Monday, 7 September 2020

बॅड पॅच

|| श्री स्वामी समर्थ ||




खूप वेळा शांत असलेल्या पाण्यात अचानक तरंग उठावे ,निरभ्र आकाश अचानक ढगाळ व्हावे अगदी तस्सेच आपल्याही आयुष्यात होते . सगळे काही सुरळीत चाललेले असताना अचानक एखादी विलक्षण घटना घडते ज्यामुळे आपले संपूर्ण आयुष्याच बदलून जाते .

मग त्या वेळेला आपण "बॅड पॅच" म्हणू किंवा तत्सम काहीही. पण ती वेळ प्रत्येक जण कधी न कधीतरी अनुभवत असतोच परमेश्वर सारखा काही आपल्याला रडवत नाही असे लहानपणी आजी गोष्टी सांगताना म्हणायची. आपले संचित, क्रीयामाण आणि प्रारब्ध ह्यातून आपली सुटका नाही हेच खरे.

पण अश्या ह्या वेळी कुठल्याही परिस्थितीत निराश न होता ,अत्यंत संयमाने त्या परिस्थितीचा सामना करून त्यातून मार्ग काढून पुन्हा आयुष्य मार्गस्थ करणे ह्यासाठी आत्मविश्वास ,मनाची एकाग्रता ,परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केलेला अभ्यास आणि त्यानुसार घेतले गेलेले योग्य निर्णय गरजेचे असतात .

परवा Youtube वरती आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांची एक मुलाखत पाहताना मनात असंख्य विचारांनी गर्दी केली होती. त्यांच्याही आयुष्यात असे अनेक चढउतार आले पण त्यांच्या ABCL ह्या कंपनीसाठी त्यांनी घेतलेले अनेक निर्णय फसल्यावर त्यांना व त्यांच्या कुटुंबाला ज्या गोष्टीना सामोरे जायला लागले त्याचे इतके हृद्यद्रावक विश्लेषण त्यांनी त्या प्रगट मुलाखतीत केले आहे कि ऐकत राहावे

कलेचा आणि साहित्याचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. अमिताभ बचन हे फक्त एक कलाकार नसून उत्तम वक्ते हि आहेत हे वेगळे सांगणे न लगे,अफाट वाचन ,बुद्धिमत्ता आणि त्यांचे प्रत्येक भाषेवर असलेले प्रभुत्व त्यांच्या वाणीतून ,लिखाणातून प्रत्ययास येते .सामान्य माणसावर आलेली हि परिस्थिती आणि सभोवताली लोकप्रियतेचे प्रचंड वलय असणार्या अश्या महानायकास अश्या अपयशाला सामोरे जाणे खचितच सोपे नाही . 

त्यांनी त्यावेळी असलेल्या भावना कमीतकमी शब्दात आपल्यापर्यंत इतक्या सहजतेने पोचवल्या आहेत ,अर्थात हेच त्यांचे वक्ता म्हणून कौशल्य आहे. त्यातील त्यांचा एक भाग आवर्जून सांगावासा वाटतो .त्याचबरोबर त्यांचे अत्यंत नम्र, मृदू बोलणे, बोलण्याची लकब, शब्दसंपदा ,हावभाव क्षणात समोरच्याला आपलेसे करून टाकतात. प्रगत मुलाखतीतील एक भाग आवर्जून सांगावासा वाटतो ,जेव्हा मला ABCL मुळे प्रचंड कर्ज झाले त्यावेळी मला सगळीकडूनच अपयश आले हे सांगताना ते म्हणतात एखाद्या गोष्टीत अपयश आले तर इतर कुठलीही गोष्ट करण्यास आपण समर्थ नाही असेच लोकांना वाटू लागते ,मी कर्जबाजारी झालो त्याचबरोबर मी एक उत्तम कलाकार नाही आणि चांगला माणूसही नाही असाच सर्वांचा दृष्टीकोण झाला आणि मला काम मिळाले नाही. कालांतराने श्री यश चोप्रा ह्यांच्या " मोहब्बते" ह्या चित्रपटाने त्यांचे पुनरागमन झाले .
 परंतु त्या काळातील सर्वच आठवणी त्यांना अस्वस्थ करणाऱ्या होत्या ,जवळच्या लोकांचे बदललेले चेहरे , शाब्दिक जखमा त्यांचे मन रक्तबंबाळ करून गेल्या...ह्या सर्व परिस्थितीवर मात करून आज फिनिक्स पक्षाप्रमाणे उंचच उंच उभारी घेवून पूर्वीच्याच ताकदीने ते आजही काम काम करत आहेत हे नक्कीच वाखाणण्याजोगे आहे .आयुष्यात खरतर पूर्वीपेक्षाही जास्ती यश तेही थोडक्या कालावधीत त्यांनी पुन्हा संपादन केले आहे. त्यावेळी झालेल्या चुकांमधून मी खूप शिकलो हि प्रांजळ कबुली त्यांनी दिली ...माणसे मोठी का होतात हे त्यांच्याकडे पहिले कि समजते....अमिताभ बच्चन यांचा वीर संघवी यांनी घेतलेली मुलाखत प्रेरणा देवून जाते ह्यात दुमत नसावे ..

अस्मिता

लेख आवडल्यास खालील लिंक वरती अभिप्राय द्यायला विसरू नका
antarnad18@gmail.com



#antarnad # bad patch #emotions #Loan #Depression #anxiety #lowfeel #bad mood #life #bad words
#अंतर्नाद #बॅड पॅच #मनातील भाव #कर्ज #मनाची अवस्था #चिंता #कमकुवत मन #वाईट शब्द प्रयोग #अपयश #वलय

No comments:

Post a Comment