|| श्री स्वामी समर्थ ||
साधकाचा दिनक्रम कसा असावा ? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. आज त्याबाबत जाणून घेवूया. आजचे जीवन अत्यंत धकाधकीचे आहे. सकाळची ८.२ ची लोकल पकडली म्हणजे जीवनाचे सार्थक झाले आणि मग युरेका असे ओरडून नाचावे ,असेच काहीसे जीवन आजचे आहे.
अगदी रोज पुणा-मुंबई प्रवास करणारे लोक आहेत.असो तर ह्या सर्व धावपळीत आपण आपली साधना करावी कशी हा प्रश्न पडतो आणि मग वेळ नाही ,जमत नाही असे उत्तर देवून सारवासारवी केली जाते. वेळ नसतो तो काढायचा असतो आणि सत्कारणी लावायचा असतो. आयुष्याच्या संध्याकाळी जसे मुद्दलावरच्या व्याजावर आपण जगतो,त्याची सोय आयुष्यभर करून ठेवतो अगदी तसेच आपल्या साधनेचेही रांजण भरून ठेवले तर त्यातील अमृतावर आपल्या अखेरचे दिवस निश्चितपणे आनंदात जातील ह्यात शंकाच नाही.
आपल्या दिवसभराच्या साधनेचे विभाजन केले तर काहीच कठीण नाही. सकाळी घरातील नोकरदार मंडळींची आणि सर्व कामांची घाई असते तसेच आजकाल पाण्याचे प्रश्नही असतात. आपल्याला खुलभर दुधाची गोष्ट माहितच आहे,त्यामुळे आपळे सर्व प्रातःविधी आटोपले कि आपली साधना करावी.
साधना विभागून करावी, आपल्या वेळेप्रमाणे त्याचे विभाजन असावे.
१. नामस्मरण ( जप )
२. पोथी वाचन(पारायण)
३ मानसपूजा
४ ध्यानधारणा
५ नामस्मरण
प्रातःसमयीच्या नामस्मरणाची सुरवात नेहमीच कुलस्वामिनीच्या नामजपाने करावी. कुलस्वामिनी आपली नस ओळखते आणि तिच्या कृपाप्रसादाशिवाय सर्व फोल आहे. प्रत्येक वर्षी खरतर श्रावण /मार्गशीर्षात आपल्या देवीची ओटी भरायला सहकुटुंब जायला पाहिजे . पण कुलदेवतेचे दर्शनास जायला सुट्टी मिळत नाही जी सिंगापूरच्या ट्रीप साठी अगदी लगेच मिळते. माफ करा पण जे दिसते समाजात आजकाल तेच लिहिले आहे. आपल्या आयुष्यातील Priorities आपणच ठरवायच्या आहेत. हे चित्र सगळीकडे असतेच असे नाही . काही लोक सहकुटुंब सहपरिवार कुलस्वामिनीच्या दर्शनाला आवर्जून जातात , तो त्यांचा न चुकता केलेला नियम असतो.
कुलस्वामिनीच्या जपानंतर कुलदैवत त्यांचाही जप केला पाहिजे. प्रातःकाली सूर्य पूर्व क्षितिजावर येताना गायत्रीमंत्र किंवा सूर्याची ११ नवे घेवून सूर्यास अर्घ्य देणे हे तर घरातील सर्वांनी करावे. सूर्याचे आपल्या जीवनात अनन्यसाधरण महत्व आहे. सूर्यामुळे आपल्याला सकारात्मक उर्जा मिळते आणि आपले आरोग्यही चांगले मिळते . सूर्यामुळे तर सृष्टी आहे,तेव्हा सूर्यप्रकाश अतिमहत्त्वाचा आहे.सूर्योपासना म्हणजे सूर्यास अर्घ्य, गायत्री मंत्राचे नित्य पठण आणि सूर्यनमस्कार . घरातील मुलांना लहानपणापासून ह्याचे बाळकडू पाजले पाहिजे.
आपल्या सद्गुरूंचा जप त्यानंतर करावा. बरेचवेळा जप करताना झोप येते असे प्रश्न येतात. कारण आपल्या वास्तूतील नकारात्मक शक्तींच्या प्रभावामुळे ह्या गोष्टी घडत असतात. काहीही झाले तरी जप सोडू नये. इथेच आपली खरी परीक्षा असते. जप करताना ज्या देवतेचा जप करत आहोत तिला शरण जावून सद्भावनेने ,आत्यंतिक प्रेमाने तो जप करावा . खाली भाजी आणायला जायचे आहे त्याआधी १० मीन जप करून घेते असा तो उरकून टाकू नये. जप हा साधनेचाच एक भाग आहे. आपले मन शांत असेल तेव्हाच तो करावा . जप कसाही करावा रोज एकाच ठिकाणी एकाच आसनावर करावा असे काहीही नाही. सुरवातील जपाची माळ लागते कारण मन सैरभैर होते पण एकदा सवय झाली कि कुठल्याच माळेची गरज भासत नाही. मी तर म्हणीन श्वासागणिक जप करावा . जप न करण्यासाठी आपल्याला १००० करणे सुचतात. मनात नसेल तर खर्च करू नये पण निदान ज्याचा जप करतो त्या देवतेवर उपकार केल्यासारखा “ केला एकदाचा जप ” असा भाव नसावा.आपली घरातील कामे करताना , केर काढताना , भांडी लावताना ,कपड्यांच्या घड्या घालताना जप केला तर जपासाठी वेगळा वेळ काढायची गरज उरणार नाही.
दुपारच्या वेळी जेवण आणि वामकुक्षी झाल्यावर आपले पोथीवाचन करावे. काहीच नाही तर ब्रम्हचैतन्य महराजांच्या प्रवचनातील एक पान वाचावे आणि त्यावर मनन चिंतन करावे.जमेल तशी मानसपूजा करावी.
ध्यान हे प्रत्येकाने करावे. ध्यानाचे असंख्य फायदे आहेत.
ध्यानाचा वेळ हळूहळू वाढवत न्यावा . आपल्या सैरभैर झालेल्या मनाला एका जागी खिळवून ठेवणे म्हणजे “ध्यान”. सुरवातीला आपण २ क्षण सुद्धा ध्यानस बसू शकणार नाही ह्यावरूनच ते किती कठीण आहे ते समजेल. शेजारणीशी गप्पा मारायला , TV वरील मालिका पाहायला जितके सहज जमते तितकेच ध्यान करणे कठीण आहे . ध्यान हि एक तपश्चर्याच आहे म्हंटले तर वावगे ठरू नये. ध्यानाने आपले चंचल मन स्थिर होते, जितका वेळ ध्यान तितका वेळ तोंड बंद ,म्हणजे आपण बोलणारही नाही आणि ऐकणारही नाही. तितकीच आपली कर्म कमी होण्यास मदत नाही का? पटतंय का? मन एकाग्र ,शांत झाले कि रक्ताभिसरण व्यवस्थित होते , आरोग्य चांगले राहते कारण मन शांत होते .मन आजारी पडले तर मग शरीरही आजारी पडते म्हणूनच ध्यानाची महती अपार आहे.
तीन्हीसंजेस देवाजवळ दिवा लावून शुभंकरोती ,देवाची आरती करावी .ज्यांना शनी ,राहू केतू दशा चालू असेल त्यांनी त्यांचा जप संध्याकाळ नंतर करावा कारण शनी केतूचे साम्राज्य संध्याकाळ नंतरच असते. दिवसभराच्या कामाचा आढावा घ्यावा. आपण ठरवलेली सर्व कामे झाली कि नाही, आपण कुणाचे पैसे द्यायचे राहिलो आहोत का? कुणाला कारण नसताना दुखावले आहे का ? त्यांची मनोमन क्षमा मागावी. काही वेळ ध्यान करावे आणि झोपावे.दिवसभराच्या साधनेमुळे नामस्मरणामुळे मनावरील ताण दूर होवून झोपही चांगली लागते .सकाळी उठल्यावर आपल्याला जगण्याची अजून एक संधी दिल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानावे आणि पुनश्च दिवस आनंदात घालवावा.
एकदाच सलग तास दोनतास मिळत नाहीत म्हणून हि अशी साधनेची विभागणी केली तर सर्व साधना , नित्योपचार व्यवस्थित होतात .घरातील कुणालाही आपल्याबद्दल तक्रार करायला जागाच उरणार नाही.
थोडक्यात काय तर दिवसभरात आपल्याकडून देवाची नित्य आराधना कुठल्या ना कुठल्या रूपाने व्हावी इतकच. आपण केलेली साधना आपल्या वस्तूला आणि कुटुंबियांनाही लाभतेच. वास्तूमध्ये सकारात्मक उर्जा प्रवाहित होते ,लक्ष्मीचा चिरकाल वास राहतो.वास्तू अगदी “ Happening ” होते.सकाळ संध्याकाळ देवाजवळ लावलेल्या दिव्याने जीवनातील अंधकार दूर होतो ,घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे लक्ष्मी येते आणि टिकते ,अनाठायी पैसा जात नाही , घरातील गृहलक्ष्मी आनंदी राहते आणि घर नांदते राहते.
आपल्याला जसा वेळ असेल त्याप्रमाणे आपल्या साधनेचे विभाजन करून ती करावी . पण नित्यक्रम चुकवू नये. हळूहळू आपण त्यात इतके रमतो कि साधनेसाठी वेळ आपोआपच काढला जातो .साधना हि कुणी आपल्यावर लादून किंवा मारूनमुटकून करायची गोष्ट नाही तर परमेश्वरावरील भक्ती त्यास कारणीभूत होते. ईश्वरासाठी असलेली तळमळ ,आंतरिक ओढ साधनेत रुपांतरीत होते.शेवटी दोन हस्तक आणि एक मस्तक त्यालाच जोडायचे आहेत.
साधना कुठेही कशीही करा ,साधनेला काळावेळाचे , स्थळाचे बंधन नसते, आपला भाव सोळा आणे खरा हवा .आपली श्रद्धा आपल्याला आपल्या आराध्याच्या समीप नेते. तद पश्चात मात्र “जेथे जातो तेथे तु माझा सांगाती ” असा त्यासोबत आपला एकत्र प्रवास सुरु होतो तो आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत .
सहभोजन ... मगाशी लिहिताना घरातील सकारात्मकतेचा उल्लेख झाला. त्याला अनुसरून एक गोष्ट सांगावीशी वाटते. कलियुगात आपल्या आजूबाजूला अनेक मंथरा वावरत असतात. त्यांना आपले कौटुंबिक सुख पाहवत नाही. घरातील सर्व कुटुंबीयांनी मिळून दिवसातून एकदा तरी एकत्रित सहभोजन करावे. हसतखेळत केलेल्या ह्या भोजनामुळे एकमेकांचे बंध (Bonding)घट्ट होतात ,विचारधारा एक राहते, अन्न उरत नाही आणि एकमेकांबद्दलची भावनिक ओढ वाढीस लागते .
ज्या ठिकाणी घरातील सर्वजण आवर्जून एकमेकांसाठी थांबून सहकुटुंब सहपरिवार भोजन करतात , त्या कुटुंबात कलह होत नाहीत आणि आनंद चिरकाल टिकतो.करून पहा.
अस्मिता
अद्भूत . .केवळ अद्भूत. उपासनेला दृढ चालवावे.. .
ReplyDeleteपुनश्च एकदा आपल्या सहजभावाची प्रचिती आली.
खूप छान, मार्गदर्शक लिहिलंय !
ReplyDeleteखुपच छान अभ्यासपूर्ण, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ReplyDelete