||श्री स्वामी समर्थ ||
घरातील देवांची पूजा हा आपला नित्यक्रम किंबहुना आपला दिवसच सुरु होत नाही त्याशिवाय. कित्येक लोक तर नित्याची पुजा झाल्याशिवाय पाणीहि घेत नाही. पूर्वीच्या काळी किंवा आजही कित्येक ठिकाणी अजूनही सोवळे नेसूनही पूजा करण्याची प्रथा आहे. असो तर सांगायचे तात्पर्य कि १६ उपचारातून षोडशोपचारे पूजा आपण करतोच. पण त्याही पेक्षा अशीही एक पूजा आहे जी आपल्याला भगवंताच्या हृदयाचीच नव्हे तर त्याच्याशी एकरूप करते आणि ती सर्वश्रेष्ठ पूजा म्हणजे “ मानसपूजा” .
कित्येक वेळा मानसपूजा म्हणजे काय हा प्रश्न बरेच लोक विचारतात. सगळ्याच गोष्टी सगळ्यांना माहित नसतात. एकमेकांना विचारून ,माहिती करून घेवूनच आपल्या जीवनातील अध्यात्मिक प्रवास सुरु असतो. बरेच वेळा आपल्याला घरातून नोकरीनिम्मिताने लवकर बाहेर पडावे लागते किंवा आपण प्रवासात असतो , कुठे बाहेरगावी गेलेलो असतो, अश्यावेळी मनात इच्छा असूनही आपल्या देवांची पूजा आपण केली नाही हि रुखरुख मनास लागून राहते . पण देवही आपल्या भक्तीचा भुकेला आहेच .जशी पूजेतील एखादी उणीव अक्षता वापरून भरून निघते त्याचप्रमाणे मानसपूजा करून आपण आपल्या आराध्याचे पूजन नक्कीच करू शकतो.कुठल्याही साधनेसाठी तसेच मानासपूजेसाठी उत्तम काळ म्हणजे प्रातःसमय.पहाटेची वेळ,नुकतेच झुंजूमुंजू होत असते ,निरव शांतता ,मन आणि शरीराचा समतोल साधला जातो ,मन एकाग्र होते. प्रातः समयी केलेली मानसपूजा आपल्या दिनचर्या निश्चितपणे प्रभावित करते .आपल्या आराध्याला आपल्या हृदयात विराजमान केले मग काय रोजच भेटीचा योग येतो आणि वर्णन करू शकणार नाही अश्या परमोच्च आनंदाची अनुभूती मिळते .
मानसपूजा म्हणजे अंतर्मुख होवून अंतकरणापासून कुठल्याही माध्यमा शिवाय , जसे ताम्हन, पळी-पंचपात्री, पूजा साहित्य जसे गंध ,हळद-कुंकु, फुले,धूप-दीप, निरंजन, नेवैद्य , केलेला कल्पना विलास. मानसपूजा कि आपल्या कुठल्याही देवतेची आपण करू शकतो जसे श्रीगणेशाची , कुलस्वामिनी ,कुलदैवत किंवा सद्गुरू.तसेच मानसपूजा करताना कुठल्याही सोवळे ओवळे हवे अश्या कर्मकांडात अडकण्याचीहि गरज भासत नाही.स्थळ काळाचेही बंधन लागत नाही. महाराजांची सचेतन मूर्ती डोळ्यासमोर आणून केलेली पूजा म्हणजेच मानसपूजा जी भगवंतास विशेष प्रिय आहे.जिथे कल्पनाविलास आहे पण त्याहीपेक्षा त्यातील निर्मळ भाव महत्वाचा .
आज मी ह्या लेखाद्वारे समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थांची मानसपूजा पूजा करत आहे. आपल्या मनाप्रमाणे ,इच्छेप्रमाणे आपण हि आपल्या घरी, कुठेही करू शकता .
घरी असलात तर पद्मासन, सुखासन घालून डोळे बंद करून बसावे. दीर्घ श्वास घेवून सोडवा आणि मन शांत ,एकाग्र करावे. आपल्या घरातील ,प्रपंचातील गोष्टी मनातून काहीकाळ दूर कराव्यात. आपल्या समोर स्वामींची मूर्ती नाही तर प्रत्यक्ष सचेतन रूपातील स्वामी प्रगट झाले आहेत अशी कल्पना करून मानसपुजेस सुरवात करावी. स्वामीचरणी आपले मस्तक ठेवून मनोभावे नमस्कार करावा आणि तुमच्याकडून हि मानसपूजा ते करून घेत आहेत , अहो भाग्य आपले ह्यासाठी त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे.
आपले सद्गुरू आपला श्वास जणू , त्यामुळे अगदी आपल्या लहान लेकराला अंघोळ घालतो त्याच प्रेमाने महाराजांना स्नान घालायचे आहे . तत्पूर्वी महाराजांना चारी बाजूनी सुरेख रांगोळी काढलेल्या चौरंगावर बसवायचे आहे. साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसरा. महाराजांच्या स्वागतासाठी सर्वत्र फुलांची तोरणे आणि सनई चौघडे लावले आहेत ,वातावरण अतिप्रसन्न झाले आहे ,आपण स्वतः अगदी छान साडी ,अलंकार घालून नथ घालून आहोत असा कल्पना विलास करायचा आहे . महाराजांना अगदी अलगद स्नान हातावर पाणी घेवून घालायचे आहे .आपण करतो त्याप्रमाणे पाण्याचे तांबे त्यांच्या डोक्यावर अजिबात ओतायचे नाहीत. वातावरण असेल त्याप्रमाणे महाराजांना विचारायचे ,अहो ते प्रत्यक्ष समोर बसले आहेत हा मनातील भाव हीच तर ह्या मानास पूजेतील मेख आहे .महाराजांशी संवाद साधत त्यांना विचारायचे स्वामी पाणी खूप ऊन आहे का मग त्यात थोडे साधे पाणी घालायचे.. .आपण लहान मुलाला कशी प्रेमाने दुधाची साय लावतो त्याचप्रमाणे, महाराजांना दुधाची साय , सुगंधित चंदन ,कस्तुरी लावून ऊन पाण्याने महाराजांना स्नान घालायचे आहे.
स्नान विधी आटोपल्यावर महाराजांना मनोभावे नमस्कार करून तलम पंचा अंग पुसण्यास द्यायचा आहे. महाराजांनी अंग पुसल्यावर त्यांना रेशमी वस्त्र ,सोवळे पंचा नेसावयास देवून त्यास पुन्हा सुशोभित रांगोळी काढलेल्या दुसर्ऱ्या पाटावर किंवा चौरंगावर बसवायचे आहे.
आता महाराजांना कपाळास अष्टगंध, चंदन ,गंध अक्षता यांचा तिलक लावून त्यास जानवे घालायचे. सुवासिक अत्तरहि लावायचे ,त्यांना हीना हे अत्तर फार आवडते .महाराजांना त्यांची आवडती रुद्राक्षाची माळ घालून मग आपल्याकडे असतील त्या सुवासिक फुलांच्या जसे
चाफा ,गुलाब, मोगरा , सायली, चमेली माळा घालून नमस्कार करायचा. दोन्ही हातामध्ये सुवासिक फुलांचे गजरे बांधायचे. महारांच्या पायावरती फुले वाहून चरणस्पर्श करायचा.
पंचारती घेवून महाराजांना ओवाळायचे , शेजारी सुवासिक अगरबत्ती लावावी. महाराजांशी सतत संवाद करत राहायचा. महाराज आता आपली भोजनाची वेळ झाली आहे ,स्वयपाक तयार आहे मी आपल्याला भोजन आणते असे म्हणून ,आपल्या घरी त्या दिवशी जे काही जेवण केले असेल तेच महाराजांसाठी आणावे, शेजारी पाण्याचे तांब्याभांडे ठेवावे आणि आपल्या लेकास ,नातवास ज्या ममतेने , आत्मीयतेने आपण जेवू घालतो त्याच प्रेमाने ,भक्तीने महाराजांना जेवू घालावे. महाराज कशी झाली आहे भाजी आपणास तिखट तर नाही ना लागत असे हळूच विचारावे, जितका भाव उत्कट साधा सोप्पा तितकेच आपण महाराजांमध्ये जास्ती एकरूप होत जातो जा माझा अनुभव आहे.
महाराजांना सांगायचे आज आपले चरण माझ्या घरास लागले आपल्याला न्हाऊमाखू घालून जेवू घालायची संधी मला मिळाली मी सदेह स्वर्गास गेले ,जीवन कृतार्थ झाले, धन्य झाले. महाराजांचे जेवण झाल्यावर त्यांना तांबुल देवून त्यांच्या चरणी बसावे. आता महाराजांच्या विश्रांतीची वेळ झाली आहे तेव्हा त्यांना लोड तक्क्या देवून, अंगावर तलम शेला पांघरून त्यांच्या पायाशी बसून त्यांचे हळूहळू पाय चेपत बसायचे. महाराजांना शांत झोप लागली आहे. त्यांना मनोभावे नमस्कार करून अलगद आपले डोळे उघडायचे आहेत .
मंडळी, खरोखरच आपल्याला ह्या मानसपूजेतून इतका स्वर्गीय आनंद प्राप्त होतो तो शब्दात मांडणे केवळ अशक्य आहे ,आपण स्वतःच प्रचीती घेवून बघावी.
आपण ह्या मानसपूजेत इतके रममाण होतो कि जणू देहभान विसरतो, सुख दुखःच्या पलीकडे नेणारी हि पूजा आहे. सर्वच विसर पडतो. मन शांत होते, महाराज सतत आपल्या अवतीभवती असल्याचा भास होत राहतो,आणि उच्च कोटीच्या पारमार्थिक आनंदाच्या लाटेवर जणू आपण स्वर होतो.महाराजांना स्नान घालताना कालांतराने आपल्याला त्यांचा स्पर्श जाणवू लागतो . संपूर्ण दिवस मानसपूजाच आठवत राहते. खरोखरच हा भास नाही तर महाराज खरच माझ्या घरी आले होते, हि प्रत्यक्ष अनुभूती देणारी हि पूजा प्रत्येकाने करावी आणि त्याचा आनंद लुटावा. मानस पूजेत आपण आपल्या महाराजांशी संवाद साधत असतो ,पुढेपुढे असा एक क्षण येतो कि महाराजही आपल्याशी बोलतात आणि ते आपल्याला ऐकू येते ,साधकाचा आपल्या लाडक्या
गुरुंबरोबर केलेला संवाद तो काय वर्णन करावा..शब्दांकित करण्याजोग्या ह्या गोष्टी खचितच नाही ,तर ज्याने त्याने प्रत्यक्ष प्रचीती घेवून पाहण्याजोग्या आहेत.
मी तर सतत महाराजांशी बोलत असते , घरातून बाहेर जाताना त्यांना सांगून जाते. कधी मन विषण्ण झाले तर महाराजांच्या जवळ जाऊन बसते , दादरच्या मठात जेव्हा जेव्हा जाते तेव्हा तर महाराजांशी खूप संवाद होतो. घरात कुठलेही कुरियर किंवा अगदी फोन चे बिल आले तरी महाराजांच्या फोटोला लावून उघडते असो. काय सांगायचे ,भांडायचे ते त्यांच्याशी,ते काही कुणाला नाही जाऊन सांगत.
अश्या प्रकारे आपण आपल्या कुलदेवतेचीहि मानसपूजा करू शकतो. लवकरच अधिकमास येत आहे , अधिकमासात रोज ह्या मानसपूजेतून आपल्या देवतेचे स्मरण करावे. हि मानसपूजा आपण सकाळ संध्याकाळी करू शकतो . शेवटी हा आपला कल्पना विलास आहे. .
मंडळी , आज मला भावलेल्या २ साधकांची सर्वश्रेष्ठ मानसपूजा इथे नमूद केल्याशिवाय हा लेख पूर्णत्वाला जाणार नाही. पहिले म्हणजे डहाणू येथील संत श्री गजानन महाराज यांचे निस्सीम भक्त दादा पवार . दहाणू येथे हिवाळ्यात प्रचंड थंडी असतेच , दादा रात्रीच्या वेळी वाटीत तेल घेवून महाराजांच्या पायाला तेल लावत असत. मानसपूजेतून महाराजांशी त्यांनी साधलेला संवाद इतका सजीव असायचा पुढील गोष्टी दादाना समजत असत. महाराजांच्या सेवेत त्यांनी आपले उभे आयुष्य वेचले.
अश्याच एक आजी होत्या ,स्वामींच्या सेवेत रममाण होणाऱ्या. मंडळी स्वतःचे देहभान विसरून अंतर्मानापासून केलेली मानसपूजा किती परमोच्च असू शकते ह्याचा ह्यापेक्षा मोठा दाखला निदान मजकडे तरी नाही.
आजी रोज मानस पूजा करत असत. एकदा घरात पूजा करताना त्या चटईवरती बसल्या होत्या .शेजारी त्यांचा लहान नातु खेळत होता आणि घरातील इतर माणसे नित्याची कामे करत होती. मानसपूजा करत त्यांनी महाराजांना फुले घातली ,गंध अक्षता वाहिल्या आणि महाराजांना त्या अत्तर लावणार इतक्यात त्यांच्या नातवाने त्या ज्यावर बसल्या होत्या ती चटई ओढली, आजींच्या हातून अत्तराची बाटली खाली सांडली आणि घरभर त्या अत्तराचा सुवास दरवळू लागला. किती हि एकरूपता. मानसपूजा हा आपल्या आराध्याच्या निकट नेणारा ,त्याच्याशी संवाद साधायला लावणारा सोप्पा ,बिनपैशाचा मार्ग आहे. ह्यात सातत्य असेल तर साधक सद्गुरुंमध्ये इतका
एकरूप होतो जणू दुग्धशर्करा योग. मनास अपार शांतता तर मिळतेच ,मनात काल्पविकल्प येत नाहीत. घरातील वास्तु दोषही नष्ट होवून वास्तू पवित्र होते ,धनसंचय होतो , आयुष्यातील अडचणी दूर होतात . शेवटी जसा तुमचा भाव तशी प्रचीती . आपल्या प्रत्येक कर्मात परमेश्वराला पाहणे , हीच अखंड मानसपूजा होय. अशाप्रकारे आपण सतत नामांत राहून, प्रत्येक कर्माला अनुसंधानाची म्हणजे नामस्मरणाची जोड दिल्यास “जेथे जातो तेथे तूं माझा सांगाती' याची अनुभुती येईल” .
परमेश्वराने त्याची सेवा करण्याची संधी प्रत्येकाला दिली आहे ,त्याच्या जवळ कुणी आवडते नावडते नाही ,पण जो ह्या संधीचा फायदा करून घेतो त्याच्या जीवनाचे सार्थक होते आणि मग “आनंदाचे डोही आनंद तरंग ” अशी अवस्था प्राप्त नाही झाली तरच नवल.
अस्मिता
लेख आवडल्यास खालील लिंक वर Click करून अभिप्राय नक्की द्या.
antarnad18@gmail.com
#antarnad#spiritual#shraddha#surrender#sadguru#chanting#anubhuti
#मानसपूजा#अध्यात्म#श्रद्धा#पूजा#सद्गुरू#सेवा#नामस्मरण#अनुभूती