|| श्री स्वामी समर्थ ||
“ पत्रिका “ काय असते बरे ते ? तर आपण जन्माला येतो तेव्हा आकाशात असणारी ग्रहांची स्थिती गणिती रुपात मांडले गेलेले कोष्टक . ग्रह हे सूर्याभोवती अव्याहत फिरतच असतात . आपल्याला जन्माला घालून त्यांचे काम संपत नसते . आपली पत्रिका किंवा कुंडली म्हणजे गत जन्माचा आरसाच आहे. आपण मागील जन्मात केलेल्या चांगल्या वाईट गोष्टींची फळे जर भोगली नसतील किंवा ती अपूर्ण राहिली असतील तर त्या भोगवासना घेऊन मनुष्य पुन्हा जन्म घेत असतो आणि अश्याच प्रकारे पुनरपि जननं पुनरपि मरणं हे चक्र चालूच असते. आपल्या पत्रिकेचा नीट अभ्यास करताना समजेल कि पत्रिका हि १२ भावात विभागली गेली आहे. प्रत्येक भाव ३० अंशाचा म्हणून संपूर्ण पत्रिकेला ३६० अंश दिले गेले आहेत . ह्या शास्त्राचा अभ्यास करताना किंवा त्याचे एकेक पदर उलगडताना असे लक्ष्यात येते कि सर्वप्रथम नक्षत्र मग राशी ह्यांचा शोध किंवा अभ्यास झाला. मग त्यातून पत्रिकेची निर्मिती झाली असावी. प्रत्येक शास्त्राचा काहीतरी पाया असावा लागतो त्याच प्रमाणे “ निसर्ग कुंडली “ जी दुर्वास ऋषींनी तयार केली हा ह्या शास्त्राचा मुलभूत पाया आहे.
पत्रिका उघडून बघितली तर त्यात चंद्र कुंडली , रवी कुंडली , लग्न कुंडली , नवमांश अश्या अनेक कुंडल्या आपल्याला दिसतात . मग त्यातील नेमकी कुठली कुंडली बघायची तर “ जन्मलग्न कुंडली “. मनुष्याच्या जीवनात असा कुठलाही प्रश्न नाही कि ज्याचे उत्तर ह्या जन्मलग्न कुंडलीचा अभ्यास करून देता येत नाही . अश्या ह्या कुंडलीत आपल्याला काय दिसते तर १२ भाव आणि त्यात असणारे ग्रह . प्रत्येक भावात ग्रह असतीलच असे नाही . काही भावात एकच ग्रह असेल काही भावात अनेक तर काही भाव रिते असतील. आता हे असे का? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या ह्या जन्माची नाळ हि गत जन्माशी जोडली गेली आहे. म्हणूनच आपल्या पूर्व सुकृता प्रमाणे ग्रहांनी पत्रिकेत अमुक अमुक स्थान पटकावली आहेत . प्रत्येक ग्रहाचे विशिष्ठ तत्व आणि कार्य आहे आणि ग्रह ते इमाने इतबारे करत असतात .त्यांचे कुणी आवडते नावडते नसते .
प्रत्येक ग्रह कुठल्या भावात आणि राशीत आहे त्याप्रमाणे त्याचे फलित असते . प्रत्येक ग्रह हा दुसर्या ग्रहाचा मित्र किंवा शत्रू असतो . म्हणूनच बुध जर त्याच्याच स्व राशीत म्हणजे मिथुन किंवा कन्या राशीत असेल तर फलीताच्या दृष्टीने उत्तम असतो . बुध जर त्याच्या शत्रू राशीत म्हणजे मंगळाच्या राशीत असेल तरी त्याचे फळ वेगळे. पत्रिकेत प्रत्येक ग्रहाला त्याचे स्वतंत्र अस्तित्व आणि कार्य आहे. हे ग्रह फलित देण्यासाठी विशिष्ठ योगात यावे लागतात . जसे सचिन तेंडूलकर उत्तम फलंदाज आहे पण त्याचे कर्तुत्व गाजवायला त्याला धावपट्टीवर खेळायची संधीच मिळाली नाही तर कसे होणार . ग्रहांचेही अगदी तस्सेच आहे . विशिष्ठ योगात ग्रह फलद्रूप होतात .
आपण समाजात वावरताना बघतो कि काही माणसे चांगली तर काही वाईट वागतात पण म्हणून त्यांचे चांगले आणि वाईट असे वर्गीकरण करणे उचित नाही . नाक्यावर उभी राहून दंगा करणारी मुले संकट प्रसंगी जीवाचे रान करून लोकांना मदत करताना दिसतात . कुणा वयस्कर व्यक्तीला रिक्षा करून देतील , कुणाला रस्ता ओलांडायला मदत कर अश्या प्रकारची कामे नेहमीच करत असतात .मग त्यांना पूर्णतः वाईट कसे म्हणायचे सांगा बर . अगदी तसेच शुभ ग्रह हे पूर्णतः शुभ आणि पाप ग्रह हे पूर्णतः अशुभ नसतात . गुरु सारखा अत्यंत शुभ ग्रह सुद्धा बिघडला तर अत्यंत अशुभ फलदायी होतो.
ह्यावरून आपल्याला एक समजते कि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक चांगल्या वाईट घटना ह्या केवळ एका ग्रहामुळे ,एका भावामुळे किंवा योगामुळे घडत नाहीत तर सगळे ग्रह , भाव , ग्रह ज्या नक्षत्रात असतात ती नक्षत्रे ,योग , ग्रहांच्या दृष्ट्या , महादशा ह्या सर्वांचे ते एकत्रित फळ असते.
ग्रहांप्रमाणे प्रत्येक भाव सुद्धा आपले नेमून दिलेले कार्य करत असतो .
आपल्या पत्रिकेत पंचम स्थान , पंचमेश आणि गुरु सुस्थित नसेल तर संततीचे सुख लाभणार नाही . मंगळ बिघडला असेल तर भावंडांशी सख्य नसेल , सप्तम स्थान , सप्तमेश आणि विवाहाचा कारक ग्रह शुक्र दुषित असेल तर वैवाहिक सौख्य मनासारखे मिळणार नाही . परमेश्वराने सगळ्यांना सगळे दिले नाही म्हणूनच त्याचे महत्व अबाधित आहे . वेळ प्रसंगी आपण त्याच्याच समोर नतमस्तक होत असतो.
चला म्हणजे आज आपल्याला हे नक्की समजले आहे कि कुठलाही एक ग्रह एखादी घटना घडवायला समर्थ नसतो . म्हणूनच आता माझा शुक्र चंद्रासोबत पंचमात आहे मग त्याचे फळ काय ? माझा रवी धनस्थानात आहे मग मला पैसा मिळेल का? माझा शनी इथे आहे आणि गुरु राहू तिथे आहेत असे प्रश्न विचारणे आपण बंद करायला हवे , पटतंय का?
पत्रिकेचा सखोल अभ्यास करूनच आपण पत्रिकेचे एक एक पदर उलगडू शकतो आणि आपल्या उत्तरा पर्यंत पोहोचू शकतो .
माझा शुक्र पंचमात का आहे आणि चंद्र लग्नात का आहे हे प्रश्न मात्र आपल्याला नक्कीच पडायला हवेत. ज्योतिष शास्त्र हे तर्कशास्त्र आहे. जसे लग्नी चंद्र असेल तर चेहरा गोल असतो कारण चंद्र वाटोळा असतो , चेहऱ्यावर आद्रता असते कारण चंद्र जलतत्व दर्शवतो .
मला खात्री आहे आता माझा राहू कर्म स्थानात आहे मग काय होईल ? मंगळ अष्टमात आहे मग माझा अपघात होणार का ? असे प्रश्न कुणालाच विचारणार नाही , कारण अर्धवट ज्ञान सुद्धा घातक असते. अथांग महासागरासारखे हे शास्त्र शिकायला आपला उभा जन्मही अपुरा होईल . लिहिण्यासारखे खूप आहे . तरीही आज इतकच .
अस्मिता
#अंतर्नाद#ग्रहयोग#फलादेश#नवग्रह#जन्मलग्नकुंडली#चंद्रकुंडली#पत्रिका#महादशा#ज्योतिषशास्त्र#तर्कशास्त्र