|| श्री स्वामी समर्थ ||
आपल्या पत्रिकेत 12 भाव असतात . प्रत्येक भाव कुठल्या ना कुठल्या तरी राशीच्या अमलाखाली असतो . काही भावात ग्रह असतात मग ते एक किंवा एकापेक्षा अधिक सुद्धा असू शकतात . पण काही भाव हे रिक्त असतात म्हणजे काही भावात एकही ग्रह नसतो . मग हे रिक्त भाव फलादेशात आपले योगदान देतात कि नाही ? आजचा आपला विषय हाच आहे.
12 भाव आणि 9 ग्रह त्यामुळे कुठला ना कुठला भाव हा रिक्त असणारच . अश्या ह्या रिक्त भावाला फलादेश करताना वगळायचे का? अर्थात नाही. ज्या भावात ग्रह असतात तो भाव फळे देण्यास जितका सक्षम असतो किबहुना त्याहीपेक्षा अधिक रिक्त भाव असतो . कुठलाही भाव , ग्रह राशी नक्षत्र बिन कामाचे पत्रिकेत नसते , त्यांना दिलेले काम ते चोख बजावत असतात .
रिक्त भाव कसा परिणाम करेल हे बघताना रिक्त भावाचा स्वामी पत्रिकेत कुठे आहे? म्हणजे उदा. चतुर्थ भाव रिक्त आहे आणि चतुर्थ भावात वृश्चिक राशी आहे तर त्या राशीचा स्वामी मंगळ पत्रिकेत कुठे आहे ते बघा . तो केंद्रात आहे कि त्रिक भावात कि अजून कुठे.
समजा लग्न भाव म्हणजेच तनु स्थान रिक्त आहे पण त्यावर गुरूची दृष्टी आहे तर लग्न भाव बलवान झाला कारण गुरूसारख्या शुभ्ग्रहाची दृष्टी आहे . पण ह्या तनु भावाकडे राहू आणि शनीचीही दृष्टी असेल तर हाच लग्न भाव कमकुवत होईल. लग्नेश कुठे आहे? पाप कर्तरीत आहे का? लग्नेश स्वतःच्या भावापासून 6 8 12 ह्या पैकी भावात आहे का? नीच कि उच्च आहे ?
समजा भाग्य भाव रिक्त आहे आणि त्याचा भावेश गुरु अष्टम भावात असेल तर भाग्य भाव बलवान होणार नाही. कारण भाग्येश भाग्य भावाच्या व्यय भावात आहे.
सप्तम भाव रिक्त आहे आणि सप्तमेश व्यय भावात असेल तर सप्तम भावाची फळे चांगली मिळतीलच असे नाही .
पण हाच सप्तमेश लग्न भावात असेल तर सप्तमेश स्वतःच्याच भावाला म्हणजे सप्तम भावाला बघेल आणि त्या भावाला बलवान करेल.
पंचम भाव रिक्त आहे आणि संततीचा कारक ग्रह गुरु जर चतुर्थ भावात असेल तर संततीचे सुख मनासारखे प्राप्त होणार नाही त्याचसोबत जर पंचमेश सुद्धा चांगल्या भावात नसेल तर अजूनच ह्या निदानाला अर्थ प्राप्त होईल.
प्रत्येक भावात राशी असेल पण ग्रह असतीलच असे नाही . पण त्या राशीचा स्वामी त्या रिक्त भावाची फळे देणारच.
ह्याच भावाचा राशीस्वामी नवमांश कुंडलीत कसे काम करतो आहे हेही महत्वाचे आहे .एखादा भाव रिक्त असेल पण त्यावर दृष्टी टाकणारे ग्रह , मग ते शुभ असो अथवा अशुभ , त्या भावाची फळे देण्यास सक्षम असतात .
ह्या भावातील राशी स्वामीच्या दशा अंतर दशेत सुद्धा त्या भावाची फळे मिळतात .
संकलन : सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment