|| श्री स्वामी समर्थ ||
आजकाल ज्योतिषाकडे जाणे हे काही अंशी “ फ्याड “ झाले आहे असे वाटायला लागावे अशीच स्थिती आहे. तुमच्या प्रापंचिक जीवनातील संकटात उत्तर शोधताना शास्त्र तुम्हाला निश्चित मदत करेल पण मदत कश्यासाठी तेही समजले पाहिजे ? उठसुठ ज्योतिष बंद करा कारण आपण त्यातच अडकून राहतो.
श्री. (कै.) शहासने ह्यांनी सुद्धा अनेकदा हे नमूद केले आहे कि लौकिक जगातील प्रश्नांची उत्तरे जर काही वेळातच अपेक्षित असतील तर त्यासाठी शास्त्राला वेठीस धरू नका. संयम ठेवा तुम्हाला तुमचे उत्तर काळच देणार आहे.
एखाद्या मुलाची नोकरीसाठी मुलाखत झाली तर त्याचा निकाल काय असेल हे विचारण्यासाठी लगेच ज्योतिष शास्त्राचा आधार घेणे अनुचित ठरेल . कारण काही दिवसात कदाचित 2-3 दिवसात त्याचा निर्णय तसाही लागणारच आहे. नोकरी मिळण्याची दशा अंतर्दशा आहे ना? मग मिळेलच कि हि नाही तर दुसरी मिळेल पण मिळेल नक्की. पणआपल्याजवळ नसतो तो संयम म्हणून लगेच आपण ज्योतिष ज्योतिष करू लागतो. खिशात पैसे आहेत म्हणून लगेच ज्योतिषाचे मानधन देतो आणि प्रश्न विचारतो. अश्यावेळी ज्योतिष महोदयांनी सुद्धा मानधन न घेता जातकाला संयमित राहायला शिकवले तर ह्या शास्त्राचा मान दुपटीने वाढेल. ह्या विद्येचा वापर नक्की कधी आणि कश्यासाठी करायचा ह्याचे भान सुटता कामा नये.
कुणीतरी पैसे देत आहे मग बघा लगेच प्रश्न असे करायला ज्योतिष इतके स्वस्त झाले नाही. ते महान दैवी शास्त्र आहे आणि त्याचा सर्व परीने मान राखणे हे आपले सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे.
एखादी मुलगी पसंत पडली आहे तेव्हा त्यांच्याही कडून पसंती कळवणारा फोन कधी येईल ? स्पर्धा परीक्षेत पास होणार का? ह्या वर्षी 10 वी मध्ये किती मार्क मिळणार असे प्रश्न विचारून आपण ह्या शास्त्राचा अवमान करत आहोत .
आता 10 वी चा निकाल 2 महिन्यात लागणार त्यासाठी कश्याला हवे ज्योतिष ? विचार करा . उत्तम मार्क मिळाले आणि खुठली शाखा निवडावी हा प्रश्न नक्कीच योग्य आहे पण तो मार्क मिळाल्यावरच विचारला तर येणारे उत्तर सुद्धा हमखास बरोबर येयील पण आधीपासूनच विचारणे मात्र अयोग्य आहे .
विवाहाचा योग आहे ना ? झाले तर मग हि मुलगी नाही तर अजून कुणी पण लगेच त्यासाठी ज्योतिष कश्याला ? ज्योतिष म्हणजे चमत्कार नाही . हे असले प्रकार म्हणजे आपला संयम संपल्याची लक्ष्यणे आहेत.
उद्या आमटी भाजी कुठली करू ? कुठल्या रंगाचे कपडे घालू ? ह्यासाठी सुद्धा ज्योतिष सल्ला घ्याल कि काय ? अत्यंत आवश्यक असेल तर आणि तरच आणि समस्या निर्माण झाल्याशिवाय ह्या शास्त्राचा उपयोग करू नये.
ह्या शास्त्राचे उत्तम अध्ययन करून मनन चिंतन आणि उपासना केली तर आपल्यातील संयम वाढेल आणि हे उठसुठ ज्योतिष बंद होयील ह्यावर विचार करणे आवश्यक आहे म्हणून हा लेखन प्रपंच .
तुम्हीही कितीही ह्या शास्त्राला नावे ठेवा सूर्य उगवायचा तो उगवणारच आहे. त्यामुळे हे शास्त्र आहे कि नाही हा प्रश्नच नाही पण ते वापरताना तारतम्य बाळगले पाहिजे इतकेच . कुणीतरी आपले मानधन देत आहे म्हणून लगेच पंचांग उघडून बसणे हि शास्त्राशी केलेली प्रतारणा आहे. जातकाने आणि ज्योतिषाने सुद्धा लक्ष्मीचा आणि पर्यायाने शास्त्राचा योग्य मान ठेवावा असे माझे मत आहे .
निसर्ग सुद्धा तुम्हाला संकेत देत असतो पण ते ऐकण्यासाठी , पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी कान नाक डोळे उघडे हवे ना ...पण नाही आम्हाला रेडीमेड अगदी इंस्तंट उत्तरे हवे असते कारण संयम नाही. कुंभ राशीतील शनी हाच संयम संपूर्ण विश्वाला शिकवत आहे, विचार करा आणि तो विचार कृतीत सुद्धा उतरवा.
ज्योतिष आणि अध्यात्म ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हंटले जाते ह्याचे कारण अध्यात्म आपल्याला संयम शिकवतो त्यामुळे हे शास्त्र शिकण्यासाठी लागणारी बैठक पक्की होते . आपली उपासना आपल्याला आपल्या आतील आवाज ऐकायला शिकवते कारण तेच तर सगळ्यात महत्वाचे असते . So turn Inward. सहमत ????
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment