Saturday, 28 June 2025

शीघ्रकोपी दीर्घद्वेषी

 || श्री स्वामी समर्थ ||


प्रगती ,समाधान , आरोग्य आणि आनंदाला ग्रहण लावणारे – मत्सर , द्वेष , इर्षा , निंदा , तिरस्कार

समाजात अनेक विविध  स्वभावाची माणसे असतात आणि प्रत्येक माणूस हा षडरीपुनी प्रेरित आहे हे नाकारता येणार नाही. हे रिपू कमी अधिक असतील पण असतात . पण हे रिपू प्रमाणाच्या बाहेर असतात तेव्हा त्यातून मग असूया , मत्सर , द्वेष , दुसर्याला पाण्यात बघणे , निंदा , इर्षा , संताप अश्या अनेक गोष्टींची अपोआप निर्मिती होते . आपल्याला जेव्हा एखाद्याबद्दल मत्सर , द्वेष , तिरस्कार वाटतो त्याचे खरे कारण काय आहे माहित आहे का? आपण त्याचे श्रेष्ठत्व मनोमन स्वीकारलेले असते . त्याचे चालणे बोलणे लोकांच्यात सहजतेने मिसळणे , समाजातील त्याची उठबस , श्रीमंती , त्यांची बुद्धी विद्वत्ता , समाजातील दर्जा मानसन्मान ह्याची बरोबरी आपण करू शकत नाही आणि मग त्या व्यक्ती बद्दल मनात इर्षा , जळफळाट , मत्सर उत्त्पन्न होते . त्याला जे जमले ते मला नाही हि खंत असते .

 

“ मी त्याच्यासारखा का नाही ? “ ह्या प्रश्नाला उत्तर नाही. खरतर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले असतेच पण ते विसरून सतत दुसर्याची बरोबरी करायला आपण जातो आणि तिथेच संघर्ष स्पर्धा सुरु होते . त्यापेक्षा आपल्यातील चांगले गुण अधिक कसे विकसित होतील आणि आपल्याला ते आनंद कसा देतील ह्यावर लक्ष्य केंद्रित केले तर आयुष्य बदलून जायील . शिक्षण कमी असो अथवा अधिक द्वेष मत्सर करणे हि एक मानसिकता , मनोवृत्ती आहे . दुसर्याचा द्वेष मत्सर करून आपण आपल्या मनातील नको त्या विचाराना  खतपाणी घालतो पण हाती काहीच लागत नाही . उलट ह्या चुकीच्या विचारातून बर्या न होणार्या आजारांची निर्मिती मात्र होते . का सतत दुसर्याला पाण्यात बघायचे ? कुणाच्यातील काहीच चांगले दिसत नाही का आपल्याला ? 

सततचा राग काही जणांच्या डोक्यात असतो कारण त्यांना हवे तसे सुख आनंदी आयुष्य मिळालेले नसते. पण दुसर्याचा द्वेष करून ते मिळणार आहे का? नाही . उलट शुक्लकाष्ट मागे लागतील. बघा विचार नक्की करा.  आपण दुसर्याचा हेवा करून वाईट चिंतून आपलीच कर्मे वाढवून घेतो आणि ती फेडायला मग पुनरपि जननं . हे असे आहे सर्व .

आपले आयुष्य जे आणि जसे आहे ते आपण स्वीकारले तर अधिक आनंदी होवू आणि निरोगी आयुष्य जगू . देवाने प्रत्येकाचा एक कोपरा रिता ठेवला आहे. सगळ्यांना सगळे नाही दिले. प्रत्येकाला काहीतरी प्रश्न विवंचना आहे अनेकदा ती आपल्याला माहित नसते . पण एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही म्हणून दुसर्याचा हेवा करणे हे त्यावर उत्तर असूच शकत नाही . प्रचंड मेहनत करणाऱ्या दोन व्यक्तींचे आयुष्य वेगवेगळे असते कारण त्यांचे प्रारब्ध वेगळे आहे . 

एखादा स्वामीना मनोभावे पुजतो आणि त्याची इच्छा पूर्ण होते पण एखादा जन्मभर माळ ओढत राहतो पण प्रश्न सुटत नाहीत. सगळे प्रश्नही आपले आणि उत्तरही आपल्याकडेच असतात . श्री गजानन विजय ग्रंथात एक सुरेख वाक्य दासगणू महाराजांनी लिहिले आहे. कायिक वाचिक मानसिक जी पापे झाली जी अनेक ती माफ कर गुरुराया ... म्हणजे काय तर अगदी मनाने सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नये . कारण हिशोब सगळ्याचाच होणार आहे. कुणाचे पैसे दिले नाहीत त्याचाही आणि कुणा वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत केली त्याचाही .

त्यामुळे दुसर्या सारखे यश मिळत नाही म्हणून त्याचा मत्सर करणे म्हणजे त्याच्यातील चांगले गुण स्वीकारणे पण उघड नाही तर मनोमनी . त्याला वाहवा मिळते मला नाही , त्याला सन्मान मिळतो मला नाही , त्याच्याकडे पैसा आहे संपत्ती ऐश्वर्य दारात चार गाड्या आहेत पण माझ्याकडे नाही...म्हणून त्याचा राग करून ते सर्व वैभव आपल्याला मिळणार आहे का ? नाही . 

बुद्धीची कीव करावी अशी लोक आपल्या आजूबाजूला असतात . का मिळत नाही आहे हे सर्व आपल्याला कारण आपण कायम दुसर्याची निंदाच करतो कुणाला चांगले म्हणणे , कुणाच्या चांगल्या गुणांचे कौतुक कधी केले आहे आपण ? मोठे मन लागते त्यासाठी ते करा निदान प्रयत्न करा बघा मनावरचा ताण जायील, लोकांना आपलेसे करा सतत खोचून टोचून बोलण्यापेक्षा आणि मी इतरांच्या पेक्षा कसा शाहणा आहे हे दाखवण्यात आयुष्य व्यर्थ खर्च करण्यापेक्षा इतरांचे शहाणपण  मान्य केलेत तर सगळे तुम्हाला आपलेसे करतील ते समजणार सुद्धा नाही . शेवटी परमेश्वर हा माणसातच आहे . 

कुणा नातेवाईकाने घर घेतले अहो कष्ट केले आहेत त्यांनी करा कि जरा त्यांचे कौतुक , सदा सर्वकाळ सगळ्यांनी तुमचीच वाहवा करायची कि काय ? दुसर्या कुणाला अक्कल नाही का? सगळी अक्कल फक्त आणि सगळे चांगले गुण तुम्हालाच दिले आहेत कि काय देवाने ? डोळे उघडा जरा आजूबाजूला बघा , मन मोठे करा , सतत देश करण्यापेक्षा कौतुकाने पाठीवर शाबासकीचा हात फिरवा बघा हीच शाबासकी काही दिवसात तुम्हालाही मिळेल . कुणी विद्यार्थी पास झाला करा कि त्याचे अभिनंदन . कुणी नवीन ड्रेस घेतला , घर सजवले , नवीन वास्तू घेतली , कुणाचे लग्न ठरले , कुणाला कसले बक्षीस मिळाले त्यांचे भरभरून कौतुक करा , आनंद साजरा करा त्यांच्यासोबत कारण जे जे द्याल तेच दुप्पट होवून तुम्हालाच परत मिळणार आहे . द्वेष कराल , मत्सर कराल तेच तुमच्याही कडे परत येयील तेही दाम दुप्पटीने. सृष्टीचा नियम आहे जे द्याल तेच परत मिळणार .

दुसर्याच्या आनंदात सहभागी होवून आपली कर्म कमी करण्याची संधी देव आपल्याला देत असतो आणि सोबत आपली परीक्षाही पाहत असतो ज्यात अनेकदा आपण पूर्णतः नापासच होत असतो. 

द्वेष , मत्सर हा मनाला जडलेला आजार आहे. दुसर्याचे चांगले न बघवणे हा मानसिक आजार आहे ज्यातून फक्त आणि फक्त मोठ्या आजारांची नांदी मात्र होते. म्हणतात न घरचे विचारात नाही , दिव्याखाली अंधार तसे जग आहे आता . आपल्या अगदी लहान सहान गोष्टींचे कौतुक जगभर होते पण घरचे विचारत नाहीत. ज्यांच्या सोबत वाढलो मोठे झालो त्यांच्याबद्दल प्रेम नाही उलट तिरस्कार द्वेष का? कश्यासाठी ? जो तो आपापले जगतोय , कोण कुणाचे खातो आपला राम आपल्याला देतो. 

निंदा नालस्ती करून आजार निर्माण होतात शरीरात आपण आपली कर्मे पापे वाढवून घेतो . असा जळफळाट करून समोरच्याचे काही वाईट होत नाही , वाट लागते ती आपली तीही कायमची. आहे ती संपत्तीही जाते आणि मनावर पापांचे थर चढून शरीर मन दुर्बल होते . आपला राग समोरच्याची प्रगती थांबवेल इतके पुण्य नाही आपल्या पदरी . 

मत्सर करणे हि एक वृत्ती आहे जी अर्थात वाईट आहे आणि आपण काहीही चांगले करू शकत नाही ह्याची पोचपावती सुद्धा आहे. कुणाचेही चांगले पाहवत नाही कारण आपले काहीच चांगले नाही , जो तो आपापले नशीब घेवून येणार आणि जाणार . आपण निंदा करून न सूर्याचे तेज कमी होणार ना इतर ग्रहांच्या गतीत फरक पडणार , आपल्या आनंदाला , आयुष्यातील प्रगतीला ग्रहण मात्र नक्कीच लागेल .

दीर्घद्वेषी आणि शीघ्र कोपी माणसांनी दुसर्याचा केलेला द्वेष , मत्सर अनारोग्याच्या पायर्या आहेत मग आहेच BP, पक्षाघात आणि अजून बरच काही ...अश्या माणसांचे आयुष्य बघा खायची जगायची भ्रांत असते. दुसर्याच्या उपकारावर जगावे लागते .नखशिखांत अहंकार शरीर मन पोखरून काढतो आणि ओंजळीतून सगळेच निघून जाते ...

हवी कश्याला दुसर्याची बरोबरी . आपण जसे आहोत तसे छानच आहोत कि .

वेळीच सावरा ...परमेश्वर माफ करायलाच बसलेला आहे .

सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230 


Friday, 27 June 2025

राजेशाही थाट ( सिंह लग्न )

 || श्री स्वामी समर्थ ||




काही दिवसात बर्याच सिंह लग्नाच्या पत्रिका पहिल्या म्हणून आज ह्या लग्नाविषयी लिहावेसे वाटले. सिंह म्हणजे वनाचा राजा आणि राजा म्हंटला कि सगळा तामझाम आलाच . राजासारखा राजाच असतो नाही का. सिंह हि राजराशी आहे राशीचा स्वामी ग्रह हा रवी आहे आणि रवी चे अस्तित्व अबाधित आहे सर्व ग्रहानी त्याचे वर्चस्व , अधिपत्य मान्य केले आहे म्हणूनच त्याच्या भोवती सौर मंडळात सर्व ग्रह त्याच्या भोवती आपापल्या कक्षेत आपापल्या गतीने भ्रमण करत असतात .

सिंह राशी हि पाचवी राशी असून काल पुरुषाच्या कुंडलीत ती पंचम भावात येते. पंचम भाव हा धर्म त्रिकोणातील गाभा असून पुर्व जन्माशी जोडलेला आहे तसेच त्याला कोण स्थान सुद्धा म्हंटलेले आहे. चतुर्थ ( काही ग्रंथ ), पंचम भावावरून आपण आपले हृदय पाहतो आणि म्हणून पंचम भाव शुद्ध असेल तर हृदय दुसर्यासाठी धडकत राहते शेवटपर्यंत. पंचम भाव म्हणजे प्रेम प्रणय विद्या संतती कला खेळ ज्योतिष तंत्र मंत्र आणि शेअर मार्केट सुद्धा .

सिंह लग्न हे अध्यात्मिकता दर्शवते. हे लोक पंचमेश गुरु असल्यामुळे देवावर विश्वास श्रद्धा असणारे असतात . राजाच्या दरबारी सुद्धा राज गुरु , राज पुरोहित , राज ज्योतिषी असत . गुरुतुल्य व्यक्तींचा राजा नेहमीच आदर सन्मान करत असे. तसेच हे लोक सुद्धा असतात . गुरु म्हणजे ज्ञान आणि गुरूची धनु राशी पंचमात आल्यामुळे हे लोक ज्ञान पिपासू , सत्शील असतात . राजाचे सर्व गुण ह्यांच्या ठायी असतात . अनेकदा हलक्या कानाचे स्तुतीप्रिय असतात . ह्यांना सतत कुणीतरी वाह वा म्हणायला लागते. रविचे लग्न असल्यामुळे मुळात शारीरिक ताकद उत्तम ,उत्तम जीवनशक्ती , व्यायामाची आवड , शारीरिक कष्टाला न घाबरणारे , जिद्द त्याच सोबत अहंकार , ओतप्रोत मी पणा हेही गुण उपजत असतात . करारी तडफदार नेतृत्व गुण असल्यामुळे मोठ मोठी पदे भूषवतात  . अंगावर घेतलेले  काम जबाबदारीने पूर्णत्वाला नेतात . संघटन कौशल्य असते. दिलदार , प्रेमळ आणि ईश्वरावर प्रचंड श्रद्धा .

प्रत्येक गोष्ट अर्थात राजा असल्यामुळे उत्तम लागते. ह्यांना दुय्यम स्थान पचनी पडत नाही. खाईन तर तुपाशी असली अवस्था असते. रवी भोवती इतर ग्रह फेर धरून भ्रमण करतात तसे प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा त्यांच्या भोवती खुशमस्करे अवती भोवती असेल कि ते मनातून सुखावतात . 

ग्रहांचा राजा त्यामुळे दानशूर , कलाकारांचा सन्मान करणारा , प्रजेचे हित पाहणारा राजा कुणाला त्रास देत नाही . कुणाचे अहित करणार नाही , परोपकारी , तत्वनिष्ठ , न्याय प्रिय पण अहंकारी मानी वृत्ती चा असतो. राजावर कुणी वर्चस्व गाजवलेले आवडत नाही .स्वतःचे व्यक्ति स्वातंत्र जपणारे हे लोक असतात .कर्तुत्व अफाट पण मानी स्वभाव त्यामुळे अनेकदा माणसे तुटतात , दुरावतात . स्वाभिमान असतो , धाडसी असतात . मंगळ लग्नाला योग कारक ग्रह आहे. राजाचा सेनापती चांगल्या स्थानी आणि चांगल्या नक्षत्रात असेल तर मंगळाची दशा उत्तम जाते. सिंह लग्नाचे लोक सतत इतरांना मदत करणारे, परिणामांची धास्ती न बाळगणारे असतात .खरेपणा , कष्टाळू , धार्मिकता असते . शासनाचे नियम तंतोतंत पाळणारे असतात .

अग्नितत्वाचे हे लग्न असल्यामुळे धर्म त्रिकोणात सगळ्या अग्नी राशी येतात . राजा असल्यामुळे थोडीशी हुकुमशाही वृत्ती , धाडस , जिद्द , अधिकाराचे तेज आणि लालसा असणारे, विवेकी , आचार विचारांनी शुद्ध स्विक राहणीमान , अत्यंत मोकळ्या मानाने जगणारे , उत्साही असतात . देवावर श्रद्धा त्यामुळे उत्तम साधना , ध्यान तेजस्वी व्यक्तिमत्व , रुबाबदार राहणीमान असते. कलासक्त , थोडेसे गर्विष्ठ आणि थोडा मी मी पण असतोच. अग्नीतत्व असल्यामुळे आणि सकारात्मकता असल्यामुळे आजारातून लवकर बरे होतात . व्यायामाची आवड असते. अहंकारी वृत्तीचा त्याग केला तर जनमानसात त्यांच्यासारखी आपलीशी वाटणारी व्यक्ती दुसरी नाही.  

खोटेपणा अंगी नसतो , उंची खाणे पिणे , पेहराव जीवनशैली पसंत करतात . लग्नेश रवी सुस्थितीत असेल तर आरोग्य उत्तम असते. सिंह लग्नाला  शनी  अनिष्ट ग्रह आहे त्यामुळे त्यांच्या दशा त्रासदायक असतात .  सतत वाचन मनन चिंतन आवडते . लाभेश बुधाची राशी असल्यामुळे सर्व वयोगटाच्या लोकांशी त्यांचे जमते. व्यासंग दांडगा असतो. 

मनात काही नसले तरी वागण्यातून बोलण्यातून मी म्हणजे कोण हि भावना डोकावते त्यामुळे अनेकवेळा ते एकटे राहतात . इतरांचे गुण आपलेसे न करणे हा स्वभाव त्यांना एकांतात नेतो . नामस्मरण , जप करून उत्तम साधक होण्याची क्षमता त्यांच्या अंगी असते. राजा असल्यामुळे राजकीय क्षेत्र , मोठे व्यवसाय , मोठी पदे, व्यवस्थापन क्षेत्र ह्यात नेत्रदिपक कामगिरी करतात . स्वकष्टाने आयुष्यात पुढे येतात कारण कष्टाला कमी पडत नाहीत . मनापासून मित्र जपणारे असतात . लोकांच्यात रमणारे , कलासक्त असतात . सिंह लग्नाचे लोक चारचौघात नेहमीच उठून दिसतात . सप्तमेश शनी असल्यामुळे वैवाहिक सौख्य कमी अधिक असू शकते आणि त्यात त्यांना थोडे अपयश सुद्धा येते किंवा सर्वार्थाने संसारात तडजोड करावी लागते आणि तो त्यांचा मुळ स्वभाव नसल्यामुळे त्यांना अधिक कष्ट होतात .

सिंह हा राजा आहे आणि प्रजेचे हित जपणारा आहे. पंचमात चंद्र असेल तर प्रेमळ , सर्वांच्यात मध्यभागी असण्याचा प्रयत्न असतो. दानशूर , महत्वाकांक्षी , शूर , निडर पण तितकाच संवेदनशील व्यक्ती , धर्माचे आचरण करणारा आणि सगळ्यात असूनही आपल्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच ठसा उमटवणारा हा सिंह लग्नाचा जातक डोळ्यात भरल्याशिवाय राहत नाही आणि आपण आपल्याही नकळत त्याच्यासमोर नतमस्तक होतो. त्याच्या तेजामुळे फक्त सौरमंडळ नाहीतर संपूर्ण पृथ्वी तेजोमय होते. विशाल हृदयाचा , कनवाळू , दुसर्याचे दुक्ख समजून घेणारा आणि वेळीच मदतीचा हात पुढे करणारा .अनेकदा त्यांना महत्व दिले नाही किंवा दुय्यम स्थान दिले तर खपत नाही. 

स्पर्धा इर्षा आणि अहंकार ह्या गोष्टीना तिलांजली दिली तर सिंह जातका सारखा जातक नाही. सिंह राशीत रवी मंगळा सारखे ग्रह आले तर अरेरावी अहंकार ह्या दुर्गुणांच्या मुळे पिछाडीला जावू शकतात . हे गुण आटोक्यात राहिले तर उत्तम संघटन कौशल्य आणि नेतृत्व करतील . गुरुतुल्य असतात , मनन चिंतन , अध्यात्म ह्यात जीवन व्यतीत होते . खोटेपणाचा लवलेश नसतो , पण अति स्पष्टवक्ते असतात , आतबाहेर एकच वर्तन असते , माघार घेणे , झुकणे  माहित नसते त्यामुळे अनेकदा नाती संबंध तुटतात . सहसा आपली चूक मान्य करत नाहीत .शनी सप्तमेश त्यामुळे वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागते. समजात  जीवनात उठून दिसतात कारण काहीतरी असामान्य असे देवून जातात .  


आपल्या ओळखीत सिंह लग्नाचे लोक असतील तर ह्या सर्व गुणांचा आरसा त्यांच्यात नक्कीच बघायला मिळेल . राजासारखी राहणी आणि व्यक्तिमत्व असणार्या ह्या सिंह जातकांना मानाचा सलाम.


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Thursday, 26 June 2025

समुद्र बनून जगून बघा ....

 || श्री स्वामी समर्थ ||


एक लाट आली त्याची चप्पल वाहून गेली त्याने लिहिले समुद्र चोर आहे .

एका म्हातारया माणसाला समुद्रावर शिंपले दिसले त्यात मोती होते , मोत्यांमुळे त्याचे आयुष्य बदलले त्याच्या मते समुद्र दानशूर आहे .

मासेमारी करणार्यांना पुष्कळ मासे मिळाले ते म्हणाले समुद्र अन्नदाता आहे.

आजीचा मुलगा समुद्रात गेला आणि गेलाच तिच्यामते समुद्र खुन्यापेक्षाही वाईट आहे .

एक लाट आली आणि सर्वकाही मिटवून गेली. समुद्राला कुणाशीही काहीही देणेघेणे नाही . 

आपण सुद्धा आयुष्यात समुद्रासारखे जगले पाहिजे , आपण आपले काम करत राहायचे . कोण काय म्हणतय त्याकडे लक्ष्य न देता नामस्मरण करत आपले कर्म करत राहावे . 

जोवर स्वार्थ आहे तोवर लोक आपले म्हणतात आणि स्वार्थ साधला कि आपलीच बदनामी करतात .

परमेश्वराची सत्ता अगाध आहे त्याच्या दृष्टीतून काहीच सुटत नाही , वेळ आली कि एकदाच सगळे हिशोब करतो ...कायमचे..मग कितीही मुखवटे लावून जगा ..दुक्ख वेदना पाठ सोडत नाहीत . 

शनी आपल्या आतच आहे . त्याला वेगळे काहीही सांगायची गरज नाही कारण तो आपल्या श्वासातच विराजमान आहे. लो प्रोफाईल जगा. आपल्याला मदत करणाऱ्या माणसांचा विसर पडू देवू नका ...गरज सरो ...केले तर मग आहेच पुढचा अध्याय. 

१३ जुलै शनी वक्री होतोय ...सर्वाना सुबुद्धी व्हावी .


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230


Wednesday, 25 June 2025

महादशा कि राजयोग ?? महत्वाचे काय ??

 || श्री स्वामी समर्थ ||




ग्रहांचा मानवी जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे आणि आपल्या जीवनावर त्यांचा विशिष्ठ ठसा सुद्धा आहे . प्रत्येक ग्रह आपल्या दशेत आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव टाकत असतो. दशा म्हणजे ग्रहाला दिलेला कालावधी ज्यात ग्रह ज्या भावात आहे तो भाव , त्याच्या राशी जिथे आहेत तेही भाव , तो ज्या नक्षत्रात आहे तो नक्षत्रस्वामी ज्या भावात आहे तोही भाव , ग्रह दृष्टी टाकतो ते भाव असे सर्व फळे देण्यास उत्सुक होतात . अजून खोलात शिरले तर उप नक्षत्र स्वामीही आहेच. 

आपल्या पत्रिकेत अनेक ग्रह स्वराशीत , उच्च अवस्थेत असून अनेकदा त्यांचा राजयोग सुद्धा होत असतो . प्रत्येक वेळी हे राजयोग फलित देतात का? तर नाही. ग्रहांची फलिते हि संपूर्णतः आपल्या दशा अंतरदशेवर अवलंबून असतात . उदा. एखाद्या पत्रिकेत शुक्र उच्चीचा किंवा बलवान आहे. पण त्याची दशाच आली नाही तर त्याची सर्वात उच्च फळे आपल्याला अनुभवताच येणार नाहीत . इतर ग्रहांच्या दशेत शुक्राची अंतर्दशा येयील तेव्हा थोडी फळे अनुभवायला मिळतील पण महादशा म्हणून शुक्र येणे वेगळे ती फळे मिळणार नाहीत .

अश्या वेळी शुक्र पत्रिकेत कितीही बलवान असला तरी त्याची दशा नसल्यामुळे त्याची फळे मिळणार नाहीत . म्हणूनच आयुष्यात राजयोग तेव्हाच फलित देतात जेव्हा त्या ग्रहाच्या दशा अंतर्दशा असतात . एकदा एका व्यक्तीची शुक्राची दशा ६५ व्या वर्षी आली. आयुष्यात कधी बायकोला गजरा न आणलेला व्यक्ती बायकोला गजरा आणू लागला, तिच्यासोबत वेळ घालवू लागला, आपण ह्या टूर ला जावू त्या प्रदर्शनाला सिनेमाला जावू असे होवू लागले. हीच शुक्राची दशा त्यांच्या ऐन तारुण्यात आली असती तर अनेक सुखांची दालने तेव्हाच उघडली असती. 

प्रत्येक ग्रहाला अमुक एक काळ दिलेला आहे जसे रविला ६ वर्ष मंगळाला ७ वर्ष , सर्वात अधिक काळ शनीला १९ राहुला १८ वर्ष असा दिलेला आहे. आपल्या पत्रिकेत तो ग्रह चांगला असेल तर ती दशाही चांगली जायील अन्यथा नाही. दशा संपूर्ण चांगली वाईट नसते कारण मध्ये मध्ये अंतर्दशा सुद्धा येतात आणि त्यांचे ग्रह कसे आहेत त्यावर त्यांचे फलित असते. 

अनेकदा माझा अमुक ग्रह स्वराशीत किंवा उच्चीचा आहे पण त्याचे फल मिळत नाही कारण त्याच्या दशेतच ग्रह सर्वाधिक फळे देतो. आयुष्यातील प्रत्येक वळणावर त्यावेळी आवश्यक ग्रहाची दशा आली तर उपयुक्त ठरते . जसे शुक्र हा आनंद पर्यटन विलास खरेदी भिन्नलिंगी आकर्षण विवाह तारुण्य मौजमजा  दागिने अत्तरे फुले एकंदरीत भौतिक सुखाचा कारक ग्रह आहे त्याची दशा २० वर्षाची असून ती ऐन उमेदीत आली तरच त्याचा पूर्ण उपभोग घेता येयील. शुक्राची दशा आयुष्याच्या उत्तरार्धात येवून उपयोग नाही . आयुष्याच्या संध्याकाळी विरक्त अश्या शनीची दशा आली तर त्यावेळी योग्य अशी अध्यात्मिक वाटचाल आणि शांत विरक्त जीवन जगता येयील.

पत्रीकेतील राजयोगापेक्षाही अत्यंत प्रभावशाली असतात त्या महादशा . प्रत्येक घटना घडवण्याचा काळ निश्चित करण्याचा संपूर्ण हक्क आणि अधिकार राखून ठेवणार्या महादशा सगळे लगाम आपल्याकडे ठेवतात . त्यांच्या अभ्यासा शिवाय घटनेची वेळ सांगता येत नाही. त्यामुळे त्या सर्वप्रथम लक्ष्यात घ्याव्या लागतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष म्हणजे चुकीचे भाकीत .राजयोग करणाऱ्या ग्रहाची दशा येते तेव्हाच त्या राजयोगा ची फलिते प्राप्त होतात .

 आपले जन्मस्थ नक्षत्र जे असते त्या ग्रहाची दशा आपल्याला जन्मतः असते. उदा. जर सिंह राशीतील केतूच्या मघा नक्षत्रात जन्म झाला तर केतू दशेने आयुष्याची सुरवात होते. पुढे शुक्र रवी चंद्र मंगळ राहू गुरु शनी बुध ह्या क्रमाने दशा येत राहतात . सगळ्या ग्रहांच्या दशा आपण भोगू शकत नाही , आपल्या आयुष्य मर्यादेवर ते अवलंबून असते.

दशे मध्ये येणाऱ्या अंतर्दशा सुद्धा महत्वाच्या असतात . खरतर अंतर्दशा ह्या सगळ्यात बलवान असतात . त्यामुळे शुक्र ह्या ग्रहाची २० वर्षाची दशा सातत्त्याने चांगली अथवा वाईट जाणार नाही कारण त्यात येणाऱ्या अंतर्दशा सुद्धा आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या असतात . 

प्रत्येक ग्रहाचे फळ कर्माशी बांधील आहे . म्हणूनच आपल्या कर्मानुसार ग्रह फळ देत असतात . ग्रहांना दोष देणे बंद केले पाहिजे कारण शेवटी कर्म हि आपलीच असतात . अनेकदा माझा हा ग्रह उच्चीचा आहे वगैरे आपण ऐकतो पण मग हव्या त्या घटना का नाही घडत ? 


ह्याला अनुसरून एक लहानसे उदा. द्यावेसे वाटते. मध्यंतरी एका मुलाची पत्रिका पहिली. प्रश्न विवाहाचा होता . वय ३४ च्या आसपास होते . त्याची आई मुलाचे तोंडभरून कौतुक सांगत होती. आईला कौतुक असणारच न आपल्या मुलाचे . कौतुक करण्यासारखी करिअर , पैसा दिसणे सर्व काही उत्तम होते पण विवाह अजूनही झाला नव्हता . त्या म्हणाल्या मुली इतक्या सांगून  येत आहेत पण काय अडते समजत नाही . 

आज मुली सुद्धा ३४-३५ ला लग्न करतात त्यामुळे आजकाल हे वय म्हणजे उशीर असेही म्हणता येत नव्हते. अगदी १०० च्या वरती मुली पाहून झाल्या अनेक सोशल साईट वरून पण लग्न जमत नव्हते . 

ह्या मुलाची पत्रिका पाहिल्यावर लक्ष्यात आले वैवाहिक सुखाचा कारक बिघडला होता आणि मुख्य म्हणजे षष्ठ भावाची दशा चालू होती. षष्ठेशाच्या  नक्षत्रात एकही ग्रह नाही त्यामुळे षष्ठ भावाचा तो एकमेव कार्येश होता. आता त्याची दशा ७ व्या भावाचे सुख कसे देणार . ती दशा सोडून द्यावी लागणार म्हणजे त्याचे वय ४५ च्या पुढे जाणार. असो.

मुख्य मुद्दा असा कि महादशा स्वामीचा ग्रीन सिग्नल असल्याशिवाय गाडी हलणार नाही . म्हणूनच संपूर्ण पत्रिकेचा सखोल अभ्यास महत्वाचा . नुसता गोचर गुरु रवी फिरवून लग्न होत नाही. शास्त्र अचूक उत्तर देतेच देते , अभ्यास  परिपूर्ण हवा .


सौ. अस्मिता दीक्षित

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230