Sunday, 26 April 2026

Curse (शाप)

 || श्री स्वामी समर्थ ||




जीवन म्हणजे संघर्ष आहेच आहे .व्यवसायात आपल्याला अनेकदा संघर्ष करावा लागतो , कष्टाला पर्याय नसतो. एका व्यवसायातील दोन व्यक्तींमध्ये पराकोटीची स्पर्धा होती . त्यातील एक देवभक्त आणि कष्ट करून आपले नित्याचे जीवन जगत होती. दुसरीही देवभक्त होती पण ती आपल्या कामापेक्षा दुसर्या व्यक्तीच्या 

यशावर खार खात होती. इर्षा करून काहीही मिळत नाही. इतरांना त्याच्याबद्दल काहीबाही वाईट सांगणे, त्याच्या मागे त्याची निंदा करणे ,अपमानित करणे हे कित्येक वर्ष चालू होते पण पहिल्या व्यक्तीने मात्र आपले वागणे बदलले नाही कारण देवावर श्रद्धा आणि आपल्या प्रयत्नावर विश्वास .


एक दिवस ह्या गोष्टींचा अतिरेक झाला कारण दुसर्या व्यक्तीने पहिल्या व्यक्तीबद्दल फारच वाईट उद्गार काढले जे त्या व्यक्तीला खूप लागले. मन दुखावले आणि डोळ्यात अक्षरशः पाणी आले. पण त्याने काहीही न करण्याचा प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय घेतला फक्त देवाला जे काही आहे ते सांगितले. 


काही दिवस असेच गेले पण त्या नंतर मात्र स्थिती बदलली . टीका , निंदा करणाऱ्या त्या व्यक्तीचा व्यवसाय थांबला, अर्थात अर्थार्जन थांबले , कुटुंबाची अनेक प्रकारे वाताहत झाली आणि सगळे जीवन उध्वस्त झाले. 


ह्या जगात परमेश्वरी शक्ती नक्कीच कार्यरत आहे फक्त ती आपल्याला दिवस नाही . ती एकदाच हिशोब करते पण तो असा करते कि आयुष्यातील सगळा आनंद हिरावून घेते . आपण जगतो पण प्रेतवत . प्रत्येक वेळी दुष्मनी केलीच पाहिजे का ? कश्यासाठी ? आपल्या नशिबात आहे ते मिळणार आपल्याला . जो तो आपापले नशीब घेवून जन्माला आलेला आहे आणि त्याचे इथले कार्य संपले कि जाणार , त्यात तुम्ही आम्ही काहीही बदल करू शकत नाही.


आपण जे काही कर्म करतो , वावगे बोलतो, निंदा करतो , कुणाला फसवतो , पैशाचा चुकीच्या मार्गाने विनियोग करतो , कुणाला त्रास देतो त्याचे जगणे असह्य करतो , समाजात कुणाबद्दल त्याच्या मागे काय काय बोलतो तेही आपली लायकी नसताना ते स्वामी कड्या नजरेने पाहत असतात पण वेळ आल्याशिवाय ते त्यावर आपे मत देत नाहीत . ज्या वेळी ते आपली केस हाती घेतात आणि सोटा उगारतात तेव्हा मात्र आपल्याला पळता भुई थोडी होते . प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे आहे . सारखेच कष्ट करणाऱ्या दोन व्यक्तींचे जीवन वेगवेगळे असते कारण त्यांचे पूर्वकर्म तसे असते. 


कुणाला त्रास देवून आपले चांगले होत नाही तर पुढील संकटांची ती नांदी असते. ह्या सर्वाची कल्पना असूनही आपल्या हातून त्या केल्या जातात कारण तेच आपले प्राक्तन असते. इथे उपासना प्रचंड कार्य करत असते . उपासक असणारी मंडळी ह्या मार्गाला कदापि जाणार नाहीत . 


प्रत्येक कृती किंवा काम करताना त्याच्या परिणामांची भीती आपल्याला असली पाहिजे जर त्यामुळे कुणाचे नुकसान होणार असेल. एक वेळा जेवा पण कुणाचे शाप तळतळाट घेवू नका . ते आपल्याला उद्वस्त करतात . प्रत्येक व्यक्तीला त्याची देवता ज्याची तो उपासना करतो ती तारत असते त्यामुळे आपण बरे आपले काम बरे हा व्यवहार असावा. निंदा करताना एखाद्याला अपमानित करताना किंवा समाजात त्याला बेअब्रू करताना खूप मजा येते , आसुरी आनंदही होतो पण कोण माझे काय वाकडे करणार ह्या प्रश्नाला योग्य वेळ आली कि परमेश्वर उत्तर दिल्याशिवाय राहात नाही . एखाद्याची टिंगल करणे , ग्रुप करून त्याला एकटे पाडणे , घरी आलेल्याला अपमानित करणे ह्या सारख्या गोष्टी अत्यंत वाईट रीतीने बुमरंग होवूनच परत येत असतात .


कुणाची त्याच्यामागे निंदा करून , अपशब्द वापरून तसेही काहीच मिळत नाही. ह्या अपयशाकडे नेणाऱ्या पायर्या आहेत आणि ह्या कृत्यामुळे आपण आपल्या स्वतःलाच संपवत असतो . एखाद्याला दुखावणे म्हणजे त्याच्यातील परमेश्वराला दुखावणे. इतके प्रगल्भ विचारांचे म्हणवणारे आपण पण प्रत्यक्षात मात्र. असो . सुज्ञास सांगणे न लगे. 


आपल्याला देवाने दोन हात दिले आहेत ते कष्ट करून आपलेच आयुष्य साकारण्यासाठी . २४ तास आणि दोन हात ह्याचे गणित जमले कि आयुष्य आनंदी होणारच सर्व काही मिळणारच आणि तेही आपल्या नशिबात आहे तितकेच. कुणाची निंदा करून आपण आपलीच कर्म वाढवून घेत असतो जी फेडायला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो .ह्या चक्रातून आपली सुटका नसते.


एखाद्याचा शाप आपले आयुष्य उध्वस्त करू शकतो हे लक्ष्यात आणून देण्यासाठीचा हा लेखन प्रपंच.


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

जीवनाला सोन्याची झळाळी देणारे “ गुरुपुष्य “

 || श्री स्वामी समर्थ ||


आपल्या अध्यात्मिक प्रगतीसाठी ,उपासनेसाठी ,साधनेसाठी आणि शुभकार्याचा श्रीगणेशा करण्यासाठीचा हा अमृततुल्य

योग  २३ एप्रिल २०२६ रोजी “ गुरुपुष्यामृत योग “ आहे. 


शनीचे पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा “ गुरुपुष्य “ म्हणजेच “ गुरुपुष्यामृत “ योगाची निर्मिती होते .ज्योतिष शास्त्रातील काही असामान्य योग आहेत त्यापैकी हा एक . शनी आणि गुरु दोन बलाढ्य ग्रहांच्या युतीने बनलेला हा योग .दोघेही साधक व उपासक . दोघेही विरक्तीचे ग्रह पण त्यातही फरक आहेच . शनीला प्रपंचाची फारशी ओढ नाही पण गुरुचे तसे नाही . प्रापंचिक जीवन जगताना धर्माचे पालन करा आणि आपली इतिकर्तव्ये पूर्ण झाली कि परमार्थाचे धडे गिरवा हे सांगणारा गुरु आहे. दोन्ही ग्रहांची शिकवण एकच पण शिकवण्याचे मार्ग वेगळे.

गुरूच्या सेवेचे अनन्यसाधारण असे फळ आहे. गुरुविना जीवन ते काय . ते परीक्षा घेतील पण अभाळा इतके पदरात टाकतील. शनी तर आपला मित्रच आहे . पण हा सखा जरा शिस्तप्रिय आणि कडक , न्यायी आहे. 

ह्या दोन्ही ग्रहांचा शुभयोग असताना केलेली साधना अत्युतम फळ प्रदान करेल ह्यात शंकाच नाही.  गुरुपुष्य योगावर सोने खरेदी करतात . ह्या सोन्यासारखेच तेजपुंज आपले आयुष्य देखील व्हावे म्हणून साधना करणेही आवश्यक आहे. गुरुपुष्य योगावर दान अवश्य करावे ,सोने जमले नाही तर चण्याची डाळ आणावी पण ती गुरुपुष्य योगातच .गरिबास गुळ गहू द्यावा .जमेल तितके नामस्मरण करत दिवस आनंदात घालवावा .

दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ह्या ग्रंथात “ गुरुपुष्यामृता” ची महती सांगताना ह्य योगावर जो अनन्यभावे श्री गजानन विजय ह्या पोथीचे पारायण करेल त्याच्या कसल्याही असोत यातना त्याचे निरसन होयील अशी ग्वाही दिली आहे . श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांच्या लीला शब्दांकित केलेला श्री गजानन विजय ह्या पवित्र , रसाळ ग्रंथांचे पारायण गजानन भक्त गुरुपुष्यामृत योगावर आवर्जून करतात . ह्या ग्रंथाच्या २१ व्या अध्यायात श्री दासगणू महाराज लिहितात ..जो ह्या अमृततुल्य ग्रंथाचे पारायण दशमी एकादशी आणि द्वादशी ह्या दिवशी तसेच गुरुपुष्य योगावर करील त्याच्या अवघ्या मनोकामना खचितच   होतील पूर्ण .कसल्याही असोत यातना त्या निरसन होतील. श्री गजानन विजय ह्या ग्रंथात प्रचंड ताकद आहे .आपल्याला मार्ग नक्कीच मिळतो आणि संकट हरण होते हे नक्की , अनुभव जरूर घ्यावा.


आपल्याला सगळे काही हवे असते पण त्यासाठी कष्ट परिश्रम करायची तयारी नसते. इंस्तंट चा जमाना आहे ना ,धीर म्हणून नसतो आपल्याला. पण अध्यात्मात तसे चालत नाही. शनी सगळ्याला विलंब करतो ,आपली प्रत्येक क्षणी परीक्षा बघतो ,त्याच्या परीक्षा कठोर असतात पण त्या देता देताच आपण आपल्याही नकळत घडत जात असतो.


पुष्य हे शनीचे शुभ नक्षत्र आहे . पुष्य म्हणजे पोषण करणारा .हे नक्षत्र अत्यंत शुभ आणि कल्याण करणारे ,सकारात्मकता , उर्जा देणारे आहे पण तरीही हे विवाहास वर्ज्य मानले आहे . ह्या दिवशी केलेल्या सर्व गोष्टींची वृद्धी होते म्हणून ह्या दिवशी सोने खरेदी केले जाते.

ह्या योगावर केलेले जप , ग्रंथ पोथी वाचन ,पारायण ,तप , ध्यान धारणा , दान मोठे फळ देते .कुठल्याही नवीन किंवा बंद पडलेल्या कामाचा श्री गणेशा ह्या योगावर केला तर यश नक्कीच मिळते . भगवंताची आराधना करून त्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी साधक ह्या दिवशी साधना करतात . ह्या योगावर केलेली श्री महालक्ष्मीची साधना सुद्धा विशेष फलदायी होते. गुरुपुष्य योगावर केलेली साधना वृद्धिंगत होते म्हणून ह्या योगावर संकल्प करून धर्मग्रंथांचे पारायण , जपजाप्य केले जाते.

शनी अत्यंत न्यायी आहे ,जसे कर्म तसे फळ म्हणूनच शनी कर्मप्रधान आहे .जीवन  कसे करायचे ते शिकवणारा ग्रह आहे . शनी आणि गुरु ह्या दोन्ही ग्रहांचा मिलाफ होणारा हा शुभदिन सर्व शुभ गोष्टींसाठी उत्तम दिवस आहे . शनी आणि गुरु हे दोन्ही विरक्त , साधक असल्यामुळे ह्या योगावर विवाह मात्र वर्ज आहे. ह्या दोन्ही ग्रहांना विवाहाचे वावडे आहे म्हणून ह्या योगावर नवीन आयुष्याची सुरवात करू नये .


आपले आयुष्य प्रत्येक क्षणाला बदलत असते . कधी हे बदल आपल्या पथ्यावर पडतात म्हणजे शुभ असतात तर काही बदल आपल्याला कठीण वळणांवर आणतात . प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढणे हेच आपल्या हाती असते आणि अश्यावेळी अध्यात्म , उपासना मनुष्याला मदत करते.

“गुरुपुष्यामृत ” योगासारख्या अत्यंत प्रभावी योगावर केलेली प्रत्येक साधना विशेष आणि अद्भुत फलदायी आहे . प्रत्येकाने ह्या योगावर आपल्या कुलस्वामिनीचा , इष्टदेवतेचे नामस्मरण अथवा पारायणरुपी साधना करून आपले जीवन कृतकृत्य करावे.

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ह्या युक्तीला धरून साधनेस आरंभ करावा आणि गुरुकृपेचा लाभ घ्यावा.

गुरु आणि शनी ह्या दोन्ही ग्रहांचे सोन्यासारखे गुण कसे ग्रहण करता येतील हे पाहणे म्हणजेच “ गुरुपुष्य ”.

आपल्या सर्वांच्या आयुष्यात हे गुरुपुष्य एका नवीन सोनेरी किरणांची पहाट घेवून येणारे असुदे हीच गुरु आणि शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना .

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230

अवतीभवतीचा अनमोल आनंद

 || श्री स्वामी समर्थ ||


जीवन आनंदाने ज्याला जगता येते तो खरा माणूस . आपल्या जगण्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असे जगले पाहिजे . आनंद येणार पाठोपाठ दुख्ख वेदना सगळे येणार , कारण त्याशिवाय आनंदाची खरी व्याख्याच समजत नाही . संपूर्ण आयुष्यच काय तर एक संपूर्ण दिवस सुद्धा सगळा आपल्या मनासारखा जात नाही . पण म्हणून आपण जगणे सोडून द्यायचे का ? नाही . पण आपण एखाद्या मनाविरुद्ध घडलेल्या प्रसंगात अडकून राहतो , कुणी एखाद्या शब्दाने दुखावलेले तर तेच तेच धरून व्यथित होतो आणि तेच जीवनभर आठवून आठवून उगाळत बसतो आणि समाधानाच्या असंख्य क्षणांना पोरके होतो. 


ह्या क्षणभंगुर आयुष्याचे जिथे माझे काहीही नाही आणि इथेच मला सगळे ठेवूनही जायचे आहे ते जेव्हा खर्या अर्थाने समजेल आणि ते आपल्या कृतीतून वागण्या बोलण्यातून इतरानाही जाणवेल तेव्हा आपल्या जीवनाचा सोहळा झाला म्हणून समजा . मातीतून आलो पण अनेक चुकीचे शब्द आणि चुकीच्या वागण्यातून सर्व मिळवलेले आपणच माती मोल करतो . हो हो आपण स्वतःच . म्हणूनच प्रत्येक शब्द कृती हि विचारपूर्वक केली पाहिजे. 


घरातील भौतिक सुखे म्हणजे परमार्थ नाही कारण ते तुम्ही घेतलेले नाम सुद्धा तुम्हाला कधीही मिळवून देत नाही . समाधान मात्र इतके मिळेल कि ओंजळ अपुरी पडेल. माणसाने समाधान कश्यात आहे त्याचा सातत्याने शोध घेतला पाहिजे . गेलेला क्षण पुन्हा येत नाही कारण पुढे जात राहणे हा प्रत्यक्ष सृष्टीचाच नियम आहे ...मग आपण कोण तो बदलणारे , नाही का. 


एखाद्या लहान मुलाने आपल्याला दिलेले निरागस स्मितहास्य अहो किती पराकोटीचा आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा क्षण असतो तो. पण आपण मात्र हा असा वागला तो असे बोलला , ह्याने हे केले त्याने ते केले नाही ह्यातच जन्मभर अडकून राहतो . काय जपायचे आणि काय सोडायचे तेच समजत नाही हीच आपल्या जीवनाची शोकांतिका आहे. सोडायला शिका .


लहान सहान गोष्टीतील आनंद शोधता आला पाहिजे आणि तो जगताही आला पाहिजे. आज जे सोडून द्यायचे आहे तेच हृदयाशी कवटाळून बसलो आहोत आणि मग त्या अपिरीमित वेदना आपल्याला दीर्घकालीन आजार देत आहे . मागील पिढ्यात होते का मधुमेह सारखे आजार पण आज तरुण मुलांना सुद्धा हृदय विकार होताना ऐकतो पाहतो . 


लहान सहान गोष्टी सोडून दिल्या पाहिजे आणि त्यासाठी साधनेची आवश्यकता आहे. पण आम्ही खूप शिकलेले आहोत आम्हाला कोण शिकवणार अहो प्रत्यक्ष ब्रम्हदेव खाली आला तर त्यालाही स्ट्रेस देवून परत पाठवू इतका स्ट्रेस आम्ही घेवून जगतोय . द्यायची सवय कधी लागणार आपल्याला , आम्ही फक्त सगळे गोळा करणार . सर्व ज्ञान आम्हाला आहे दुसर्याला काय कळतंय अश्या अविर्भावात जगणे हीच पराभवाची पहिली पायरी आहे. इतरांच्या साठी जागून पाहिले आहे का कधी ? 


साधे पाणी मिळायचे मारामार अन्न खूप दूर राहिले असे जीवन ज्यांच्या वाट्याला आले आहे त्यांनी काय करायचे ? कधीतरी विचार करा आणि केलात तर समजेल देवाने किती भरभरून दिले आहे पण त्याची काडीचीही किंमत नाही आपल्याला आणि म्हणूनच वेळ आली कि त्याची किंमत त्याला आपल्याला करून द्यावी लागते  


कधी पटकन एखाद्या फळ विक्रेत्याला जवळ असलेला उसाचा रस देवून बघा , कुणाला चहा तर कुणाला काही खायला  देवून बघा . उन्हाळ्याने त्रासलेले आहेत आज तरीही सगळे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हातून आपले काम करत आहेत त्यांना ह्या तुमच्या एका लहानश्या मदतीमुळे किती सुख मिळेल त्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही.


आनंद हा देण्यात आहे घेण्यात नाही हे जेव्हा समजेल तेव्हा जीवन समजेल. एक दिवस प्रत्यक्ष परमेश्वराने आपल्याला देणे बंद केले तर काय होईल ? कितीही नारळ वाढवा त्याच्यासमोर काहीही देणार नाही तो मग आम्ही हताश होवू ...पटतंय ना? त्यामुळे खरा माणूस तोच जो आपल्या कुवती ऐपती प्रमाणे देण्यातील आनंद मिळवतो आणि जीवनाचा सोहळा करतो. अश्या लोकांना परमेश्वर न मागता सुद्धा अनेक गोष्टी बहाल करत असतो. 


आयुष्य हि त्याचीच देणगी आहे आणि अखेरच्या क्षणापर्यंत आयुष्य सन्मार्गाने जगणे आणि इतरानाही प्ररणा मिळेल असे काहीतरी करून जाणे हेच आयुष्याचे इप्सित असले पाहिजे . पण आपण हेवेदावे मत्सर कुणाला पाण्यात पहा , कुणाची निंदा करा ह्यातच अडकून पडलेले असतो . 


एखादी अगदी साधी सोपी गोष्ट सुद्धा आपल्याला असाध्य होते तेव्हा परमेश्वराचे अस्तित्व किती मोलाचे आहे ते जाणवू लागते . लहान सहान गोष्टीतील आनंदाला पारखे होणे हेच खरे दुर्भाग्य आहे. आपल्याला काय मिळाले नाही त्याचेच गाणे आपण गात असतो पण जे मिळाले आहे त्याची किंमत आपल्याला कधीच नसते . तेही मिळाले नसते तर काय केले असते हा विचार सुद्धा मनाला शिवत नाही . 

कटू आठवणी येत जात असतात पण तेच आयुष्य नाही. 


अखंड आयुष्यात सुखाचे वारे वाहत असतातच त्याचा आस्वाद घ्या तेव्हाच दुखाची झळ पोहोचणार नाही . दुख सहन करायची क्षमता शेवटी सुखाचेच क्षण देत असतात , नाही का?

जीवन जगण्यासाठी आहे तेही आनंदाने . कुणाचे वाईट चिंतून आपल्याला तरी काय मिळणार आहे ? कुरबुरी , तक्रारी , निंदा , मत्सर , हेवेदाने , अति लोभ ह्यात गुंतून पडणे हे केवळ दुर्भाग्य म्हंटले पाहिजे .ज्याला जीवन जगण्याची कला उमगली तो तर आनंदाने जगेल आणि इतरानाही आनंद देयील ...आज नक्कीच विचार करा ....


मनुष्य जन्म मिळणे कठीण आणि तो सार्थकी लावणे त्याहून कठीण ...


श्री स्वामी समर्थ  


सौ. अस्मिता दीक्षित 

पत्रिकेसाठी संपर्क : 8104639230

Wednesday, 7 January 2026

नैतिक अनैतिकतेच्या पलीकडील राहूचे जग

 || श्री स्वामी समर्थ || 

राहुने आपल्या तन मनावर अक्षरशः ताबा मिळवला आहे. सतत मोबाईल वर दिसणार्या व्यक्तीच्या पत्रिकेत सध्या राहू सक्रीय आहे हे समजायला हरकत नाही. राहू दशा चालू झाली कि व्यक्ती अनेक प्रलोभनात अडकत जाते . youtube , इन्स्टा , whatsapp हेच त्याचे जग होते . ह्यात होणारी स्कॅम सुद्धा राहुचीच मेहेरबानी आहे. ह्या सर्व माध्यमांचा गरजेपुरता वापर केला तर उत्तम पण आज आपण ह्यामुळे संवाद विसरत चाललो आहोत . एकमेकांशी मोकळ्या गप्पा मारायला वेळ नाही आपल्याला किबहुना ते आता out dated म्हणायला हरकत नाही . आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती असतात त्यांना सगळी माहिती असते किबहुना ती त्या आवर्जून घेत गोळा करत असतात . राजकारण खेळणे , इथले तिथे करणे , गैरसमज पसरवणे जे मुद्दामून केले जातात , गरज नाही तिथे नाक खुपसणे ह्यात राहूच आहे. राहू म्हंटले कि भल्याभल्यांची झोप उडते . अनेकदा चार लोक एका गोष्टीला वाईट म्हणू लागली कि अर्थात त्यांच्या अनुभवावरून  पाचवा सुद्धा त्या शृंखलेत सामील होतो आणि त्याला वाईट म्हणू लागतो (अनुभव नसताना ).असो हा मनुष्य स्वभाव आहे. आयुष्यातील सगळे चढ उतार आपल्याला राहू दशेतच बघायला मिळतात . रंकाचा राव करणारा राहू जनमानसाला जबरदस्त प्रभावित करणारा जणू खलनायक आहे . खेकडा जसा दगडाला घट्ट धरून असतो अगदी तसाच राहू आपल्या मेंदूचा ताबा घेतो . 


म्हणूनच आज राहुविषयी अधिक जाणून घेवूया . प्रत्येक वेळी अभ्यासातून , संशोधनातून आणि अनुभवातून आपल्याला राहूचे अनेक नवनवीन कंगोरे उलगडत जातात आणि आपण सुद्धा विस्मयचकित होवून जातो. अनैतिकता हा राहूचा स्वभाव निश्चित आहे पण अनेकदा चांगल्या ग्रहांच्या युतीत संपर्कात येवून तो आपल्याला एक वेगळा दृष्टीकोन सुद्धा देवू शकतो . अनैतिक गोष्टी घडवण्यात राहुचेच master mind असते पण अनेकदा ते कोण घडवते तेच समजत नाही . आपल्या संपर्कात असणार्या व्यक्तीत राहू लपलेला असतो पण त्यातील कोण आपला आणि कोण आपला नाही ह्याचा पत्ता आपल्याला काही करून न लागणे हीच राहू दशा आहे. म्हणूनच राहू दशेत व्यक्तीने कमीतकमी लोकांच्या संपर्कात राहावे , समाजात कमी मिसळावे , डोळसपणे जगावे , आंधळा विश्वास इथे कामाचा नाही . कुठेही अंध विश्वास ठेवून सही करू नये , कुणालाही जामीन राहू नये .

राहुकडे शीर आहे , डोळे कान नाक घसा सगळी इंद्रिये आहेत त्यामुळे राहू दशा अंतर्दशेत व्यक्तीला हे करू कि ते करू असे होवून जाते , जे जे दिसते ते सर्व हवे असते तसेच व्यक्तीतील passion वाढते , विचारांच्या कक्षा रुंदावतात पण हे सर्व पचवता मात्र येत नाही कारण त्याच्याकडे शरीरच नाही . विचारांना नुसते पंख फुटून उपयोग नाही ते प्रत्यक्षात तर आले पाहिजेत जे येत नाहीत . मला खूप काही करायचे आहे पण त्या कल्पना सत्यात उतरत नाहीत . त्यातून हाती येते ते मात्र  वैफल्य .

राहू व्यक्तीचा कल्पनाविस्तार वाढवतो , आशा अपेक्षा फुलवतो पण पुढे सर्व संभ्रम असतो . त्या सत्यात उतरवणे जमतेच असे नाही . राहूच्या दशेच्या अंतिम टप्प्यात अनेकदा व्यक्ती पूर्वपदावर आलेलीही दिसते . प्रचंड धाडस , काळी जादू वगरे प्रकार सुद्धा राहूच . 

राहू अत्यंत हुशार आहे पण मंगळ आणि राहूच्या हुशारीत फरक आहे. राहू होत्याचे नव्हते करणारा आहे . अचानक आकस्मित , अकल्पित सुद्धा . मंगळ योद्धा आहे तो सरळ लढेल पण राहू कट करण्यात माहीर आहे . त्याच्यासारखा दुसरा कुठलाही ग्रह ह्यात त्याच्या जवळपास सुद्धा नाही . हेर खात्यातील किंवा हेरगिरी करणाऱ्या लोकांचा राहू बलवान असतो .

एखादे अनुमान लावणे अनेक तर्क वितर्क करणे म्हणजे राहू. कलियुगाचा बादशाह राहू आहे. 


सोशल मिडिया , इंटरनेट चे युग अवतरले ते राहूमुळे . राहुने जग जवळ आणले . टेक्नोलॉजी राहुकडे . स्मार्टफोन म्हणजे राहूच . बघा आज प्रत्येक जण फोन मध्ये डोके खुपसून बसलेला असतो. ज्यांचा राहू पत्रिकेत सक्रीय आहे ते काम असो अथवा नसो फोन laptop ह्या माध्यमात सतत दिसतात . राहुने आपल्या तन मनावर ताबा मिळवला आहे.  राहुने आपले विश्व जग बदलुन टाकले आहे . विशेष करून रात्री उशिरापर्यंत मुले काय सगळेच फोन घेवून बसलेले असतात . इन्स्टा म्हणजे सुद्धा राहूच . आपण गोष्टी एका क्लिक वर विकत घेतो अनेकदा फसतो सुद्धा . मी एकदा फुले ठेवयाची एक कुंडी मागवली जेव्हा ती प्रत्यक्षात घरी आली तेव्हा ती इन्स्टा वरती दिसत होती त्यापेक्षा खूप लहान होती . दिसणे आणि प्रत्यक्ष असणे ह्यातील फरक राहुने शिकवला त्या दिवशी मला . भ्रमित करणारा राहू , मुले अभ्यास करत नाहीत , काढून घ्या कि त्यांचे मोबाईल. करतील अभ्यास . बघा प्रयत्न करून . फोन काढून घेणे म्हणजे माश्याला पाण्यातून बाहेर काढण्यासारखे आहे. असो. राहुने तंत्रज्ञान दिले आहे पण त्याचा किती आणि कसा वापर करायचा हे आपल्या हातात आहे , पटतंय का?


व्यसनं राहुकडेच आहेत . राहू बरोबर असलेल्या इतर ग्रहांचे विशिष्ठ राशीतून होणारे योग हे व्यसने देतील आणि त्यातून बाहेर येणे अत्यंत अवघड होयील . राहू धुवा आहे त्यामुळे सिगरेट चे व्यसन , नशिल्या पदार्थांचे व्यसन राहू देतो . पण काही वेळा हा अध्यात्मिक प्रवास सुद्धा घडवतो . राहुकडे दृकश्राव्य मध्यम आहे . आपल्याला जे दिसते आणि जे दिसत नाही त्यातील पडदा म्हणजे राहू . जे दिसत नाही त्याचे दर्शन देणाराही राहू म्हणूनच त्याला अध्यात्माचा कारक म्हंटले जाते . साधना नामस्मरणाने हा मधला पडदा दूर होण्यास मदत होते . शत्रूंचा नाश करणारा राहूच आहे जर पत्रिकेत षष्ठात असेल. हि राहूची सर्वात उत्तम स्थिती आहे. राहुला कंट्रोल करण्यासाठी हनुमान चालीसा नित्य पठण करावे. नाग सर्प ह्यांचे प्रतिक राहूच आहे त्यामुळे पत्रिकेतील कालसर्प दोष राहूच दर्शवतो . राहूच्या दशेत गूढ विद्या , मंत्र तंत्र , ज्योतिष शास्त्राचे शिक्षण उत्तम होते . राहू संशोधन करवतो . 

राहूचा दोष कमी करण्यासाठी माता दुर्गा ची उपासना , हनुमान चालीसा , शंकराला अभिषेक करावा.


सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230