Thursday, 5 June 2025

रेशीमगाठी भाग 3 - महादशेची अनुकुलता

 || श्री स्वामी समर्थ || 



आपले आयुष्य १२० वर्षाच्या कालखंडाचे धरून त्यात प्रत्येक ग्रहाला ठराविक कालावधी दिलेला आहे त्या कालखंडात तो ग्रह आपल्या आयुष्याचा लगाम त्याच्या हाती घेत असतो. जसे रवीला ६ वर्ष , मंगळाला ७ वर्ष राहू १८ वर्ष अश्याप्रकारे असलेल्या ह्या कालखंडाला त्या ग्रहाची “ महादशा “ असे संबोधले आहे. प्रत्येक ग्रहाच्या दशेचा कालखंड ठरलेला आहे त्या काळात मूळ पत्रिकेत त्या ग्रहाची स्थिती कशी आहे, ग्रह कुठल्या भावाचा कार्येश आहे आणि कुठल्या नक्षत्रात आहे , त्याचा नक्षत्र स्वामी कुठे आहे ह्या सर्व भावांशी संबंधित गोष्टींच्या बाबत काहीतरी फळे मिळणारच . ह्या महादशेत इतर सर्व ग्रहांच्या अंतर्दशा , विदशा सुद्धा  येतात . असो 

घटना घडवायची तसेच ती कधी आणि कशी घडेल ह्याचा संपूर्ण अधिकार महादशा स्वामीकडे राखून ठेवलेला आहे त्यात काहीही बदल करता येत नाही. आज आपण विवाह ह्या विषयावर चर्चा करत असताना दशांबद्दल चर्चा करणे आवश्यक आहे. 

विवाह होण्या साठी पत्रिकेतील 2 7 11 ह्या हे भाव महत्वाचे आहेत . द्वितीय भाव कारण कुटुंबात एका नवीन व्यक्तीचे आगमन म्हणजेच कुटुंब वृद्धी , सप्तम भाव हा पती आणि पत्नीच्या मनोमिलनाचा आहे तसेच विवाह करून लाभ होणार म्हणून लाभ भाव ११ भाव सुद्धा महत्वाचा . ह्या तिन्ही भावांशी निगडीत असणार्या दशा ह्या विवाह हि घटना घडवण्यासाठी पूरक ठरतात . ह्या विरोधात 1 6 10 ह्या भावांच्या दशा असतात . 

साधारण पणे शैक्षणिक दशा संपली कि नोकरी आणि मग छोकरी असे समीकरण धरले तर साधरण वय २८ नंतर विवाहाची दशा जर 2 7 11 भावांशी अनुकुलता दर्शवत असेल तर विवाह होतो. एखाद्यावेळी राहू शनी गुरु बुध ह्या ग्रहांच्या मोठ्या दशा आल्या आणि ग्रह जर षष्ठ भावाची फळे देत असेल किंवा षष्ठ भावाचा एकमेव कार्येश असेल तर अश्या वेळी कितीही प्रयत्न केले तरी विवाह जुळून येत नाही . षष्ठ भाव हा सप्तमाचा व्यय असल्यामुळे विवाह होत नाही किंवा मोडतो. अष्टम भावाची दशा अंतर्दशा असेल तर भांडत भांडत राहतील पण विवाह मोडणार नाही . दशास्वामी 3 9 आणि ६ भाव दर्शवत असेल तर त्यांच्या दशा अंतर्दशेत कायदेशीर घटस्फोट होण्याची शक्यता असते. 

संसारात अनेक चढ उतार येतातच . कधी आर्थिक समस्या निर्माण होतात तर कधी वैचारिक मतभेद . एकदा एका व्यक्तीने मला सांगितले आमचे अजिबात पटत नाही . मी विचारले कारण काय असते वादाचे ? त्यावर म्हणाले आमच्यात शुल्लक करणे असतात उदा. रस्ता कुठून ओलांडायचा त्यावरून पण आमच्यात मतभेत होतात .मला खरच हसू आले. असो पण आहे हे असे आहे . अनेकदा दोन्ही कडील वडील मंडळी सुद्धा त्या दोघांच्या संसारात नको तितकी लुडबुड करतात आणि म्हणून वादाला अंकुर फुटतात .

अनेकदा वयाची पन्नाशी आली तरी विवाहाला अनुकूल दशाच येत नाही आणि सनईचे सूर , मंगलाक्षते कानी पडणे कठीण होते . आपला आजचा जन्म हा पूर्व जन्माशी निगडीत असल्यामुळे पूर्व जन्मातील अनेक चांगल्या वाईट कर्मांचे फळ भोगल्याशिवाय सुटका नाही. विवाहासाठी दशा आणि सोबत चंद्र , रवी , शुक्र गुरु मंगळ हेही बघावे लागतात .रवी आणि गुरुचे गोचर भ्रमण अनुकूल असावे लागते .

थोडक्यात काय तर दशा स्वामी ची संमती घेतल्याशिवाय विवाह ठरत नाही आणि संपन्न सुद्धा होत नाही .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230
















रेशीमगाठी भाग 4 - अविवाहित योग

 || श्री स्वामी समर्थ || 


 

विवाह हा आयुष्याचा टर्निंग आहे पण अनेकदा कित्येकांच्या आयुष्यात “ विवाह “ हि घटना दुर्दैवाने घडताना दिसत नाही . आज त्याची कारण मीमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न करुया .

सप्तमेश पापग्रह युक्त किंवा दृष्ट असेल ६ ८ १२ मध्ये असेल ,नीच वक्री अस्तंगत असेल किंवा वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल वर वैवाहिक सौख्य मिळत नाही .

सप्तमेश व्ययात असून लग्नेश किंवा राशीस्वामी सप्तमात पापग्रह दुष्ट असेल तर वैवाहिक सौख्य मिळत नाही .

६ ८ १२ चे स्वामी सप्तमात असून त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल तर विवाह होत नाही.

सप्तम भाव पापकर्तरी योगात असून शुक्र सुद्धा बिघडला असेल कन्या , सिंह राशीत असेल तरी विवाह होत नाही . लग्न कुंडलीत शुक्र सिंह राशीत आणि सिंह नवमांशात असेल तर विह कठीण झालाच तर टिकत नाही .

सप्तम भावातील वक्री हर्शल, वक्री प्लुटो  विवाह सुखात न्यूनता आणतो. शुक्र केतू युती विरक्ती देते . वैवाहिक सौख्याची ओढ नसते. व्यय भावात पापग्रह असतील तरीही शैयासुख कमी मिळते . बुध शनीसारखे नपुंसक ग्रह सुद्धा विवाह विलंब करतात , 

मेष लग्नाला सप्तम भावात बुध असेल तर विवाहात अडचणी येतील. सप्तम भावात शनी केतू, शनी बुध असतील तर विवाहात अडचणी येतील, अनेकदा होणार नाही. सप्तमेश स्वतःपासून 6 8 12 ह्या भावात असेल किंवा त्रिक भावात असेल तरी त्रासदायक होयील. तुळेचा रवी सप्तम भावात आणि त्यावर शुभ ग्रहांची दृष्टी नसेल तर विवाह जमण्यात अडचणी येतील. 

पत्रिकेत द्वितीयेश , सप्तमेश आणि व्ययेश ह्यांचा संबंध असेल तसेच ह्याचा 6 8 12 ह्या भावांशी सुद्धा संबंध असून त्यावर राहू शनीचा प्रभाव असेल तरीही वैवाहिक सुख न्यून मानावे लागते . अश्या जातकांचे अनेकदा विवाह झालेले दिसून येत नाहीत .

लग्न कुंडलीतील सप्तमेश नवमांश कुंडलीत दुषित असेल तर वैवाहिक सौख्य जवळ जवळ शून्य.

सप्तम भावातील दोन पेक्षा अधिक पापग्रह असून त्यावर पापग्रहांची दृष्टी असेल तसेच ह्या स्थितीत शुक्र सुद्धा दुषित असेल तर विवाह होणे कठीण होते .

सप्तमेश त्रिक भावात आणि त्रिक भावातील कुठलाही एक किंवा दोन ग्रह सप्तम भावात आले तरीही विवाह दुरापास्त होतो. शुक्र पापग्रहांच्या युतीत , दृष्टीत , वक्री असेल तरी वैवाहिक सुखात अडचणी निर्माण होतात.

अनेकदा विरक्ती देणारा केतूचा संबंध लग्न भाव किंवा सप्तम भाव ह्याच्याशी निगडीत असेल किंवा चंद्र केतूच्या नक्षत्रात असेल तरीही जातकाला स्वतःलाच विवाह करण्याची इच्छा नसते. ज्योतिष शास्त्राचे माध्यमातून आपण अनेक ग्रह स्थिती अभ्यासल्या . 


अनेकदा कुटुंबातील जबाबदार्या , वडील भावंड असल्यामुळे लहान भावांच्या विवाहाच्या शिक्षणाच्या जबाबदार्या , आई वडिलांची जबाबदारी , आर्थिक स्थिती , घराच्या समस्या ह्यामुळे सुद्धा विवाह इतके लांबणीवर पडतात कि कित्येकदा पुढे होत सुद्धा नाहीत.


सप्तम स्थानाशी जर बाधकेशाचा संबंध आला तर अविवाहित राहण्याचे योग येतात . चर लग्नाला लाभेश हा बाधकेश आहे.  स्थिर लग्नाला भाग्येश हा बाधकेश आहे. द्विस्वभावी लग्नाला सप्तमेश हा बाधकेश आहे. शुक्र हा जर चंद्र आणि रवी च्या मध्ये असेल तर पत्रिका अविवाहित राहण्याकडे जाते .हे दोघेही शुक्राचे शत्रू आहेत . 


सध्याच्या युगात अनेक सामाजिक स्थिती मुळे मुलांना विवाह करावेसे वाटत नाहीत अशीही उदाहरणे आहेत . एकटा जीव सदाशिव अशी स्थिती अनेक तरुण बोलूनही दाखवतात .  समाज आणि जग बदलत आहे पण तरीही मनापासून असे वाटते कि विवाह संस्था टिकली पाहिजे ...ती कमकुवत होणे आपल्या हिताचे निश्चितच नाही .

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


Tuesday, 3 June 2025

चिथावणी देणारा राहू

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या आजूबाजूला अनेक चांगल्या वाईट शक्तींचा वावर असतो आणि त्यातून आपले आयुष्य राजमार्गावर नेण्याचे काम करते ती आपली उपासना .म्हणूनच उपासनेची कास धरावी म्हणजे अनेक फसव्या आणि मोहात टाकणाऱ्या क्षणांपासून आपले संरक्षण होते.

गेल्या आठवड्यात ४ लोकांनी मला संपर्क केला . Fraud in Investment Apps.  मोठी गुंतवणूक केली आणि फसवणूक झाली .

लक्ष्मी इतकी सहज नाही . कलियुगात राहू हर्शलचे  साम्राज्य आहे , त्यांच्या विळख्यात आपण अडकतो आणि अजून हवे अजून हवे अशी मनोधारणा होते आपल्याही नकळत. कुठे थांबायचे ते समजत नाही . आपल्या मेंदूचा मनाचा राहू इतका ताबा घेतो कि आपल्याही नकळत आयुष्य भराची जमा पुंजी घालवून बसतो. 


आज दोन लाखाचे चार लाख करून देतो वगैरे गोष्टी रोजच्याच आहेत. फसवणूक आता आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आणि म्हणूनच सतर्क राहिले पाहिजे. मुळात आपण कुठे गुंतवणूक करतो त्यासाठी चौकशी करणे हि तर प्राथमिक बाब आहे. दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील पण पोस्टात पैसे टाका तिथे सुरक्षित राहतात असे माझे आई बाबा नेहमी सांगत . 


आज आपल्याला मोहात पडणारी अनेक app , माध्यमे , गुंतवणूक करणारे अनेक प्लान आणि हे सर्व सांभाळणारी लोक आहेत . पण आपण सतर्क राहिलो तर आपण फसवणुकी पासून नक्कीच वाचू शकतो. आज समाजात वावरताना कान नाक डोळे उघडे ठेवायची गरज आहे. तसे केले नाही तर मग मनस्ताप करण्याची वेळ येते. 

मोहाचा एक क्षण आपले आयुष्य उध्वस्त करू शकतो . अश्या वेळी काय ग्रहस्थिती असते ती पाहू. मोहात फसणे , कुणाच्या बोलण्याचा विचार न करता गुंतवणूक करणे म्हणजे कुठेतरी पत्रिकेत राहू कार्यरत झालेला आहे. राहूची दशा अंतर्दशा किंवा गोचर राहूचे धन स्थान अष्टम व्यय किंवा धनेशावरून भ्रमण, मुळ पत्रिकेतील राहू वरून गोचर राहूचे भ्रमण , शनी मंगळा सारख्या पापग्रहांच्या वरून भ्रमण . असो .


फसवणूक होते तेव्हा मुख्यतः अष्टम आणि व्यय भाव सामील असतात अष्टमेश मनस्ताप , व्यय भाव हा एकंदरीत व्यय दर्शवते. प्रश्न कुंडली मांडली आणि चंद्र ८ १२ असेल तर संपलच सगळे. पैसे परत मिळणार नाहीत .

जागृत राहा कारण ह्या गोष्टी आता दिवसागणिक वाढतच जाणार आहेत , आपल्या सारख्या सुशिक्षित शिकलेल्या लोकांची फसवणूक होते हे आश्चर्य आहे कारण पैशाची हाव, शेअर मार्केट हा भूलभुलय्या आहे. दोनाचे चार लाख होतात पण ते स्वप्नात . शेअर मार्केट चा परिपूर्ण अभ्यास असणारेही भले फसतात तर तुम्ही आम्ही काय ? इंटरनेट , ATM , GPAY हि सगळी राहुचीच भावंडे आहेत . gpay काय आहे इथून पैसे तिथे जातात पण आपण बघतो का ते , अदृश्य शक्ती काम करतेय .

शेअर मार्केट मध्ये अनेक धनी झाले आहेत पण त्यांनी वर्षानुवर्ष अभ्यास केला आहे .एका रात्रीत श्रीमंत झालेले नाही ते. सगळे झटपट हवे अश्यांची मग अशीच अवस्था होते . गेल्या जन्माचे ऋण फेडायचे म्हणून बुद्धी होते तशी आणि मग जातात पैसे .

वेळीच सावध व्हा. आपल्या मुलांचे आपले भविष्य सुरक्षित करा. आज जिथे तिथे फसवणूक आहे, सतर्क राहा आणि इतरानाही सतर्क करा. आपले अनुभव शेअर करा . 

गुंतवणूक करताना काळजी घ्या . म्हणूनच प्रत्येकाने आपली पत्रिका थोडीतरी समजून घेतली तर भविष्यातील संभाव्य धोके टाळता येतील.  श्री स्वामी समर्थ. 


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


   



Monday, 2 June 2025

रेशीमगाठी– भाग १- प्रस्तावना

 || श्री स्वामी समर्थ ||


मुलगा असो अथवा मुलगी वयात आले कि घरात त्यांच्या विवाहाची चर्चा सुरु होते . तुझे कुठे ठरले असेल तर सांग बाबा असा कालानुरूप असलेला आधुनिक विचारणा , सल्लाही दिला जातो. पिढी कुठलीही असो विवाह हा जिव्हाळ्याचा विषय संपूर्ण कुटुंबासाठी असतो. आज विवाहाचे संपूर्ण चित्र बदलले आहे , पण तरीही अजूनही मंगलाक्षत ऐकताना आधुनिक नवरीच्या आधुनिक उच्च शिक्षित आईचे डोळे पाणावल्याशिवाय राहवत नाहीत ते तितकेच खरे आहे. 

विवाहाचे सर्व विधी आणि त्या सर्व रूढी परंपरा अगदी रीतसर मुहूर्त काढण्यापासून ते पारंपारिक पेहराव , दागिने घालण्याकडे मुलींचा कल आजही दिसून येतो. विवाह म्हणजे आयुष्यातील मांगल्य आणि त्याचा सोहळा त्यातील गोडवा लुटण्यासाठी दोन्हीही बाजूची कुटुंबे जोमाने तयारीला लागलेली असतात . अनेकदा आयुष्याच्या पुढील वळणावर हा आनंद द्विगुणीत होतो तर अनेकदा ह्या आनंदाला सौख्याला ओहोटी लागते . असंख्य करणातून नेमके कारण शोधणे  कठीण होवून जाते . असो .

विवाह आणि त्यासंबंधी तत्सम गोष्टी जसे विवाह नेमका कधी कुणाशी करावा ? पत्रिका बघावी कि नाही ? ज्योतिषीय सल्ला घ्यावा का? मंगळ आहे त्याचे काय ? अश्या अनेक प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न पुढील काही लेखातून करायचा प्रयत्न करत आहे. आजचे वास्तव खूप वेगळे आहे आणि त्या सर्वाशी मिळते जुळते घेवून पुढील आयुष्य जगण्याची मानसिक तयारी ठेवावी लागते .

आजकाल मुला मुलींची शिक्षणे , नोकरी ह्यामुळे विवाहाचे वय पुढे जात आहे . आता मुलांच्या सारख्या मुलीसुद्धा आपल्या करिअर च्या बाबत जागरूक आहेत , देशोविदेशात प्रवास करणाऱ्या स्वतंत्र आयुष्य जगण्याकडे कल असणार्या असल्यामुळे त्यांचीही मते महत्वाची आहेत . 

पूर्वीचे चहापोहे आणि देण्याघेण्याच्या याद्या आज जरी इतिहासजमा झाल्या असल्या तरी त्या काळाच्या आड जाणे कितपत योग्य आहे ते येणारा काळच ठरवेल. प्रत्येक वेळी पूर्वीच्या लोकांना आणि त्यांच्या चालीरीतींना नावे ठेवून चालणार नाही कारण शेवटी जुने ते सोने म्हंटले आहेच.

विवाह संस्था टिकून राहणे ह्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि विवाह जुळवण्यासाठी सामाजिक घटक म्हणून प्रयत्न सुद्धा केले पाहिजेत . ज्योतिषीय दृष्टीकोन त्याचप्रमाणे सामाजिक व्यवस्था , वधू आणि वराचे आधुनिक विचार , तडजोड , एकत्र कुटुंब अवस्था कि विभक्त ह्या सर्वच गोष्टींचा उहापोह पुढील काही  लेखांतून करूया आणि  ह्यातील अनेक पेहलु तपासून आणि अभ्यासाची दिशाही ठरवूया .

एकूण 21 लेखांची “ रेशीमगाठी “ हि लेखन मालिका आपल्याला उपयुक्त ठरेल अशी आशा आहे, 

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिका मार्गदर्शन संपर्क : 8104639230