|| श्री स्वामी समर्थ ||
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरु ह्या ग्रहाबद्दल अधिक जाणून घेवूया . ग्रह मालिकेतील नैसर्गिक शुभग्रह “ गुरु “ . अत्यंत सात्विक , समाधान देणारा , ज्ञानाचा अखंड स्त्रोत म्हणजे गुरु . गुरु ग्रहाला आपल्या आयुष्यात अनन्य साधारण असे महत्व आहे .
गुरु म्हणजे आत्मिक समाधान देणारा बलाढ्य ग्रह . आयुष्याचे सर्वार्थाने सोने करणारा आणि आयुष्य तेजाने प्रकाशमान करणारा गुरु. प्रगल्भ बुद्धिमत्ता , आकाशासारखा विशाल दृष्टीकोण आणि असामान्य प्रतिभा देणारा हा ग्रह खरच अलौकिक आहे. विद्या ज्ञान ह्यांनी खर्या अर्थाने आपले आयुष्य उजळून टाकणारा दुसरा कुणी नसून गुरूच आहे .
आयुष्यात जिचे बोट धरून आपण पदार्पण करतो ती आई खर्या अर्थाने आपली प्रथम गुरूच म्हंटली पाहिजे . उच्च मुल्यांचा स्वीकार आणि आदर , आपल्या धर्माप्रती निष्ठा , शुद्ध आचरण आणि सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवणारा आणि यशाची शिखरे चढून सुद्धा पाय जमिनीवर ठेवायला शिकवणारा गुरूच . नैतिक मुल्यांची जाण, परोपकार , संस्कृती , सभ्यता , मदत करण्याची सामाजिक जाणीव , समाजातील मानसन्मान , तीर्थाटन ह्या सर्वांची निव ठेवणारा गुरूच.
जगातील सर्व भौतिक सुखे एका बाजूला आणि गुरुचरणाशी मिळणारी शांतता एका बाजूला. आयुष्यातील परमोच्च सुखाचे आनंद वेचायला मिळतात ते फक्त गुरुमुळेच . प्रपंच करून परमार्थ करा हा मोलाचा संदेश देणारा गुरु . गुरु कडे प्रसन्न मुद्रा आहे म्हणूनच आपल्या गुरूंची नुसती आठवण झाली किंवा त्यांची मूर्ती वा छबी डोळ्यासमोर आणली तरी मन प्रसन्न होते. सुख समृद्धी ज्याच्यामुळे प्राप्त होते आणि जीवन जगण्यासाठी लागणारा सकारात्मक दृष्टीकोण देणाराही गुरूच .
गुरूला जीव कारक म्हंटले आहे त्यामुळे ह्या जगात नवीन जीव येण्यासाठीच म्हणजे संतती होण्यासाठी ह्याच गुरूचा आशीर्वाद लागतो. समोरच्याचे मन समजून घेणारा हा गुरु माया ममता प्रेम ह्याने जणू ओथंबलेला आहे.
आयुष्याची नवीन सुरवात म्हणजेच विवाह बंधन गुरूच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही . ग्रह मालिकेतील गुरु आणि शनी ह्या दोन्ही ग्रहांचा प्रभाव जीवनावर अपरिमित आहे . दोघांचाही उद्देश एकच आहे मोक्षप्राप्ती पण मार्ग वेगवेगळे आहेत . शनीला मुळी प्रपंचाचा तिटकारा आहे तर प्रपंच नेटका करून परमार्थाला चला हा संदेश देणारा गुरु आहे.
गुरुप्रधान व्यक्तींच्या चेहऱ्यावर सात्विकता , ज्ञानाचे तेज दिसते तिथे हाव नसते . कुटील कारस्थाने करणारी बुद्धी गुरूच्या तेजासमोर टिकणारच नाही. असामान्य कर्तुत्व , समृद्धी आणि सफलता गुरुशिवाय अशक्य आहे .
वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींचा विचार करता आपल्या जीवनात गुरुमहाराजांचे स्थान किती महत्वाचे आहे त्याची जाणीव होईल. आपल्या कुंडलीत गुरु शुभ स्थितीत आणि शुभ भावात असेल तर आयुष्य जिंकले असेच म्हणावे लागेल .
नामकरण , विवाह , वास्तू अश्या सर्व शुभ कार्यासाठी गुरुचे बळ आवश्यक असतेच असते . व्यवसाय , नोकरी आणि अश्या प्रत्येक गोष्टीत यशवंत करणारा हा गुरूच आहे. अध्यात्मिक प्रगती , साधना करण्यासाठी लागणारे सामर्थ्य गुरूच प्रदान करणार . ज्ञानाचा स्त्रोत म्हणजे गुरु . ज्ञानामुळे जीवनातील अंधकार सरतो आणि जीवन प्रकाशमान होते .
आपल्या साधनेमुळे उच्च कोटीची सेवा हातून घडवणारा आणि त्या योगे आत्मा आणि परमात्म्याचे मिलन घडवणारा असा हा गुरु केवळ अलौकिक आणि असामान्य . गुरुप्रधान व्यक्ती अत्यंत आशावादी असतात . नको नाही बघतो सांगतो परंतु हे शब्दच त्यांच्या शब्द कोशात नसतात . गुरूला आकाशतत्व दिले आहे जे इतर सर्व तत्वांना सामावून घेणारे आहे त्यामुळे गुरुप्रधान व्यक्ती अथांग सागरासारख्या सर्वाना सामावून घेवून आयुष्याचा प्रवास करणाऱ्या असतात . मनाचा मोकळेपणा आणि उत्तम वैचारिक बैठक ह्या लोकात पहायला मिळते . गुरु देणारा आहे घेणारा नाही त्यामुळे हे देणारे असतात . देत राहण्यात ते धन्यता मानतात . जीवनाचा दृष्टीकोण आनंदी ठेवुन सत्कर्म घडवणारा गुरु आयुष्यात कधीच एकटेपणा देणार नाही .
गुरुप्रधान व्यक्ती सदैव कार्यमग्न आढळतात .देवाप्रती आणि धर्माप्रती विशेष श्रद्धा असणारी हि मंडळी सामाजिक कार्यात स्वतःला अर्पण करतात . कुठल्याही संकटातून मार्गस्थ होतात . उत्साह , आनंद म्हणजेच गुरु . आपल्या आयुष्यात अनेक वळणांवर होणारी सत्कर्मे गुरुमुळेच शक्य होतात . गुरूकडे संयम आहे उथळ नाही त्यामुळे सारासार विचारशक्ती , मोठे मन, नम्रता आणि उत्तम श्रवणभक्ती ह्यामुळे यशाची उच्च शिखरे अश्या व्यक्ती सहज पार करताना दिसतात . ऐकणारा आणि ऐकवणारा सुद्धा हा गुरु आहे पण सामंजस्याने हाच फरक आहे.
गुरुंच्या चरणावर आपला उभा संसार अर्पण करणारे आयुष्य गुरुसेवेत व्यतीत करतात , ना कसला लोभ ना कसला अहंकार , ना काही मिळवायचे असते ना गमावल्याचे दुक्ख असते. अत्यंत निर्विकार वृत्ती आणि मन ह्यामुळे गुरुकृपा बरसत राहते आणि जीवनातील मानसन्मानाचे धनी होतात .मोठ्या लोकांमध्ये उठबस होते , त्यांचे अस्तित्व लोकांना हवेहवेसे वाटते , त्यांच्या मताला आणि त्याहीपेक्षा त्यांच्या असण्याला महत्व प्राप्त होते. जीवनात अनेक संधी समोरून येतात आणि अशक्यप्राय गोष्टीही घडून येतात . गुरुकृपा म्हणजे लाख दुखोकि एक दवा आहे .
हाच गुरु कुंडलीत अशुभ असेल तर व्यक्ती प्रत्येक गोष्टीसाठी तरसेल. प्रत्येक क्षेत्रात पीछेहाट होईल. जीवन निरस , उदास आणि निराशेच्या गर्तेत जायील . यश हुलकावण्या देत राहील.
गुरु पौर्णिमा. गुरु सेवा करून , गुरुंनी सांगितलेल्या मार्गावरून चालणे म्हणजेच कुंडलीतील गुरु बलवान करणे . आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरुसेवा करून आपले जीवन कृतार्थ करुया आणि गुरु सेवेचे अखंड व्रत घेवून जीवनाची दिशा निश्चित करुया .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment