Sunday, 6 September 2020

मोक्षकारक ...केतू

|| श्री स्वामी समर्थ ||

समुद्र मंथन

राहूच्या बरोबर १८० अंशात समोर केतू असतो . राहू आणि केतू दोघेही नेहमी वक्री असतात हे आपल्या सर्वाना माहितच आहे.वक्री म्हणजे मागे जाणे. आपले काही काम राहिलेले असते तेव्हा आपण मागे फिरतो ,अगदी त्याचप्रमाणे राहुकेतु वक्री चालून  मागील जन्मातील अपूर्ण कर्म आणि वासना दर्शवतात . मागील लेखात आपण राहूचे आभासी जग पाहिले आज केतू बद्दल अधिक जाणून घेवूया. पत्रिकेत राहू आणि केतू एकटेच असावेत असे नेहमी म्हंटले जाते .

अश्विनी ,मघा , मूळ हि केतूची ३ नक्षत्रे आहेत . कारण ते ज्या भावात किंवा ज्या ग्रहासोबत असतात त्याच्या फळात न्यूनता आणतात . केतू हा मंगळा प्रमाणे फळे देतो. अध्यात्मातील प्रमुख ग्रह म्हणून केतू कडे पहिले जाते. गुरु केतू युती हि उच्च साधना दर्शवते. केतूची हि सकारात्मक बाजू आहे पण केतू कॅन्सर चाही कारक आहे. केतूची दशा कुठल्याही लग्नाला आणि कुठल्याही वयात परीक्षा पाहणारीच असते. केतू जर प्रथम म्हणजे लग्नस्थानात असेल तर व्यक्तीचे आरोग्य चांगले राहत नाही. दुसर्या स्थानातील केतू दातांच्या समस्या दर्शवतो तर ३ र्या स्थानातील केतू नातेवाईकांशी फारशी सलगी दाखवत नाही .चतुर्थात केतू वास्तू तसेच मातृसुखालाही ओहोटी लावतो.चंद्र जर अश्विनी , मघा किंवा मूळ ह्यापैकी कठल्याही नक्षत्रात असल्यास केतूची दशा जन्मतःच असते.

केतूच्या महादशेत मंगळाची उपासना करावी. चंद्राच्या नक्षत्रातील केतू प्रकृतीस त्रासदायक असतो.
राहू आणि केतू म्हंटले किंवा त्यांच्या महादशा ह्या सदासर्वदा वाईट जात नाहीत किबहुना कुठल्याही ग्रहाची महादशा हि संपूर्ण वाईट जात नाही. त्यातील शुभग्रहांच्या अंतर्दशा शुभफळे प्रदान करतात. त्यामुळे फक्त राहुं केतू मुळेच आयुष्यात काही वाईट घडते हा गैरसमज मनातून काढून टाकला पाहिजे . तीच बाब साडेसातीचीही आहे. संपूर्ण आयुष्यात अश्या अनेक वाईट ,त्रासदायक गोष्टी घडतात जेव्हा राहुकेतु किंवा शनी चा प्रभाव कुठेच नसतो ,त्या अन्य ग्रहांच्या परिणामामुळे घडत असतात . म्हणूनच पत्रिका बघताना नवग्रहांचा विचार केला जातो ,त्यांची स्थाने ,राशी , महादशा इत्यादी अनेक गोष्टी एकत्रित पाहूनच फलादेश काढता येतो.

केतुला अंक शास्त्रात ७ हा नंबर दिला आहे. केतू दशाही सात वर्षाची असते. ७ ह्या अंकास जीवनात विशेष स्थान आहे जसे ७ सूर ,७ रंग , सप्तपदी ,७ दिवस, ७ परिक्रमा , सप्तशती आणि शरीरातील ७ चक्रे. ह्यावरून समजेल कि केतू किती महत्वाचा आहे. केतू आपल्या आजोळचा कारक आहे.

राहू केतू आपल्या पूर्वजन्मातील घटनांचा लेखाजोखा ठेवतात. केतू ज्या स्थानात असतो त्या स्थानातील फळापासून आपल्याला वंचित ठेवतो आणि त्या स्थानातील लाभांपासुनही वंचित ठेवतो ,आसक्ती कमी करतो. उदा. केतू जर ३ र्या स्थानात असेल तर भावंडापासून विरक्त करतो. मोक्षाचा कारक केतू आहे. केतू शरीराचा खालचाच भाग आहे त्याला धड नाही. राहूच्या अगदी उलट कारण राहु ला धड आहे पण शरीराचा खालचा हिस्सा नाही . केतू पाहूच शकत नाही त्यामुळे तो ज्या ग्रहासोबत असेल त्याचीच फळे देयील . केतुला मनाचा कारक मानला आहे .राहू मायाजाल आहे तर केतू अध्यात्माका कडे नेणारा ग्रह आहे .

गुरु केतू युती किंवा केतूवर गुरूची दृष्टी असेल तर मोक्षापर्यंतचा प्रवास होतो .शनी केतू युती पिशाच्चपिडा देते आणि अशी ग्रहस्थिती असलेल्या लोकांना व्यसन लागले तर ते कधीच सुटत नाही. नशा चांगली किंवा वाईट असू शकते. गुरुसोबत केतू असेल तर परमेश्वराचे ,अध्यात्माचे वेड लागते आणि मंगळ ,शानिसोबत असेल तर दारूचे व्यसन लागते. केतू चंद्राला ग्रहण लावतो ,विचारांपासून परावृत्त करतो. केतू सर्जरी चा कारक असल्याने मंगळ केतू हे डॉक्टरांसाठी महत्वाचे आहे. पुलिस खात्यातील लोकांसाठी जिथे धडाडी ,त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे तिथे मंगळ केतू युती उत्तम काम करेल. कुत्रा चावणे, सर्पदंश, चुकीच्या औषधामुळे त्रास हे सर्व केतूच्या प्रभावामुळे होते .

केतू स्वतःच्या नक्षत्रात येतो तेव्हा व्यक्तिगत आणि जागतिक स्थरावर बदल घडवून आणतो . सध्याच्या महामारीच्या काळात केतू मूळ नक्षत्रात होता. अमेरिकेत ट्वीन टॉवर वरती हल्ला झाला तेव्हा केतू मूळ नक्षत्रात होता. हिरोशिमा नागासाकी हि मोठी शहरे उद्ध्वस्त झाली तेव्हा केतू मूळ नक्षत्रात होता. केतू त्याच्या दशा महादशा अंतर्दशेत मोठे बदल घडवून आणतो. केतू शकुनाचा आणि Intution चाही कारक आहे. ज्योतिष  शास्त्रा सारखे अतेंद्रीय ज्ञान केतूच्या अधिपत्याखाली येते. छल जुगार खेळणार्यांचा कारक केतूच.

राहू Expansion करतो तिथे केतू contraction . केतू आपल्याला जीवनातील मोह, आसक्ती पासून कट करून विरक्तीकडे नेतो. त्यागामध्ये सुख आहे आणि केतू त्याग करायला शिकवतो. आयुष्यात आपण अनेक गोष्टींचा संचय करत जातो , आपला हव्यास कधीच संपत नाही ,काहीनाकाही हवेच असते आपल्याला पण हा संचय आपल्याला समाधान नाही देवू शकत पण तिथेच एखाद्या गोष्टीबद्दल आसक्ती कमी होणे , परावृत्त होणे ,विरक्त होणे ह्या गोष्टी आंतरिक समाधान मिळवून नक्कीच देतील. म्हणूनच जेव्हा आपण हव्यासातून दूर जातो ,विरक्त होतो ,कश्यातच आसक्ती उरत नाही तेव्हाच आपला अध्यात्मिक प्रवास आयुष्यात एक उंची गाठतो आणि आपल्याला मोक्ष मिळतो. केतुजवळ धड आहे पण शीर नाही त्यामुळे तो विचारच करू शकत नाही . म्हणूनच बुधासारख्या विचारवंताशी त्याचे जमणे कठीण.


ज्योतिष शास्त्र गहन आहे पण अशक्य नाही . थोडे logic लावले तर आपण नक्कीच सहज शिकू शकतो. तुमची पत्रिका तुम्हाला माहित असली पाहिजे. नवीन शहरात गेलो कि रिक्षावाला कसा सगळीकडे फिरवून  आणतो कारण त्याला समजलेले असते आपण ह्या शहरात नवीन आहोत .मग जिथे 30 रुपये होणार तिथे ७० होतात ते कसे तर हे असे. हाच नियम आयुष्यात प्रत्येक गोष्टीत लागू आहे. आपण एखाद्या विषयात अनभिद्न्य आहोत हे समोरच्याला समजायचा अवकाश पुढे न बोलणे योग्य . पण तुम्ही त्या विषयातील जाणकार आहात आणि तशीच २-३ वाक्ये टाकलीत तर समोरचा सांभाळून बोलेल ,अगदीच टोपी नाही लावू शकणार आपल्याला ,पटतंय ना? म्हणून आपली पत्रिका आपल्याला माहित असावी .

समजा आपली मंगळाची दशा चालू आहे आणि मंगळ मकरेत उच्चीचा आहे तर ह्या दशेत आपले घराचे स्वप्न पूर्ण झालेय का ? ब्रोकर म्हणून काम करत असाल आणि कर्म स्थानात मकरेचा मंगळ असेल तर व्यवसाय तेजीत चालतोय कि व्यवसायाचे काही खरे नाही .हे तपासून तुमचे तुम्हीच पाहू शकता . संपूर्ण दशेत ज्या घडामोडी आयुष्यत घडतील त्यावरून त्या ग्रहाने कायकाय फळे दिली त्याचा अभ्यास होवू शकतो. म्हणजे तो ग्रह आपल्या पत्रिकेत शुभ म्हणायचं कि अशुभ हे समजेल. करून पहा. सगळेच पूर्णतः कळणार नाही पण निदान थोडे समजले तरी पुरे. मग ह्या अभ्यासाची सवय लागेल. गुरु कितीवेळा लग्नी आला आणि लग्नेशावर दृष्टी टाकून गेला तरी विवाह जमला नाही ,का? ह्याचे उत्तर तुम्हालाच समजेल. लग्नी गुरु आला की विवाह संपन्न होयीलच असे नाही,कारण महादशास्वामी . तो जर विवाहाची स्थाने देत नसेल तर सर्व फोल आहे. असो तर सांगायचे असे कि राहू केतू शनी मंगळ ह्यांना आपले शत्रू समजू नका कारण ते प्रत्येक वेळी वाईटच फळे देत नाहीत .

अश्विनी नक्षत्रात जन्मलेले लोक निडर असतात. केतू म्हणजे मन , हृद्य आहे म्हणूनच त्याचा संबंध अनाहत चक्राशी संबंध आहे. हृदयात आत्मा आणि परमात्मा दोन्ही आहे. कुठलाही ग्रह केतूच्या अश्विनी नक्षत्रात असेल आणि जर त्या ग्रहाची दशा असेल तर विष्णूचा जप केला तर फायदेमंद होतो. केतूचे मघा नक्षत्र अधिकार देते पण मघा नक्षत्राच्या लोकांनी घमंडा पासून दूर राहावे .मघा नक्षत्राचा संबंध आज्ञा चक्राशी आहे , ओमकाराचा जप करणेही लाभ देते. मूळ नक्षत्र मूलाधार चक्रात आहे जिथे आपली कुंडलिनी शक्ती विसावलेली आहे. मूळ नक्षत्रात असेलेल्या ग्रहाची दशा अंतर्दशा चालू असेल तर गणेशाची उपासना फलदायी ठरते. केतूच्या ७ वर्षाच्या महादशेत आयुष्यात अनेक स्थित्यंतरे होताना दिसतात म्हणून केतुकडे दुर्लक्ष करून चालत नाही .वृश्चिक ,धनु आणि मिनेतील केतू चांगली तर वृषभेत तितकी चांगली फळे देणार नाही. सुर्यासोबत केतू असेल तर ग्रहण योग होतो. सूर्य आपला आत्मा आहे ,वडिलांशी संबंध चांगले राहत नाहीत. कार्यक्षेत्रातही अश्या व्यक्ती पुढे येत नाहीत. चंद्रासोबत सुद्धा ग्रहण दोष होतो. चंद्र केतू आईसोबत संबंध चांगले नसतात. चंद्र केतू युती गुरूच्या राशीत योग साधनेस उपयुक्त. केतू बुधासोबत चांगली फळे देत नाही .पण बुधाच्या उच्च राशीत हि युती झाली तर असे लोक अनेक भाषा शिकणारे असू शकतात .शनी केतू युती प्रेतशाप योग आहे. केतू फारच त्रासदायक होत असेल तर केतूच्या बीज मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेने जप करावा.गणेशाच्या आराधनेने केतू शांत होतो त्यामुळे श्री गणेशाची पूजा ,जप ,आराधना ,अथर्वशीर्ष पठन फलदायी ठरेल.

प्रत्येक ग्रह हा शुभ आणि अशुभ परिणाम देणारा आहे. त्यामुळे पत्रिकेचा अभ्यास करताना प्रत्येक ग्रहाच्या शुभ अशुभत्वाचा अभ्यास करणेही आवश्यक असते नाहीतर आपले भविष्य चुकू शकते. राहू केतूच्या प्रभाखालील घटना आकस्मिक होतात. राहुकेतुचा संबंध पुर्व जन्माशी जोडला गेलाय .गेल्या जन्मात ज्या गोष्टी भोगण्याच्या राहून गेल्या त्याचे भोग ह्या जन्मात राहू दाखवतो तर गेल्या जन्मात अनेक गोष्टी भोगून झाल्या आणि त्याचा आपल्याला उबग आलाय त्या गोष्टींपासून ह्या जन्मात आपण परावृत्त राहतो , त्या केतू दर्शवतो.

साधनेचा ग्रह केतू आहे. दोन्ही ग्रहांना स्वतःची अशी रास नाही ते छाया ग्रह आहेत . जसे एखाद्या वृक्षाची सावली आपल्यावर असते पण आपण तिथून दूर गेल्यावर वृक्षाची सावलीही दूर जाते अगदी तसेच. सूर्य आणि गुरु हे प्रकाशाचे ,सात्विकतेचे ग्रह आहेत , ह्या ग्रहांना बलशाली केले तर राहुकेतुचा प्रभाव कमी होत जातो. म्हणूनच आपण अध्यात्माची कास धरली पाहिजे. सात्विक जीवन जगलो मोहापासून वंचित राहिलो तर राहूकेतूचा नकारात्मक परिणाम कमी जाणवेल. राहुकेतुचा सगळ्यात मोठा प्रभाव म्हणजे जीवनाचे काहीच रुटीन नसणे. सकाळी उशिरा उठणे ,कुठल्याही वेळी भोजन वगैरे करणे ,दिनक्रमास शिस्त नसणे ,दाढी वाढवणे ,केस न कापणे , अस्वछ्य राहणे अश्यानी राहुकेतूचे उपाय अवश्य करावेत, बेशिस्त जीवनाला वळण लावावे .आपल्या देवघरात केतुला स्थान आहे त्यामुळे देवघर आणि तेथील जागा स्वछ्य ठेवणे हे महत्वाचे आहे. आजपण केतूची बरीच माहिती घेतली.

माझे गुरु श्री(कै) गोगटे काकांकडे एक वयस्कर गृहस्थ यायचे. त्यांचा राहू केतूंचा खूप अभ्यास होता आणि त्यांचे वाचनही दांडगे होते. त्या दोघांच्या ह्या विषयावर खूप गप्पा होत . गोगटे काकांनी ३५ वर्ष ज्योतिष केलेले त्यामुळे त्यांना तर बर्याच कुंडल्या पाठही होत्या . त्यावेळी मी अगदीच प्राथमिक धडे गिरवत असे. काका सांगत अग लिहून घेत जा ,पण मला तेव्हा भूक लागलेली असायची,झोप आलेली असायची ,दुनियाभरचा कंटाळा आलेला असायचा. आज ह्या गोष्टींचे महत्व समजते पण ते दुर्दैवाने तेव्हा अजिबात नव्हते हे कबुल करायला लाज वाटत नाही. जे आहे ते आहे . आज ह्या गोष्टी आठवल्या कि वाटते तेव्हा खूप शिकून झाले असते .

असो तर आज आपण केतू आणि आपली कुंडली कशी monitar करायची ते शिकलो. ह्या महान शास्त्राचा जुजबी अभ्यास तरी प्रत्येकाने करावा असे मला आपल्याला कळकळीने सांगावेसे वाटते. इथे अनेक जाणकार आहेत.

त्यांनी सध्याची परिस्थिती पाहता online क्लास सुरु करावेत म्हणजे ज्योतिष शास्त्राचे प्राथमिक धडे सर्वाना गिरवता येतील.

एखादा शब्द कमी अधिक झाल्यास क्षमस्व....सर्वांच्या पत्रिकेतील केतू शुभ फळे प्रदान करो आणि सर्वाना मोक्ष मिळूदे हीच प्रार्थना.

अस्मिता

लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका


antarnad18@gmail.com


#antarnad #moksh #rahuketu #7chakra #ketumangal#saturnmars#twin tower#hiroshima
#अंतर्नाद #मोक्ष#केतू #राहू #परमार्थ#शरीरातील चक्रे #धुमकेतू #मंगळ केतू #शानिकेतू#शकुनी मामा#ट्वीन टॉवर #हिरोशिमा 


6 comments:

  1. माहितीपुर्ण लेख
    वैभवी जोशी.

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर माहिती दिली आहे 🙏🙏

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete