Sunday, 11 June 2023

अविस्मरणीय माहेरची वारी

 || श्री स्वामी समर्थ ||




गेले चार महिने ओळखीतले अनेक जण शेगाव ला जाऊन आले . महाराजांना म्हंटले सगळ्यांना बोलावता पण मला मात्र बोलवत नाही . कट्टी आता तुमच्याशी . पण महाराजांना कसे करमेल , बोलावलेच मला त्यांनी आणि रविवारी गुरुच्याच नक्षत्रावर माहेरी म्हणजेच शेगाव वारी झाली. महाराजांशी भेट हि नेहमीच आनंददायी ,अविस्मरणीय असते . जगातील सगळा आनंद एकाबाजूला आणि महाराज एकाबाजूला .

 

तसे महाराज प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असतात आणि त्याची वेळोवेळी प्रचीती पण मिळते पण प्रत्यक्ष भेट काहीतरी वेगळाच आनंद देवून जाते नाही का? रविवारी अक्षरशः लाखोंच्या संखेने शेगाव ओसंडून वाहत होते . प्रचंड गर्दी आणि त्याचसोबत मी म्हणणारे असह्य असे ऊन. पण ह्या सर्वावर आपल्या मायेची पाखरण करणारे महाराजांचे अस्तित्व सर्व काही सहन करायची ताकद देते हे परवा अनुभवले , नाहीतर माझ्यासारखा पेदरुक भक्त 4 वेळा उन्हामुळे खाली पडला असता पण तसे झाले नाही.

मठात पाऊल टाकताच सनईचे सूर कानी पडले आणि डोळे महाराजांना शोधत सैरभैर फिरू लागले. तिथल्या प्रत्येक स्फंदनात त्यांचे अस्तित्व जाणवत होते. कुठल्या रुपात ते समोर येऊन ठाकतील समजणार सुद्धा नाही म्हणून सतर्क होते पण माझी तितकी कुठे पुण्याई म्हणा. दिवसातून दोन वेळा समाधी दर्शन 3 वेळा गादीचे दर्शन , दोन्ही वेळा आरती , आणि दोन्ही वेळा महाप्रसाद असा हा आनंददायी सोहळा होता . प्रसादाच्या रांगेत उभे असताना केलेले पारायण , प्रदक्षिणा , नामस्मरण आणि  महाराजांशी केलेल्या भरपूर गप्पा अश्या अनेक गोष्टीनी शेगाव ची वारी सुफळ संपन्न झाली. 

महाराजांनी मला बोलावले नाही म्हणून मी खरतर रुसले होते पण समाधीसमोर उभे राहिले आणि त्यांनी खुदकन हसून “ आलीस पोरी “ म्हंटल्यावर सगळा लटका राग कुठल्याकुठे पळून गेला. डोळ्यातून घळाघळा अश्रू येऊ लागले. आजवरचा सगळा अध्यात्मिक प्रवास आठवत गेला. अगदी सुरवातीला सासूबाईनी दिलेली पोथी मी कशी कपाटात भिरकावून दिली होते आणि आज हीच पोथी माझे संपूर्ण आयुष्य व्यापून राहिली आहे. आज महाराजांना आयुष्यातून वजा केले तर जगण्याला अर्थच उरणार नाही, व्यर्थ आहे हा श्वास घेणे इतकी त्यात मी समरसून गेले आहे. महाराजांशी काय बोलू आणि काय नको असे झाले होते मला. पण सगळेच विसरून गेले होते आणि नुसती त्यांच्याकडे बघत होते, तेही मला काहीतरी सांगत होते पण मला पामराला काहीही समजत नव्हते. महाराजांना म्हंटले मला आजवर  तुम्हीच सांभाळले आहे . माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत तुमच्याच आधारावर मी जगणार आहे , मला सांभाळा. माझ्याकडून प्रत्येक क्षणी तुमची सेवा व्हावी , आमरण वारी व्हावी आणि सदैव तुमचे चिंतन व्हावे हाच आशीर्वाद द्या , मागण्यासारखे काही ठेवले नाही तुम्ही इतके भरभरून सुख आनंद आणि शांत झोप माझ्या पदरात टाकली आहेत अजून काहीही नको. आज इथे मठात आलेल्या प्रत्येकाच्या सर्व इच्छा पूर्ण होवूदेत . तुमचे आणि माझे नाते कुणालाच समजण्याच्या पलीकडचे आहे पण ते मला समजले आहे आणि म्हणूनच जीवन कृतार्थ झाले आहे . जगून पुष्कळ झाले आहे त्यामुळे आता उरलेले आयुष्य तुमच्या चरणी . तुमच्या भेटीचा आनंद शब्दबद्ध करता येत नाही तो ज्याचा त्यालाच अनुभवावा लागतो ..आपल्या लिखाणातून वाहवा मिळवावी हे माझे वय राहिले नाही आणि त्यासाठी मी लिहित नाही पण त्यातून चार भक्त तयार व्हावेत , आपल्या दुक्खातूनच अध्यात्म सेवेचा मार्ग असतो हे ज्याला त्याला समजावे आणि प्रत्येकाचे जीवन आनंदी व्हावे हाच लिखाणाचा उद्देश आहे त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत माझे लिखाण असेच अविरत आपल्या सेवेत राहूदे हाच एकमेव हट्ट आहे. 

मंदिरातील सकाळी 11 वाजता होणारा घंटानाद हा अणुरेणूत भिनतो , स्वतः महाराज मंदिराच्या आवारात गादिपाशी , सर्वत्र फेरफटका मारत असावेत असा भास होत राहतो. महाप्रसाद वाढणाऱ्या तिथल्या प्रत्येक सेवेकर्यात मला तेच दिसत होते , जणू ते पाठीवरून हात फिरवून “ पोटभर जेव माहेरी आली आहेस ग “ असेच म्हणत असावेत . आज माझे आईवडील नाहीत पण महाराजांच्या रुपात ते माझ्यासाठी सदैव असणार आहेत . शेगाव वारी मला नेहमीच काहीतरी वेगळे देवून जाते , अध्यात्माची, गुरुसेवेची गोडी अधिक वाढते , जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोण देवून जाते . हा एक दिवसाचा आनंदाचा सोहळा उराशी जपत शेगाव सोडणे मला खूप कठीण जात होते पण पुन्हा यायचे असेल तर आज माघारी परतायला हवे म्हणून शेगाव सोडले , पुन्हा पुन्हा मागे वळून पाहताना पितांबर शिंपी आठवला . दासगणुंनी लिहिलेला अजरामर असा “ श्री गजानन विजय “ हा प्रासादिक ग्रंथ आणि त्यातील महाराजांचे सर्वच निस्सीम भक्त “ . त्या भक्तांची अपरंपार श्रद्धा , त्यांनी महाराजांच्या सेवेत अर्पण केलेले संपूर्ण जीवन ह्यातील काही गोष्टी जरी आपल्याला घेता आल्या तरी खूप झाले म्हणायचे. 


गेले काही महिन्यांपासून मला सतत पार्ले येथील मठातील महाराजांच्या पादुका डोळ्यासमोर दिसत आहेत . ह्या सर्वातून महाराजांना काय सुचवायचे ते समजत नाही पण आपणही अश्याच पादुका आणून त्यावर अभिषेक करावा असे मनात सतत येत होते. ह्यावेळी पंचधातूच्या पादुका तिथून घेतल्या आणि गादीला लावून घेताना महाराजांना म्हंटले तुमचे संकेत मला समजत नाहीत पण तुमच्या पादुकांची रोज पूजा माझ्याकडून करून घ्या . चला जगायला एक निम्मित्त मिळाले. म्हंटले ना महाराज आपल्याला जगवत असतात . 

खरच महाराज मला जगायला निम्मित्त देत आहेत आणि आणि मी त्यांच्या सेवेत जगायचं प्रयत्न करत आहे . सात्विक , सर्वांग सुंदर आणि सुखाचा सदरा देणारे शांत जीवन फक्त आणि फक्त त्यांच्या सेवेमुळे मी अनुभवत आहे . ना कुणाशी स्पर्धा ना काही मिळवायचे आहे त्यामुळे गुरुसेवेशिवाय काही दिसत सुद्धा नाही . 


समाधी समोर आणि गादी समोर अनुभवलेली शांतता आणि त्यातील अनुभवलेले त्यांचे अस्तित्व हे सर्व शब्दात लिहिता येणार नाही , पण मी ते पुरेपूर अनुभवले आहे आणि पुढेही त्याचा विसर पडणार नाही . महाराजांच्या अस्तित्वाने माझ्या आयुष्याचे खर्या अर्थाने सोने झाले आहे तसेच प्रत्येक भक्ताचे होवूदे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना . 

अशी हि शेगाव ची म्हणजेच माझ्या माहेरची वारी सुफळ संपन्न झाली. पुन्हा एकदा महाराजांशी माझी बट्टी झाली आहे हे वेगळे सांगायला नकोच . 

गजानना गजानना सांभाळ आपल्या भक्तजना |

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित

संपर्क : 8104639230


No comments:

Post a Comment