Monday, 5 July 2021

चांदोमामा

||श्री स्वामी समर्थ ||



रात्रीच्या वेळी आकाशात पाहिले तर लक्ष लक्ष तारका लुकलुकताना आपल्याला दिसतात .ह्या सर्वांसोबत आकाशभर दुडूदुडू धावणारा चंद्र म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका “ चांदोमामा “  पण दिसतो . त्याला बघून लहान मुले टाळ्या पिटत गाणी म्हणतात . रामाने सुद्धा  नभीचा चंद्र मला हवा असा हट्ट धरला होता . अश्या ह्या चंद्राला बघून काही कवी मनांना स्फुरण चढते तर काहीना मधुचंद्राचे वेध लागतात . प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमी युगुलांच्या प्रेमाला भारती आणणारा हा चंद्र आहे. चंद्र म्हणजे मनाला होणारी संवेदना .एखाद्याचे मन दुखावले जाते म्हणजे नेमके काय होते तर त्याच्या भावना दुखावल्या जातात मन व्यथित होते . मग हे व्यथित झालेले मन दिसते का? तर नाही . हा एक अनुभव आहे. ह्या संवेदना आहेत त्या ज्याच्या त्यालाच अनुभवायला लागतात . 

असा हा अत्यंत शीतल , शांत प्रेमळ चंद्रमा आवडत नाही असा एकही प्राणीमात्र ह्या सृष्टीत नसेल. सगळ्यांचा हा लाडका आहे तो त्याच्या खास गुणांमुळे . चंद्राच्या अनेक पौराणिक कथा आपण पुराणात वाचतोच . चंद्र हा स्त्री ग्रह असून मनाचा कारक मानला आहे चंद्रमा मनसो जातः असेही म्हंटले जाते. चंद्र म्हणजे आई . सात्विक प्रेमाची बरसात आईच करू शकते आणि आपले मन सुद्धा आईच जाणू शकते. 

चंद्र हा आकाशातील २७ नक्षत्रातून पळत असतो . एका जागी निवांत बसणे, थोडे थांबणे हे जणू त्याला माहीतच नाही . सतत भ्रमंती करत राहणारा हा चंद्र एक राशी सव्वादोन दिवसात पार करतो.  चंद्राचा  सात्विक प्रकाश मनाला शांत करतो स्थिरता देतो. ह्या चंद्राशी आपले मनाचे नाते आहे म्हणूनच स्त्रिया त्याला भाऊ मानून ओवाळतात . दक्ष प्रजापती राजांनी त्याच्या २७ मुलींचा , म्हणजेच हि २७ नक्षत्रे, विवाह चंद्राशी करून दिला. चित्रा नटूनथटून त्याची वाट पाहत असे पण तिला नेहमीच निराश व्हावे लागे कारण चंद्र रोहिणीवर लट्टू झाला होता , त्याचे तिच्यावरून ध्यान हलेचना . शेवटी राजा दक्ष ह्याने त्याला शाप दिला आणि तेव्हापासून तो रोज एकेक नक्षत्रातून भ्रमण करू लागला. उशाप  दिला म्हणून चंद्र  15 दिवस कलेकलेने लहान होतो आणि कलेकलेने मोठा होतो.  काहीही झाले तरी रोहिणीच त्याला अतिप्रिय आहे म्हणून त्या रोहिणी नक्षत्रात चंद्र  उच्चीचा आहे.

आनंदाचा बहर असेल तेव्हा आनंदाश्रू डोळ्यातून पाझरतात आणि अतीव दुखात  सुद्धा डोळ्यातील पाणी थांबत नाही. ह्या  दोन्ही स्थिती चंद्राच्या आंदोलनावर अवलंबून असतात .

ह्या पृथ्वीवर सर्वात गतिमान कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे आपले “ मन “. आता होते भुईवर , गेलं गेलं आभाळात अशी जणू ह्या मनाची अवस्था असते. एखाद्या सुखद विचाराने मन थुई थुई नाचू लागते तर एखाद्या विचाराने ते निराशेच्या गर्तेत सुद्धा अडकते .  मन आनंदी असेल तर हि सृष्टी हे जग हे विश्व रम्य वाटते ,जगावेसे वाटते पण हेच मन निराश झाले तर काहीच नकोसे वाटू लागते . अश्या ह्या मनाच्या अनेक विविध छटा प्रदर्शित करणारा हा चंद्र आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. 

पृथ्वीवरील आणि शरीरातील पाण्यावर चंद्राचा अंमल आहे.  भरती ओहोटी हि चंद्रावरच पहिली जाते. इतक्या दूरवर आकाशात असणारे हे ग्रह पण त्याचा परिणाम पृथ्वीवरील मानवी जीवन आणि सृष्टीवर होतो आहे. जन्मलेले शिशु हे आईच्याच स्तनपानाने तृप्त होते आणि त्याच सात्विक प्रेमाला आयुष्यभर जागतेही. बाळाची नाळ आईशी जोडलेली असते ते ह्याचसाठी.

चंद्र गतिमान असल्यामुळे प्रवासाची आवड दाखवतो. चंद्र म्हणजे आई आणि आई म्हणजेच सेवाभाव वात्सल्य , स्त्रीसुलभ लज्जा आणि निखळ प्रेमाचा अविष्कार . त्यामुळे सेवाभाव असतो  ,जसे परिचारिका , तिथे चंद्र कार्य करतो. निसर्ग कुंडली मधले चतुर्थस्थान कर्क राशीकडे आहे आणि त्याचे स्वामित्व चंद्राला जाते . चतुर्थ स्थानावरून आपले घर ,सुखाची निद्रा ,वाहन सौख्य शेती देशप्रेम सर्व पहिले जाते. 

असा हा चंद्र बिघडला तर मनाचा समतोल बिघडतो, चंद्राचा अंमल हा पचनशक्ती वर असल्यामुळे तीही बिघडते .जरा वातावरण बदलले कि सर्दी पडसे ,पोट बिघडते.  अनेक प्रकारचे मानसिक आजार बिघडलेला चंद्र देतो. 

चंद्राकडे सर्व रस आहेत त्यामुळे दुधाचे पदार्थ , फळांचे रस ,वनस्पती , फ्रीज , कुलर , पाण्याची ठिकाणी तळी विहिरी नद्या गाईंचे गोठे हे सर्व चंद्राच्या अधिपत्याखाली येतात .

चंद्र हा शीतलता देणारा आणि गतिमान म्हणून पर्यटन व्यवसाय . पाण्याशी संबंध म्हणून मासेमारी नौ दल, मीठ मोती खलाशी हे सर्व व्यवसाय येतात. 

चंद्र ज्यांच्या लग्नस्थानात असतो त्यांचा चेहरा वाटोळा गोल असतो ,रंग गोरा असतो . चेहऱ्यावर आद्रता असते.

चंद्र शनी राहू केतू ह्या ग्रहांनी त्यांच्या दृष्टीने , कुयोगाने बिघडतो म्हणूनच ह्यावर उत्तम उपाय म्हणजे सोमवारी केलेले पांढर्या वस्तूंचे दान आणि शंकराची उपासना.

चंद्र कवी मनांना नेहमीच प्रेरणा देतो आणि  चंद्राच्या शांत शीतल प्रकाशात प्रेम फुलते बहरते . सात्विकतेचा उत्कट  अनुभव येतो ,मन शांत होते  आणि  ते आपल्याही नकळत गाऊ लागते ...तोच चंद्रमा नभात...


अस्मिता

#चंद्र#सात्विक#शीतल#मानसिकआजार#वेड#स्मृतीभंश#नर्स#आई@मातृत्व@भरतीओहोटी












   










 

3 comments: