|| श्री स्वामी समर्थ ||
मनुष्याला कुठे थांबायचे ते समजत नसले तरी आपल्या गुरुना आपल्याला कुठे थांबवायचे ते बरोबर समजते . त्याची प्रचीती आपल्याला आयुष्यभर पदोपदी येत असते , पण त्या वेळी आपल्याला ती समजत नाही कारण ती समजेल इतकी अध्यात्मिक उंची आपल्या साधनेने गाठलेली नसते . जसजसे आपण ह्या मार्गात पुढे जात राहू तसे प्रत्येक चांगल्या आणि वाईट घटनेचे अवलोकन करण्याची क्षमता आपल्यात येत असते .
मन का हो तो अच्छा , लेकीन ना हो तो और भी अच्छा...ह्याची प्रचीती येते . अनेकदा आपण आपल्या नातेवाईकांकडे जायला निघतो पण बस रिक्षा काहीच मिळत नाही . आपले जाणे रहित होते कारण त्या दिवशी तिथे न जाणे हेच आपल्या हिताचे असते . एखाद्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही कारण कदाचित तिथे मित्र संगत चांगली मिळणार नसते.
अनेकदा अगदी मनापासून आवडलेल्या स्थळा कडून नकार येतो कारण कदाचित मुलगी सतत online खरेदी करून नवर्याचे दिवाळे काढणारी असते . काही लोक आपल्याशी अचानक बोलायची बंद होतात , कारण आपल्याला समजत नाही पण त्यांचे आपल्या आयुष्यात असणे पुढे जावून आपल्याला किंवा त्यानाही त्रासदायक होणारे असते म्हणून त्यांना आपल्याशी न बोलायची बुद्धी देणारे दुसरे तिसरे कुणी नसून प्रत्यक्ष गुरूच असतात . आयुष्यातील घटनांचा क्रम लक्ष्यात घेतला तर प्रश्न समस्या निर्माण होतात पण त्यातून आपण सही सलामत बाहेरही पडतो ते केवळ त्यांच्यामुळेच .
जे जे काही होते आणि होणार आहे ते सर्व त्यांच्या लीला आहेत म्हणूनच ...संताच्या जे जे असेल मनी तेच येयील घडोनी , भरवसा त्यांच्या चरणी ठेवुनी स्वस्थ राहावे. अनेकदा आपण करत असलेल्या कामातून आपल्याला अलगद बाहेर काढून आपल्याला दुसर्याच कामात व्यस्त करून मार्गस्थ करणारे गुरूच असतात . महाराज आपले कधीही वाईट करत नाहीत आणि आपल्याकडून इतरांचे सुद्धा नुकसान होवून देत नाहीत .
अनेकदा आपल्याला खूप बोलण्यासारखे असते , पण ते तोंडातून चकार शब्द काढूनच देत नाहीत , आपल्या जीवाची घालमेल होते पण कालांतरानी अश्या काही घटना ते घडवतात कि विस्मयचकित व्हयायला होते . त्यांची इच्छा हि अंतिम इच्छा हे समजून जीवन जगणाऱ्या भक्तांचे कधीही नुकसान होत नाही . त्यांनी आपल्यासाठी जे योजलेले आहे ते सर्वोत्तम असणार ह्यावर आपला संपूर्ण विश्वास आणि गुरूंवर अढळ , नितांत श्रद्धा असली पाहिजे.
एखादी गोष्ट विलंबाने होते तेव्हा समजून जायचे ह्यात काहीतरी आहे, ह्या विलंबित काळात अनेकांचे अहंकार धुळीला मिळतात , मी मी म्हणणारे दिसेनासे होतात , आपण सर्व काही करू शकतो हा विचार किती बिनबुडाचा आहे पोकळ आहे ह्याची प्रचीती तेच दाखवतात , सहज वाटणाऱ्या गोष्टी कर्म कठीण करून ठेवतात आणि मग तो क्षण येतो जेव्हा आपलेच आपल्याला उमगू लागते आणि शेवटी आपण जेव्हा त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो तेव्हा सगळा गुंता ते अलगद सोडवतात आणि प्रश्न मार्गी लावतात .
त्यांचे अस्तित्व आहेच आहे , कुणी ते मानो अथवा न मानो . क्षणोक्षणी मिळणारी त्यांची प्रचीती आपल्याला हतबुद्ध करते , अनेकदा आपल्या बुद्धीला न झेपणाऱ्या घटना प्रत्यक्ष घडतात तेव्हा डोळ्यातून नुसते अश्रू येतात आणि आपण त्यांचे अस्तित्व मान्य करू लागतो .
ह्या ब्रम्हांडातील एका धुळीच्या कणा इतकेही अस्तित्व नसलेले आपण किती माज करत असतो , संपत्तीचा , ऐश्वर्याचा , शिक्षणाचा कि अजून कश्याचा . अरे ह्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे त्यांच्या समोर कसला आलाय माज . क्षणात उतरवतात ते आणि आपण आणि आपले अस्तित्व किती खुजे आहे ह्याची जाणीव सुद्धा करून देतात .
आयुष्यातील प्रत्येक घटना अर्थपूर्ण असते , आयुष्यात येणारी माणसे त्यांच्या आयुष्यातून निघून जाण्याच्या वेळा सर्व काही ठरलेले असते फक्त ते आपल्याला माहित नसते . जे होते आहे ते आणि होणार आहे हे त्यांच्या कृपेने हे मनात पक्के झाले कि मग काश्याचेही काहीही वाटत नाही . कारण अखेरच्या क्षणापर्यंत तेच आपल्याला सांभाळणार असतात .
श्री स्वामी समर्थ
सौ. अस्मिता दीक्षित
संपर्क : 8104639230
No comments:
Post a Comment