Saturday, 17 June 2023

ज्योतिष शास्त्राचे अध्ययन कसे करावे ????

 || श्री स्वामी समर्थ ||


ज्योतिष शास्त्र शिकायला आयुष्य कमी पडेल इतकी त्याची मोठी व्याप्ती आहे . ह्यातील कण अन कण वेचण्यासाठी मुळातच गुरुकृपा लागते आणि त्याच सोबत प्रचंड तळमळ , कष्ट करण्याची तयारी , साधना आणि मनन चिंतन . आवड असेल तर सवड सुद्धा मिळेल . अभ्यासातील सातत्य हवे , शिकायची जिद्द , मेहनत करण्याची तयारी आणि संशोधक वृत्ती तसेच यश अपयश स्वीकारून पुढे जाण्याची वृत्ती हवी . नुसतेच हा क्लास तो क्लास करून , फेसबुक किंवा इतर सोशल मिडिया वरील सेशन ऐकून शास्त्र शिकता येणार नाही हे नक्की. 


जगभरातील ह्या शास्त्राच्या थोर अभ्यासकांनी आपले ज्ञान , संशोधन पुढील पिढ्यांना उपयोगी व्हावे म्हणून ग्रंथ रुपात संग्रहित करून ठेवले आहे त्याचा शास्त्र समजून घेण्यास नक्कीच उपयोग होईल . ह्या सर्व ग्रंथरूपी ज्ञानाच्या ज्योती आपल्याला अभ्यासाची दिशा जरी देत असल्या तरी आपल्याला त्यात स्वतःचे योगदान द्यावेच लागणार आहे हि खूण गाठ मनात पक्की असावी. 


फलज्योतिष असो अथवा कृष्णमुर्ती पद्धती असो अथवा अन्य कुठलीहीपद्धती , फलादेश महत्वाचा आहे.  ज्योतिषाने फलादेश करताना तारतम्य सुद्धा बाळगले पाहिजे.असो. ज्योतिष हे तर्कशास्त्र आहे आणि हे प्रत्येकाला येणारच . अभ्यासाची दिशा योग्य असली कि झाले. उगाचच आज हे वाचन उद्या ते करून दिशाहीन होऊ नये . हा अभ्यास मी फक्त उत्सुकते पोटी करत आहे कि मला ह्यात खरोखर पुढे जायचे आहे ? हे प्रश्न स्वतःला विचारावे आणि ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली कि पुढे जावे. 


नवीन अभ्यासकांनी अभ्यास पायरी पायरीने करावा घाई करून शिकण्यासारखा कुठलाच विषय नसतो . संपूर्ण पंचांग अभ्यासावे , त्यातील बारकावे जाणून घ्यावेत . पंचांगाची 5 अंगे तसेच software शिवाय लग्न कुंडली आणि नवमांश कुंडली कशी करायची ह्याचाही अभ्यास करावा .  प्रत्येक ग्रह , त्याचे कारकत्व समजून घ्यावे . कुठलाही ग्रह पूर्णतः शुभ किंवा अशुभ नसतो तो कसा ह्याचाही अभ्यास करावा . जसे चंद्र किंवा नेप चांगले असतील तर कविताही करतील आणि बिघडले तर व्यसनाकडे सुद्धा नेतील. प्रत्येक भावाचा सखोल अभ्यास करावा . प्रत्येक भाव शरीरातील एक अवयव , नातेसंबंध आणि इतर असंख्य गोष्टींचे द्योतक आहे. ग्रहांच्या अवस्था जसे अस्तंगत , स्तंभी आणि वक्री त्यांच्या दशा अंतर दशेतील त्यांची फळे ह्याचाही अभ्यास करावा . 


उदा. पत्रिकेत चतुर्थ भावावरून आपण आपली आई बघतो तसेच , घर , वाहन शिक्षण सुद्धा बघतो. एखाद्याला मातृसुख बरे  असेल तर शिक्षण जेमतेम असेल पण वाहन सुख चांगले असेल. मग हे सर्व एकच भावावरून असून सुद्धा त्यात इतका फरक का हे समजून घेता आले पाहिजे.  शुभ ग्रह , पाप ग्रह कुठले? ग्रह कुठल्या राशीमध्ये नीच आणि उच्च होतो , ग्रहांची दृष्टी ह्या सर्वासाठी पंचांगात दिलेल्या माहितीचा उपयोग करावा. जाता येता त्यातील तक्ते डोळ्याखालून घालावे जेणेकरून ते पाठ होतील. प्रत्येक भावात ग्रह काय फळे देतील , त्रिक स्थाने , केंद्र  स्थाने , कोण स्थाने म्हणजे कुठली स्थाने हे समजले पाहिजे आणि त्यांचे पत्रिकेतील महत्व सुद्धा . लग्न बिंदुला खूप महत्व आहे , हे सर्व पेहलू तपासावे.


आपल्या आयुष्यात घटना अश्याच घडत नाहीत तर त्यासाठी एकापेक्षा अनेक ग्रहांचे योग व्हावे लागतात . त्यामुळे ग्रहांचे योग जसे युतीयोग , नवपंचम , अनोन्य योग, प्रतियोग , षडाष्टक ह्याचा अभ्यास करावा. ग्रहांची जातकुळी समजण्यासाठी ह्या सर्व बाबी माहिती असणे आवश्यक आहे . मुळातच एखाद्याच्या आयुष्यावर बोलायचे म्हणजे सोपे काम नाही . आपली स्वतःचीही पत्रिका त्यासाठी तितकीच सक्षम लागते . 


आयुष्यातील घटनाक्रमाचे मुख्य आणि एकमेव सूत्रधार म्हणजे “ महादशा स्वामी “ . एखाद्या ग्रहाची महादशा आपल्या आयुष्याची दिशा एका रात्रीत फिरवू शकते त्यामुळे ह्या महादशा स्वामींचे कार्येशत्व काळजीपूर्वक अभ्यासावे लागते. आपल्या आयुष्याचा सुकाणू ह्या दशा स्वामीच्या हातात आणि जातकाच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा हा दशा स्वामीच देणार त्यामुळे त्याचा अभ्यास पाहिजे. दशास्वामी कुठला ग्रह आहे , तो लग्नेशाचा मित्र आहे का? ग्रह लग्नाला योगकारक आहे का? पत्रिकेत नेमका तो कुठे आहे आणि कुठल्या भावांची फळे देणार आहे , कुठल्या नक्षत्रात आहे अश्या असंख्य बाबी तपासून त्याची फळे नेमकी कशी असतील ह्याचा अंदाज बांधता येतो.  उदा. दशास्वामी विवाह हि घटना देणार नसेल तर अनेकदा गोचर गुरु लग्नातून किंवा सप्तमावर दृष्टी टाकून गेला तरी विवाह होत नाही आणि निराशा पदरी पडते कारण अपूर्ण अभ्यास. उलटपक्षी विवाहाचा किंवा परदेशगमनाचा उत्तम योग असूनही ती संभाव्य घटना का घडली नाही ? कुठे माशी शिंकली ? इथेच खरा अभ्यास सुरु होतो. आपल्याकडे येणारा जातक हा त्याच्या आयुष्यातील कुठल्या दशा , अंतर्दशा आणि विदशेत आला आहे हे पाहावे . 


ज्योतिष सांगणारा सुद्धा मनुष्य आहे देव नाही , प्रामाणिक पणे अध्ययन करूनही कित्येकांचे भाकीत चुकते कारण हे शापित शास्त्र आहे. प्रत्येक वेळी तुमच्या तोंडून गेलेला शब्द खरा होईलच असे नाही त्यासाठी अट्टाहास सुद्धा नको . भाकीत बरोबर आले तरी त्याचा अहंकार नको आणि चुकले तर निराशाही नको. पुनश्च हरिओम करून कुठे आणि कसे चुकले ह्याचा अभ्यास करणारा अभ्यासक नक्कीच पुढे जायील .त्यामुळे माझे भाकीत नेहमीच बरोबर येते हा दर्प आपल्या बोलण्या वागण्यात नको. मुळात ज्योतिषाने स्वतःला अभ्यासक समजावे आणि तसेच वर्तन करावे . मला सगळे येते म्हंटले कि संपले सगळे. सतत वाचन चिंतन मनन आणि गोचर भ्रमणाने जगभरात घडणाऱ्या घटना , वातावरणातील बदल , व्यक्ती सापेक्ष घडणाऱ्या घटना , शेअर मार्केट, सोने चांदीच्या भावात होणारे बदल , राजकारण ह्या रोजच्या घडामोडींवर  होणारा परिणाम ह्याचा डोळसपणे अभ्यास करून वेळोवेळी नोंदी करून ठेवाव्यात . जसे आता शनी महाराजांचे भ्रमण जानेवारीपासून त्यांच्या मुल त्रिकोण राशीत होत आहे तसेच ते वक्री सुद्धा ह्याच राशीत होत आहे . ह्या आधी शनी कुंभ राशीत असताना नेमकी इतर ग्रहस्थिती काय होती ? तो वक्री असताना जगभर कुठल्या घटना घडल्या ? शनी सर्व गोष्टी आक्रसून घेतो त्यामुळे किती रिसेशन झाले होते ? क्रूड ओईल चे भाव कसे होते ? भूकंप , वादळे ह्याची जगातील कुठल्या भागात  झळ अधिक पोहोचली होती ? ह्या प्रश्नांची उत्तरे सापडण्यासाठी संशोधन करावे आणि असाच प्रत्येक गोचर भ्रमणाचा सखोल अभ्यास करावा . शनी आणि गुरु सारखे बलाढ्य ग्रह राशीबद्दल करताना वेगवेगळा परिणाम दर्शवतात त्याचा जगभरातील अभ्यासक अभ्यास करून नोंदी ठेवतात .


आपली स्वतःची साधना उत्तम असेल तर क्षणात सुद्धा पत्रिका समजते . अनेकदा जातकाच्या प्रश्नांची उत्तरे त्याची जन्म कुंडली न पाहता , प्रश्न कुंडली किंवा अगदी रुलिंग ग्रहांवरून सुद्धा देता येते . जातकाने प्रश्न कुंडली मांडण्यासाठी दिलेल्या क्रमांकावरून सुद्धा उत्तर समजते किंवा देता येते . अर्थात हा अभ्यासाचा पुढील भाग आहे . 

थोडक्यात काय तर अर्जुनाला जसा पक्षाचा फक्त डोळाच दिसला तसे आपल्याला जळी स्थळी फक्त अभ्यास दिसला तरच आपल्याला हा भवसागर पार करता येयील . कुठलाही एखादा ग्रह आपले आयुष्य घडवू किंवा बिघडवू शकत नाही , फलादेशासाठी नवग्रहांची पालखी तयार व्हावी लागते . वरील अनेक बाबींचे सखोल चिंतन मनन आणि आपल्या सद्गुरूंच्या आशीर्वादाची शिदोरी पाठीशी असेल तर कुठे भविष्य कथनाचा धागा हाती लागतो अन्यथा सर्व व्यर्थ आहे .

आज समाजाला उत्तम जाणकार ज्योतिषांची गरज आहे. अहो ज्योतिषी कुणी वेगळा नाही तो तुमच्या आमच्यातील एक आहे तुमची आणि त्याची सुख दुखे सुद्धा एकच आहेत . त्याला असणार्या ह्या दैवी शास्त्राच्या अध्ययनाचा उपयोग करून तो जातकाला मार्गदर्शन करत आहे इतकच . 

ज्योतिष शास्त्र आणि हे ग्रहतारे आपल्या मदतीलाच आहेत आणि त्यांची मदत आपल्याला कधी मिळणार आहे हे सांगणारा ज्योतिष अभ्यासक आहे त्याचा आणि ह्या दैवी शास्त्राचा मान ठेवा आणि आपले आयुष्य सुखमय करा. 

 

श्री स्वामी समर्थ 

संकलन : सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230  





No comments:

Post a Comment