Wednesday, 21 July 2021

परीसस्पर्श

|| श्री स्वामी समर्थ ||

डॉ.सौ.चंद्रकला जोशी


आयुष्याच्या अनेक वळणांवर अनेक व्यक्ती भेटत जातात . अगदी चार तासाच्या प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तींशी सुद्धा कधीकधी आपले बंध घट्ट होतात. बरेचदा एका छताखाली राहणारी माणसे सुद्धा कायम समांतर रेषेसारखीच जगतात तर काही माणसे काही भेटीतच आपलीशी होवून जातात . अनेक व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यावर छाप पाडतात तर काही आपले आयुष्य समृद्ध करतात . अनेकांच्या विचारांनी आपण प्रभावित  होत असतो . आज गुरुपौर्णिमेच्या निम्मित्ताने अश्याच एका उत्तुंग गुरुतुल्य व्यक्तिमत्वाची आपल्याला ओळख करून देताना मला अत्यानंद  होत आहे .त्यांच्यामुळे  माझ्याही आयुष्यात , विचारात माझ्याही नकळत परिवर्तन झाले आहे . मला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन प्राप्त झाला आहे. 



एक दिवस असेच अनेक व्हीडीओ बघत असताना अचानक एक व्हीडीओ पाहण्यात आला. मी अक्षरशः भारावून गेल्यासारखी कितीतरी वेळा तो पुन्हापुन्हा पाहिला.  काय माहित नाही पण एकदम “Click “ झाले कि हे सामान्य व्यक्तिमत्व खचितच नाही.  

हे असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांनाच  अनेक व्याख्यानांच्या माध्यमातून  परिचित असणार्या डॉ.(सौ.) चंद्रकला जोशी . 



आपल्या आयुष्यात गुरुकृपे शिवाय गुरुतुल्य व्यक्ती येत नसतात ह्याचा पुनश्च अनुभव मी घेत होते. माझ्या जीवनातच काय तर अगदी घरात सुद्धा येणारी प्रत्येक व्यक्ती महाराजांची इच्छा असल्याशिवाय येत नाही ह्यावर सुद्धा माझी नितांत श्रद्धा आहे. कारण मी त्यांच्याच घरात राहते. 

सारखे मनात येत होते कि आपल्याला त्यांच्याशी कधी २ शब्द बोलायला मिळतील  का  ?  एक दिवस धीर करून फोन केला. खर सांगते त्यांचा आवाज ऐकून सुद्धा माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. माणसे मोठी का होतात हे त्यांच्याकडे पाहून समजते. अत्यंत सात्विक शांत बोलणे.  त्यांचा प्रेमाने ओथंबलेला प्रत्येक शब्द मला त्यांच्या समीप नेत होता . खर सांगते अतिशयोक्ती नाही पण गुरुकृपा झाल्याचा आनंद मी प्रत्यक्ष अनुभवत होते. काय ती मंत्रमुग्ध करणारी रसाळ वाणी , मोजक्या शब्दात व्यक्त केलेला प्रचंड खोल आशय सर्वच शब्दांच्या पलीकडे आहे. त्यांच्या बोलण्यातून सामोरच्या व्यक्तीबद्दल असणारा आदर , प्रचंड विनम्रता  ,तितकाच साधेपणा आणि ओतप्रोत भरलेली अध्यात्मिकता जाणवल्याशिवाय राहिली नाही. 



त्यांच्याशी मी प्रथमच बोलत आहे ह्यावर माझाच विश्वास बसत नव्हता इतक्या सहज सोप्प्या साध्या शब्दात प्रेमाने त्या माझी चौकशी करत होत्या आणि म्हणून मीसुद्धा त्यांना लगेच सांगून टाकले मी तुम्हाला “ काकू “ म्हणीन . मला म्याडम म्हणायला अजिबात आवडत नाही . क्षणात आमचे बंध घट्ट झाले. अनेक वर्ष ओळख असल्या सारख्या आमच्या गप्पा रंगल्या. 



चंद्रकला काकू ह्या मुळच्या पैठणच्या . त्यांचे वडील भगवानराव जोशी  हे प्रख्यात ज्योतिषी होते त्यामुळे त्यांना ह्या विषयाचे बाळकडू लहानपणीच मिळाले. शालेय जीवनात सुद्धा त्यांच्या कलागुणांचे कौतुक होत असे. पीयुसी कला विभागात सर्वप्रथम आणि प्रतिष्ठान महाविद्यालयातून राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान त्यांना मिळाल्यामुळे त्यांचा नगरपालिकेच्या वतीने सत्कारही झाला होता. पुढे विवाहानंतर औरंगाबाद इथे आल्यावर त्यांनी श्री. मग्गीरवार सरांकडे आपले ज्योतिषातील पुढील धडे गिरवले. कालिदास  संस्कृत युनिवर्सिटीतून “ ग्रहस्थितीनुसार मानवी आयुर्दायाचा अभ्यास “ ह्या विषयावर प्रबंध लिहून Ph. D मिळवली तीसुद्धा वयाच्या 60 व्या वर्षात . स्वतःचे घर, मुले कुणाचीही कसलीच आबाळ न करता स्वतःची प्रतिभा सकारात राहिल्या .मुलांवर नुसते संस्कार नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी त्यांची धडपड सतत चालू असे. 



आमच्या आईने दिलेल्या संस्कारांच्या  शिदोरीमुळेच आम्ही आज आयुष्यात अत्यंत यशस्वी झालो आहोत हे त्यांची मुले अभिमानाने सांगतात ह्यातच सर्व आले.   त्यांनी आजवर  किती मुलांना  घडवले ह्याचा परामर्श घेणे म्हणजे अंबरीच्या चांदण्या मोजण्या सारखेच आहे. आज वास्तू , भविष्य ह्या विषयावर बोलण्यासाठी त्यांना अनेक कॉन्फरन्स मधून बोलावणे येत असते . गेली 20 वर्षाहूनही अधिक काळ वास्तू , ज्योतिष ह्यासाठी विनामुल्य सेवा देणे हि खचितच सोपी गोष्ट नाही. 



भाषेवरचे प्रभुत्व , उच्च प्रतीची शब्दसंपदा , स्पष्ट विचार आणि तितकीच समोरच्याला आपलेसे करणारी वाणी , अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास ,दांडगा व्यासंग , प्रत्येक विषयावरची पकड, एखादा विषय कसा शिकावा आणि कसा शिकवावा ह्यात त्यांचा हात कुणीही धरू शकत नाही.  कुठल्याही विषयाचा सखोल अभ्यास , त्यातील बारकावे, त्याला असलेल्या शास्त्राचा आधार ,अगणित ग्रंथांचे वाचन ,त्यातील सातत्य , ज्ञानप्राप्तीची भूक , तेजस्वी वाणी आणि अमृताहूनही गोड वाटणारी शब्दसंपदा ,परखड पण आपलेसे करणारी  मधुर वाणी .



ज्ञान घेण्या आणि देण्यासाठी असणारी  धडपड , तळमळ  त्यांच्या व्याख्यानातून दिसते. एखाद्या विषयाची खोली  त्याचे गांभीर्य त्यातून आपल्याला काय मिळू शकते किबहुना काय घ्यायचे आहे हे अत्यंत सहजरीतीने समजावून सांगायची त्यांची हातोटी अवर्णनीय आहे. दुसर्याला आपलेसे करण्याची वृत्ती , सर्व वयोगटात मिसळून कुणाचेही मन न दुखावता साधलेला संवाद विलक्षण आहे. प्रत्यक्ष सरस्वती त्यांच्या मुखात आहे . 

ज्ञानाच्या इतक्या उत्तुंग शिखरावर विराजमान असूनही तसूभरही अहंकार नाही, नव्हे त्याचा लवलेश सुद्धा नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी . कुठल्याही गोष्टीचा मी पणा नाही. मी माझे अजिबात नाही. कसलाही डामडौल नाही ,कुणी आपल्यावर स्तुतीस्तुमने उधळावी प्रशंसा करावी हि अपेक्षाही नाही.  



फक्त देत राहणे हेच माहिती आणि तेही कुठलीही अपेक्षा न ठेवता . त्यांच्याकडे बघून मला नेहमीच विंदा करंदीकर ह्यांची कविता आठवते  

देणाऱ्याने देत जावे ,

घेणाऱ्याने घेत जावे |

घेता घेता एक दिवस 

देणाऱ्याचे  हात घ्यावेत ||

त्यांची ओंजळ कधीच रिती नसते , रात्र असो अथवा दिवस फोन ,मेसेज , व्याख्याने काही ना काही चालूच असतात . एखाद्या तरुण माणसाला लाजवतील इतक्या प्रचंड उर्जेने त्यांना काम करताना बघून खरच असे वाटते कि इतके बळ येते तरी कुठून ? त्यांच्याही गुरूंची त्यांच्यावर असणारी असीम  कृपा त्याशिवाय हे सर्व शक्यच नाही.



कुणी आवडते नाही कुणी नावडते नाही , प्रत्येकाशी तितक्याच गोड वाणीने बोलणार आणि प्रत्येकाला क्षणात आपलेसे करणार . सर्व श्रेय दुसर्याला देवून निघून जातील . आज समाजामध्ये वावरताना मी जे काही पाहते ,ऐकते आणि अनुभवते त्यावरून  ह्या व्यक्तिमत्वाचे वेगळेपण मनात भरल्याशिवाय राहातच नाही .  उपजत शिकण्याची तळमळ असल्यामुळे त्यांनी अनेक  शास्त्रे , वेद , उपनिषदे ह्यांचे पठण केले. उदात्त विचार आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या चंद्रकला काकुंचे माझ्या आयुष्यात येणे हे मी माझे सौभाग्य समजते. त्यांच्यामुळे माझ्या विचारांना आणि आयुष्यालाही  वेगळीच दिशा मिळाली आणि माझा प्रवास आता एका अद्भुत पण चैतन्यमयी मार्गावरून होतो आहे ह्याचा मनाला आनंद आणि त्याहूनही अधिक समाधान आहे. आता शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे बोट सोडणे नाही .

कुठेही स्वतःच्या कर्तुत्वाचा साधा उल्लेख सुद्धा न करता सगळ्यात असूनही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवणाऱ्या चंद्रकला काकुंचे व्यक्तिमत्व खरच मनाला भावते  आणि म्हणूनच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने  माझ्या मनातील त्यांच्या विषयीच्या भावना आणि कृतज्ञता मी माझ्या तोडक्या मोडक्या लेखणीतून साकारण्याचा ,व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय .



त्यांच्यासारख्या गुरु मिळणे हे मी माझे परमभाग्य समजते. गुरूंचे अस्तित्व आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देते ह्याचा अनुभव मी घेते आहे. 

माझे अनेक जन्माचे सुकृत चांगले म्हणून  अश्या गुरुतुल्य व्यक्ती माझ्या आयुष्यात आहेत आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझे गुरु संत शिरोमणी शेगावनिवासी श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी समर्थ ह्यांची मी ह्या अमुल्य भेटीसाठी मनापासून ऋणी आहे. त्यांनी मला चंद्रकला काकूंच्या रुपात जी अनमोल भेट दिली आहे त्याची किंमत कश्यातच करता येणार नाही .कुठेतरी वाचले आहे कि गुरु हे जन्मोजन्मी आपल्या सोबत असतातच ,आपल्यातील  शिष्यत्व जागृत करता आले पाहिजे.

आज गुरु पौर्णिमा .  माझ्या सर्व गुरूंना मी  त्रिवार वंदन करते. चंद्रकला काकू तुमच्या  ज्ञानासमोर मी नतमस्तक आहे. आपले हे गुरु शिष्याचे नाते नसून आई आणि मुलीचे आहे . मुले कितीही मोठी झाली तरी आईला लहानच असतात आणि मुलांचे हट्ट आई सदैव पुरवत असते. म्हणून आज हक्काने हट्टाने मागत आहे कि .. तुमच्या प्रेमळ आशिर्वादाला मला कधीच पारखे ,वंचित व्हायचे नाही . मी कधी चुकले तर माझा कान धरा , ओरडा पण मला कधीच दूर लोटू नका. आपला प्रत्येक शब्द माझ्यासाठी आदेश आहे आणि वंदनीय  आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्या त्या व्यक्तींची योजना महाराजांनी केलेली असते . आपली भेट हेही एक पूर्व संचितच म्हंटले पाहिजे .



काकू म्हणजे ज्ञानाचा मूर्तिमंत झरा आहेत. वयाची सत्तरी उलटली तरी त्यांचा ज्ञानयज्ञ अव्याहत चालूच आहे. लहान मुले हि कृष्णासमान आहेत  त्यामुळे त्या लहान मुलात अधिक रमतात . घरी आलेल्या प्रत्येकाला परमेश्वर स्वरूप समजून त्यांचे आदरातिथ्य करणे ,त्यांना आवडीचे पदार्थ खाऊ घालणे , सतत वाचन मनन चिंतन आणि नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास ह्या तुम्ही आम्ही घेण्यासारख्याच गोष्टी आहेत . आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आयुष्यातील प्रत्येक नात्याला न्याय देत चंदनाच्या खोडाप्रमाणे झिजत राहणाऱ्या  प्रतिभासंपन्न अश्या चंद्रकला काकुना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावे हीच स्वामींच्या चरणी आज प्रार्थना . 

माझ्या आयुष्याला तुमचा लाभलेला हा “  परीसस्पर्श  “   मी मनापासून अनुभवते आहे. 

अस्मिता

#अंतर्नाद#परीसस्पर्श#गुरुपौर्णिमा#सद्गुरू#पादुका#ज्ञान#चंद्रकलाजोशी#उपनिषदे

#वेदाचेअध्ययन

 






 










 
















7 comments:

  1. खुपचं सुंदर अनुभव .

    आपणास गुरु पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा .

    आपल्या गुरू शिष्य प्रेमळ , आदारार्थी नात्याला
    शतशः नमन .

    ReplyDelete
  2. अत्यंत प्रांजळ आणि विद्वान व्यक्तिमत्वाचे उत्तम व्यक्तिचित्रण!

    ReplyDelete
  3. खूपच छान अस्मिता ताई. जोशी मॅडम म्हणजे एक अतिशय अभ्यासक व प्रेरक प्रेमळ व्यक्तिमत्व आहेत.त्यांचा आम्हा सर्व अभ्यासकांना नेहमी पाठींबा असतो.प्रोत्साहन असत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मॅडम ना शतशः नमन 💐

    ReplyDelete
  4. उत्साही खूपच उत्तुंग व्यक्तिमत्त्व डॉ सौ चंद्रकला जोशी मॅडम नवमांश कुंडली, सर्वतोभद्र चक्र ,कोटचक्र याचा सुंदर अभ्यास
    गुरुपौर्णिमेनिमित्त शतशः नमन

    ReplyDelete
  5. खूपच छान व्यक्तिचित्र शब्दबद्ध केले। खरोखरच सौ. चंद्रकला जोशी यांच्या कार्यकर्तुत्राचे कौतुक करावे तेवढे थोडेच।आपण आपल्या गुरुंचे कार्याचा छान आढावा घेतला।

    ReplyDelete
  6. खूप छान व्यक्ती आहात तुम्ही.आपली समोरासमोर ओळख नाही पण मलाही तुम्हाला भेटायला नक्की आवडेल.

    ReplyDelete