Friday, 27 September 2024

ग्रहण

 || श्री स्वामी समर्थ ||


पत्रिकेतील समस्या आपल्याला समजते पण ती नक्की कश्यामुळे निर्माण झाली आहे हे समजणे महत्वाचे आहे. अनेकदा त्याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला खूप मागे जावे लागते . अनेकदा संततीचे प्रश्न घेवून पालक येतात . मुल ऐकत नाही , खूप त्रास देते किंवा विचित्र वागते , अभ्यास करत नाही , घरात वस्तूंची अगदी राग आला कि आदळ आपट सुद्धा करते , अश्या मुलांना समजून घेता घेता पालक आजारी पडण्याची वेळ येते पण मुले ऐकत नाहीत . 


अश्यावेळी मुल जन्माला आले त्याच्या आधी ९ महिने म्हणजे गर्भधारणा झाली त्यावेळी कुठली कुठली ग्रहणे झाली ते बघितले तर आपले उत्तर मिळते . गर्भधारणा झाली त्यावेळी किंवा त्याच्या आसपास चंद्र सूर्य ग्रहणे असतील तर मातेच्या गर्भावर त्याचा परिणाम होतो , म्हणूनच गर्भवती स्त्रियांनी ग्रहण बघू नये , बाहेर जावू नये असे शास्त्र सांगते . पण आपण उच्च शिक्षित दीड शाहणे लोक ह्याच शास्त्राला नाव ठेवतो . विज्ञान कितीही पुढे जावूदे , शास्त्र त्याच्या जागी आहेच आणि ग्रहांचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम कुणीही थांबवू शकत नाही ते होतच राहणार . सूर्य उगवायचा तो उगवणारच आहे कि . असो.


परवा अशीच एका मुलाची पत्रिका बघताना नेमकी हीच गोष्ट तपासली आणि मला उत्तर मिळाले . गर्भ धारणे पासून पहिल्या महिन्यात शुक्राचा अंमल गर्भावर अधिक असतो . 


हा अभ्यास करणे म्हणजे खोल समुद्रात उडी मारणे आणि जितके मोती वेचता येतील तितके वेचणे . आयुष्य कमी पडेल अभ्यासाला , पण शिकायची इच्छा मात्र दुर्दम्य असली पाहिजे . 


ऑक्टोबर च्या 2 तारखेला हस्त नक्षत्रात सूर्य ग्रहण होत आहे . ग्रहण रात्री ९ वाजून १३ मिनिटापासून पाहते ३ वाजून १७ मिनिटापर्यंत असणार आहे . हि एक खगोलीय घटना आहे . हे ग्रहण भारतात जरी दिसणार नसले तरी त्याचा प्रभाव असणार आहेच .  ग्रहण म्हणजे घेणे .ग्रहण हे अध्यात्मिक दृष्टीने चांगले असते. 

चंद्राच्या हस्त नक्षत्रात हे ग्रहण होत आहे . ज्यांची बुध किंवा चंद्राची दशा चालू आहे किंवा दशा स्वामी ह्या नक्षत्रात असेल तर त्यांनी अधिक उपासना करावी . चंद्र सूर्याची ताकद ग्रहण काळात कमी होते .  रोजच्या जीवनात कामात अडथळे अचानक निर्माण होतात . राहू हा तामसिक ग्रह असून सत्तेत उलथा पालथ करण्यास सुद्धा अती सामर्थ्यवान आहे.  राहूच्या मनमानी समोर कुणाचेही चालत नाही. कन्या राशीत चंद्र रवी बुध आणि केतू समोर मिनेतील राहू आहे. 

चंद्र मनाचा तर रवी आत्म्याचा कारक आहे. ह्या दोघांची क्षमता कमी होते ती ग्रहण काळात . सोबत बुद्धीचा कारक बुध आणि केतू जो सगळ्या ग्रहांची ताकद काढून त्यांचा शुष्क करणार आहे . शरीरातील हाडे , दृष्टी आणि पित्ताशय , पचनसंस्था  ह्यावर रवीचा अंमल आहे त्यामुळे ह्यासंबंधी काळजी घेणे आवश्यक आहे. तब्येत सांभाळ आणि आहार विहार सुद्धा सांभाळा. वाचेवर , शब्दांवर नियंत्रण ठेवा. बुध हा संवादाचा कारक आहे म्हणून बोलणे कमी असलेले उत्तम .


ह्या काळात नामस्मरण हा एकमेव उपाय आहे . सूर्य आपली उजवी नाडी म्हणजे पिंगला तर चंद्र डावी इडा वर अंमल करतो , अमावास्येला सुषुम्ना चालू असते म्हणून अध्यात्मिकता वाढवा . सूर्य म्हणजेच रवी हा अग्नि तत्वाचा ग्रह आहे. रवी हा राजा आहे आणि त्याला थोडा अहंकार असतोच . त्यालाच आपलयाला जपायचे आहे , अहंकार खिशात ठेवा , वादात पडू नका . नवीन काम सुरु करू नका . ग्रहणात पित्त होते म्हणून गुळ खावा . गुळ गहू  दान करा , कुणाला ? चतुर्थ श्रेणीतील लोकांना करा.  आपला नेहमीचा जप नित्य करत राहा. 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230





कुठली शाखा निवडू ?

 || श्री स्वामी समर्थ ||




आज अनेक शैक्षणिक शाखा आणि क्षेत्रे मुलांना खुणावत आहेत . पण नेमके कुठे प्रवेश घ्यावा ते समजत नाही तसेच  आजची प्रत्येक कोर्स ची फी सुद्धा तोंडाला फेस आणणारी आहे त्यामुळे निर्णय चुकला तर पैसे फुकट जातातच पण आयुष्यातील सोन्यासारखे वर्ष फुकट जाते आणि खच्ची होतो तो मुलांचा आत्मविश्वास . खरतर तसे काही नसते कारण चुकलेली असते ती निवड. 


मुळात पत्रिकेत पंचम आणि नवम भाव हा शिक्षण दर्शवतो . पंचम भाव हा मुळातच विद्येचा भाव असल्यामुळे त्या भावासंबंधी असणारी दशा असेल तर उत्तम शिक्षण होते . उच्च शिक्षण जसे CA , CS , PhD ,MS करण्यासाठी नवम भाव लक्ष्यात घ्यावाच लागतो . चतुर्थ भाव हा प्राथमिक शिक्षणाचा आहे . अश्यावेळी जर तृतीय भावाची दशा लागली तर मुले अभ्यास करताना दिसत नाहीत . घराच्या बाहेर बाहेर राहतात , मित्रांच्या संगतीत भटकत राहतात , एका जागी अभ्यासाला बसणे कठीण असते . अश्यावेळी पालक सुद्धा त्रस्त , चिंतेत पडतात . आईवडील एका मुलाला आयुष्यात उभे करायला काय कष्ट करतात ते आपल्यालाच माहिती आहे. बुद्धीची देवता गणपती म्हणून रोज मुलांनी गणपती स्तोत्र म्हंटले पाहिजे .


साधारण पणे मुळात आपल्या अपत्याचे शिक्षण होणार कि नाही त्याला ज्ञान प्राप्ती होणार कि नाही ह्यासाठी पत्रिकेत बुध आणि गुरु हे दोन मुख्य ग्रह बलवान सुस्थितीत असावे लागतात . बुध आकलन आणि गुरु ज्ञान , तसेच पंचम भाव आणि पंचमेश हे सुद्धा बिघडलेले नसावेत . 


अनेकदा शिक्षण चालू असताना अष्टम किंवा व्यय भाव कार्यान्वित होतो तसेच राहूची दशा लागली तर मन मन भरकटत जाते अश्यावेळी जर इंटरनेट किंवा telecommunication , multimedia , digital , photography ह्यासारख्या राहुच्याच क्षेत्रातील अभ्यासक्रम निवडला तर अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळते . 


तृतीय भाव हा जाहिरात आणि प्रसिद्धीचा आहे त्यामुळे आता प्रसिद्धी कोण देते बातम्या कोण देते ? वर्तमानपत्रे . मग जर्नालिझम चा कोर्स केला तर ह्या क्षेत्रात उत्तम काम होते . अष्टम भाव हा मृत्यूसम पीडा देणारा आहे मग अष्टम भावाची दशा असेल तर विमा एजंट त्यासंबंधित अभ्यासक्रम करावा . 


एखाद्या कलेत प्राविण्य मिळवायचे असेल तर पुन्हा पंचम भाव आणि पंचमेश तसेच शुक्र मंगल ( खेळासाठी ) उत्तम हवेत .

नोकरीसाठी सहावा भाव महत्वाचा आहे. कारण सहावा भाव म्हणजे आपले रोजचे जीवन आणि तिथे आपले पोट आहे. मंडळी पोटाला भूक लागली कि माणूस आपले कर्म करण्यासाठी घराबाहेर पडतो , कष्ट करून धन अर्जित करतो  आणि आपला उदरनिर्वाह चालवतो . म्हणूनच षष्ठ भाव नोकरीसाठी नेहमी महत्वाचा ठरतो . व्यवसाय करायचा असेल तर रवी धन भाव आणि दशम भाव पाहावा. मंगल सुद्धा महत्वाचा . नोकरी व्यवसाय काहीही करा बुद्धीचा कारक बुध ह्याला विसरून कसे चालेल .


रवी गुरु चंद्र मंगळ आणि दशमाचा संबंध पंचम षष्ठ अष्टम व्यायाशी असेल तर वैद्यकीय क्षेत्र चांगले ठरेल. मंगळ चांगला असेल तर इंजिनियरिंग क्षेत्र , शनी असेल तर रिअल एस्तेट एजंट , शुक्र आणि पंचम असेल तर बुटी पार्लर , एखादी कला , पंचामावरून मुले संतती पहिली जाते म्हणून घरातून शिकवण्या घेवू शकता . षष्ठ भावाची दशा घरातून खाद्य पदार्थांची विक्री करायला उत्तम असते . त्यासाठी चंद्र शुक्र आणि षष्ठ भावाचा कारक सुद्धा पहावा. थोडेसे हे शास्त्र अवगत केले तर सोपे आहे सर्व . 

पोळी भाजी , नाश्त्याचे पदार्थ करून घरोघरी पोहोचवणारे लोक पहिले तर त्यांचा बुध शुक्र चंद्र ( समाजात वावरायचे आहे ) आणि षष्ठ भाव उत्तम असणार .

आयुष्य नेहमी प्रगतीकारक असावे आणि त्यासाठी आपल्या आकलन शक्तीचा सर्वांगीण उपयोग करता आला पाहिजे . 

आमच्या वेळी असे नव्हते हे सगळ्यांना माहित आहे तेव्हा आताची शिक्षण पद्धती वेगळी आहे हे आपण स्वीकारले पाहिजे. आजकाल मुले पास होतात आणि पालक नापास अशीही स्थिती बघायला मिळते . मुलांच्या कलेला वाव मिळाला पाहिजे . कला जोपासतील तर त्यांचे मन सुद्धा साथ देयील . नुसती लाखो रुपये फी भरून आपले कर्तव्य संपत नाही तर मुलांना घरात अभ्यास करायला वातावरण सुद्धा चांगले ठेवावे लागते . आपले प्रश्न विशेष करून आर्थिक त्यांच्यासमोर न बोलणे उत्तम . आपण मुलांचे पालकत्व आपल्याच आनंदासाठी स्वीकारले आहे तेव्हा त्यांना उत्तम माणूस म्हणून घडवणे म्हणजे उपकार नाहीत तर आपल्याच जीवनाची इति पूर्तता आहे. त्यांच्यावर  थोडा विश्वास ठेवा ,त्यांच्याशी संवाद साधा मग बघा .

पटतंय का? 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Tuesday, 24 September 2024

यशापयश

 || श्री स्वामी समर्थ ||


माणसाच्या आयुष्यातील यश आणि अपयश ऊन पावसासारखे असते . अनेकदा यशाची खात्री असताना जेव्हा अपयश येते तेव्हा ते पचवता येत नाही . कारण आपण सगळ नेहमी गृहीत धरतो . सगळ्यांनी आपल्याच मनासारखे वागले पाहिजे असे आपल्याला वाटत असते . प्रत्येक गोष्टीत आपल्याच मनाचा विचार झाला पाहिजे , जे हवे ते अगदी नियतीने सुद्धा उपलब्ध करून दिले पाहिजे अशी आपली अपेक्षा नाही अट्टाहास असतो . नेमके इथेच गणित बिघडते .

एकदा यशाच्या पायर्या चढायला लागलो कि पुढे त्या पायर्या फक्त आणि फक्त यशाकडेच नेणार हा आपला भ्रम असतो आणि तो भोपळा फुटतो तेव्हा आपण हतबल असतो. यश अपयश ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत . त्या दोन्हीची चव आयुष्यात चाखायची तयारी ठेवावी लागते . प्रत्येक आईला वाटत असते माझा मुलगा शाळेत पहिल्या पाचात तरी यावा . ह्या आणि अश्या अनेक अपेक्षा आपण आपल्यावर आणि समोरच्यावर आपल्याही नकळत पणे लादत असतो .


आयुष्यात अपयश हे खूप लवकर यावे ह्या मताची मी आहे कारण तेव्हाच आपल्याला यशाची किंमत कळते आणि आपण ते मिळवण्यासाठी अधिक मेहनत करतो . सतत यश मिळत गेले तर मग आलेले अपयश आपल्याला सहज पचवता येत नाही .

केलेल्या मेहनतीला सुद्धा न्याय मिळवून देणारी असते ती आपल्या जन्माची ग्रहस्थिती . अनेकदा आपले अपमान होतात , कष्ट करून धन मिळत नाही , आनंद उपभोगता येत नाही , कुठेतरी काहीतरी राहून गेल्याची उणीव सतत भासत राहते . आणि मग हेच माझे जीवन असणार का असे मनात येणे हे स्वाभाविक आहे. आपले प्रारब्ध आहे ते .

ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज ह्यांच्यासारख्या थोर संतांचे शिक्षण प्रख्यात विद्यालयात झाले नव्हते पण आज त्यांच्या ओव्या आणि दोह्या वर लोक PhD करत आहेत . दिवसातील आठ तास काम करणाऱ्या एकाला महिना १० हजार मिळतात तर दुसरा एखादा त्याच आठ तासात २ लाख सुद्धा कमावतो . आपल्याला जे मिळत आहे ते त्यांच्या कृपेने  आणि त्यात समाधान मानले तर यशापयाशाच्याही खूप पुढे जावू आपण .


आपल्या जे मिळत नाही ते दुसर्याला मिळाले कि त्यातून मग मत्सर , इर्षा , द्वेष ह्या भावना उदयाला येतात पण त्या अर्थहीन असतात . ह्या भावना यशा पर्यंत नेणार नाहीच पण मिळालेले यश सुद्धा टिकू देणार नाहीत . 

आपले मन सतत काश्याच्यातरी मागे धावत असते , अजून पैसा , मोठे घर गाडी , सगळे अजून अजून हवे असते . नेमके कश्याच्या मागे धावत असतो हे आपल्याला सुद्धा समजत नाही . कुठे थांबायचे हेच समजत नसते कारण यशाची धुंदी आणि अपयश पचवायची भीती .

ह्या जीवघेण्या स्पर्धेत मग मत्सर , हेवेदावे येतात आणि अनेक नात्यांना समाधी मिळते . यशाच्या उत्तुंग शिखरावर तो आनंद साजरा करायला मग आपण एकटेच असतो . ह्यासाठी कुठे थांबायचे ते समजले पाहिजे . आता मीही इथेच पूर्णविराम देते .


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230






Friday, 20 September 2024

धूम मचाये धूम ( मंगळ वक्री 7 डिसेंबर ते 23 फेब्रुवारी )

 || श्री स्वामी समर्थ ||


ह्या वर्षा अखेरीच्या अत्यंत महत्वाच्या ग्रहस्थिती बद्दल थोडा विचार करुया .ऑगस्ट २६ ला मंगळ ग्रहाने मिथुन ह्या आपल्या शत्रूराशीत प्रवेश केलाय . विचारवंतांच्या राशीतील अक्शन प्लानेट काय  काय करणार आहे ह्याकडे संपूर्ण ज्योतिष जगताचे लक्ष आहे .  मंगळाला आपण सेनापती म्हंटले आहे , समोरच्या शत्रूचा निप्पात करून यशाची शिखरे पादाक्रांत करणे ह्यात तरबेज पणा,  धडाडी , जिद्द ,मुत्सद्देपणा , साहस , पराक्रम  ह्यासोबत अनेकदा अविचार, उतावीळपणा ह्यामुळे मंगळ अमंगळ करतो . कुठल्याही गोष्टीचा अतिरेक शेवटी वाईट . मंगळ सुस्थितीत असेल तर अश्या व्यक्तीची कार्यक्षमता उत्तम असते बुध हा जितका विचारी तितकाच मंगल अविचारी आणि म्हणून बुधाच्या ह्या राशीत त्याला कसेनुसे होते . बुधाची मिथुन राशी हि राजकुमाराची म्हणजेच एका बालकाची राशी आहे ,कन्या राशीसारखी परीपक्वता ह्यात नाही . बालक हट्टी असतेच त्यात मंगलाची भर म्हणजे बोलणेच खुंटले. पत्रिकेत मिथुन राशीत मंगळ दिसला तर  ती व्यक्ती प्रमाणाबाहेर हट्टी असणारच . मिथुन राशीतील आणि मिथुन नवमांशा तील मंगल अजिबात चांगली फळे देत नाही .  

मंगळ हा पुरुष ग्रह असून तामसी आहे . पापग्रह आहे . मंगळाला भौम म्हणजेच भूमिपुत्र म्हंटलेले आहे . त्यामुळे जमीन जुमला , भावंडे , शेजारी सावत्र आई चे आयुष्यातील अस्तित्वावर बोलतो . मंगळ अत्यंत उतावीळ आहे त्याच्याकडे धीर नाही तर प्रत्येक गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अत्यंत अधीर आहे. डोके बाजूला ठेवायचे आणि निर्णय घ्यायचे किंवा बोलायचे ह्यात मंगळ अग्रगण्य असल्यामुळे अनेकदा भांडणे वादविवादाची स्थिती निर्माण होते . सध्या तेच आहे कारण मंगळ बुधाच्या राशीत नाखूष आहे . 

मेदनिय ज्योतिषाचा विचार करता वादळे , मोठे भूकंप आणि त्यात झालेली जीवितहानी , मंगळाच्या हाती शस्त्र असल्यामुळे युद्ध जन्य स्थिती , अतिरेकी कारवाया , मंगळ रक्ताचा कारक त्यामुळे हिंसाचाराचे वाढते प्रमाण आणि त्यातून होणारा रक्तपात . ग्रह वक्री झाला कि बलवान होतो आणि त्याची फळे सुद्धा तितकीच त्रासदायक असतात . मंगळ अंदाजे दोन महिन्याच्या काळापर्यंत वक्री अवस्थेत असतो . ह्या काळातील वैयक्तिक स्थरावरील तसेच जागतिक , सामाजिक स्थरावरील स्थिती अभ्यासण्या जोगी असते आणि अभ्यासकांनी ह्या सर्व नोंदी करून ठेवाव्यात .


पृथ्वीपासून कोटी मैल दूर असणारा मंगळ हा पृथ्वीच्या कक्षेजवळ असणारा पण बहिर्वर्ती ग्रह आहे . मिथुन राशीतून मंगळ कर्क राशीत २१ ऑक्टोबर ला प्रवेश करणार आहे . तिथे त्याला नीचत्व प्राप्त होईल . कर्क राशीतच मंगळ ११ अंशावर डिसेंबर 7 रोजी पुष्य नक्षत्रात आणि तुळ नवमांशात वक्री होणार आहे . पुढे वक्री अवस्थेतच २२ जानेवारीला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल आणि 23 फेब्रुवारी रोजी मार्गस्थ होईल. थोडक्यात ७ डिसेंबर ते २३ फेब्रुवारी ह्या काळात मंगळ वक्री असणार आहे . २१ ऑक्टोबर ला मंगळ कर्क राशीत नीच होत आहे आणि लगेच २५ ऑक्टोबर पासून मंगळाची गती २२ कला होते आहे . कर्क राशीतून मंगळ कुंभ राशीतील शनीवर दृष्टी टाकेल तसेच रवी बुध वृश्चिक राशीत आले कि शनीच्या दृष्टीत असतील . वातावरण असे असल्यावर नामस्मरण वाढवा इतकेच म्हणावे लागेल. शनी मंगळ षडाष्टकात आणि मंगल स्तंभी , वक्री अपघातांचे प्रमाण वाढेल , शस्त्रापासून  भय , आगी लागतील आणि शस्त्रक्रीयांचेही प्रमाण वाढेल . 


मंगळ म्हणजे थोडक्यात Aggression  , उतावीळ पणे घेतलेले निर्णय , जोश होश.  मंगल म्हणजे घातपात  , डोक्यात राग घालून घेणे आणि त्या रागाच्या भारत अविचारी कृत्ये करणे . मंगळ हा अग्नी तत्वाचा तामसी  ग्रह आहे. पेटून उठणारा , अन्याय विरुद्ध दोन हात करताना प्रचंड राग डोक्यात घालून घेणारा . लहान मुल कसे मनाविरुद्ध काही झाले कि जमिनीवर डोके आपटून घेते तसेच . रागाचा उद्रेक हा मंगळ करणार . सामाजिक व्यवस्थेत पोलीस यंत्रणेला सुसज्ज राहावे लागेल. आगी लागणे , भांडणे , प्रचंड मानसिक त्रास , रक्ताच्या संबंधित विकार , बिपी वाढणे , रक्तदोष , शरीरातील ज्वर वाढणे .वेरीकोज वेन्स , डोळ्यांचे आजार , मानसिक ताण त्यामुळे होणारी डोकेदुखी वाढेल . प्रचंड वादविवाद होतील आणि त्यामुळे रागाचा ईर्षेचा उद्रेक होईल . आगी लागतील , स्वयपाकघरात सुद्धा काम करताना सांभाळावे लागेल. जनसामान्यांत प्रक्षोभ , संताप होयील. 

मंगळ वक्री स्तंभी असताना जे परिणाम होतात ते दूरगामी होतात त्यामुळे ह्या काळात वाद टाळा . आपल्या शब्द संपदेचे नको तिथे प्रदर्शन करून नको ती संकटे ओढवून घेवू नका . आपल्याला शेंबूड पुसता येत नव्हता तेव्हा उच्च शिक्षण घेतलेले आपले सगेसोयरे , आप्तेष्ट मित्र किंवा इतर कुणीही असोत ह्यांची अक्कल काढू नका म्हणजे मानहानी तरी टळेल . ह्याचे कारण चर्चा करून सामंजस्याने एखादा प्रश्न सोडवावा हा मुळात मंगळाचा स्वभाव नाही . मोठा आवाज करून शिवराळ भाषेत बोलणारा हा सेनापती आहे . काय आहे ते सर्व मलाच समजते आहे इतर सर्व बिनडोक असल्या भ्रमात राहिलात तर आयुष्याच्या सारीपाटावरून कायमचे दूर फेकले जाल . 

मग करायचे काय ? पुढील ६ महिने गप्प बसायचे हीच मोठी साधना आहे , बघा जमतंय का? ह्याचा शब्दशः अर्थ नाही हे मी वेगळे सांगायला नको. भरपूर पाणी प्या . ज्यांना बिपी चा त्रास आहे त्यांनी आगाऊ पणा करून नको तिथे वक्तव्य करायला मुळात जावूच नये आणि मग बिपी वाढले तर बोंबलू नका. स्वतःला आणि कुटुंबाला जपा . सत्तापालट होताना होणारा हिंसाचार , एक घाव दोन तुकडे कुणाच्याच फायद्याचे नसतात .  अत्यंत चक्रम डोक्याची मुले जी घरात कुणाचेही ऐकत नाहीत विशेष करून मिथुन राशीतील मंगळ असेल त्यांच्याकडे जातीने लक्ष ठेवा . 


नैसर्गिक कुंडलीत मिथुन राशी हि तृतीय स्थानात येते आणि ती संवादाची राशी आहे तसेच तिथून डावा कान , कागदपत्रे बघितली जातात . बोलताना , लिहिताना आणि कुठे सही करताना विचारपूर्वक कृती केली पाहिजे . सतत कानात हेड फोन घालून बसू नका . तृतीय भाव हा प्रवास दर्शवतो आणि मंगळ वेग. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढेल . उगीच अति वेगाने वाहन चालवणे आणि रस्त्यात भांडणे करणे टाळा.

राहू शनी दशा असलेल्या लोकांनी मुळात समाजात कमी वावरावे .काही लोकांचा राजकारण हा श्वास आहे त्यांना २४ तास दुनियादारी करायची असते त्यांना विशेष सतर्कतेचा इशारा आहे. एखादे प्रकरण अंगावर शेकेल आणि कुणीतरी पोलिसात जायील इथवर वेळ आणू नका. व्यक्तिगत कुंडलीत वक्री मंगळाची फळे भोगावीच लागतील ह्यात शंका नाही .  ह्या शास्त्रावर विश्वास नसलेल्या लोकांना आता मंगळ शास्त्र काय चीज आहे ते दाखवेल . पत्रिकेत मंगळ कुठल्या भावांचा कारक आहे , नवमांश बळ ,  षडबल किती आहे. त्यावरील पापग्रहांच्या दृष्टी , दशा आणि लग्न किती बलवान आहे ह्यावर ह्याचे परिणाम आहेत आणि जे होतील ते दूरगामी हे नक्की.  

अनेकदा स्वतःच्या आत डोकावून पहायची वेळ येते ..ती आत्ताच आलेली आहे . शनी वक्री , मंगल वक्री , ऑक्टोबर पासून गुरुही वक्री . मंगळ शनी रिअल एस्तेट एक पावूलही पुढे जाणार नाही . अडथळ्यांची शर्यत आहे . मग काय आपण श्वास घ्यायचा नाही कि काय ? घ्यायचा पण त्यांचे बोट धरून .... साधनेला लागा जे करत आहेत त्यांनी वाढवा ....

कुठल्या शब्दाने कुठले संकट ओढवेल सांगता येणार नाही ....सूज्ञास सांगणे न लगे .

उपाय :

१.  दर मंगळवारी मारुतीला जाऊन त्याच्या पायावर चिमुटभर शेंदूर अर्पण करणे .

२. हनुमान चालीसा नित्य पठण 

३ वारेमाप कष्ट 

४ आवश्यकता नाही तिथे गप्प बस ...सगळी अक्कल तुम्हालाच नाही . जगाची काळजी घ्यायला संत बसले आहेत तुम्ही तुमची काळजी घेतली तरी खूप झाले. . 

५ मंगळ भाऊबंदकी करवेल , आगी लागतील . मनातील मत्सराची ज्योत जितकी मोठी तितकी लक्ष्मी मिळवणे दुरापास्त होयील . शेवटी पैशाची सोंगे आणता येत नाहीत . 

६. मौनं सर्वार्थ साधनं  जे ज्याला समजले तो जिंकला. आपले expert मत प्रत्येक वेळी दिलेच पाहिजे असे नाही . 


सारांश असा कि ग्रहस्थिती बदलत राहणार आहे पण ह्या काळात आपल्या कडून कुणी दुखावले गेले तर पुन्हा जवळीक साधता येयीलच असे नाही . आपल्या स्वभावाला अनेकदा आयुष्यात मुरड घालावी लागते , नाती संबंध जपावे लागतात .

हा आपल्या परीक्षेचा काळ आहे म्हणूनच जो उपासनेची कास धरेल तो ह्यातून पार होणारच .


सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230