||श्री स्वामी समर्थ ||
वास्तू मध्ये सर्वात महत्वाचे काय असते तर “ घराचे मुख्य प्रवेशद्वार ”. घरात येणारी माणसे , पै पाहुणा , सर्व प्रकारची उर्जा , लक्ष्मी , अलक्ष्मी हि ह्याच प्रवेशद्वारातून आतमध्ये येत असते. पूर्वीच्या काळी घरे मोठी होती आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर ओसरी असायची . आलेला पाहुणा किंवा घरातील व्यक्ती आली कि ओसरीत बसत असे .हातपाय धुवून गुळपाणी घेवून निवांत झाली कि मग आतमध्ये येत असे. ओसरीवर घरातील स्त्रिया आणि मुली खोळंबत नसत . त्यांना तिथे येण्यास मज्जाव असे.
आज शहरीकरणामुळे ओसरी , गुळपाणी ह्या संज्ञा इतिहासजमा झाल्या आहेत . असो तर महत्वाचे असे कि घराचा मुख्य दरवाजा अति महत्वाचा आहे. घराच्या दरवाज्याची संपूर्ण चौकट हि लाकडी असावी .आजकाल उंबरठा संगमरवरी असतो ,प्रत्येकाची हौस असते पण तरीही उंबरठा लाकडी असावा . उंबरठा रोज स्वछ्य पुसून त्यावर रांगोळी घालावी आणि हळदकुंकू घालून नमस्कार करावा. आजही तुम्ही गावात कुठेही गेलात तर घरोघरी उंबरठ्याचे पूजन करून समोर सडासमार्जन केलेले दिसते. संध्याकाळी घराबाहेरील तुळशीसमोर दिवा लावलेला दिसतो. आज शहरातून इतकी जागा नाही त्यामुळे हे सर्व होणे कठीण .पण आधुनिकीकरणाच्या नावाची पळवाट काढून आज आपण सर्वच गुंडाळून ठेवले आहे. आपल्या घराच्या बाहेर किंवा बाल्कनीत जागा असेल तर जरूर तिथे तुळशीचे रोपटे लावावे. संध्याकाळी तिथे दिवा लावावा . घरात सुख शांती ,लाभते ,नुसता तुळशीजवळचा दिवा पाहूनही प्रसन्न वाटते.
घराच्या उंबरठ्याला विशेष महत्व आहे. म्हणून घरातील मंडळीनी विशेषकरून स्त्रियांनी घराच्या उंबरठ्यावर शिळोप्याच्या गप्पा मारत राहू नये . पूर्वी स्त्रियांना उंबरठ्यावर येण्यास मज्जाव होता. घरातील स्त्रियांनी घराच्या आत राहावे हे शास्त्र . आज हे शहरात प्रत्ययास येणे कठीण कारण आज स्त्रियाही नोकरी करतात ,कुटुंबासाठी आर्थिक योगदान देतात . हे सर्व ठीक पण इतर वेळी घराच्या उंबरठ्यावर गप्पा मारत राहू नये .घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव जाणवू लागतो. घरातील कर्त्या पुरुषास आजारपण आणि धननाश ह्या गोष्टींची तीव्र फळे मिळतात. त्यामुळे घरातील सौख्य नष्ट होते आणि घरातील सुखाला ओहोटी लागते. घराच्या बाहेर सुशोभित रांगोळी काढायची आणि तिथेच उभे राहून दुनियादारी म्हणजे नको त्या विषयावर गप्पा मारत राहायचे हे पटतंय का?
काही गोष्टी शास्त्रात सांगितल्या आहेत त्याच्या मागे तितकीच मोठी कारणेही आहेत त्यामुळे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. वस्तूचे प्रवेशद्वार महत्वाचे आहे आणि ते आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे जणू साक्षीदार आहे , त्याचा योग्य तो सन्मान ठेवावा कारण
शेवटी वास्तू म्हणते तथास्तु.
अस्मिता
लेख आवडल्यास अभिप्राय जरूर कळवा.
Antarnad18@gmail.com
#अंतर्नाद#वास्तू#वास्तुशास्त्र#प्रवेशद्वार#रांगोळी#सडासमार्जन#तुळशीचे रोप#दरवाज्याची चौकट#गप्पा#स्त्रिया
No comments:
Post a Comment