकाळी उठाल तेव्हा तुमच्याकडे काहीच राहणार नाही मग अहंकारही येणार नाही कारण सर्व तुम्ही देवालाच देवून टाकले मग अहंकार कसला ? रोज नवीन अध्याय सुरु करा बघा आयुष्यातील वाईट दिवसही चुटकिसरशी निघून जातील....करून पहा... 

माझ्या राशीला साडेसाती कितवर आहे ? हे आणि असे अनेक प्रश्न नकोत ... काहीच कुणालाच विचारू नका हे माझे वैयक्तिक मत आहे...परमेश्वराने तुम्हाला रामबाण उपाय दिलाय सर्व दुक्खावर...नामस्मरण तो सोडून आपली जगभ्रमंती चालू असते ... नाम घ्यावयास लागा बघ काय चमत्कार होतो आयुष्यात ...
सध्या धनु , मकर  आणि  कुंभ ह्या राशींना साडेसाती चालू आहे .धनूची शेवटची अडीचकी मकर राशीची मधली आणि कुंभेची पहिली चालू आ

हे.  शनी महाराज अत्यंत न्यायी ग्रह आहे पण मिजासखोर लोकांना ते अजिबातच सोडत नाहीत . साडेसाती आयुष्यातील अत्यंत उत्तम काळ असतो ज्यात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतात जसे अनेकांची घरे होतात ,विवाह संपन्न होतात ,परदेशगमन ई तसेच आपण स्वतःही अंतर्मुख होतो . 

अनेक मनासारख्या गोष्टी होतात पण ज्यांच्यासाठी जे विनयाने ,नम्रतेने वागतील. ...शनिचा जप तुम्हाला संयम शिकवतो ,पैशाने सर्व सुखे मिळतील पण माणसे पैशाने विकत घेता येत नाहीत ती आपल्या स्वभावाने जोडावीच लागतात हि शिकवण मिळते . शनी सिंहावलोकन करायला शिकवतो ,आपल्या चुका आपल्यालाच उमजतात मग. 

पण काही जणांना आपल्या कामासाठी माणसे वापरून फेकून देण्याची सवय असते ती साडेसातीचे फटके खावूनही जात नाही . देवळात जा नाहीतर जप करा त्यांच्या स्वभावात काहीही फरक पडत नाही ..आणि मग शनी देवांच्या शिक्षेस ते पात्र ठरतात. 

भल्याभल्यांची झोप उडवणारे शनी महाराज इतके फटके मारून सुद्धा काडीचाही माज न उतरलेले लोक पहिले कि आठवतात ह्या ओळी ...चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा...

अस्मिता


लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.
antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.

अवघा रंग एक झाला

|| श्री स्वामी समर्थ ||




आपल्याकडे काश्मीर , सिमला ,सिंगापूर ,युरोप साठी आर्थिक सुबत्ता असते पण देवदर्शन ,कुलाचार ,कुलदर्शन ह्यासाठी आपल्याला वेळ नसतो आणि आपले बजेट नेमके तेव्हाच कोलमडते .

तीर्थयात्राना जाण्याबद्दल अनेक तर्कवितर्क असतात . घरातल्या देव्हार्यातहि देव आहेत मग उठून तीर्थयात्रेस कश्याला ? त्यांची पूजा करतोच कि रोज यासारखे अनंत प्रश्न विचारले चर्चिले जातात .ह्या अश्या अनेक प्रश्नांचे निराकरण करण्याचा हा लहानसा प्रयास .

आपण आपल्या प्रापंचिक जीवनातील सुखदुख्खे, कामकाज ,इतर प्रापंचिक अडचणी ह्यात इतके गुरफटलो जातो कि मनात असूनही आपल्याला उपासनेस , साधनेस वेळ देता येत नाही. त्यासाठी लागणारी शांतता आपल्याला आपल्या घरात मिळत नाही बरेचदा . तसेच शेवटच्या प्रवासात इथून बरोबर काहीही नेता येणार नाही हे पुरते माहित असूनही सर्व आसक्ती , भोगामध्ये अडकतो ,त्यापासून परावृत्त होवू शकत नाही, म्हणूनच प्रपंचातून काही काळ दूर राहून ईश्वरी सान्निध्य लाभावे आणि सेवा घडावी ह्या उद्दात्त हेतूने तीर्थाटन करावे .

देवदर्शन पदरी पडते हाही एक धार्मिक दृष्टीकोन आहेच, प्रपंचापासून काही काळ दूर गेल्याने आणि केलेल्या साधनेने ,उपासनेने आपल्याला काही अडचणीतून मार्ग मिळतो .संसारिक आसक्ती कमी होवून षडरिपूनवर मात करता येते. मानसिक शांतंता मिळून अध्यात्मिक सेवा घडते आणि पापक्षालन होते.

आपल्या शरीराच्या आणि मनाच्याही शुद्धीकरणाची प्रक्रिया ह्यातूनच होते म्हणून तीर्थयात्रा महत्वाची. आपल्या प्रापंचिक आणि पारमार्थिक जीवनाची सांगड घालून आपले मन हळूहळू विरक्तीकडे वळते.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या संस्कृतीची पाळेमुळे , संस्कार मनात खोलवर रुजले आहेत ,त्याचे जतन करणे आणि आपल्यामध्ये सकारात्मक बदल घडवणे ह्यासाठी तीर्थाटन आवश्यक आहे .

तीर्थक्षेत्री असलेल्या देवतेच्या मूर्तीवर हजारो वर्षे केल्या गेलेल्या अभिषेक , पूजा, व्रते ह्यामुळे त्या देवतेचा जागृत अविष्कार तेथील प्रत्येक स्पंदनात असतो ,आणि म्हणूनच त्या वातावरणातील ऊर्जेमुळे ,लहरींमुळे प्रसन्न वाटते ,सकारात्मक वाटते ,मन शांत होते आणि परमेश्वरी सान्निध्याची, अस्तित्वाची अनुभूती मिळते .

मनात समर्पणाची भावना निर्माण होते आणि श्रद्धा बळकट होते. क्षणभर का होयीना आपण प्रापंचिक समस्या विसरून परमेश्वरी चिंतनात रममाण होतो ,आपले दुक्ख विसरतो आणि परमेश्वर चरणी लीन होतो .

कायेने , वाचेने आणि मनाने कळत नकळत झालेल्या पापांचे क्षालन होते हा धार्मिक आधारही तीर्थाटनामागे आहे.

तार अश्या ह्या तीर्थाटनाचा लाभ हा केल्याशिवाय कसा कळेल .

तीर्थक्षेत्री जाणे म्हणजे घरातील वडील मंडळींचे काम ,आमचे काय वय आहे का तीर्थयात्रा करण्याचे? हा प्रश्न तरुण मंडळी सर्रास विचारतात . पण खरतर आयुष्यभर आपण आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करतो , खूप चढउतार येतात आयुष्यात ,आताचे युग तर किती स्पर्धात्मक आहे . पण हे सर्व करत असताना जसा वेळ मिळेल तसे देवदर्शन घेतले तर ह्या स्पर्धेत टिकून राहायला मानसिक बळ मिळेल ह्यात शंकाच नाही.आयुष्याच्या शेवटी देवदेव न करता सुरवाती पासून केले तर तो देव शेवटच्या काळात तुम्हाला नक्कीच सांभाळेल .मी तर म्हणीन सहकुटुंब यात्रा करावी म्हणजे घरातील सर्व पिढ्यांना त्याचे महत्व समजेल आणि घरातील मुलांवरही त्याचे उत्तम संस्कार होतील. भौतिक सुखेही प्राप्त करावी पण तीर्थाटन विसरू नये . देवदर्शनास वयाची अट नसते .देवदर्शनास जायचे आहे हे लहानपणापासून मानत रुजले पाहिजे . आपल्या कुलदेवीचे दर्शन निदान वर्षातून एकदा किंवा जमेल तसे नक्कीच करावे . आपल्या वृद्ध आई वडिलांचे शेगाव ,शिर्डीचे तिकीट काढून दिले म्हणजे काही मोठा पुरुषार्थ नाही केला किंवा उपकारही नाही पण उलट त्यांच्यासोबत गेलात तर त्यांचा आनंद द्विगुणीत होईल.नक्की विचार करा .

तीर्थक्षेत्री असलेल्या भक्तिरसात न्हावून निघणे हि एक पर्वणीच आहे.

म्हणूनच मग म्हणावेसे वाटते “ अवघा रंग एक झाला.... ”.

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय नक्की द्या.


antarnad18@gmail.com

लेखाच्या शेजारी आपला Email द्यायला तसेच Follow वरती Click करायला विसरू नका.