Tuesday, 1 September 2020

अजूनही... अध्यात्माच्या पहिल्याच पायरीवर

|| श्री स्वामी समर्थ ||


आयुष्यात संकटे गळ्यापर्यंत आली कि आपण अध्यात्माची पहिली पायरी चढतो. दुखांचा दाह वाढतो तसे नास्तिकाचे आस्तिक होत जातो . कुठून का होयीना संकटांची होळी व्हावी म्हणून मग जो कुणी सांगेल ते करत जातो. मग अंगारेधुपारे करा, मठाच्या मंदिरांच्या पायर्या चढा , नवस बोला ,काहीही करायचे ठेवत नाही. हळूहळू संकटे कमी होत जातात, दिलासा मिळतो आणि आयुष्य पूर्ववत होते. मधल्या काळात केलेल्या उपासनेमुळे अध्यात्माकडे कल वळतो. संकटातून बाहेर पडल्यामुळे देवाबद्दल मनात कृतज्ञता वाटते आणि मनात भक्तीचा मळा फुलू लागतो. आपल्याकडून किती आणि काय सेवा करून घ्यायची ते आधीच ठरलेले असते ,प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण प्रत्यक्ष परमेश्वरानेच ठरवलेला असतो.

हृदयात भक्तीचा अंकुर फुटला कि मग अजून काय हवे. अध्यात्मिक वाचन त्याबद्दल माहिती वाचावीशी वाटते. मग कुठल्या नातेवायिक किंवा मित्रांसोबत शिर्डी , अक्कलकोट ,शेगाव येथे जाणे होते. तेथील वातावरणाने भारावून जातो ,त्या शक्तीसमोर नतमस्तक होतो आणि आपल्या प्रापंचिक जीवनाला पारमार्थिक जोड लागते.उभे आयुष्यच बदलून जाते.


मग नामस्मरण , पारायण , सामुदायिक कार्यक्रम सुरु होतात आणि आपल्या आयुष्यात परमार्थ फुलतो. श्री गजानन विजय ह्या ग्रंथात परमभक्त भास्कर पाटील ह्यांना महाराजांनी प्रचीती दिल्यावर त्यांनी आपला प्रपंच महाराजांच्या चरणावर वाहिला “ आता भक्तीचाच मळा फुलविन “ असे वचन त्यांनी महाराजांना दिले आणि आपल्या सर्व निष्ठा त्यांच्या चरणी वाहिल्या.

नामस्मरण , पोथी वाचन, पारायण ह्या सेवेमुळे आपले मन हळूहळू महाराजांच्या चरणी स्थिर होते, मन शांत होतो , विश्वास वाढतो आणि रागावर नियंत्रण येते..आपल्यात षडरिपू ठासून भरले आहेत. ते जाता जात नाहीत पण त्याचे प्रमाण मात्र नक्कीच कमी होते. भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या भक्ताला आता महाराजांचे वेड लागते ते कायमचे. माझ्या पुढे मागे तूच उभा अशी अवस्था होते .आपल्या जीवनात आता कितीही चढउतार आले तरी आता भीती वाटत नाही. “ महाराज आहेत ते पाहतील ” हे उद्गार आपोआपच बाहेर पडतात , भक्ती अभेद्य राहते , विश्वास वाढतो. संकटातून मार्ग निघतो आणि आपण पुन्हा एकदा त्यांच्या चरणी विलीन होतो.

भक्तीवीणा प्रचीती नाही आणि प्रचीती शिवाय भक्तीही नाही . जशीजशी सेवा वाढते तशी अधिकाधिक प्रचीती येऊ लागते. महाराजांचा फोटो घरातील देवघरात स्थानबद्ध होतो. नामस्मरण , पारायण ह्यात मन रमू लागते. पण इतके सर्व होवूनही एक गोष्ट मात्र जात नाही ती “ मी पणा ”. अध्यात्मात अहंकाराला स्थान नाही. अहंकाराचा वारा न लागो म्हणतात ते सार्थ आहे. मी पारायण केले , मी नामस्मरण केले ह्यामध्ये असलेला “ मी ” फार घातक असतो आणि तो आपल्यात आणि सद्गुरुंमध्ये दरी निर्माण करतो. हा “ मी ” आपल्याला त्यांच्यापासून दूर नेवू शकतो. त्यापेक्षा महाराजांनी मला नामस्मरणाची संधी दिली आणि मी कृतकृत्य झाले. महाराजांनी माझ्याकडून पारायण करून घेतले , त्यांनीच मला शेगाव ला बोलावले म्हणून दर्शन घडले ,हा असा भाव आपण मनात ठेवला तर अहंकार मनास शिवणार सुद्धा नाही. अहो आपण कोण पारायण आणि नाम घेणारे . त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पान सुद्धा हलायचे नाही .

ब्रम्हचैतन्य महाराजांचे रोजचे प्रवचन हे आपल्या आयुष्यभर पुरणारा प्रसाद आहे. रोज फक्त एकच पान वाचायचे आहे आणि त्याचे मनन ,चिंतन करायचे आहे. आपण जे वाचतो ते आपल्यात उतरले तर त्याला काही अर्थ प्राप्त होयील, आपले आचरण तसेच राहिले तर सर्व फोल आहे. आपण श्री गजानन विजय ग्रंथ किंवा अजून कुठलाही ग्रंथ ह्याची असंख्य पारायणे करतो ,पण आपल्यात तिळमात्र बदल घडून येत नाही, ह्याचा अभ्यास आपण आपलाच करायला नको का. म्हणूनच वरवर दिसतो तितका अध्यात्मिक प्रवास साधा सोप्पा खचितच नाही. आंतरिक मनाने , अपेक्षाविरहित सतत सेवेत राहिले तर काकणभर बदल होईल आपल्यात.


 इतका जप करूनही आपण निस्पृह मनाने कुणाला मदत करत नसू, घरातील वडील मंडळीना उद्धटपणे बोलत असू, घरातील अन्न फुकट घालवत असू, बढाया मारत असू तर खरच ह्या सर्व सेवेला अर्थ आहे का? आणि आपले गुरु आपल्याला किती समजले आहेत ? आपण वाचत असलेल्या पोथीतील अर्थ आपल्याला नक्की किती समजला आहे ?त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून आपण चालत आहोत का ?स्वतःशी प्रामाणिक आहोत का? हे सर्व अभ्यास करण्यासारखेच आहे.

कुठल्याही देवस्थानाला गेलो कि तिथून फोटो ,पोथी मूर्ती कितीतरी गोष्टी आणतो ,ह्या सर्वच संचय करतो पण आपल्या नामस्मरणाचा ,भक्तीचा संचय किती झालाय ?ह्याचा हिशोब कोण ठेवणार ?बरेचदा एखद्या वेळी आपल्या संकटाचे निवारण झाले नाही तर सरळ आपण आपले सद्गुरूच बदलतो . मग आज काय गजानन महाराज तर उद्या साईबाबा . कुठेही एका ठिकाणी निष्ठा नाही. इतके करूनही मनाची हि चंचल अवस्था असेल तर आपण नाम घेताना आपले लक्ष्य कुठे होते ? गुरु बदलून प्रश्न सुटत नाहीत हे कालांतराने समजते आपल्याला , मग पुढे येरे माझ्या मागल्या.

मुळातच आपल्या आयुष्यात सद्गुरूंचे आगमन व्हायला आपले पूर्व प्रारब्ध लागते हे विसरून चालणार नाही. अध्यात्मिक प्रवास हा अत्यंत खडतर आहे. इथे “ पी हळद हो गोरी ” हा नियम लागू पडत नाही. इथे लागतो तो संयम. म्हणतात ना “ सब्र का फल मिठा होता है “. गोष्टी अपोआप घडत जातात . आपण आपल्या साधनेत तसूभरही चुकायचे नाही आणि काही मागायचे तर त्याहूनही नाही . आपल्याला काय द्यायचे ते आपल्या गुरुना माहित आहे आणि वेळ आली कि ते आपल्याला दिल्याशिवायाही रहात नाहीत .

 अध्यात्मातील मार्ग खडतर तर आहेच पण महाराज खूप परीक्षाही पाहतात ,अगदी टफ पेपर असतो त्यांचा पण आपण एक दिवस नक्कीच पास होतो. काहींचा संयम सुटतो आणि मग त्यांनी आपली परीक्षा घ्यायची तर आपणच त्यांची परीक्षा घेतो .महाराज आपले पोरखेळ पाहत राहतात .  आपण उठसुठ महाराजांना वेठीस धरतो ..चार दिवस नाही झाले , २ माळा नाही ओढल्या तर किती गर्व होतो आपल्याला ,आपल्यासारखा कुणी भक्तच नाही ह्या भावनेने दिमाखात वावरू लागतो ,महाराजांवर हक्कही सांगायला लागतो. पण महाराज आपल्यावर कधीच रागवत नाहीत कारण ह्या सर्वातून तावून सुखावूनच आपण एक उत्तम भक्त होणार असतो. मनापासून केलेली उपासना फळते ,त्यांच्या सगळ्या कसोट्यांवर खरे उतरलो कि महाराजांचे दर्शनही घडते आपल्याला. गोंदवलेकर महाराजांनी आपल्या भक्तांना अभिवचन दिले आहे जिथे नाम आहे तिथे मी आहे.

 म्हणूनच आपण श्वासागणिक नाम घेतले पाहिजेत. कुठली माळ घ्यावी स्फटिकाची कि रुद्राक्षाची ,आसन कुठले आसवे ,कुठल्या दिशेला तोंड करून बसावे, पारायण किती दिवसांचे करावे ,प्रसाद काय करावा , ह्या सर्व दुय्यम गोष्टी आहेत , आपले सद्गुरू ह्या सर्वांच्या पार आहेत . त्यांना हवाय आपला अंतरीचा खरा भाव , आपले समर्पण , आपली तळमळ ,आपली त्यांच्याविषयी असलेली ओढ आणि आपला प्रामाणिकपणा. आपल्या सेवेचे बाळकडू आपण आपल्या पुढील पिढीलाही द्यावे .हा वारसा आपल्या मुला नातवंडाना द्यावा. पारमार्थिक जोड असेल तर प्रापंचिक सुखांची गोडीही अवीट असते.

पण वर्षानुवर्षाचा अध्यात्मिक प्रवास करूनही एक प्रश्न स्वतःला विचारला  “अध्यात्मातील कुठल्या पायरीवर आहे मी ?” तर त्याचे उत्तर आहे ...अजूनही पहिल्याच पायरीवर आहे मी .

हा लेख तुमच्या आमच्या सर्व गुरुना अर्पण करत आहे ..... 

अस्मिता 


लेख आवडल्यास अभिप्राय द्यायला विसरू नका 


antarnad18@gmail.com



#antarnad#spirituality#sadhguru#tredition#chanting#faith#generation#Inheritance#parayan#अंतर्नाद#अध्यात्म#सद्गुरू#दर्शन#परंपरा#जपमाळ#आसन#भक्ती#वारसा#प्रपंच#परमार्थ#पारायण#फलश्रुती


1 comment:

  1. डोळे उघडणारा लेख आहे. माझ्या आजुबाजूला अशी अनेक माणसं मी बघितली आहेत की ज्यांना त्यांच्या उपासनेचा अहंकार आहे. आत्मपरीक्षण करता स्वतः मध्ये सुद्धा कुठेतरी हा अहंकार जाणवतो मला. आता नक्कीच ह्यावर काम करायला हवाय आणि त्यासाठी मी आपल्या महाराजांचे बोट धरणार आहे. ��

    ReplyDelete