Thursday, 15 June 2023

कर्माधीपती वक्री

 || श्री स्वामी समर्थ ||




17 जून , 2023 रोजी शनी महाराज वक्री होत आहेत आणि ते ह्याच वक्री अवस्थेत 4 नोव्हेंबर ,2023 पर्यंत असणार आहेत . ग्रह वक्री होणे हि असामान्य घटना नाही त्यामुळे त्याला घाबरण्याचे करण नाही. दर वर्षी शनी महाराजन 140 दिवस वक्री होत असतात . ग्रह वक्री होतो म्हणजे तो उलटा चालायला लागतो हा भ्रम आहे. ग्रह आपल्याच मार्गाने जात असतो पण वक्री अवस्था हि एक भासमान स्थिती आहे जी ग्रह आणि पृथ्वी ह्याच्या गतीमुळे निर्माण होते .  ग्रह वक्री होतो तेव्हा तो अधिक बलवान आणि अधिक परिणाम देण्यास सक्षम होतो. प्रत्येक वेळी आयुष्य एकाच गतीने जाणार नाही , ते वर खाली होणार , सगळे सहज मिळणार नाही कधीतरी अडथळ्यांची शर्यत असणार , सगळे सहज सोपे सुंदर नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही हेच शनी महाराज शिकवत आहेत .

शनीच्या ह्या वक्री अवस्थेचा संपूर्ण विश्वावर निश्चित परिणाम होणार आणि अर्थात जनमानसावर सुद्धा. शनी आपल्याला आपल्याच कर्माची फळे देत असतो त्यामुळे ज्यांनी उत्तम कर्म केली आहेत त्यांना घाबरण्यासारखे काहीच नाही उलट शनी महाराज त्यांना काहीतरी देवूनच जातील. इतरांनी त्यांचा विचार करावा . चुकीच्या कर्माचे फळ मिळणारच त्यामुळे अनेकांना ह्या वक्री शनीची भीती वाटते . आयुष्याच्या शाळेत अनेक धडे मिळत असतात त्यापैकी जास्तीत जास्त धडे शनी वक्री असताना मिळतात . अनेक मार्गांवर भरकटत जाणारी आपली गाडी योग्य मार्गावर आणण्याचे काम शनी महाराज ह्या काळात करतात , जसे आपण नक्की काय केले पाहिजे आणि आयुष्याचे उद्दिष्ठ काय असले पाहिजे. मग सांगा वक्री शनी वाईट कसा काय ?प्रत्येकाच्या आयुष्याचे जहाज कधीना कधी तरी भरकटतेच , पण ते मार्गावर येते , तसेच आहे हे.

प्रत्येक व्यक्ती ह्या काळात आलेल्या अनुभवांवरून किंवा शनी महाराजांनी निर्माण केलेल्या परिस्थितीवरून प्रगल्भ होतो , स्वतःचे सिंहावलोकन करायला लागतो किबहुना त्याला ते भाग पडते . आयुष्यभर दुसर्यावर टीका करणारे आणि दुसर्याच्या आयुष्यावर तोंडसुख घेणारे आपण अहो कुणीतरी आपल्यालाही “ जरा स्वतःच्या आतमध्ये बघ “ हे सांगायलाच हवे ना , तेच तर काम करणार आहेत आता शनी महाराज .

शनी आपल्या मुल त्रिकोण राशीत वक्री होत आहे . 13 अंशावर वक्री होणारा हा शनी 6 अंशांपर्यंत मागे जाऊन पुन्हा पुढे मार्गक्रमण करणार आहे. ह्या काळात संपूर्ण विश्वाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे जसे पुरामुळे होणारे नुकसान , वादळी वारे, चक्री वादळे , भूकंप .

ग्रहमालिकेतील आत्यंतिक महत्वाचा ग्रह  गुरु सध्या राहुसोबत चांडाळ दोषात आहे आणि त्यावर वक्री शनीची तिसरी दृष्टी असणार आहे . शनी अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवत असल्यामुळे अनेकांना आपल्या नोकर्या सांभाळाव्या लागतील. बेरोजगारीचे वाढते प्रमाण हि कित्येक देशांना झोप उडवणारी व्यथा ठरेल.

शनी सर्व सामान्य माणसाचे नेतृत्व करतो. शनी जमिनीच्या खालचा भाग दर्शवतो त्यामुळे सत्य शोधणे हे त्याचे काम आहे. मिजास अहंकार ह्यांनी माजलेल्या कित्येकांचे जहाज बुडणार आहे कारण शनी हेच अंतिम सत्य आहे .

थोडक्यात काय तर आता शनी अधिक बलवान होणार आहे आणि आपल्याला आपल्याच कर्माची फळे देणार आहे. चुकत कोण नाही ? सगळेच कधी ना कधी चुकतात . पण अजाणते पणी झालेली चूक आणि जाणून बुजून , समजून उमजून केलेल्या चुकांना माफी शनी महाराज कधीच करत नाहीत . ज्यांनी अश्या चुका केल्या आहेत त्यांनी शनी महाराजांच्या समोर आपला गुन्हा स्वीकारून नतमस्तक व्हावे आणि त्यांनी दिलेली शिक्षा भोगून मुक्त व्हावे ह्याशिवाय पर्याय नाही .

वक्री शनीचा त्रास हा ज्यांना शनीची दशा , अंतर दशा , विदशा आहे किंवा ज्यांचा शनी मूळ पत्रिकेत 6 8 12 ह्या भावात आहे त्यांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक घटना वाईटच घडेल असे नसते. ज्यांनी अथक परिश्रम केले आहेत , सचोटीने जीवन जगले आहेत त्यांना महाराज त्यांच्या इच्छा पूर्ण करून बक्षीस सुद्धा देतील.

दुसर्याला त्रास देताना आपल्याला मजा येते , समोरच्याला किती त्रास होत असेल त्याची सुतराम कल्पना किंवा त्याचा विचार सुद्धा आपण करत नाही , इतके बिनधास्त जगतो आपण . अश्यांना शनी बरोबर वठणीवर आणतो आणि त्यांची जागा ( लायकी ) दाखवतो . शनी महाराजांना कष्ट करणारी व्यक्ती प्रिय आहे, खोटे बोलणे त्यांना अजिबात आवडत नाही त्यामुळे सत्याची कास धरून , प्रामाणिक कष्ट करून आयुष्य व्यतीत करणे, हनुमान चालीसा, शनी महात्म ,शनी महाराजांचा जप आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अहंकाराला तिलांजली , ह्या गोष्टी आपल्याला ह्या भवसागरातून नक्कीच तारून नेतील.

वक्री शनी बिघडवायला नाही तर बिघडलेली घडी पुन्हा नीट व्यवस्थित करायला येणार आहे. आपल्याला मार्गावर आणण्यासाठी त्याला चार फटके मारायला आपणच आपल्या चुकीच्या कर्मानी प्रवृत्त करत आहोत . आपल्याला शिक्षा करताना त्यानाही आनंद होत नसणारच कि . 

ओं शं शनैश्चराय नमः 

संकलन : सौ अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


 

 




1 comment:

  1. खूप छान माहिती दिली. तुमच्या या मार्गदर्शनामुळे बऱ्याच गोष्टींची माहिती मिळतेय आणि असलेले गैरसमज सुद्धा दूर होतात. धन्यवाद

    ReplyDelete