Wednesday, 21 July 2021

अस्तित्व ( गुरुपौर्णिमा विशेष )

 || श्री स्वामी समर्थ ||


आयुष्य नागमोडी वळणे घेत असते .अनेक चढ उतार असतात . अनुभवांनी आपण समृद्ध होत जातो. जगाच्या कुठल्याही शाळेत जे शिकायला मिळत नाही ते आपल्याला आलेले अनुभव शिकवतात . प्रपंचातील अडचणीने माणूस सैरभर होतो आणि मग जो जे सांगेल ते उपाय करत राहतो . दुक्ख गळ्यापर्यंत आल्याशिवाय अध्यात्मात पाऊल पडत नाही असे म्हणतात ते वावगे नाहीच.

अपराध माझे गुरुवरा आज सारे क्षमा करा | वरदहस्त ठेवा शिरी मी अनंत अपराधी ||

भौतिक जगात आपल्याच धुंदीत जगणारी आपली पावले आपल्याही नकळत मंदिराची ,मठाची पायरी चढायला लागतात आणि तोच आपल्या जीवनातील खरा टर्निंग असतो.  डोळ्यासमोर अंधार असतो वाट सापडत नसते आणि अश्यावेळी त्या मिट्ट काळोखात चाचपडणाऱ्या भक्ताचे बोट  दुसरे तिसरे कुणी नाही तर प्रत्यक्ष सद्गुरू धरतात तेव्हा  संपूर्ण शरीरातून वीज चमकावी तसे काहीसे होते , दिव्य अनुभूती मिळते. अंधुकसा का होईना पण प्रकाश दिसू लागतो आणि आपण आपल्या संकटांवर मात करू पाहतो.  हा मोठा आधार आपले संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो आणि त्या शक्तीपुढे आपण केवळ नतमस्तक होतो . आयुष्यात सद्गुरू प्राप्ती हि आपल्या पूर्वसंचीतावर सुद्धा अवलंबून असते.

श्रीगजानन लीलेचा पार कधी न लागायाचा|अंबरीच्या चांदण्याचा हिशोब कोणा न लागे कधी ||

आता आपले चित्त कुठेच लागत नाही. आयुष्य होत्याचे नव्हते होत असताना अगदी तळ गाठून आलेले आपण कात टाकल्या सारखे पुन्हा सुखासीन आयुष्य जगू लागतो पण आपल्या चित्तवृत्ती आणि मन मात्र त्यांच्याच चरणांशी गुंतते तेही कायमचे .

आयुष्यात गुरूंचे स्थान अढळ आहे.  त्यांच्या नुसत्या विचारांनी डोळ्यातून अश्रू येऊ लागतात .त्यांच्यासाठी काय करु आणि काय नको असे झालेला भक्त आपले संपूर्ण जीवन त्यांच्या चरणाशी समर्पित करतो. महाराज आणि भक्ताचे नाते हे आई आणि लेकरा सारखेच आहे . समर्पणाची भावना जितकी दृढ तितकी भक्ती परिपूर्ण होते. मग नामस्मरण पारायण मानसपूजा ह्या सर्वातून महाराजांच्या आपल्या गुरूंच्या सेवेत भक्त रुजू होतो आणि तिथेच रमतो. आता काहीच नको असे वाटायला लागते.

गजानन पदी निष्ठा ठेवा | सुख –अनुभव सर्वदा घ्यावा |कुतर्कासी मुळी न द्यावा ठाव आपल्या मानसी ||

शांतपणे विचार केला तर आपल्याला आयुष्यात कश्याकश्यातून ,किती कठीण प्रसंगातून त्यांनी बाहेर काढले आहे हे फक्त आपले आपल्यालाच माहित असते. आपले अनन्य अपराध त्यांनी आईच्या मायेने पोटात घातलेले आहेत ह्याची क्षणोक्षणी जाणीव होत राहते.

प्रत्येक गोष्टीचा संचय करण्याकडे मनुष्याचा कल असतो पण तो करताना आपण किती गोष्टींचा   हव्यास धरायचा , काय जोडायचे काय सोडून द्यायचे ह्याचे भान उरत नाही आणि मग हव्यास हेच जीवन बनते . आयुष्यातील शांतता त्यामुळे भंग होते कारण समाधान कश्यातच नसते अजून हवे अजून हवे ह्यातच जीवन व्यतीत होते. प्रत्यक्ष महाराजांनी भक्तांना सांगितले आहे किती जमवशील कश्या कश्याचा संचय करशील.. हे म्हणजे अग्नीत तुपाची धार ..जितके तूप घालाल तितका अग्नी अधिकाधिक प्रज्वलित होणार . तसाच हव्यास वाढतच राहणार .



गुरूंची सेवा आपल्याला कुठे थांबायचे त्याची जाणीव करून देते . गरजेपेक्षा आयुष्यात काहीही असले तरी ते वाईटच थोडक्यात हव्यास आपल्याला बेधुंद करतो. संचय करायचाच असेल तर तो  भौतिक गोष्टींचा नाही तर भक्तीचा हि शिकवण आपल्याला अध्यात्म देते .आपण इथून काहीही घेवून जाणार नाही पण आपली गुरुसेवा अखेरच्या क्षणी आपल्याला मोक्षाचे दरवाजे नक्कीच खुले करून देयील .

अनन्याश्चीन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते | तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम ||

गुरूंचे आयुष्यात पदार्पण हि खचितच सोप्पी गोष्ट नाही . भक्त आणि गुरु हे समीकरणच वेगळे आहे. ह्यासारखा दुग्ध शर्करा योग दुसरा नाही. गुरुसेवेमुळे मनुष्य शांत होतो, तम आणि रज गुणांचा प्रभाव कमी होवून सात्विकता ,परोपकाराची भावना वाढू लागते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो . सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकटेपणा वाटत नाही. समस्या येत राहतात पण त्यातून मार्ग मिळत राहतो. गुरु कृपेचा अनुभव क्षणोक्षणी मिळतो आणि गुरुपदी निष्ठा समर्पित होतात .

मी कश्याला घाबरू ,मी कसलाच विचार करत नाही..महाराज आहेत ते बघतील हा विचार मनात रुजतो आणि त्यांच्या चरणी मन एकाग्र होते. आनंदाच्या व्याख्याच जणू बदलतात. हव्यास कमी होतो .

अध्यात्मिकता आयुष्य बदलून टाकते त्यागाची वृत्ती येते ,नुसते घेणे नाही तर देण्यातील आनंद आपण अनुभवू लागतो. कात टाकल्याप्रमाणे आपल्यात नखशिखांत बदल होतो.  जिथे सर्व काही संपणार होते तिथेच जीवन नव्याने सुरु झालेले असते.



अश्या ह्या  गुरूंसाठी काय करू आणि काय नको असे भक्ताला वाटले नाही तरच नवल. अश्या ह्या गुरूंच्या सेवेत रुजू होवून आपले आयुष्य सार्थकी लावणे हेच आपले कर्म आहे.

आज गुरुपौर्णिमा . गुरुसेवेसाठी मिळालेली अभूतपूर्ण  अशी पर्वणी. माझ्या आयुष्यात मला प्रत्येक क्षणी प्रचीती देणारे आणि भरभरून प्रेम देणारे माझे दोन्ही गुरु शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आणि अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ ह्या दोघांनाही माझा साष्टांग दंडवत . त्यांच्या चरणी मी माझे आयुष्य कधीच समर्पित केले आहे. मी आज जे काही आहे ते त्यांच्याच मुळे ह्याचा क्षणभर सुद्धा विसर मला पडत नाही .

त्यांनी मला काय दिले आहे हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दसंपदा नाही. मी त्यांच्या ऋणात आजन्म राहणार आहे आणि निरंतर त्यांची सेवा करणार आहे. मला काहीही मिळवायचे नाही . माझ्या आयुष्याचा सुकाणू त्यांनी धरला आहे त्यामुळे ते माझ्या साठी जे जे करतील ते माझ्यासाठी  योग्यच असणार आहे ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. असंख्य अनपेक्षित गोष्टी आयुष्यात करणारे माझे दोन्ही गुरु माझ्या हृदयात विराजमान आहेत .  पराकोटीची अनुभूती त्यांनी मला दिली आहे कि मी रात्रंदिवस बसून लिहिले तरी ते अपूर्णच असेल.

काही गोष्टी आपण फक्त अनुभवायच्या असतात . आयुष्यात आपल्याला हवे असते तेव्हा त्या त्या गोष्टींचा लाभ होणे  हेच भाग्य अशी साधी सोपी सुटसुटीत व्याख्या मी करीन . माझ्या आयुष्यातील सुखाला, आनंदाला आणि सर्वात मुख्य म्हणजे समाधानाला चार चांद लागले आहेत ते फक्त आणि फक्त सद्गुरू कृपेमुळेच.

|| अशक्यही शक्य करतील स्वामी ||

नामस्मरण पारायण हि आपल्या सरभैर झालेल्या मनाला एका जागी स्थिर करण्याची माध्यम आहेत . कालांतराने ह्या कश्याचीही गरज उरत नाही. आपल्या  दैनंदिन जीवनात व्यवहारात वागताना त्यांच्या असण्याचे भान ठेवले तर आपली कर्म शुध्द सात्विक राहतील ह्यात वादच नाही. मी मी म्हणणारे आपण अहंकाराच्या मायेत सतत गुरफटलेले असतो .  देवाचिया द्वारी उभा क्षणभरी .म्हणणारा देव  जणू आपल्याला सांगत आहे अरे वेड्या मला तुझा एक क्षणच दे पण तो भक्तीरसाने ओथंबलेला असुदे . मायेचा वर्षाव करणारा असुदे .  परमेश्वराशी आपले अतूट नाते हवे  आणि ते एकदा निर्माण झाले कि मग काही मागणे हे उरतच नाही .

सद्गुरूंचे आयुष्यात असणे ह्यासारखा दुसरा आनंद असूच शकत नाही . असा भक्त भाग्यवानच म्हंटला पाहिजे. सद्गुरुप्राप्ती आयुष्यातील दुक्ख संकटांची होळी करते .  आयुष्य पुढे सरकत आहे , आपले प्रत्येक पाऊल मृत्यूकडे जात आहे आणि म्हणूनच आपल्याकडे वेळ खूप कमी आहे ,प्रत्येक क्षण ओंजळीतून जणू निसटून चालला आहे.  हा वेळ गुरूंच्या सेवेत राहून आयुष्याचे सार्थक करणे हे आपल्या हातात नक्कीच आहे . आयुष्यात प्रत्येक क्षणी मला प्रेमाची आणि त्यांच्या असण्याची अनुभती देणाऱ्या माझ्या दोन्ही गुरूंच्या मुळे आज माझे  “ अस्तित्व “ आहे आणि म्हणूनच त्यांच्या चरणी माझे जीवन समर्पित आहे.

अस्मिता

#अंतर्नाद#गुरुपौर्णिमा#व्यासपौर्णिमा#भक्तीरस#समर्पण#गजाननमहाराज#श्रीस्वामीसमर्थ#मानसपूजा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


















 



 




No comments:

Post a Comment