Wednesday, 2 October 2024

स्थिरता

|| श्री स्वामी समर्थ ||


मनाचा कारक चंद्रमा जो अत्यंत चंचल आहे. एका जागी थांबणे जणू त्याला आवडतच नाही , आकाशात मुक्त विहार करत दुडूदुडू धावत महिनाभरात सर्व राशीतून तो प्रवास करत असतो . मन स्थिर नसेल तर बुद्धीही स्थिर राहणार नाही  आणि बुद्धी अस्थिर झाली तर सर्व कठीणच होईल . 

मन स्थिर नसलेली लोक क्षणात निर्णय बदलत राहतात , हे करू कि ते करू . कुठल्याही एका निर्णयावर स्थिर राहणार नाहीत किबहुना निर्णयक्षम नसतात . अस्थिर मनोवृत्ती बिघडलेल्या चंद्राचे प्रतिबिंब आहे. मग बसल्या जागी सतत पाय हलवत राहणे , सतत काहीतरी हातवारे करणे. एका जागी शांत बसणारच नाहीत .

अश्या मुलांना किंवा व्यक्तींनी ध्यान धारणा करावी , अर्थात ध्यानासाठी  मुळात तयारच होणार नाहीत . पण ध्यान जसजसे करत जातील अगदी एखादा मिनिट बसली सुरवातीला तरी चालेल . पण त्याने त्यांच्या मनोवृत्तीत बदल होईल . योगाभ्यास हा मनाच्या एकाग्रतेसाठी रामबाण उपाय आहे .


निर्णयक्षमता नसल्यामुळे किंवा मनाची चंचल अवस्था मग आयुष्यात अपेक्षित यश मिळवू शकणार नाही आणि मग त्यातून निर्माण होणारे वैफल्य आणि पुढे सर्वच चुकत जाते .  चंद्राला अस्थिर करणारा ग्रह बुध , ह्या दोघांचे प्रतियोग , युती चंचलता वाढवणारी असते . 


शारदीय नवरात्रोत्सव सुरु होत आहे आणि आपण घरोघरी महालक्ष्मीचे स्वागत करत आहोत . लक्ष्मी सुद्धा चंचल आहे . तिला स्थिर करण्याचे काम महाविष्णूच करू शकतात . पण आपण तिला आवाहन करून तिचे पूजन करत असताना आपलेही मन अस्थिर चंचल असेल तर आपण तरी शांत चित्ताने पूजन कसे करणार . आपणच चंचल असू तर लक्ष्मी तरी स्थिर कशी होईल ? म्हणूनच पुढील ९ दिवस सर्व चित्त एकवटून एकाग्र होवून महालक्ष्मीच्या चरणाशी आपले मन एकाग्र करुया , माझे मन तुझ्याच चरणाशी  स्थिर कर अशी तिला प्रार्थना करुया , आपले मन , विचार स्थिर झाले तर आयुष्य सुद्धा लयबद्ध होईल आणि लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे स्थिरावेल. 

आज हा विचार आपल्यासमोर मांडताना माझेही मन तिच्याच चरणाशी स्थिरावत आहे.

सर्वाना शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेछ्या . 

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230


 

No comments:

Post a Comment