Wednesday, 23 September 2020

सुख म्हणजे नक्की काय असत

 || श्री स्वामी समर्थ ||



एखादी लहानशी घटना आठवून चेहऱ्यावर एका क्षणात हसू येते त्यालाच सुख म्हणतात . “आमटी छान झाली आहे ग ” असे आपल्या ह्यांनी म्हणणे, “आमच्या सुनेची भाजणी छानच होते”, हे सासुबाईंचे वाक्य कानी पडते ,तेव्हा मनास जो आनंद होतो ते सुख असते . आपल्याला अगदी हवी तशीच साडी खरेदी होते ते सुख असते . 


घराच्या भिंतीना साजेसे पडदे मिळणे हेही सुखच असते. मनासारखा स्वयंपाक होणे, आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींमध्ये मनसोक्त रमणे, गप्पा मारणे हेहि आनंदच देवून जाते. मुलांना भरभरून मार्क्स मिळालेले प्रगतीपुस्तक आणि त्यावर सही करताना पालक म्हणून आपली ताठ झालेली कॉलर हे सुखाचे क्षण जपुन ठेवणे हे सुख कश्यातच मोजता येणार नाही. 


लहानसहान गोष्टी अगदी कडधान्याला आलेले मोड , उशीर झालेला असतानाही मिळालेली रोजची लोकल ट्रेन आणि  ध्यानीमनी नसतानाही मिळालेली खिडकीजवळची जागा. कुंडीत फुललेला गुलाब , देवासमोर लावलेले निरांजन आणि पडल्यापडल्या लागलेली शांत झोप हे सुखाच्याही खूप पलीकडचे असते. 


घरी यायला उशीर झाला असतानाही आवडती मालिका बघायला मिळणे , हव्या त्या वेळी हव्या त्या गोष्टी जसे नेलकटर , सहाण, सुईदोरा ह्या वस्तू नेमक्या मिळणे हेही सुखच .आपल्या वाढदिवसाला आपल्या नकळत मुलांनी हौशीने आणलेला केक , साहेबांकडून आपल्या रजेचा मान्य झालेला अर्ज , वाफाळलेल्या चहाचा घोट घेत घराच्या खिडकीतून मनसोक्त पाऊस बघत राहणे. आपल्याला हवे तेव्हा इंटरनेट असणे .घड्याळाचा ,रिमोटचा सेल हाताशीच असणे. कधी लाईट गेले तर क्षणात मिळालेली मेणबत्ती , मनासारखी साधना ,जप होणे. आपल्या साडीला हवा तसा ब्लाउज पीस मिळणे ,मोदकाची पारी सुरेख पडणे ,घरात ठरलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडणे हे सर्व सुख नाही तर काय आहे. 

रोजच्या जीवनात अगदी लहानसहान गोष्टीतसुद्धा सुख दडलेले असते जे आपल्याला आनंद देवून जाते. आपण लहानसहान गोष्टीनी निराश होतो आणि ह्या छोट्याछोट्या आनंदाला पारखे होतो.  

खरतर ह्या लहानलहान आनंदातच मोठा आनंद दडलेला असतो..फक्त तो शोधता आला पाहिजे कारण हाच आनंद आपल्याला खर्या अर्थाने जागवतो ....


अस्मिता


लेख आवडल्यास अभिप्राय नक्की द्या .


antarnad18@gmail.com


#antarnad#happiness#positivevibes#
#अंतर्नाद #आनंद#सुखम्हणजेनक्की काय असते#सकारात्मक






3 comments:

  1. अशा छोटया गोष्टीत आनंद घेता येण्यासाठी आपली निरागसता जपावी लागते मग असतोच "आनंदाचे डोही .... आनंद तरंग"

    ReplyDelete