Sunday, 13 October 2024

विश्वासपात्र

 || श्री स्वामी समर्थ ||


मंडळी ज्योतिष हे प्रत्येकाने शिकावे निदान आपल्या पत्रिका समजून घ्या अशी आज कळकळीची विनंती करावीशी वाटते , ज्यांना ह्या शास्त्रावर विश्वास नाही त्यांच्यासाठी हि पोस्ट नाही आहे . असो. शास्त्र मानणाऱ्या सर्वानीच हा जळजळीत डोळ्यात अंजन घालणारा अनुभव नक्की वाचवा आणि त्यावरून बोधही घ्यावा .

मध्यंतरी एक पत्रिका पाहिली. आईचा किती विश्वास मुलावर . आईच्या पत्रिकेत दशा स्वामी राहूच्या नक्षत्रात आणि पंचमेश सुद्धा राहूच्या नक्षत्रात . दशा स्वामी स्वतः बाधकेश. अन्य ग्रहस्थिती इथे देता येणार नाही पण मुख्य मुद्दा राहू आणि फसवणूक करणारी संतती हाच आहे . असो जिथे जिथे राहू येतो तिथे साधे सोपे काम नसते. राहू आपल्याही नकळत आपला सापळा रचत असतो .  प्रत्येक आईसाठी आपली मुले हे विश्व असते त्यामुळे आपलीच मुले आपल्याला फसवतील हे स्वप्नात सुद्धा येत नाही पालकांच्या किबहुना त्या दृष्टीने विचार करण्याची त्यांची बुद्धीच नसते आणि इच्छाही .  मुलगा पन्नाशीला आला तरी आईसाठी तो बाबूच असतो आणि अजूनही पाळण्यातच असतो. मुलाने आईच्या लाखो रुपयाची हातसफाई कधी केली कुणालाही समजले नाही. आता ते पैसे गेले परत मिळणे कठीण . पण त्या हि पेक्षा गेला तो विश्वास . 

आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी आपण आयुष्य पणाला लावतो , आपल्याला जे मिळाले नाही ते त्यांना मिळावे , कश्याचीही कमतरता त्यांना भासू नये म्हणून दोन दोन नोकर्या करून मुलांची फी भरणारे लोक मी पहिले आहेत . पण आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा मुलेच आपली अश्या वागण्यातून परतफेड करतात तेव्हा वाटते , कुठे चुकले आपले? कुठले संस्कार करण्यात कमी पडलो आपण ? आणि ह्या अश्या स्थितीतून बाहेर पडायला वेळ लागतो पण त्याही पेक्षा गेलेला विश्वास पुन्हा मिळत नाही त्याचा धक्का मोठा असतो. सांगणार कुणाला ? तोंड दाबून मुक्याचा मार अशी गत होते .

लक्ष्मी अशीच येत नाही , अथक परिश्रम करावे लागतात , पै पै साठवताना नाकी नौ येतात आणि अश्या घटना आपल्याला निराशेच्या गर्तेत नेतात .त्यांना सांगितले सर्व कागदपत्रे सांभाळ आणि ह्यापुढे  तुमच्या सही शिवाय अन्य कुणीही एकही पैसा काढणार नाही ह्याची खबरदारी घ्या . इथे राहू असल्यामुळे नेट ट्रान्स्फर करून पैसे गेले हे वेगळे सांगायला नको. 

मुलांवर आंधळे प्रेम करू नका. जेवायचे ताट द्या पण बसायचा पाट देवू नका. आपले सर्व हक्क आपल्याकडेच ठेवा . मुलांवर उत्तम संस्कार केले आहेत आपण आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात उभे राहण्याइतपत मदत , शिक्षण काय दिले नाही आपण . आता पुढचे त्यांनी बघायचे . आपण हयात आहोत तोवर सर्व आपले मग गेल्यावर त्यांचेच आहेत .आज मुलांना अनेक प्रलोभने सुद्धा आहेत , लाखात पगार आणि शो ऑफ करण्यासाठी अवलंबलेली महागडी जीवन शैली हि त्याची कारणे असावीत . आमच्या मागील पिढ्या जगल्याच कि त्या कुठे गेल्या होत्या उठसुठ पिझ्झा खायला. असो  ह्या सर्वातून निर्माण होणारी अनिश्चितता , निराशा आणि त्यातून म्हातारपणी निर्माण होणारी विकतची आजारपणे. ह्यात दोष आपलाच आहे. आजूबाजूच्या घटना माहित असूनही आपण डोळे उघडत नाही , मायेचा पूर येतो आणि विश्वास ठेवतो . हा विश्वासच पुढे जावून आपल्या उरलेल्या आयुष्याचे तीन तेरा वाजवतो. 

अनेक लोक ह्या शास्त्राला नावे ठेवतात , ठेवू देत , नावे ठेवल्यामुळे शास्त्राचे महत्व कमी अजिबात होणार नाही. पण त्या पेक्षा आपल्या आणि मुलांच्या येणाऱ्या सुना जावई घरातील सर्वांच्या पत्रिका समजून घेतल्यात तर आयुष्यात पुढे येणाऱ्या वळणांवर काय काय वाढून ठेवले आहे ह्याचा अंदाज नक्कीच येयील आणि त्याप्रमाणे वागता सुद्धा येयील. 

राहू हा क्षणाचाही विलंब देत नाही . भल्याभल्यांची झोप उडवतो तीही क्षणात . आपण फसले गेलो आहोत हे व्यक्तीला समजत सुद्धा नाही कारण आपल्या कित्येक पट हुशार राहू आहे. तो आपल्याला बरोबर हेरतो .  आजकाल सर्रास वापरल्या जाणार्या नेट बँकिंग, इंटरनेट टेक्नोलॉजी , gpay , मोबाईल बँकिंग ह्या अत्याधुनिक युगातील सोयी हा राहुचाच पिंजरा आहे त्याचा वापर सांभाळून केला पाहिजे . राहू हि अदृश्य शक्ती आहे जी दिसत नाही म्हणून बँकेच्या एका खात्यातून पैसे दुसर्या खात्यात जातात पण ते आपल्याला दिसत नाही हाच राहू . राहूच्या दशेत समाजात कमी वावर आवश्यक तेच बोला , फालतू बडबड टाळा. लोक आपला वापर करून घेतात आणि फेकून देतात . आपण वापरले गेलो आहोत ह्याचा त्रास पुढे राहू दशा संपेपर्यंत होत राहतो . म्हणून जेव्हड्यास तेव्हडे अगदी सर्वांशी . राहू अदृश्य शक्ती असल्यामुळे आपले कोण आणि परके कोण हे आपल्याला समजत नाही. नक्की कोण आपल्याला फसवत आहे ते तर अजिबात समजत नाही . आपली सगळी अक्कल हुशारी पणाला लावली तरी राहू समोर निभाव लागत नाही . शब्दांच्या कोत्या करणारे , स्वतःला लई हुशार समजणारे सुद्धा राहूच्या विळख्यात अलगद सापडतात इतका राहू सामान्य व्यक्तीच्या अवकलनाच्या पुढे आहे. ज्योतिष अभ्यासकांनी लग्नातील राहूचा विशेष अभ्यास करावा कारण लग्नात आपला मेंदू आहे जो विचार करतो. 

कुठलेही आईवडील मुलांना म्हातारपणी आम्हाला फसवं असे बाळकडू पाजत नाहीत पण फसवले जावू नये म्हणून आपल्या संपत्तीची काटेकोर व्यवस्था करताना दिसत नाहीत , इथेच चुकते . शास्त्राच्या माध्यमातून आपण शहाणे व्हावे आणि इतरानाही शहाणे करावे तसेच विश्वास पात्र कोण आहे हे तपासून पुढे जावे  ह्या उदात्त हेतूने आपल्यासमोर मांडलेला हा लेखन प्रपंच .  

सौ. अस्मिता दीक्षित 

संपर्क : 8104639230




No comments:

Post a Comment