|| श्री स्वामी समर्थ ||
आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी माहित नाही असा माणूसच नाही. ह्या वारीचे आयोजन दुसरे तिसरे कुणी नाही तर स्वतः पांडुरंग करत असतो आणि म्हणून तिथे कसलीच उणीव राहत नाही. गेले कित्येक वर्षे हा दृष्ट लागण्यासारखा सोहळा लाखो वारकर्यांच्या उपस्थितीत आनंदात पार पडतो आहे.
आता कोठे धावे मन | तुझे चरण देखिले आज ||
तहान भूक हरवलेला प्रत्येक वारकरी माऊलीच्या सेवेत रुजू होतो आणि देवळाचा कळस दिसेपर्यंत मग त्याला काहीच सुचत नाही. मिळेल ते खाणार , जागा मिळेल तिथे पथारी पसरणार . ऊन पाऊस कश्याचीही तमा नाही .माऊलींच्या एका प्रेमळ कटाक्षासाठी , सेवेसाठी उभे आयुष्य वेचणारा , असा हा वारकरी पंथ म्हणजे श्रद्धा भक्ती समर्पण ह्याची उद्दात्त अनुभूती देणारा आहे .
कुणाला कसले आमंत्रण लागत नाही आणि कुणाला कश्याची हाव नाही ,मानापमानाची भावना नाही . ना धर्म भेद ना जाती भेद ,कुणी उच्च नाही नीच नाही , श्रीमंत नाही आणि गरीबही नाही . ह्या सगळ्या भिंती गळून पडतात आणि वारीत फक्त एकच ओळख शिल्लक राहते ती म्हणजे “ माऊली ”.
विठू माऊली तू माऊली जगाची | माऊलीच मोठी विठ्ठलाची ||
टाळ मृदुंगाच्या जल्लोषात म्हंटले जाणारे अभंग ,गाथा ओव्या ह्यांनी अवघा आसमंत दुमदुमतो आणि माऊलींचे अस्तित्व चराचरात जाणवू लागते. माऊली आणि भक्त हे अभेद्य नाते आहे . जीवाला जीव लावणारे आणि प्रसंगी आपल्या भक्तासाठी धावत येणारे एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे असे हे सगळ्या सगळ्याच्या पलीकडे असणारे नाते आहे.
चालो वाटे आम्ही तुझाची आधार | चालविसी भार सवे माझा | जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती |
आपल्या साश्रू नयनांनी त्यांच्या चरणावर आपले सर्वस्व वाहणारा भक्त जेव्हा संकटात असतो तेव्हा माऊली सर्व सोडून धावत येतात आणि आपल्या भक्तावर मायेची पाखरण करत त्याला मार्गस्थ करतात .ह्या भक्तीची गोडी अवीट आहे.
असा हा भक्तांच्या हाकेला धावत येणारा विठोबा कित्येक युगे भक्तांच्या रक्षणार्थ एका विटेवर उभा आहे. पण आपण काय करत आहोत ? आपण ५ मिनिटे सुद्धा संपूर्ण श्रद्धेने त्याच्यासमोर उभे राहू शकत नाही . हि विचार करण्यासारखी गोष्ट नाही का?
नामस्मरणाला बसलो कि कुकरच्या शिट्टीकडे आपले लक्ष . पोथी वाचत असू तर कुरिअर कुणाचे आले ह्याची पंचाईत, देवळात गेलो तरी लक्ष घरात . देवाचिया द्वारी उभा क्षणभरी .. हे सर्व खरच प्रत्यक्षात उतरते का? तर नाही . देव आपल्या भक्तीचा खऱ्या भावाचा भुकेला आहे. त्याला आपला तासंतास वेळ नकोच आहे .तो आपल्याकडे फक्त एक क्षण मागत आहे , पण तो क्षण मात्र सर्वार्थाने फक्त त्याचा असावा इतकच . निदान एक क्षण तरी आपल्या आराध्याला , आपल्या लाडक्या महाराजांना , इष्टदेवतेला माऊलीला डोळे भरून बघा , त्याचे ते देखणे रूप आपल्या हृदयात साठवा , बघा तरी त्या २ क्षणात तो आपल्याला काय सांगत आहे काय सुचवत आहे ते.
पण आपण तासंतास पोथ्या पारायणे करून सुद्धा जे एका क्षणात समजायला हवे ते आपल्याला समजत नाही हीच तर खरी अध्यात्माची मेख आहे. जो पांडुरंग क्षणात एका कटाक्षात समजतो त्याला कुठे कुठे शोधात असतो आपण ,तनमन समर्पित करून त्याला आपले सर्वस्व वाहिले तर फक्त एका क्षणात हि माऊली आपल्या हृदयावर विराजमान होईल. हा समर्पणाचा एक क्षण फक्त हवा आहे त्यांना आपल्याकडून . देवाचे अधिष्ठान आपल्या हृदयात असले पाहिजे तरच जन्म सार्थकी लागेल.
कुठल्याही देवाने संसार सोडून देवदेव करायला सांगितले नाही . म्हणूनच तर खुलभर दुधाची गोष्ट आपण लक्ष्यात ठेवली पाहिजे कारण प्रत्येक जीवात आपण शोधात असणारा देव आहेच कि. हेच तर सुचवायचे आहे त्याला .
कानडा राजा पंढरीचा | वेदांनाही नाही कळला अंत पार याचा ||
तहानभूक हरवून काट्याकुट्यातून मार्ग काढत ,मिळेल ते खाऊन पोटाची खळगी भरत कश्याचीही तमा न बाळगणारा हा वारकरी आपल्याला आयुष्याचा खरा अर्थ शिकवत आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी करावी कारण जगातल्या कुठल्याही शाळेत शिकवले न जाणारे सगळे माणुसकीचे धडे इथे शिकायला मिळतात . माणूस म्हणून माणसाशी कसे वागले पाहिजे हीच शिकवण ह्या वारीत मिळते. कुणालाही कमी लेखू नका , जातीभेद करू नका ,कुणाला हिणवू नका ,प्रत्येकात पांडुरंगाचा म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा अंश आहे हेच हि वारी सुचवते .
अहो आपले शरीर म्हणजे घाणीचे साम्राज्य आहे. वरती हि सुरेख कातडी आहे म्हणून आपल्याला रूप रंग आहे. आपल्या विष्ठेचा वास आपल्यालाही सहन होत नाही हे सत्य आहे. जे मातीत मिसळणार आहे ,चिरकाल टिकणारे नाही त्याचा आपल्याला लोभ आसक्ती आहे आणि जी भक्ती जन्मोजन्मी आपल्याला साथ करेल त्यापासून आपण परे आहोत हेच सत्य आहे.
आधी बीज एकले | बीज अंकुरले रोप वाढले ||
अखंड जगाचे लक्ष वेधून घेणारी हि वारी आपल्याला आपल्या माऊलीना फक्त एक खराखुरा क्षण द्या हेच तर सुचवत नाही ना ? आपल्या डोळ्यांसमोर विठोबाची तुळशीमाळा घातलेली सुरेख मूर्ती आणा आणि पूर्ण श्रद्धेने त्यांच्या चरणाशी समर्पित होताना डोळ्यातील अश्रू भक्तीच्या रुपात कधी वाहू लागतील हे तुमचे तुम्हालाही कळणार नाही.
खरच किती 16 आणे खरे असते नाही भक्ताचे पांडुरंगाशी असलेले नाते . प्रत्येक वारकर्याला अक्षरशः वेड लावणारा , तहानभूक विसरायला लावणारा हा विठोबा आपल्या सर्वांच्या हृदयावर राज्य करतो आहे. चंद्रभागेच्या तीरावरून जेव्हा मंदिराचा कळस दिसू लागतो तेव्हा भक्तीच्या सर्व सीमांचे उल्लंघन करून प्रत्येक भक्त जीवाचे रान करून धावत सुटतो आणि कळसाचे दर्शन घेतल्यावर साश्रू नयनांनी आपल्या माऊलींच्या चरणावर नतमस्तक होतो .
भक्तीचा नामाचा गजर आसमंतात दुमदुमू लागतो ,सर्वत्र चैतन्याच्या लहरी फेर धरू लागतात , ढोल ताशे मृदुंग वीणा टाळ सर्व त्याच्यासमोर जणू नतमस्तक होतात . मृदुंगावर थरथरणारे हात आणि फेर धरणारी पावले , स्वर्गातून देव सुद्धा पुष्पवृष्टी करत असतील .अहाहा काय वर्णावा तो सोहळा . हा भक्तिरसाचा अविष्कार अवर्णनीय असतो . ह्या सर्वाचे वर्णन कुणीच शब्दात वर्णू शकत नाही कारण हा असतो फक्त आणि फक्त एक अनुभव .
वारकरी माऊलींच्या चरणावर आपले डोके टेकवतो तेव्हा त्याच्या भावनांचा बांध फुटतो आणि पांडुरंगाच्या चरणावर त्याच्या अश्रूंचा अभिषेक होतो. सद्गदित झालेला हा भक्त कृतकृत्य होतो .त्याच्या जीवनाचे जणू सार्थक झालेले असते.
आता कोठे धावे मन | तुझे चरण देखिले आज ||
आषाढी एकादशीची वारी हि पाहण्यासाठी जगभरातून लोक वारीमध्ये वर्दी लावतात . आपणही दर वर्षी ती पाहतो आणि अनुभवतो. घरोघरी तुळशीमाळा घालून पांडुरंगाची पूजा केली जाते .पण त्यातून आपण काय आणि किती शिकतो , किती आचरणात आणतो ते सर्वात महत्वाचे आहे. वारीतला सेवाभाव , समर्पणाची भावना , वारीचा उद्देश , एकमेकांना सोबत घेवून जाण्याची वृत्ती , दानशूर वृत्ती ,जिद्दीने कुठल्याही प्रसंगाला तोंड देवून पुढे मार्ग काढत रहायची वृत्ती .
शेवटचा दिस गोड व्हावा | याजसाठी केला होता अट्टाहास ||
खरच किती लिहू आणि काय लिहू . नुसत्या कल्पनेने सुद्धा ऊर भरून आला आहे. अशी हि सर्व जगाला वेड लावणारी , स्वतःचे अस्तित्व विसरून फक्त पांडुरंगाच्या ओढीने त्याच्या नामाचा गजर करत भक्तिरसाचा अविष्कार करणारी आषाढी वारी आणि पांडुरंगाच्या दर्शनाचे त्याच्या एका कृपेचे अभिलाषी असणारी वारकरी मंडळी ह्या सर्वांसमोर मी नतमस्तक आहे.
अस्मिता
#अंतर्नाद#वारकरी संप्रदाय#पंढरपूर#माऊली#चंद्रभागा#टाळमृदुंग#कळस#तुळशीमाळा
����������
ReplyDelete